४४ वर्षात तिसरी निवडणूक, दरवेळी आडवं येणारं एकच आडनाव, “पायलट”..

गहलोतांनी माघार घेतली. काहीही केल्या सचिन पायटल मुख्यमंत्री होता कामा नयेत असच त्यांच म्हणणं होतं. या राड्यानंतर अखेर कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक ठरली ती शशी थरूर आणि मल्लिकार्जून खर्गेंच्यात. म्हणजे म्हणायला हा तिरंगी सामना आहे. केएन त्रिपाठी, शशी थरूर आणि खर्गेंच्यात असला तरी वनसाईड खर्गे निवडणून येणार अस म्हणलं जात आहे.

आत्ता गेल्या ४४ वर्षांच्या राजकारणात कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी होणारी ही तिसरीच निवडणूक आहे. पहिली निवडणूक झाली होती ती १९९६ साली. दूसरी निवडणूक झाली होती ती २००० साली आणि तिसरी होतेय ती २२ वर्षांनंतर म्हणजे २०२२ साली..

अन् या तिन्ही निवडणूकांच वैशिष्ट म्हणजे पायलट हे आडनाव..

गोष्ट रितसर समजून घेण्यासाठी पहिल्या निवडणूकीचा किस्सा पाहूया. 

या निवडणूकीत राजेश पायलट, शरद पवार आणि सिताराम केसरी उमेदवार होते.

पैकी सिताराम केसरींना 6,224 पवारांना 882 तर राजेश पायलट यांना 354 मतं मिळाली होती. काँग्रेस कुटुंबाच्या बाहेरचा काँग्रेस अध्यक्ष बनण्याची ही दुसरीच वेळ होती. मात्र काँग्रेसने यावेळीही एकमताने अध्यक्षपदाचा उमेदवार निवडायचं ठरवलं होतं. त्यानुसार गांधी घराण्याने जेष्ठ नेते सीताराम केसरी यांचं नाव पुढं केलं.

मात्र शरद पवार आणि राजेश पायलट यांनी आपली उमेदवारी देत ही परंपरा मोडीत काढली होती. शरद पवार यांनी आपली पक्षातील ताकद पाहता आपणंच खरे दावेदार असल्याचं वाटत होतं म्हणून अर्ज दाखल केला होता तर राजेश पायलट यांनी सीताराम केसरी हे दुबळे उमेदवार असल्याचं सांगत आपला अर्ज भरला होता.

सीताराम केसरी पुढे केवळ १९९८ पर्यंतच अध्यक्षपदी राहिले आणि त्यानंतर त्यांना अत्यंत अपमानास्पदरित्या पदावरून काढून सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्ष झाल्या. मात्र सोनिया गांधी यांचं नेतृत्व मान्य नसल्याने त्यांच्या परकीय नागरिकत्वाचा मुद्दा पुढं करत शरद पवार, तारिक अन्वर , पी.ए. संगमा यांनी सोनियांना विरोध करण्यास  सुरवात केली.  

याविरोधात सोनिया गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र याने काँग्रेस नेते मोठ्या प्रमाणात सोनिया गांधींच्या विरोधात उभे राहिले आणि शरद पवार, तारिक अन्वर , पी.ए. संगमा यांना काँग्रेसमधून बाहेर पडण्यास मजबूर करण्यात आलं. 

मात्र जरी हे नेते बाहेर पडले असले तरी सोनिया गांधी यांचा काँग्रेस अध्यक्षपदाचा मार्ग बिनविरोध झाला नाही. 

आता सोनिया गांधी यांच्या विरोधात दोन नेते आघाडीवर होते ते म्हणझे राजेश पायलट आणि जितेंद्र प्रसाद. दोघांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी कॅम्पेन करायला देखील सुरवात केली होती. मात्र याच दरम्यान जून २००० ला राजेश पायलट यांचा कार अपघातात मृत्यू झाला. 

नोव्हेंबर २००० मध्ये जेव्हा काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लागली तेव्हा जितेंद्र प्रसाद यांनी सोनिया गांधींच्या विरोधात अर्ज भरला. मात्र त्यात त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. सोनिया गांधींच्या विरोधात उभारलेल्या जितेंद्र प्रसाद यांना 94 मतं मिळालेली तर सोनिया गांधींना 7448 मतं मिळाली.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या दोन्ही निवडणुकीत राजेश पायलट चर्चेत राहिले.

त्यानंतरची तिसरी निवडणूक म्हणजे २०२२ ची. आत्ता चर्चेत आले ते सचिन पायलट. गांधी घराण्याचे एकनिष्ठ असणाऱ्या गहलोत यांना गांधी कुटूंबाचा पाठींबा होता. या पाठिंब्यावर ते कॉंग्रेसचे अध्यक्ष होतील हे जवळपास निश्चित होतं.

