जगातील पहिली महिला डॉक्टर ५६ वर्ष स्त्रीत्व लपवून पुरुष बनून राहिली…

भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण…?

यावर आपल्याकडे नेहमी वाद होतात. आनंदीबाई जोशी, रखमाबाई राऊत यांच्या बरोबरीने कादंबरी गांगुली यांचे नाव देखील घेतले जाते.

पण “जगातील” पहिली महिला डॉक्टर कोण..?

असे विचारलं तर सहसा आपल्याला माहीत नसते. अलेक्सा, सिरी, गुगलअसिस्टंट यांना विचारले तर एलिझाबेथ ब्लॅकवेल यांचे नाव सांगितले जाईल मात्र हे खरे नाही.

जगातील पहिली महिला डॉक्टर आहे जेम्स बॅरी

एखाद्या व्यक्तीचे आयुष्य सिनेमातील कथेपेक्षा रोमांचक असू शकेल याचे उत्तम उदाहरण म्हणजे जेम्स बॅरी. स्वतःचे स्त्रीत्व लपवून, पुरुष बनून मेडिकल कॉलेजला एडमिशन मिळवले, नंतर ५६ वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर जेव्हा तिचा मृत्यू झाला तेव्हा तिचे स्त्रीत्व बाकीच्यांना कळले आपण सिनेमामध्ये अनेक वेळा स्त्री पुरुष एकमेकांच्या वेशात येताना पाहिलं असेल (खर तर लिंगबदलाचा मेकओव्हर एवढा फालतू असतो की शेंबडे पोरग पण ओळखेल)

मात्र जेम्स ५६ वर्ष स्त्रीत्व लपवून पुरुष बनून राहिला आणि मृत्यूनंतर एक दंतकथा बनून. हे खरे की पहिल्या नोंदणीकृत महिला डॉक्टर एलिझाबेथ ब्लॅकवेल याच आहेत मात्र त्यांच्या तीस वर्ष आधी मार्गारेट नावाची मुलगी डॉक्टर बनण्यासाठी जेम्स बॅरी हे नाव घेऊन मेडिकल कॉलेज मध्ये दाखल झाली होती.

तिला असे का करावे लागले…

याचे उत्तर आहे तेव्हा डॉक्टर होण्यास महिलांना अटकाव होता. तीस वर्षांनंतर खुद्द एलिझाबेथ ब्लॅकवेल यांचे अर्ज जवळजवळ सगळ्या मेडिकल कॉलेजने नाकारले होते. जिनिव्हा मेडिकल कॉलेजने देखील अट घातली की शिकत असलेल्या १५० पैकी एका विद्यार्थ्याने पण हरकत घेतली तर तिला प्रवेश नाही मिळणार. मतदान घेण्यात आले. आश्चर्य म्हणजे सर्वांनीच एकमताने तिचे स्वागत केले..

तीस वर्षांपूर्वी अर्थात अधिक प्रतिकूल परिस्थिती होती. म्हणून मार्गारेटला “चाचा ४२०” बनण्याशिवाय पर्याय नव्हता.

इंग्लंड मधील कॉर्क शहरात १७८९ साली जेरेमिहा आणि मेरी-ॲन बल्कली या जोडप्याला पहिल्या पोराच्या पाठीवर एक पोरगी झाली. तिचे नाव ठेवले मार्गारिटा. नक्की जन्म दिवस कोणता हे कुणालाच माहीत नाही. जेरेमिहाने कॉर्क मधील बाजारपेठेतील वजनकाटा कंत्राटी पद्धतीने चालवायला घेतला होता. मार्गारेटचा बाप पण उचापती आणि मोठा भाऊ जॉन पण. श्रीमंत बापाची पोर पटवण्याचा नादात लय पैसे फुंकले जॉनने.

जेरेमीहाने पण चर्चविरोधी वक्तव्य करून सगळ्यांचा रोष ओढवून घेतला. परिणामी त्याचे कंत्राट काढून घेण्यात आले. जवळ होते ते पैसे असेच उडून गेले. लोकांना टोप्या घालून जॉन परागंदा झाला..

लोकांची कर्जे चुकवली नाही म्हणून जेरेमिहाला कारावास भोगावा लागला, घरातील एक पुरुष जेल मध्ये, एक फरार. संकटाचा भडिमार मात्र अशातच मार्गारेटचा मामा त्याच्या बहिणीसाठी पुरेसे पैसे ठेऊन वारला. मार्गारेटचा मामा जेम्स बॅरी (ज्याचे नाव ती पुढे वापरणार होती) हा प्रसिद्ध चित्रकार होता.

कला महाविद्यालयात प्राध्यापक, मोठमोठ्या लोकांमध्ये उठबस होती. सरदार, उमराव लोकांशी चांगले संबंध होते. मामाने ठेवलेले पैसे मिळवण्यासाठी मायलेकींनी लंडन गाठले.. आणि तिथून पुढे मार्गारेटच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले.

