आदिपुरुषच्या टिझरवरुन वाद चालूये, पण रामायणात राम आणि रावणाचं वर्णन असं आहे…

बाहुबली फिल्ममधून धुरळा उडवणाऱ्या प्रभासच्या आदिपुरुष सिनेमाची वाट सगळेच बघत आहेत. सगळ्यांचं लक्ष लागलेल्या आदिपुरुष सिनेमाचा टिझर अखेर २ ऑक्टोबरला रिलीज झाला. पण जसा हा टिझर रिलीज झाला त्याचबरोबर सोशल मीडियावर अनेकांनी या टीझरची खिल्ली उडवायला सुरुवात केली.

अनेकांनी आदिपुरुषमध्ये रावणाची भूमिका साकारणारा सैफ अली खान रावण नाही तर औरंगजेब आणि अल्लाउद्दीन खिल्जीसारखा दिसतोय अशा कमेंट केल्या आहेत.

सोशल मीडियाच्या पाठोपाठ आता काही हिंदू संघटना आणि राजकीय नेत्यांनी सुद्धा सिनेमात दाखवण्यात आलेल्या रावणाच्या पात्रावर आक्षेप घेतला आहे.

एकीकडे या सिनेमासाठी २१ वर्ष काम करणारे फिल्मचे दिग्दर्शक ओम राऊत यांची मेहनत आहे. तर दुसरीकडे रावणाचे पात्र दाखवताना पौराणिक ग्रंथांमधील उल्लेखांना सपशेल धुडकावून लावण्यात आलंय असा हिंदू संघटनांचा आरोप आहे.

पण आरोप केल्या जाणाऱ्या या टीझरमध्ये खरंच काय दाखवलंय..

यात मोठ्या प्रमाणावर वीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. यात रावणाने निळ्या रंगाचं कवच घातलेलं आहे. त्याच्या डोक्यावर कोणत्याच प्रकारचा मुकुट नाही. ज्याप्रमाणे हॉलिवूड सिनेमातले पात्र दाखवण्यात येतात त्याचप्रमाणे रावणासह सर्व पात्रांना दाखवण्यात आलंय, अशी टीका होतीये.

आता या सिनेमात दाखवण्यात आलेल्या रावणाच्या पात्रावरून वाद सुरु आहे पण खऱ्या रामायण ग्रंथांमध्ये राम आणि रावणाचा वर्णन फार वेगळं आहे.

रामायण ग्रंथाच्या वेगवेगळ्या आवृत्त्या आहेत. हे महाकाव्य अनेक ऋषींनी आणि संतांनी स्वतःच्या ज्ञानानुसार वेगवेगळ्या काळात लिहिलंय. जगभरात रामायणाच्या अंदाजे ३०० आवृत्त्या सापडतील. पण या आवृत्त्या वेगवेगळ्या असल्या तरी या ग्रंथांमध्ये राम आणि रावणाची कथा थोड्याफार फरकाने सारख्याच पद्धतीनं सांगण्यात आली आहे.

या ग्रंथांमध्ये ७ खंडात वर्णन केलेलं वाल्मिकी रामायण हे सगळ्यात पहिले आणि मूळ रामायण मानले जाते. १२ व्या शतकात तामिळ भाषेत लिहिलेल्या ‘कंबन रामायणा’त १ खंड कमी आहे. तर आधुनिक इतिहासात गोस्वामी तुलसीदास यांनी १६ व्या शतकात अवधी भाषेत ‘रामचरितमानस’ हा ग्रंथ लिहिला. यात सुद्धा वाल्मिकी रामायणाप्रमाणे ७ खंड आहेत.

याव्यतिरिक्त वेगवेगळे रामायण आहेत आणि त्यातील संदर्भ सुद्धा वेगवेगळे आहेत. पण राम आणि रावणाचे मूळ उल्लेख बघायचे असतील तर सर्वात प्रथम वाल्मिकी रामायणात बघावं लागेल.

वाल्मिकी रामायणात सुंदरकांड आणि युद्धकांडात रावण कसा दिसत होता याचं वर्णन करण्यात आलंय. सुंदरकांडातील एकोणपन्नासाव्या सर्गात, लंकेत सीतेच्या भेटीला गेलेल्या हनुमानास बंदी बनवून रावणाच्या समोर सादर केल्याचा प्रसंग आहे.

रावणासमोर नेल्यानंतर हनुमान जेव्हा रावणाला बघतात तेव्हा ते रावणाचं वर्णन करतात.

“महाप्रतापी रावणाने मोत्यांनी मढवलेला मुकुट धारण केलाय. रावणाचे दहा मस्तक मंदराचल पर्वताप्रमाणे दिसत आहेत. त्याच्या मोठ्या भुजांवर चंदन लावलेलं आहे तसेच त्यावर बांधलेले बाजूबंद पाच फण्याच्या भुजंगासारखे दिसत आहेत. त्याच्या अंगावर मौल्यवान दागदागिने आहेत. त्याने  मौल्यवान रेशमाचे कपडे घातले आहेत.”

“त्याचा चेहरा चंद्रासारखा असून सूर्याला झाकून असलेल्या ढगांसारखा दिसतोय. त्याच्या लाल लाल डोळ्यांमुळे भीती निर्माण होते. त्याचे ओठ लांब होते तर मोठ मोठे दात साफ केल्यामुळे पांढरे शुभ्र आणि चमकत होते. त्याच्या मंत्र्यांसोबत बसलेला रावण इंद्रापेक्षा जास्त तेजस्वी दिसत होता,” अशा पद्धतीने सुंदरकांडात रावणाचं वर्णन करण्यात आलंय.

