केंद्रीय मंत्री महाराष्ट्राच्या गाव खेड्यात घुसलेत; हे पाहिलं की कळतं भाजप का जिंकतं

केंद्रीय मंत्री सोमप्रकाश यांचा गेल्या तीन दिवसांपासून चालू असलेला सातारा दौरा कालच पार पडला. आता याची ठळक बातमी होण्याची शक्यता कमीच असल्याने तुमच्या वाचण्यात हे आलं देखील नसेल. त्याआधी अजून एक मंत्री एस पी बघेल यांनी २३, २४ आणि २५ ऑगस्टला हातकणंगले मतदारसंघाचा दौरा केला होता. त्याचबरोबर बिश्वेश्वर तुडु यांनी देखील ऑगस्ट महिन्यातच पालघर लोकसभा मतदारसंघाचा तीन दिवसीय दौरा केला होता.

हे सगळे मंत्री महाराष्ट्रा बाहेरचे आहेत. त्यामुळे असे मंत्री त्यांच्या मंत्रालयासंबंधीचं एखाद उदघाटन करायचं असेल तर काही तासांपुरते येतात आणि जातात असंच आपण आतापर्यंत पहिलं आहे मात्र हे मंत्री तीन- तीन दिवस काय करतायेत हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.

तर हे मंत्री महाराष्ट्रात येत आहेत भाजपच्या लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत. 

आता हि केंद्र सरकराची योजना नसून भाजप पक्षनेतृत्वाने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणलेला एक आराखडा आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाने आपल्या मित्रपक्षांच्या मदतीने चारशेहून जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी देशभरातील ११६ लोकसभेच्या जागांवर पक्षाकडून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. 

यामध्ये महाराष्ट्रातील १६ लोकसभा मतदारसंघांचं समावेश आहे. 

या प्लॅननुसार राज्यातील सोळा मतदारसंघांमध्ये पुढील १८ महिने ही ‘प्रवास योजना’ सुरू राहणार आहे. त्यासाठी सहा केंद्रीय मंत्री नेमले असून ते प्रत्येक मतदारसंघात तीन दिवस मुक्काम करतील. त्यावेळी स्थानिक मतदार, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह शासकीय अधिकार्‍यांशी ते संवाद साधणार आहेत. मतदारसंघातील संघटनात्मक, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्राशी निगडीत कार्यक्रमांचे आयोजन असा राजकीय कार्यक्रम आखण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आठ वर्षांच्या कालावधीत झालेल्या कामांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत घेतला जाईल. बूथ कार्यकर्ते, योजनांचे लाभार्थी आणि मतदारसंघातील स्वातंत्र्यसैनिकांचीही या मुक्कामात भेट घेतली जाणार आहे. स्थानिक प्रशासनाने अनेक केंद्रीय योजना या मतदारसंघांमध्ये राबवल्या. त्याचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचला का ? याचा आढावा प्रशासकीय पातळीवर घेतला जाणार आहे.

मात्र ही सगळी ध्येय धोरणं झाली असली तरी ज्याप्रमाणे ही योजना राबवली जात आहे. ज्या नेत्यांची आपल्याला नावंही माहित नाहीत ते नेते अगदी जिल्ह्याच्या जिल्हा पिंजून काढत आहेत. विशेष म्हणजे २०२४च्या लोकसभा निवडणुकांना अजून अडीच वर्षांचा टाइम असताना भाजपने आतापासूनच या निवडणुकांची तयारी करण्यास सुरवात केली आहे. 

यातला पहिला मुद्दा म्हणजे १६ मतदारसंघांच्या निवडीमागचं लॉजिक 

२०१९ ची लोकसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेने एकत्रित लढवली होती. त्यावेळी भाजपला २३ जागांवर विजय मिळवता आला होता. तर सेनेने १८ जागांवर विजय मिळवला होता. पहिलं म्हणजे भाजपने आता मात्र आता हरलेल्या आणि सेनेने जिंकलेल्या अश्या दोन्ही जागांवर लक्ष केंद्रित केलं आहे.