त्याआधी मार्गारेटचे बालपण तसे बेरंगी… गरिबघरची पोरगी.. गावात मिळेल तेव्हढे शिकली… तारुण्याची नवलाई जेव्हा आयुष्यात रंग भरणार तेव्हा तिला जवळच्या नातलगाकडून लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागले. (बहुतेक वेळा जवळच्या नातेवाईकांकडूनच होत असतो) घटना किती दाबली तरी निसर्ग त्याची कठोरता दाखवायला चुकत नाही..

पोरवयात मार्गारिटा एका पोरीची आई झाली.. बाळाचे नाव ठेवले ज्युलियन. मात्र पुढे तिची ओळख बाहेरच्या जगाला मार्गारेटची बहिण म्हणूनच करून देण्यात आली.

लंडनमध्ये मामा जेम्स बॅरीचे जवळचे मित्र जनरल फ्रान्सिस्को मिरांडा आणि सरदार डेव्हिड स्टुअर्ट यांचा मायलेकींशी संपर्क आला. मार्गारेटची हुशारी आणि होतकरूपणा त्यांना खूप भावला. त्यांनी मार्गारेटला शिक्षिका बनण्यासाठी प्रोत्साहन दिले..

मात्र घरचे अठरा विश्व दारिद्र्य काढायचे असेल तर त्याकाळात बेस्ट पर्याय होता सर्जन बनणे. मार्गारेटला मुलाचे रुप देऊन डॉक्टर बनवायचे ठरवले. मार्गारेट बल्कलीचे नवीन सर्वसमावेशक नाव झाले “जेम्स मिरांडा स्टुअर्ट बॅरी.” मार्गारेटच्या आयुष्यातील “स्त्रीपण” झाकले गेले.. नवीन रूप घेतलेला जेम्स बॅरी १८०९ मध्ये आईसोबत एडनबर्ग मध्ये दाखल झाला..

एडनबर्ग म्हणजे त्याकाळी वैद्यकीय शिक्षणाचे माहेरघर होते.

विशीमधला जेम्स तिथे दाखल झाला. जेम्स म्हणजे मिसरूड, आवाज न फुटलेला कोवळा, नाजूक पोरगा दिसे. हे अगदीच पौगंडावस्थेतील चिकणे पोरगे. लोकांना त्याचा संशय यायला लागला. मुलगी असेल म्हणून नाहीतर वय वाढवून सांगत आहे हा आरोप. (म्हणजे सोंग चांगले जमले होते) त्याला मेडिकल कॉलेजकडून अंतिम परीक्षेस बसण्यास मनाई करण्यात आली. मात्र डेव्हिड स्टुअर्ट यांनी आपले राजकीय वजन वापरून जेम्स साठी परिक्षेची परवानगी पदरात पाडून घेतली.

तीन वर्षात म्हणजे १८१२ साली जेम्स हा “डॉ. जेम्स” झाला. लगोलग पुढच्या वर्षात सर्जरीचा अभ्यासक्रम देखील जेम्सने पूर्ण केला.

शिक्षण पूर्ण झाले.. पण नोकरीचे काय..मूळचा प्लॅन असा होता की शिक्षण पूर्ण झाल्यावर जेम्स बॅरी व्हेनेझुएला येथे जाऊन वैद्यकीय व्यवसाय सुरू करेल. जनरल फ्रान्सिस्को मिरांडा हे व्हेनेझुएला येथे मोठे अधिकारी.. ते यासाठी जेम्सला मदत करणार होते.

पुरूष वेष त्यागून जेम्स ला नॉर्मल स्त्रीचे जगणे सुरू करता येणार होते..

मात्र ह्याचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत इकडे महाभारत घडले होते. व्हेनेझुएला मध्ये स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले.. त्यात मिरांडाचा सक्रिय सहभाग होता. लोकांनी त्यालाच नेता म्हणून निवडलेले होते. लढा यशस्वी झाला. दीड दोन वर्ष मिरांडा तेथील “हुकुमशहा” झाला. मात्र स्पेनने व्हेनेझुएला ताब्यात घेतले आणि मिरांडाला अटक झाली. जेम्स बॅरीचे भविष्य टांगणीला लागले.

जेम्सकडे आता एकच पर्याय.. पुरुष अवतार सुरू ठेवणे..

शिक्षण पूर्ण करून त्याने सैनिकी नोकरी पकडली. वैद्यकीय तपासणी आवश्यक नाही अश्याच पोस्टसाठी प्रयत्न करण्यात हशील होता. हॉस्पिटल सहायक म्हणून जॉईन झालेला जेम्स प्रमोशन वर प्रमोशन मिळवत इन्स्पेकटर जनरल म्हणून रिटायर झाला. तेव्हा ब्रिटिश वसाहती जगभर पसरल्या होत्या. नोकरीच्या निमित्ताने जेम्सचे पण भरपूर फिरणे झाले.