तर युद्धकांडात जेव्हा रावण युद्धभूमीवर येतो तेव्हा विभीषण रामाला रावणाचा परिचय करून देताना सांगतो…

“उत्तम घोडे जुंपलेल्या आणि चमचमणाऱ्या रथावर जो तेजस्वी आणि बलवान व्यक्ती आहे तोच रावण आहे. ज्याने सूर्यासारखा चकाकणारा मुकुट धारण केलाय, ज्याच्या कानात कुंडलं आहेत, शरीर पर्वतासारखं मोठं आणि धिप्पाड छाती आहे. ज्याप्रमाणे महादेव भुतांमध्ये शोभून दिसतात त्याचप्रमाणे रावण राक्षसांमध्ये शोभून दिसतोय.” असं विभीषण सांगतो.

तेव्हा रावणाला पाहून राम सुद्धा म्हणतात, “वाह! खरंच राक्षसराज रावण अतिशय तेजोमय आणि पराक्रमी आहे. त्याच्या चेहऱ्यावरच्या प्रकाशामुळे त्याचा चेहरा सुद्धा नीट दिसत नाही. असं तेज तर कोणत्या देवाच्या सुद्धा चेहऱ्यावर नाही.” 

रावणाचं केवळ एकाच दशेतील वर्णन करण्यात आलंय, मात्र रामाचे वर्णन राजा आणि वनवासी या दोन परिस्थितीत करण्यात आलं आहे.

‘जेव्हा राम अयोध्येतील राजकुमार असतात तेव्हा त्यांचे कपडे रेशमाचे असतात. अंगावर मौल्यवान आभूषण असतात, रामाच्या शक्तिशाली भुजा आणि धिप्पाड छाती असते, चेहरा अतिशय तेजस्वी असतो, तसेच ते धनुर्विद्येत निपुण असतात. त्यांचं सुंदर शरीर शारीरिक अवयवांनी सुशोभित आहे तर बळ आणि पौरुष अजिंक्य आहे. त्यांना युद्धात हरवणं अशक्य आहे.’ असं वर्णन करण्यात आलंय.

तर जेव्हा ते वनवासी असतात आणि युद्धासाठी लंकेच्या जवळ येतात तेव्हा त्यांची अवस्था वेगळी असते

त्यांचे हात सापासारखे बारीक झालेले असतात, राजभोगात असताना ज्याप्रकारे शरीरयष्ठी असते ती बदललेली असते. पूर्वी राजसुखात राहणारे राम आता हाताची उशी करून जमिनीवर झोपलेले असतात. 

अशाप्रकारे वनवासातील रामाचा उल्लेख वाल्मिकी रामायणात करण्यात आलाय.

तर गोस्वामी तूलसीदास यांनी लिहिलेल्या रामचरितमानस ग्रंथात सुद्धा राम आणि रावणाचा उल्लेख करण्यात आलाय. 

परंतु हा ग्रंथ वाल्मिकी रामायणाच्या नंतरचा आहे तसेच संस्कृत श्लोकांऐवजी अवधी दोह्यांमध्ये लिहिण्यात आलाय, त्यामुळे त्यात काही बदल दिसतात.    

वाल्मिकी रामायणात युद्धाच्या प्रसंगात रावणाला दहा डोके दिसत नाहीत, मात्र रामचरितमानस ग्रंथात युद्धाच्या वेळेस राम रावणाचे दहा डोके आणि चार हात तोडतात, तेव्हा ते पुन्हा पुन्हा परत निर्माण होतात असा उल्लेख आहे. तर रावणाच्या दिसण्याचं वर्णन वाल्मिकी रामायणातील रावणासारखंच आहे. रावण हा तेजस्वी, शक्तिशाली आणि महापराक्रमी आहे असं वर्णन करण्यात आलंय. 

तर रामचरितमानस मधील रामाचा उल्लेख वाल्मिकी रामायणापेक्षा थोडा वेगळा आहे.  

वाल्मिकी रामायणात रामाचा उल्लेख अयोध्येचा धर्मपरायण राजा या पद्धतीने करण्यात आलाय. रामाला देवाचा अवतार असल्याचा उल्लेख फार तुरळक आहे. मात्र रामचरितमानस मध्ये दैवत्वाची जोड देणारे प्रसंग आणि उल्लेख जास्त आहेत. मात्र रामाच्या दिसण्याचं वर्णन अगदी वाल्मिकी रामायणातील रामासारखंच करण्यात आलंय.

वाल्मिकी रामायण, रामचरितमानस यांप्रमाणे तामीळमधील कदंब रामायण, जैन धर्मातील रामायणाचे उल्लेख तसेच इतर प्रति आणि पोथ्यांमध्ये रामायणात स्थानिक कथेनुसार बदल आढळतात. जसे की वाल्मिकी रामायणात सीता ही जनकाला जमिन नांगरताना सापडते. तर कर्नाटकातील लोककथांमध्ये सीता ही गर्भवती रावणाच्या पोटी जन्म घेते असे उल्लेख आहेत.

अशा प्रकारचे वेगवेगळे बदल वगळले तर राम आणि रावणावर आधारलेल्या रामायणाचा मूळ गाभा मात्र तसाच असलेला दिसतो. मात्र ग्रंथांमध्ये उल्लेख असलेल्या रावणापेक्षा सिनेमातील रावण वेगळा दाखवण्यात आलाय, असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही.

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.