राजकारणाचा नाद असणारे कित्येक जण कार्यकर्ते बनून राहतात, फक्त एखादाच रमेश खंडारे होतो

२०१९ इकडे राज्याच्या राजधानीत सत्ता नाट्य सुरु होते. भाजप आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री पदावरून वाद सुरु होता. वेळेत सरकार स्थापन न झाल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. यामुळे सगळ्या राज्यात याच विषय ट्रेडिंग होता.

या सगळ्या गोंधळात वऱ्हाडी भाषेतील एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता.

त्यात एक जण म्हणत आहे की, राज्यपाल म्हणत आहेत रमेश खंडारेला मुख्यमंत्री करायचे ठरले आहे. मुंबईत अशा प्रकराची चर्चा आहे. तुझा नंबर सापडला नाही. राज्यपाल एसटी ने तुला भेटायला येत आहे. 

तर रमेश खंडारे म्हणतात, त्यांना सुरक्षा नाही का. मी मुख्यमंत्री व्हायला तयार आहे पण मला मजबूत सिक्युरिटी पाहिजे. त्याशिवाय जमणार नाही. पद भेटलं नाही तरी चालतं. पैशाशिवाय मी मुख्यमंत्री पद स्वीकारणार नाही. देशाची सुरक्षा पण करू, पगार पण नाही. मला अशा गोष्टींची गरज नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. 

यानंतर रमेश खंडारे यांचे राजकारणावर भाष्य करणारे एक-एक व्हिडीओ व्हायरल होऊ लागले. 

रमेश खंडारे हे मूळचे अमरावती जिल्ह्यातील वरुडचे. 

पत्नी, दोन मुली आणि मुलासह ते राहतात. बोलण्यामुळे जेवढे रमेश खंडारे फेमस आहेत तेवढेच कामासाठी ते प्रसिद्ध आहेत. घरोघरी जाऊन गॅस शेगड्या दुरुस्त करण्याचे काम खंडारे करतात. ॲटलस सायकल वरच त्यांनी आपले दुकान थाटले आहे. गेली ३० वर्ष याच सायकलवरून ते फिरून व्यवसाय करतात. 

रमेश खंडारे यांच्या शेजारी राहणाऱ्या शिवदास भंडारी यांनी सांगितले की, खंडारे यांचे १० पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यांना लहानपणापासून न्यूज बघणे आणि पेपर वाचण्याचा छंद होता. त्यातूनच त्यांना राजकारणाबद्दलची आवड निर्माण झाली.  

जेव्हा त्यांनी गॅस शेगडी दुरुस्तीचा व्यवसाय सुरु केला तेव्हा त्यांचे वरुड मधील लोकांशी बोलणे वाढले होते. खंडारे राजकारणा बद्दल बोलू लागल्यावर आजूबाजूचे लोक ऐकत बसायचे. वरुड मधील बाजारातून खंडारे जातांना कोणीही त्यांना थांबवून बोलायचे. तसा खंडारे यांना कुठलाही विषय वर्ज नाही, पण राजकारणात विशेष रुची. 

आपणच पंतप्रधान, राष्ट्रपती होणारे असे ते बोलून दाखवत. त्यामुळे खंडारे यांच्या सोबत बोलणाऱ्याचे चांगलेच मनोरंजन होत. त्यांच्या बोलण्यातील विश्वास, त्यांची वऱ्हाडी भाषा, त्यांचे हावभाव पाहून त्यांचे चाहते दिवसेंदिवस वाढू लागले होते. वरुडचे नगरसेवक धनंजय बोकड हे आपल्या मागण्यांसाठी नगरपरिषदे समोर आंदोलन करत होते. खंडारे दिवसभर आंदोलनाच्या ठिकाणी बसत. यावेळी तिथल्या लोकांशी राजकारणार गप्पा मारायचे.

खंडारे यावेळी लोकल राजकारणाबद्दल एक शब्दही बोलत नसायचे. मात्र त्याच वेळी आपल्याला पंतप्रधान, राष्ट्रपती बनायचे असल्याचे सांगत. 

मेरे को देस का पीएम बना दो. सरकार कैसी चलानी चाहिये, मैं बताता हू, एक साल मौका देव मेरे को. दोन्ही पार्ट्यायले धक्का पोहचन, अशी कायदे बनवीन सारखे या सारखे डायलॉग मारून खुश करत. यावेळी तिथे जमलेले लोक त्यांचे व्हिडीओ काढत. 

रमेश खंडारे यांचा महाराष्ट्राला कळाले ते २०१९ मध्ये झालेल्या व्हायरल व्हिडीओमुळे.

कॉन्ट्रॅक्टर असणारे अतुल फुटाणे हे वरुड मधील एका दुकानात थांबले होते. त्यावेळी रमेश खंडारे काही कामानिम्मित तिथे आले होते. नेहमी प्रमाणे रमेश खंडारे राजकारणावर गप्पा मारत होते. आपल्याला राष्ट्रपती, पंतप्रधान होण्याची आवड असल्याचे सांगितले.

फुटाणे यांनी अगोदर त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. मात्र, त्यानंतर खंडारे हे काही इंटरेस्टिंग बोलत असल्याने फुटाणे यांनी त्यांना गप्पा मारायला घरी बोलावले. दुसऱ्या दिवशी फुटाणे ज्यावेळी खंडारे यांचा व्हिडीओ काढला त्यावेळी ते राज्यभर फेमस झाले. 

यानंतर दिवसेंदिवस रमेश खंडारे फेमस होऊ लागले होते. 

तेव्हा रमेश खंडारे यांना लोक विचारायचं की, तुम्ही राष्ट्रपती, पंतप्रधान होणार असल्याचे सांगता मात्र तुमचा नेमका पक्ष कोणता आहे. यावेळी रमेश खंडारे यांनी राष्ट्रीय एकता विचार मंच हा पक्ष काढला आहे. या पक्षाचा डेमो सुद्धा त्यांनी तयार केला आहे.

जेव्हा हा डेमो पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, प्रियंका गांधी पाहतील तेव्हा ते सुद्धा राष्ट्रीय एकता मंचात येतील अशा विश्वास रमेश खंडारे यांना आहे.  

तर काही जण रमेश खंडारे यांना मनोरुग्ण असल्याचे म्हणत होते. मात्र जेव्हा त्यांच्या बद्दल  जाणून घेतल्यावर वेगळीच माहिती समोर आली. रमेश खंडारे हे मनोरुग्ण किंवा वेडसर नाहीत. खंडारे हे लहानपणा पासून विनोदी स्वभावाचे आहेत. फक्त ते आपल्या कल्पनेत रमणारे व्यक्ती आहेत. त्यांना इतर बाबींचे सुद्धा चांगले ज्ञान आहे. त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर ‘व्हेरी गुड’.            

 हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.