रशियाकडून वापरल्या जाणाऱ्या कामिकाझे ड्रोन्समागे जापनीज इतिहास दडला आहे
रशिया आणि क्रिमियाला जोडणारा पूल युक्रेनने पडल्यानंतर रशियाने युक्रेनवर बॉम्ब आणि मिसाईल्सचा मारा करण्यात प्रचंड वाढ केलीय. रशियाकडून दरवेळी नवनवीन अस्त्रांचा वापर केला जात आहे. यापूर्वी रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हवर ८० क्रूझ मिसाईल डागल्या होत्या. त्या हल्ल्यात १९ लोक मृत्युमुखी पडले असून १०० हुन अधिक जण गंभीर जखमी झाले होते.
पण आता रशियाने मिसाईलसोबतच इराणी बनावटीच्या कामिकाझे ड्रोन्सचा वापर सुरु केलाय. रशियाकडून युक्रेनची राजधानी कीव्हवर ३० कामिकाझे ड्रोन्सचे हल्ले करण्यात आले आहेत यात ८ जण ठार झाले आहेत.
काही सप्ताहांपूर्वी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर झेलेन्स्की यांनी रशियाकडून इराणी बनावटीचे ड्रोन्स वापरले जात आहेत, असा आरोप इराणवर केला होता. तेव्हा इराणकडून हे सगळे आरोप फेटाळून लावण्यात आले होते. तसेच इराणकडून रशियाला कोणत्याही प्रकारच्या शस्त्रांचा पुरवठा करण्यात आला नाही असं सांगण्यात आलं होत.
पण रशियाने वापर केल्यामुळे जगभर टीका झालेले हे आत्मघाती ड्रोन्स पुन्हा एकदा चर्चेत आलेत.
प्रामुख्याने इराणमध्ये बनवण्यात येणाऱ्या या ड्रोन्सची बनावट एका छोट्या रॉकेटसारखी असते. हे ड्रोन लॉन्च केल्यानंतर टार्गेटच्या जवळ जातात आणि त्यावर स्वतःला आदळून घेऊन टार्गेटला नष्ट करतात. अगदी दूरवर असलेल्या टार्गेटला सुद्धा हे ड्रोन अचूकपणे ओळखते आणि त्याचा विनाश करते.
या ड्रोनची इंटेलिजन्स व्यवस्था अतिशय जबरी आहे. लॉन्च केलेला कामिकाझे ड्रोन लॉन्चनंतर आकाशात जाऊन स्थिर राहतो. जेव्हा ड्रोनला शत्रूची खात्री पटते तेव्हाच हे ड्रोन टार्गेटवर स्वतःला आदळून घेते. हे ड्रोन स्वस्त आणि किफायतशीर असतात आणि रडारच्या माध्यमातून या ड्रोन्सना ओळखता येऊ शकत नाही. कामिकाझेच्या या वैशिष्ट्यांमुळेच या ड्रोनला इतकं घातक आणि आत्मघाती मानलं जातं.
पण या इराणी ड्रोन्सना कामिकाझे हे जापनीज नाव कसं काय मिळालं असेल?
तर याचं कारण इतिहासात दडलंय. हे ड्रोन्स बनवण्यामागे कामिकाझे या जापनीज सैनिकांकडून प्रेरणा घेण्यात आलीय त्यामुळे या ड्रोन्सला कामिकाझे हे नाव देण्यात आलंय. कामिकाझे या शब्दाचा अर्थ ‘दैवी वारा’ असा होतो. १२८१ मध्ये जपानवर पश्चिमेकडच्या मंगोलांनी आक्रमण केलं होतं तेव्हा जपानी लोकांनी मंगोलांचा हल्ला परतवून लावला होता. तेव्हापासून कामिकाझे शब्द प्रचलनात आहे.
या शब्दाचा इतिहास जुना असला तरी याची खरी प्रचिती दुसऱ्या महायुद्धादरम्यान आली होती. दुसऱ्या महायुद्धात जापानी सैन्याने कामिकाझे या विमानाच्या वेगळ्या तुकड्यांची निर्मिती केली होती. तुकडीचे ऑफिशिअल नाव टोकुबेट्सु कोगेकिताई म्हणजेच स्पेशल अटॅक युनिट असं होतं. पण कामिकाझे म्हणूनच यांचा जास्त प्रचार झाला. या तुकडीतले वैमानिक शत्रू राष्ट्राच्या एखाद्या गोष्टीला टार्गेट करायचे आणि त्यावर स्वतःचं विमान आदळून द्यायचे.
या हल्ल्यात वैमानिक स्वतःचं प्राण देऊन टार्गेटला उडवत होते, म्हणूनच या प्रकाराला आत्मघाती प्रकार म्हटलं जातं.