पण सामन्याला रंगत आली ती पायलट यांच्या भूमिकेमुळं. गहलोत कॉंग्रेस अध्यक्ष होणार असतील तर त्यांनी एक पद एक व्यक्ती नियमानुसार मुख्यमंत्रीपद सोडवं यासाठी डाव टाकण्यास सुरवात केली. दूसरीकडे आपण दोन्ही पदांवर राहू यासाठी गहलोत यांनी फिल्डिंग लावली. मात्र कॉंग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक लढवणारच असू तर मुख्यमंत्रीपदामुळे मिळणारा प्रोटोकॉल आवश्यक असल्याचं मत गहलोत समर्थकांकडून देण्यात येवू लागलं.

इथेही डाळ शिजत नाही हे लक्षात येताच कोणीही मुख्यमंत्री म्हणून चालेल पण पायलट चालणार नाहीत अशी भूमिका अशोक गहलोत यांनी घेतली. या सर्व घडामोडींची अखेर झाली ती गहलोतांच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीतून माघार घेण्यात. आणि या सर्व घडामोडींमागे मुळ दुखणं होतं ते म्हणजे सचिन पायलट यांची भूमिका.

सचिन पायलट यांनी मुख्यमंत्रीपदाचा हट्ट धरला नसता तर गहलोत हे सहजपणे कॉंग्रेस अध्यक्ष होवू शकले असते. ठरल्याप्रमाणे गांधी कुटूंबाला देखील आपल्या पसंती क्रमांकावर असणाऱ्या पहिल्या व्यक्तीला कॉंग्रेसचं अध्यक्ष करता आलं असतं.

वास्तविक राजस्थानसारख्या राज्याचे तीन टर्म मुख्यमंत्री, गांधी घराण्याशी असेलेली निष्ठा, २४* ७ राजकारण करण्याची क्षमता आणि ओबीसी चेहरा ही सर्व बलस्थानं असल्याने गांधी घराण्याने अशोक गेहलोत यांना पहिली पसंती दिली होती. काँग्रेस हायकमांडचा यामागचा एक दुसरा एक प्लॅन असल्याचं सांगितलं जात होता, तो म्हणजे राजस्थानमधील पायलट विरुद्ध गेहलोत हा वाद निकाली काढणं.. 

मात्र अशोक गेहलोतांनी या खेळीचा वापर देखील आपलं राजस्थानचं वर्चस्व कायम राखण्यासाठीच केली.

गेल्या तिन्ही टर्म जेव्हा काँग्रेसची सत्ता आली तेव्हा त्यांच्याच गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली आहे. २०१८ मध्ये सचिन राजेश पायलट यांचे सुपुत्र सचिन पायलट यांनी जवळपास गेहलोत यांच्याकडून मुख्यमंत्रीपद खेचूनच घेतलं होतं की अखेरच्या क्षणी कधीकाळी पोट-पाण्यासाठी जादूगारी केलेल्या गेहलोत यांनी हायकमांडवर जादू केली आणि मुख्यमंत्रीपद आपल्याच पारड्यात पडून घेतलं.

मात्र मुखमंत्रीपदाची आकांक्षा बाळगून असलेल्या सचिन पायलट यांच्यासाठी हा धक्का होता. त्याचबरोबर  वडिलांपासून चालत आलेल्या पायलट विरुद्ध गेहलोत राजकीय संघर्षात सचिन पायलट यांना पुन्हा गेहलोत यांना पुन्हा मात खावी लागली होती. गेहलोत मुख्यमंत्री आणि सचिन पायलट उपमुख्यमंत्री असा निर्णय हायकमांडणे दिला होता. 

मात्र त्याचवेळी सचिन पायलट यांना पुढच्या काळात मुख्यमंत्रीपदाच आश्वासन देण्यात आलं होतं असं सांगण्यात येत होतं.

पण पुढे जाऊन अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याची कोणतीच शक्यता निर्माण होऊ दिलं नाही. मधल्या काळात २१ आमदारांना सोबत घेऊन सचिन पायलट यांनी बंड देखील केलं मात्र काँग्रेस हायकमांडने हे बंड देखील शांत गेलं.

मात्र काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सचिन पायलट यांना पुन्हा संधी चालून आली होती.  काँग्रेसमध्ये १९७८ नंतरची तिसरी निवडणूक आणि पायलट हे नाव पुन्हा चर्चेत आलं. 

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.