बुलढाणा, चंद्रपूर, हिंगोली, औरंगाबाद, पालघर, कल्याण, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड, बारामती, शिरूर, शिर्डी, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या १६ मतदारसंघाचा समावेश आहे. 

यातील बुलढाणा, हिंगोली, पालघर , कल्याण, दक्षिण मध्य मुंबई ,दक्षिण मुंबई ,शिर्डी, हातकणंगले,रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर या दहा मतदारसंघात सेनेचे खासदार म्हणून निवडून आले होते. यापैकी  दक्षिण मध्य मुंबईमधून निवडून आलेले अरविंद सावंत आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून निवडून आलेल्या विनायक राऊत यांचा अपवाद सोडता बाकीच्या आठ मतदारसंघातील खासदार शिंदे गटाबरोबर गेले आहेत आणि त्यांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे. 

मात्र तरीही भाजपने आपले मिशन या जागांवर चालू ठेवले आहे.

 त्यामुळे शिंदे गट आला तरी ठीक नाहीतर स्वबळावर या जागा निवडुन आणण्यासाठी भाजपने ताकद पणाला लावलेली दिसते. त्यातच अनेक वर्षे युतीत असल्यामुळे या जागांवर आपली ताकद भाजपाला मोजता आली नव्हती. तसेच विरोधी काँग्रेस राष्ट्रवादीची या विरोधी विचारधारेची मतं वळवण्यापेक्षा हिंदुत्वाच्या मुद्यावर सेनेकडील मतं वळवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं सांगण्यात येत आहे. 

याच प्रयत्नांचा भाग म्हणून जरी २०१९ यामध्ये सेनेचा खासदार निवडून आला नसला तरी सेनेचे पारंपारीक बालेकिल्ले राहिलेल्या औरंगाबाद, रायगड आणि शिरूर या तीन लोकसभा मतदारसंघाचाही या १६ मतदारसंघांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. 

तर चंद्रपूर हा असा मतदारसंघ आहे जिथं भाजपचा उमेदवार काही हजारांनी पडला होता. 

यामध्ये बारामती आणि सातारा हे दोन असेही मतदारसंघ निवडण्यात आले आहेत जिथं भाजप कधीही स्ट्रॉंग नव्हती मात्र मागच्या दोन निवडणुकीत भाजपणे या दोन्ही जागांवर तुल्यबळ फाइट देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे राज्यात २०२४ ला भाजपने ४५+ जागा निवडून आणण्याचे जे मिशन आखलं आहे त्याला डोळ्यासमोर ठेवूनच या १६ जागांची अगदी टोटल रिसर्च करून निवड करण्यात आल्याचं दिसतं.

दुसरा महत्वाचा मुद्दा ठरतो तो म्हणजे या १६ जगणासाठी करण्यात आलेली मंत्र्यांची निवड.

सध्या जी माहिती उपलब्ध आहे आणि आतापर्यंत ज्या मंत्र्यांनी या १६ मतदारसंघातील काही मतदारसंघांना भेटी दिल्यात त्यानुसार मंत्र्यांची निवडही जाणीवपूर्वक करण्यात आल्याचं दिसतं. 

त्यानुसार बुलढाणा आणि औरंगाबादसाठी भूपेंद्र यादव, चंद्रपूरसाठी  हरदीपसिंग पुरी, पालघरसाठी  विश्वेश्वर तुडू , दक्षिण मध्य मुंबई, कल्याणसाठी अनुरागसिंग ठाकूर,दक्षिण मुंबई-नारायण राणे, शिर्डी आणि रायगडसाठी  प्रल्हाद पटेल,बारामतीसाठी निर्मला सीतारमण, साताऱ्यासाठी सोमप्रकश, हातकणंगले मतदारसंघासाठी एस पी बघेल रत्नागिरी सिंधुदुर्गासाठी अजय कुमार मिश्रा यांची निवड झाल्याची माहिती मिळते.ओडिशाचे विश्वेश्वर तुडू हे केंद्रात आदिवासी राज्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्रातही त्यांना आदिवासीबहुल अशा पालघर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

त्याचबरोबर शहरी -ग्रामीण, एकाद्या मतदारसंघाचं विरोधी पक्षासाठी असलेलं महत्व या सर्व गोष्टीवर बारकाईने लक्ष दिल्याचं दिसतं. 

