एकेकाळी पिण्याच्या पाण्याचे वांदे असलेलं गाव आज ‘करोडपतींचं’ गाव बनलंय

आपला भारत देश एकेकाळी लय श्रीमंत होता म्हणतात, इतका की, इथून सोन्याचा धूर निघायचा. पण आपल्या या श्रीमंतीला  इंग्रजांची नजर लागली आणि त्यांनी आपल्या इथली सगळी श्रीमंती त्यांच्या देशात नेली. आता आज आपला देश वेगाने विकसित होणाऱ्या देशांपैकी एक जरी असला तरी अजून सुद्धा गरीब देशांच्या यादीत नाव येतं. 

म्हणजे एका सर्वेनुसार देशात आर्थिक परिस्थिती समान नाहीये, काही मोजकी मंडळी करोडपतींच्या यादीत येतात तर मोठा जनसमुदाय अजूनही गरीबी रेषेच्या खालीये. म्हणजे 10 घरापैकी 3 ते 4 घरचं आर्थिकदृष्ट्या चांगली असतील. पण भिडू आपल्या महाराष्ट्रातलं एक अख्खच्या अख्ख गाव करोडपतींच आहे. म्हणजे इथलं प्रत्येक कुटुंब लखपती – करोडपती आहे.

आता तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे. इथं काय पेट्रोलच्या खाणी आहेत की, सोन्याच्या. तर तुमच्या माहितीसाठी इथं या दोन्ही खाणी नाहीत तर इथले बहुतेक लोक हे शेतकरी आहेत.

हे गाव म्हणजे अहमदनगरमधलं हिवरे बाजार. जवळपास 305 कुटुंब असणाऱ्या या गावात 80 पेक्षा जास्त कुटुंब करोडपती आहेत. धक्का बसला असेल, पण एवढ्यावरचं नाही तर  या गावात एकही डास नाही.  गावातील सरपंच एक डास शोधण्यासाठी 400 रुपयांचे बक्षीस देतात. या गावात ना पाण्याची कमतरता आहे, ना हिरवळीची. उन्हाळ्यात या गावाचे तापमान आजूबाजूच्या गावांच्या तुलनेत 3 ते 4 अंशांनी कमी असतं. आता वाचताना जरा आश्चर्य वाटेल, पण स्टोरी सत्यघटनेवर आधारीत आहे.

बरं या करोडपती असलेल्या या गावावर काय कोणी जादूची कांडी नाही फिरवली. या गावाचं नशीब इथल्या गावकऱ्यांनीचं बदललंय. आणि या सगळ्यात महत्वाची भूमिका बजावली ती तिथले सरपंच पोपटराव पवार. तेच पोपटराव पवार ज्यांना भारत सरकारचा सर्वोच पद्मश्री पुरस्कार मिळालाय.

म्हणजे 1970 च्या दशकात हे गाव हिंदकेसरी पैलवानांसाठी प्रसिद्ध होते.  पण परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत गेली. 1990 मध्ये जर पाहिलं तर या गावात 90 टक्के गरीब कुटुंब होती.  प्यायलाही पाणी नव्हतं.   माहितीनुसार हिवरे बाजाराला 80-90 च्या दशकात पिण्यासाठी पाणी नसताना भीषण दुष्काळ पडला होता. दुष्काळामुळं काही लोक कुटुंबासह गाव सोडून निघून गेले. गावात फक्त 93 विहिरी होत्या.  पाण्याची पातळीही 82-110 फुटांवर पोहोचली.

आता सरकारी मदत तरी मिळून मिळून किती मिळणार. त्यामुळे इतक्या लोकांनी स्वतः आत्मनिर्भर होऊन, स्वतःला वाचवण्याची कसरत सुरू केली.  1990 मध्ये ‘संयुक्त वन व्यवस्थापन समिती’ ही समिती स्थापन करण्यात आली.  त्याअंतर्गत गावात विहिरी खोदणे, वृक्षारोपण करण्याचे काम श्रमदानातून सुरू करण्यात आले.  या कामात महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गत निधी मिळाला, त्यामुळे खूप मदत झाली.

