भारताचा अभिमान असलेली जगातली सगळ्यात मोठी रेडिओ दुर्बीण जिओमुळे अडचणीत आलीय.

मानवी डोळ्यांना दिसणाऱ्या ग्रह, ताऱ्यांच्या पलीकडेही एक न दिसणार ब्रह्मांड असतं, असं आपण आजवर ऐकत आलोय. अशा आपण ना पाहिलेल्या ब्रह्मांडातून पृथ्वीवर विशिष्ट प्रकारची किरण सातत्याने येत असतात.

या किरणांच्या साहाय्याने ब्रह्मांडाचा वेध घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या वैज्ञानिकांनी येणाऱ्या सर्व प्रकारच्या विद्युतचुंबकीय लहरींपासून प्रतिमा विकसित करणाऱ्या दुर्बिणी तयार केल्या आहेत. त्यापैकी रेडिओ लहरींवर आधारित जगातील सर्वांत मोठी रेडिओ दुर्बीण महाराष्ट्रात आहे.

जायंट मीटरव्हेव रेडिओ टेलिस्कोप – जीएमआरटी असं तीच नावं 

पण आज या जायंट मीटरव्हेव रेडिओ टेलिस्कोपला ब्रम्हांडातून फोटो घेण्याला रिलायन्स जिओमुळे अडचण येत आहे. 

आधी ही जायंट टेलिस्कोप काम कशी करते ते बघूया.. 

अवकाशीय घटकांतून उत्सर्जित होणाऱ्या विद्युतचुंबकीय लहरींपैकी आपण फक्त डोळ्याला दिसणाऱ्या दृष्य प्रकाश लहरी पाहू शकतो. परंतु मानवी डोळ्याला न दिसणाऱ्या मायक्रोवेव्ह, अतिनील किरणे, रेडिओ लहरींचे उत्सर्जनही विविध अवकाशीय घटकांतून होत असते. ब्रह्मांडात अब्जावधी प्रकाशवर्षे दूरपर्यंत रेडिओ लहरी प्रवास करत असतात.

पृथ्वीवर येणाऱ्या अशा लहरींचे संकलन करणारी सध्या अस्तित्वात असलेली आधुनिक दुर्बीण आपल्याकडे आहे. पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळील खोडद या गावात या दुर्बिणीचे केंद्र आहे. जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) नावाने ओळखली जाणारी ही दुर्बीण तीस रेडिओ संग्राहकांचा (ॲन्टेना) समूह आहे.

सुमारे पंचवीस किलोमीटर व्यासाच्या परिसरात इंग्रजी ‘वाय’ आकारामध्ये हे संग्राहक बसविण्यात आले आहेत. या पैकी एका ॲन्टेनाचा व्यास हा ४५ मीटर आहे. हे सर्व ॲन्टेना एकमेकाला ऑप्टिकल फायबर केबलने जोडलेले आहेत. दुर्बिणीने संग्रहित केलेल्या सर्व रेडिओ लहरींचा या ऑप्टिकल फायबर केबलच्या माध्यमातून खोडद येथील केंद्रावर संग्रह केला जातो. संग्रहित केलेल्या रेडिओ लहरींमधून आवश्यक रेडिओ लहरींचे पृथक्करण करण्यात येते.

निरीक्षण घ्यायचे आहे अशा ताऱ्यातून बाहेर पडलेल्या रेडिओ लहरी आधी उपलब्ध माहितीच्या आधारे शोधल्या जातात. या रेडिओ लहरींच्या माध्यमातून संबंधित ताऱ्याची किंवा अवकाशीय घटकाची प्रतिमा मिळविली जाते. त्यासाठी खोडद येथे कंट्रोल रूम तयार करण्यात आली आहे.

जगात इतरत्र अजून ही सुविधा उपलब्ध नाही. भारतीय शास्त्रज्ञ सहा ते २० मिलीसेकंद एवढ्या कालावधीच्या पल्सारच्या निरीक्षणासाठी अद्ययावत जीएमआरटीचा वापर करत आहेत. 

या दुर्बिणीने आजवर हायड्रोजन वायुमेघ, पल्सार, तारे, आकाशगंगा आदींचा शोध घेतला आहे. जीएमआरटीने दीडशे मेगा हर्ट्झला संपूर्ण आकाशाचे स्कॅनिंगही केले आहे. त्यातून मिळालेला मोठ्या डेटावर अजूनही संशोधनाचे काम चालू आहे.

पण अडचण कुठं येत आहे ? 

तर ज्या भागात हि दुर्बीण आहे, त्या भागात असणाऱ्या मोबाईल कंपन्यांना, उद्योगांना तिथं उच्च दर्जाच्या रेडियो लहरी वापरण्यास परवानगी नाही. कारण आकाशगंगेची निरीक्षण घेण्यात जीएमआरटीला अडचण येते.

मात्र इथं दूरसंचार मंत्रालयाने रिलायन्स जीओला जीएमआरटीच्या परिसरात नेटवर्क उभारण्यासाठी विशिष्ट वारंवारितेच्या रेडिओ लहरी वापरण्याची परवानगी दिली होती. आणि याच जिओच्या लहरींचा जीएमआरटीला अडथळा ठरू लागला. 

पुढं तीन वर्षांनंतर पाठपुरावा करून आदेशात चूक असल्याचं दूरसंचार मंत्रालयान मान्य तर केलं. पण यात प्रशासनाने कोणती कारवाईच केली नाही. इथली परिस्थिती जैसे थे चं आहे. 

या दुर्बिणीची काळजी इथं राहणाऱ्या स्थानिक लोकांनीच खूप घेतली आहे. कधी आपल्या शेतात एखादा प्रयोग करायचा असेल तर इथले शेतकरी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतात. जेणेंकरून दुर्बिणीला तिच्या कामात काही अडथळा नको म्हणून. पण पुढं तर धक्कादायक म्हणजे या परिसरातून भविष्यात रेल्वे जाणार आहे. मोठ्या गोंगाटामुळे कदाचित ही दुर्बीण येत्या वीस वर्षातच बंद करावी लागेल.

जगभरातील रेडिओ खगोलशास्त्रज्ञांनासाठी वैज्ञानिक तीर्थक्षेत्र असलेली ही दुर्बीण महाराष्ट्रासाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. भविष्यात ब्रह्मांडातील नवनवीन शोध या माध्यमातून पुढे येणार आहेत. पण या दुर्बिणीबद्दल जी सरकारी अनास्था आहे ती मात्र कमी झाली पाहिजे इतकंच.

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.