यासाठी बारामती मतदारसंघाचं उदाहरण घेता येइल.  बारामती मतदारसंघ १९९१ पासून शरद पवारांच्या ताब्यात आहे. १९९१ ला अजित पवार, शरद पवार आणि आता सुप्रिया सुळे अशा पवार कुटुंबातील तीन व्यक्ती इथून निवडून जात आहेत. त्यामुळे पवारसांठी या मतदार संघ अतिशय महत्वाचा आहे. जर हा मतदारसंघ हातातून गेल्यास राष्ट्रवादीला तो मोठा धक्का असू शकतो. 

यासाठी भाजपने या जागेवर २०१४ पासूनच विशेष लक्ष दिल्याचं दिसतं.

२०१४ मध्ये महादेव जानकर यांना पाठिंबा देत भाजपने सुप्रिया सुळेंच्या विरोधात बारामतीतून उभं केलं होतं आणि त्यांनी सुप्रिया सुळे यांना तगडी फाइट दिली होती. २०१९ मध्ये भाजपच्या कांचन कुल यांनी ५ लाखांपेक्षा जास्त मतं घेतली होती. मात्र दोन्ही वेळेस भाजपला यश काय आलं नाही आणि आता भाजपने या मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना. 

अगदी पुण्याला लागून असलेला बारामती मतदारसंघात एक तृतीयांशपेक्षा जास्त शहरी मतदान आहे. त्यामुळे निर्मला सीतारामन ज्या केंद्रतील मोठ्या मंत्री आहेत आणि एक नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे पुण्याच्या आजूबाजूचा शहरी मतदार भाजपकडे वळवू शकतात. त्यातच जेव्हा निर्मला सीतारामन यांचा बारामती दौरा होईल तेव्हा निश्चितच त्याची जोरदार चर्चा होईल. राजकीय वर्तुळात चर्चाही अशा चालू आहेत की केंद्रातूनच एकदा मोठा उमेदवार बारामतीला लोकसभेची निवडणूक लढवायला पाठवू शकतंय. 

तिसरं म्हणजे दौऱ्याच स्वरूप 

या दौऱ्यात हे केंद्रीय मंत्री अगदी शेवटच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिसतात. उदाहरण घ्यायचच झाल्यास सातारा मतदारसंघाचं घेता येइल. केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री सोमप्रकाश यांनी या मतदार संघाचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी बूथलेव्हलचे पदाधिकारी ते सरपंच, पंचायत समिती सदस्य या तळाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. अगदी महिला तालुकाध्यक्षांच्या निवडी मंत्र्यांच्या हस्ते देण्यात आल्या.

यामुळे ग्राऊंडवरील कार्यकर्त्यांमध्ये पक्षात आपली दखल घेतल्याची भावना निर्माण होते. त्यांच्यात उत्साह संचारतो आणि पक्ष केवळ निवडणुकीपुरताच आपल्याला विचारतो हि भावना कुठेतरी दूर होण्यास मदत होते. 

त्याचबरोबर या नेत्यांची वक्तव्ये देखील लक्ष वेधून घेण्यासारखी असतात. देशातून प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व संपून जाईल, शरद पवार यांचे साताऱ्यातील अस्तित्व संपले आहेत अशी जेव्हा केंद्रीय मंत्री सोमप्रकाश यांनी वक्तव्ये केली तेव्हा त्याच्या या वक्तव्यांची जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार चर्चा झाली होती.

त्याचबरोबर मतदारसंघातील प्रसिद्ध अशा मंदिरांना भेटी देणे, तिरंगा रॅली सारखे कार्यक्रम राबवणे या अशा कार्यक्रमातून पक्षाची हिंदुत्वाची आणि राष्ट्र्वादाची विचारधारा पसरवण्याचे काम देखील या दौऱ्यांमार्फत चालू असल्याचं दिसतं.

त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या १८ महिने आधीच भाजपने चालू केलेल्या अशा तयारींमुळे भाजप इतर पक्षांच्या पुढे का आहे याची आयडिया येते. 

 हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.