मात्र जिथे जाईल तिथे त्याने अन्याय, विषमता याविरुद्ध आवाज उठवला. त्याचा स्वभाव आक्रमक होता. (कदाचित त्याला मनातील गंड झाकायचा असेल.) आरडा ओरड करणे, हातातील वस्तू फेकून मारणे, सर्वांसमोर अपमान करणे इत्यादी बाबीमुळे तो अनेकांचा नावडता होता.. “नर्सेस डे” ज्यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो त्या “फ्लॉरेन्स नाईटिंगेल” यांच्यासोबत जेम्सने क्रिमियामध्ये काम केले होते. त्या म्हणतात की,

“आयुष्यात भेटलेली सर्वात क्रूर निष्ठुर व्यक्ती म्हणजे जेम्स”

तरी देखील जेम्सला वेळोवेळी पदोन्नती मिळत होती कारण त्याचे सर्जन म्हणून असलेले कौशल्य वादातीत होते. आफ्रिका खंडातील पहिले यशस्वी सी सेक्शन (बोलीभाषेत आपण सिझर म्हणतो ते) ऑपरेशन करण्याचा पराक्रम जेम्स बॅरीच्या नावावर आहे. यशस्वी म्हणजे आई आणि बाळ दोघे सुखरूप. १८२६ मध्ये ही खूप मोठी घटना होती.. इतकी महत्त्वाची की झालेल्या बाळाचे नावपण जेम्स बॅरी ठेवण्यात आले (आता हा तिसरा जेम्स बॅरी..)

जेम्सबाबत प्रसिद्धी आणि कुप्रसिध्दी हातात हात घालून होती.

जवळ ५० वर्षाच्या त्याच्या कारकीर्दीत त्याने खूप जणांशी पंगा घेतला. अनेक वेळा अधिकाऱ्यांचा अवमान केल्या प्रकरणी त्याच्यावर दावा दाखल केला गेला. मात्र त्यातून निर्दोष सुटला. तो त्याच्या मताबद्दल ठाम असे. सैनिकांचा जीवनमान दर्जा उंचावण्यासाठी त्याने कायम प्रयत्न केले. फक्त सैनिक नाही तर कैदी, मजूर, मनोरुग्ण, गुलाम या सर्वांना चांगले पौष्टिक अन्न, सर्वांना समान पाणी, स्वच्छ वातावरण मिळेल यासाठी तो आग्रही होता.
दहा वर्षाच्या सेवा काळात त्याने केप टाऊन मधील पाणी वितरण व्यवस्था सुधारून श्रीमंत आणि गरीब, मालक आणि गुलाम या सर्वांनाच सारखे स्वच्छ पाणी मिळेल अशी व्यवस्था बनवली.
केप टाऊन मध्ये गवर्नर होते “लॉर्ड चार्ल्स समरसेट”. दहा वर्षात समरसेट आणि जेम्सचे नाते खूप बहरले होते. कदाचित समरसेट या एकमेव व्यक्तीला माहीत असावे की जेम्स स्त्री आहे. जेम्सला गवर्नर निवासात राहण्याची सोय केली गेली. बाहेर गवगवा खूप वाढला.(मात्र इथे लोकांना समलिंगी संबंधांचा संशय.. स्त्री पुरुष नाही.) कुणा अनामिक नतदृष्ठाने तर पोस्टर टांगले ज्यात समरसेट आणि जेम्सची समलिंगी क्रिया सुरू आहे. (लोकांना दुसऱ्याच्या फाटक्यात पाय घालायला खूप आवडते) समलिंगी संबंध हे त्याकाळी कायद्याने गुन्हा होते. या दोघांची पण चौकशी झाली मात्र त्यातून निष्पन्न काही झाले नाही.
समरसेटवर जेम्सचा खरचं खुप जीव होता.
पुरुष म्हणून जगताना त्याची नैसर्गिक ऊर्मी त्याने दाबून ठेवली होती अनेक वर्ष.. ऐन तारुण्यात त्याच्या जीवाची किती घालमेल होत असेल. ना शरीरसुख. ना कसला साजशृंगार. पुरुषी वागणे अन् पुरुषी जगणे. मेंदुतली संप्रेरके किती धिंगाणा घालत असतील. त्याला समरसेट रूपाने प्रेम मिळाले. आणि त्याच्याशी तो एवढा प्रामाणिक राहिला की बदली होऊन परदेशी गेलेला जेम्स जेव्हा समरसेट आजारी आहे असे समजले तेव्हा विना रजा, विना परवानगी समरसेट जवळ येऊन राहिला. अगदी समरसेट च्या मृत्यूपर्यंत.
नंतर मात्र त्याच्या आयुष्यात कोणी आले नाही. की कोणाला नंतर कसला संशय आला नाही. आपल्या स्त्री शरीराचे देणे असलेले उभार लपविण्यासाठी तो सहा टॉवेल वापरायचा. त्याचे कपडे बदलत असताना कुणाला दिसणे शक्य नव्हते. एक विश्वासू नोकर आणि एक कुत्रा एवढेच त्याचे सख्खे. बाकी कुणाशी जास्त जवळीक नाही. त्याने शेवटची इच्छादेखील हीच लिहिली होती की माझी कोणती चिरफाड करू नये. असतील त्या कपड्यात मला दफन करण्यात यावे.