या कामिकाझे स्ट्राईकसाठी सध्या विमानाची थोड्या वेगळ्या पद्धतीने निर्मिती करण्यात येत होती. या आधी विमानात साधे बॉम्ब आणि गॅसोलिनच्या टाक्या जोडल्या जायच्या. त्यानंतर त्यात वैमानिक बसायचा. वैमानिक बसल्यानंतर विमानाला पूर्णपणे बंद केलं जायचं. दरवाजे बंद झाल्यानंतर वैमानिकाला विमानातून बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग शिल्लक नसायचा.
ही आत्मघाती विमानं ८० किमी दुरून आणि ७,५०० मीटर पेक्षा जास्त उंचीवरून सोडली जायची. १ ताणापेक्षा जास्त वजनाची स्फोटके जोडलेलं विमान वेगाने उडत स्वतःच्या टार्गेटवर हल्ला करायचं. विमानाला बांधलेल्या बॉम्ब आणि गॅसोलिनच्या टाक्यांमुळे भीषण स्फोट व्हायचा आणि टार्गेट उडवलं जायचं.
या हल्ल्यात शत्रूराष्ट्राच्या हत्यारांचे आणि इंधनाचे कोठार, समुद्रातील जहाज आणि सैन्याच्या छावण्या या हल्ल्याने नष्ट केल्या जायच्या.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान कामिकाझे विमानांनी हल्ले करून ३५ लढाऊ जहाजं समुद्रात बुडवली होती. अशाच हल्ल्यांनी जपानच्या ओकिनावा शहराजवळ असलेल्या अमेरिकन नैदलाचं मोथन नुकसान करण्यात आलं होतं. या हल्ल्यात अंदाजे ५ हजार सैनिक मारले गेले होते. या हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी फारसे उपाय नसल्यामुळे कामिकोझेचे हल्ले मोठ्या प्रमाणावर यशस्वी होत होते.
या कामिकोझे ऑपरेशनमध्ये १७ ते २४ वयोगटातल्या वैमानिकांनी सहभाग घेतला होता. यात नेमकी किती विमान क्रॅश झाले आणि किती वैमानिक मेले याची आकडेवारी उपलब्ध नाही मात्र अंदाजे ३ ते ४ हजार लोकांनी यात स्वतःचे प्राण दिले. यातील केवळ १० टक्के मोहीम यशस्वी झाल्या होत्या आणि त्यात ५० च्या आसपास मित्र राष्ट्रांची सुद्धा जहाजं बुडाली होती असं सांगितलं जातं.
याच कामिकोझे विमानापासून प्रेरणा घेऊन इराणने कामिकोझे ड्रोन बनवलेत. इराणने बनवलेल्या ड्रोन्सच्या धर्तीवर अमेरिका, चीन, इस्राईल, तुर्की, आर्मेनिया या देशांनी सुद्धा अशाच प्रकारचे ड्रोन्स विकसित केलेले आहेत.
युक्रेनने सुद्धा स्वतः विकसित केलेला रॅम २ हा ड्रोन युद्धात वापरला जातोय.
हा ड्रोन युक्रेनच्या कंपन्यांनी डिजाईन केलाय पण याची युद्धात याचा प्रभाव तितकासा पडत नाहीये. म्हणून या ड्रोन सोबतच अमेरिकेकडून मिळालेल्या स्वीचब्लेड ड्रोनचा वापर युक्रेनकडून केला जातोय. या ड्रोनच्या माध्यमातून कामिकाझेप्रमाणेच हल्ले केले जातात. ‘स्विचब्लेड ३००’ आणि ‘स्विचब्लेड ६००’ या ड्रोन्सच्या माध्यमातून १० ते ३२ किमी अंतरापर्यंत हल्ला केला जाऊ शकतो. स्विचब्लेड सोबतच अमेरिकेने ‘फिनिक्स घोस्ट’ नावाचे ड्रोन्स सुद्धा युक्रेनला दिले होते.
अमेरिकेच्या ड्रोन्ससोबत ब्रिटनमध्ये बनवण्यात आलेले ‘ब्लॅक हॉर्नेट मायक्रो ड्रोन्स’चा सुद्धा वापर केला जातोय. दुसऱ्या महायुद्धात जपानी सैनिकांनी राष्ट्राच्या सेवेसाठी स्वच्छेने स्वतःच्या प्राणाचे बलिदान दिले होते. याच धर्तीवर आता ड्रोन्सचा वापर केला जातोय.
हे ही वाच भिडू
- दुसरं महायुद्ध संपून तीस वर्ष झालेली, तरिही तो एकटा लढत राहिला…
- रशिया युक्रेन सारखंच या पाच ठिकाणचे वाद तिसऱ्या विश्वयुद्धाची ठिणगी पेटवू शकतात
- रशिया युक्रेन युद्धाचा सर्वाधिक फटका बसलेलं भारतातलं शहर म्हणजे ‘सुरत’…