भिडू, पोलिसांच्या गणवेशाचा रंग खाकीच असण्यामागेही मोठा इतिहास आहे

खाकी वर्दी बघितली की सगळ्याच भारतीयांच्या अंगावर काटा येतो. अगदी लहान्यांपासून ते मोठया व्यक्तींमध्येही पोलिसांच्या खाकी गणवेशाबद्दल आदर झळकतो. अनेकदा पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना विचारलं की, “तुम्हाला पोलिस का बनायचं आहे?” यावर “आम्हाला खाकी वर्दीची  आवड आहे”, असं चटकन बरेच जण बोलून जातात. त्यातही सिनेमांनी यात अजून भर टाकली आहे.

खाकी गणवेश घातलेला रुबाबदार, ऐटीत चालणारा हिरो बघितला की लगेच व्हिलन लोकांना घाम फुटताना आपण बघतो. अशा या खाकी गणवेषाने सगळ्याच भारतीयांना क्रेझ लावेल आहे. खाकी रंग बघितला की लगेच डोळ्यासमोर पोलीस उभे राहतात. भारतीय पोलिसांची ओळखंच खाकी रंगाने केली जाते.

पण कधी विचार केला आहे की संपूर्ण देशाच्या पोलिसांच्या गणवेशाचा रंग खाकीच का आहे? काय आहे याच्या मागची कारण? जाणून घेऊया…

खाकी गणवेशाचा इतिहास काय आहे?

ब्रिटिशांनी भारतात पोलिसांसाठी अधिकृत गणवेशाची व्यवस्था आणली. ब्रिटिश राजवटीत भारतातील पोलीस पांढरा गणवेश परिधान करत असत. पण पांढर्‍या युनिफॉर्मची अडचण होती. खूप वेळ ड्युटी करताना गणवेश लवकर घाण व्हायचा. त्यामुळे पोलिसांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागायचं. अनेकदा पोलीस कर्मचारी आपल्या गणवेशातील अस्वच्छता लपविण्यासाठी गणवेश वेगवेगळ्या रंगात रंगवत असत. अशा प्रकारे त्यांचा गणवेश वेगवेगळ्या रंगात दिसू लागला. म्हणूनच पोलिसांनी त्यात बदल करण्याचा विचार केला.

पोलिसांसाठी खाकी रंग का निवडण्यात आला?

गणवेशाचा रंग बदलायचा म्हणून रंग शोधण्याची मोहीम सुरु झाली. असा कोणता रंग आहे जो जास्त वेळ काम करतानाही खराब होणार नाही. शिवाय अगदी बिनधास्तपाने वापरता येईल, असा विचार करून रंग शोधण्याला सुरुवात झाली. हळूहळू गणवेशाचा रंग बदलण्यात आला. मळखाऊ रंग शोधण्याच्या प्रक्रियेत पोलीस अधिकाऱ्यांनी हलका पिवळा आणि तपकिरी रंगाचे मिश्रण केलं आणि तयार झाला खाकी रंग.

आधी चहाच्या पानांचे पाणी खाकी रंग बनवण्यासाठी वापरले जायचे. मात्र, आता सिंथेटिक रंग वापरले जातात. याशिवाय हिंदीत खाकचा शाब्दिक अर्थही मातीचा रंग आहे. हा खाकी रंग लावल्यानंतर पोलिसांच्या गणवेशावरील धूळ आणि डाग कमी दिसू लागले म्हणून पोलीस कर्मचारी रोज याचं रंगाचा गणवेश परीक्षण करू लागले.

पोलिसांनी उचललेलं हे पाऊल बघून सर हेनरी लॉरेंस यांनी १८४७ साली अधिकृतपणे खाकी रंगाचा गणवेश स्वीकारला. आणि तेव्हापासून हा रंग भारतीय पोलिसांची ओळख आहे. ब्रिटिशांनी भारत सोडलं पण पोलिसांनी खाकी रंगाची साथ काही सोडली नाही. कारण खाकी रंग हा मातीचा रंग आहे आणि मातीचं भारतीय पोलिसांना वेगळंच आकर्षण आहे.

पण आजही भारतात असं एक शहर आहे जिथे पोलिसांच्या गणवेशाचा रंग खाकी नाही तर पांढरा आहे. यामागेही असाच इतिहास आहे. 

सर हेन्री लॉरेन्स यांनी १८४७ मध्ये पोलिसांचा खाकी रंग अधिकृतपणे स्वीकारला. लॉरेन्स तेव्हा वायव्य सरहद्दीच्या गव्हर्नरचे एजंट होते. १८४६ मध्ये त्यांनी क्रॉप्स ऑफ गाईड्स नावाची फौज तयार केली. ही सेना ब्रिटिश भारतीय सैन्याची एक रेजिमेंट होती, जी उत्तर-पश्चिम सीमेवर तैनात करण्यासाठी तयार करण्यात आली होती.

लॉरेन्स यांनी कोलकाता पोलिसांना खाकी गणवेश घालण्याची ऑफर देखील दिली, परंतु त्याने ही ऑफर स्वीकारली नाही. कोलकाता पोलिसांनी सांगितले की, हा किनारी भाग आहे. अशा स्थितीत वातावरणात ओलावा अधिक असतो. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पंधरा रंग जास्त चांगला आहे. याच कारणामुळे आजही कोलकाता पोलिसांच्या गणवेशाचा रंग पांढराच आहे.

हे ही  वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.