पुडे 1994-95 मध्ये आदर्श ग्राम योजना आली, त्यामुळे या कामाला आणखी चालना मिळाली, त्यानंतर समितीने गावातील ज्या पिकांना जास्त पाणी लागते त्या पिकांवर बंदी घातली. आताच्या घडीला गावात 340 विहिरी आहेत. ट्युबवेल संपल्या आणि पाण्याची पातळी 30-35 फुटांवर गेलीये.

सरपंच पोपट राव यांच्या म्हणण्यानुसार, गावात 305 कुटुंबे असून त्यापैकी सुमारे 1250 लोक आहेत.  त्यापैकी 80 करोडपती कुटुंबे आहेत.  50 पेक्षा जास्त कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 10 लाखांपेक्षा जास्त आहे.  गावाचे दरडोई उत्पन्न हे देशातील पहिल्या 10 टक्के ग्रामीण भागातील सरासरी उत्पन्नाच्या दुप्पट 890 रुपये प्रति महिना आहे.

म्हणजेच गेल्या 15 वर्षात सरासरी उत्पन्न 20 पट वाढले आहे.सर्वेक्षणानुसार 1995 मध्ये 180 पैकी 168 कुटुंबे दारिद्र्यरेषेखाली होती.  1998 च्या सर्वेक्षणात ही संख्या 53 वर पोहोचली.  आणि आता या वर्गात फक्त तीन कुटुंबे आहेत.  गावाने दारिद्र्यरेषेचा स्वतःचा निकष लावला आहे.  या निकषांमध्ये वर्षाला 10 हजार.  खर्च करण्यास सक्षम नसूनही ते या श्रेणीत येतात.  हे मापदंड अधिकृत दारिद्र्यरेषेच्या जवळपास तिप्पट आहेत. 1995 मध्ये दरडोई उत्पन्न केवळ 830 रुपये प्रति महिना असताना, आज हे उत्पन्न 30,000 रुपयांपेक्षा जास्त झाले आहे.

पोपट राव यांच्या म्हणण्यानुसार,

गाव वाचवण्यासाठी यशवंत अॅग्री वॉटरशेड डेव्हलपर्स एनजीओसोबत पंचवार्षिक योजना तयार करण्यात आली.  या अंतर्गत गावात विहिरी खोदण्यात येणार होत्या.  झाडे लावायची होती.  100% शौचालय असलेल्या गावात गावाचा समावेश करण्यात येणार होता. लोक यात लगेच सामील झाले की, आणि त्यांच्यात असा काही जोश तयार झाला कि, पंचवार्षिक योजना दोन वर्षांतचं संपुष्टात आली.

आपल्या या कामगिरीमुळेच या हिवरे बाजारला अनेक पुरस्कार सुद्धा मिळालेत. यात 1995 सालचा महाराष्ट्र शासनाचा आदर्श गाव पुरस्कार, 2000 साली महाराष्ट्र शासनाचा यशवंत ग्राम पुरस्कार, 2007 चा भारत सरकारचा निर्मल ग्राम पुरस्कार, त्याच वर्षी भारत सरकारचा वनग्राम पुरस्कार, भारत सरकारचा राष्ट्रीय जल पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार, 2008 सालचा महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम पुरस्कार, आणि असे कित्यके पुरस्कार गावकऱ्यांनी आपल्या नावावर केलेत.

आता या हिवरे बाजारचं समृद्ध होण्यामागे काही सूत्र आहेत, जसं कि, रस्त्यावरची झाडं तोडू नका, कुटुंब नियोजन, नशाबंदी, श्रमदान, लोटा बंदी, प्रत्येक घरात शौचालय, ग्राउंड वॉटर मॅनेजमेंट. 

त्यामुळं भिडू पोपटराव आणि हिवरे बाजारच्या गावकऱ्यांसारखं मॅनेजमेंटजर प्रत्यक्ष गावाने केलं तर महाराष्ट्रातलंच काय संपूर्ण देशातील प्रत्येक गाव आदर्श गाव बनेल. 

हे ही  वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.