अमेरिकेनं लाखो गोळ्यांचा साठा केलाय, अणुबॉम्बच्या पुढे ही गोळी महत्त्वाची आहे ती यामुळे…

अमेरिकेन सरकारने नुकतंच २९० मिलियन डॉलर खर्च करून अँटी-रेडिएशन ड्रग विकत घेतली आहे. रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी न्यूक्लिअर हल्ल्याबाबत पुन्हा एक धमकीवजा सूचना जरी केली असून रशियाकडे असणाऱ्या पावरफुल अण्वस्त्रांचा उल्लेख केला आहे. त्यावर प्रतिउत्तर देत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी ‘जग आता अण्वस्त्र हल्ल्याच्या जवळ आहे’ असं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर खऱ्या अर्थाने न्यूक्लिअर युद्धाची चर्चा सुरु झाली.

अमेरिकेने खबरदारी घेत या अँटी रेडिएशन गोळ्या विकत घेतल्याचं सांगितलं जातंय.

फेब्रुवारी महिन्यापासून सुरु असलेलं रशिया-युक्रेन हे युद्ध संपण्याचं नाव घेत नाहीये. अनेकदिवस चालू असणाऱ्या या युद्धात आता रशियाने पुन्हा एकदा आक्रमक पावलं उचलत युक्रेनच्या राजधानीसह अनेक ठिकाणी बॉम्ब हल्ले केले आहेत. युक्रेनच्या म्हणण्यानुसार रशियाने चोवीस तासात ७५ क्षेपणास्त्रं युक्रेनच्या राजधानीवर डागली असून त्यातल्या तब्बल ४१ क्षेपणास्त्रांना हाणून पाडण्यात युक्रेन आर्मी यशस्वी ठरली आहे.

एकाएकी रशियाची झालेली ही आक्रमक भूमिका न्यूक्लियर वॉरला निमंत्रण आहे का? अशी सुद्धा एक शक्यता वर्तवली जात आहे. न्यूक्लियर हल्ला व्हायची नक्की किती शक्यता आहे? असं विचारलं तर काही विश्लेषकांच्या मते हल्ला होण्याची शक्यता कमी आहे. मात्र अमेरिकेने या धमकीला गांभीर्याने घेत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून या गोळ्या खरेदी केल्याचं सांगितलं जात आहे.

मात्र युद्धाच्या सुरुवातीला युरोपात या गोळ्या खरेदी करायचं प्रमाण खूप जास्त होतं. युरोपवर अण्वस्त्र हल्ला व्हायची शक्यता तशी कमी असली तरी मार्च महिन्यात पोटॅशियम आयोडाईडच्या गोळ्या विकत घ्यायचं प्रमाण झपाट्यानं वाढलं होतं. सध्या अमेरिकन सरकारने सुद्धा भविष्यात जर हल्ला झालाच तर प्रतिबंधक उपाय म्हणून नागरिकांच्या सुरक्षेसाठी आधीच गोळ्या विकत घेतल्या आहेत.

आता एवढी छोटी आयोडीनची गोळी नेमक अण्वस्त्र हल्ल्यापासून कसं वाचवते याबद्दल जाणून घेऊया.

Centers for Disease Control & Prevention या अमेरिकन हेल्थ एजन्सीच्या अधिकृत वेबसाईटवर या औषधाबद्दल माहिती दिली आहे. त्यानुसार अणुहल्ला झालेल्या भागात घातक आयोडीन I-131 हवेत तरंगू लागतात. हे घातक आयोडीनचे कण श्वासाद्वारे शरीरात गेले तर ल्युकेमियापासून घशात ट्युमर होईपर्यंत अनेक हानिकारक परिणामांना सामोरं जायला लागू शकत.

अणुहल्ल्यातून बाहेर पडलेलं किरणोत्सर्गी आयोडीन आणि पोटॅशियम आयोडाईड दोन्हीही थायरॉईडद्वारे शोषले जातात.

पोटॅशियम आयोडाईड सुद्धा एक प्रकारचं आयोडीन आहे पण फरक असा आहे की हे रेडिओऍक्टिव नाहीये. KI ही त्याची संज्ञा असून हे औषध अणुहल्ला झाल्यावर लगेच घेतलं तर त्याचा लवकर आणि जास्त प्रभाव दिसून येतो. कारण थायरॉइडने आधीच KI शोषून घेतलं असल्याने घातक आयोडीनचा शरीरात जायला जागा मिळत नाही.

हे औषध सहसा ४० वर्षाखालील लोकांना घ्यायचा सल्ला दिला जातो. पण अणुहल्ल्यानंतर किती प्रमाणात घातक आयोडीन शरीरात गेलय यावर त्याचा परिणाम अवलंबून आहे. हल्ल्यात झालेल्या फक्त आणि फक्त घातक आयोडीनपासून हे औषध तुमचं रक्षण करू शकत.

इतिहासात अगदी कमी वेळा या औषधाचा उपयोग करण्यात आला होता.

जपानमध्ये २०११ साली 9.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा मोठा भूकंप झाला ज्यामुळे त्सुनामी आली. ज्याचा मुख्यतः फुकुशिमा, मियागी आणि इवाते भागावर परिणाम झाला. जपानमधील या त्सुनामीने हजारो लोकांचा मृत्यू झाला होता.

यामुळे बाधित भागातील पायाभूत सुविधाच विस्कळीत झाल्या नाहीत तर फुकुशिमाच्या आपत्तीग्रस्त भागातील अणुविद्युत प्रकल्पांचाही संपूर्ण नाश झाला. त्सुनामीमुळे अणुस्फोटाच आलेलं एवढ संकट इतिहासात यापूर्वी कधीच पाहिल गेल नव्हत. जपानच्या सरकारकडून आपत्तीच्या भागात जायची बंदी केली गेली होती.

तसंच पोटॅशियम आयोडाईडच्या २ लाखाहून जास्त गोळ्या नागरिकांना देण्यात यायचा विचारही झाला होता.
तसंच युक्रेनच्या चेर्नोबिलमध्ये १९८६ साली अणु प्रकल्पात स्फोट झाला. त्याची तीव्रता एवढी जास्त होती की हिरोशिमामध्ये झालेल्या अणुहल्ल्यापेक्षा ४०० पट जास्त रेडिएशन या स्फोटातून बाहेर पडले. तेव्हा जीव वाचवण्यासाठी पोटॅशियम आयोडाईडचा उपयोग करण्यात आला होता.

हे औषध सध्या ८ कंपन्यांद्वारे मॅन्युफॅक्चर केलं जातं. ज्यात ५ कंपन्या भारतीय आहेत इतर काही जर्मन आणि चायनीज आहेत. भारतातून मोठ्या प्रमाणावर पोटॅशियम आयोडाईड निर्यात केली जाते. जवळपास ९८ देशांना भारताकडून हे औषध निर्यात केलं जातं. 2020-2021 साली (एप्रिल-नोव्हेंबर), भारताने 11.66 USD दशलक्ष किमतीच्या पोटॅशियम आयोडाइडची निर्यात केली आहे.

सध्याच्या काळात न्यूक्लिअर हल्ला न व्हावा या पद्धतीने प्रयत्न सुरु आहेत पण तो होणार का नाही हे येत्या काळात कळेलच. सध्या तरी तहान लागल्यावर विहीर खणण्याऐवजी अमेरिका आधीच तयारीसह हा हल्ला परतवायला तयार आहे हे दिसून येतंय. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की कळवा.

 हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.