मात्र त्याची शेवटची इच्छा पूर्ण झाली नाही.

वयाच्या ७० वर्षी त्याला सरकारने निवृत्ती घ्यायला लावली (त्याची अजून काम करायची इच्छा होती).. नंतर सहा वर्षांनी १८६५ मध्ये अतिसाराने त्याचा मृत्यू झाला. प्रेताला अंघोळ घालणारी बाई “सोफिया बिशप जेम्सचे कपडे दूर करताना हादरली.. ही तर बाई आहे.. जिच्या पोटावर बाळंतपणाच्या खुणापण आहेत. तेव्हा समजले की मागच्या ५६ वर्ष एक बाई पुरुष बनून ब्रिटिश मिलिटरीमध्ये सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकून आपले काम करून गेला.
जगभर आपले हसे व्हायला नको म्हणून ब्रिटिश सेनेने डॉ. जेम्स बॅरी संबंधित सर्व कागदपत्र गोपनीय सदरात १०० वर्षासाठी “कुलूपबंद” केली. बातमी पण बाहेर नसती पडली. जर सोफियाचे तोंड पैसे देऊन बंद केले असते.
सोफिया बिशप मोठी धूर्त होती. जेम्सचे डेथ सर्टिफिकेट बनवणाऱ्या मेजर मॅकिंननकडे ती गेली आणि गप बसायचे पैसे मागितले. मॅकिंननने ते दिले नाहीत म्हणून ती प्रेसकडे गेली आणि बातमी बाहेर आली. तिला आणि प्रेसला उत्तर देताना मॅकिंनन यांनी जे उद्गार काढले ते महत्त्वाचे..

” जेम्स स्त्री आहे की पुरुष याच्याशी मला काही घेणे नाही”

कोणत्याही पेशात व्यक्ती स्त्री आहे की पुरुष याने फरक पडत नसतो. त्या व्यक्तीची क्षमता महत्त्वाची असते. जेम्स बॅरीने दाखवून दिले की तो स्त्री असो, पुरुष असो (किंवा काही लोक म्हणतात त्याप्रमाणे उभयलिंगी) त्याचे मूल्यमापन त्याच्या कामावर केले गेले पाहिजे.
शिक्षण पूर्ण करत असताना जेम्सने प्रबंध सादर केला होता त्याच्या अर्पणपत्रिकेत देखील जेम्स म्हणाला होता.. “एक लहान मुलगा सांगतोय या दृष्टीने या प्रबंधाकडे पाहू नका..” तेव्हा कमी वयाचा दिसणे हाच त्याच्यापुढे प्रमुख मुद्दा होता.. मात्र हेच लिंगाबद्दल देखील लागू होते. कोणत्या लिंगाचा व्यक्ती सांगतो यापेक्षा तो काय सांगतो हे महत्त्वाचे. लिंगाधारीत विषमता प्रत्येक घरात अजूनही आहेच.. जी न्यूनगंड देण्याशिवाय काहीच करत नाही. अठरा वर्षाची मार्गारिटा मोठ्या भावाला पत्रात म्हणते,
” मी जर मुलगा असते तर सैन्यात गेले असते.”
यापुढे तरी जगात कोणत्या मुलीला “मी मुलगा असते तर” हा निबंध लिहायला लागू नको या भावनेने जेम्स बॅरीची माहिती पोस्ट करत आहे. त्याकाळात जरी तिची अस्तित्वाची लढाई असली तरी मला स्वतःला जेम्स बॅरीने पुरुषी व्यवस्थेला मारलेली चपराक वाटते.
होमो सेपियन सेपीयन म्हणजे अती हुशार हुशार म्हणवल्या जाणाऱ्या मानव वंशातील ५०% भाग असलेल्या महिलांना कोणतेच अधिकार संघर्षाशिवाय मिळत नसतील तर आपण कसले डोंबलाचे हुशार !!!!
  •  डावकिनाचा रिच्या  

 

हे ही वाच भिडू  

Leave A Reply

Your email address will not be published.