भावा, आपल्या घरी दूधवाला दूध घेऊन येतो त्यामागेही खमंग इतिहास आहे…

सकाळ सकाळी उठलं की बऱ्याच जणांच्या वाटेला येणारं दिवसातील पाहिलं काम म्हणजे दूधवाल्या काकांकडून दूध घेणं. शहरी भागात राहणाऱ्या अनेकांची तर झोपमोडचं दूधवाल्या काकांच्या गाडीच्या हॉर्नने होते. झोपेतून उठून दूध घेण्याचं काम कितीही कंटाळवाणं वाटत असलं तरी नंतर हेच दूध ग्लासभरून ढेकर देईपर्यंत पिणं  किंवा आईने दुधापासून बनलेले पदार्थ चाटून पुसून खाणं  प्रत्येकाला आवडतंच आवडतं.

पण कधी विचार केला आहे का की, घरपोच दूध देण्याची पद्धत कधीपासून सुरु झाली असावी? याचं उत्तर जाणून घेण्यासाठी जरा इतिहासात डोकावं लागेल.

दूधवाले काका दूध घेऊन येतात कारण तो त्यांचा व्यवसाय असतो. त्याला दुग्धव्यवसाय असं म्हणतात. दुधाचं उत्पादन करणं, त्यावर योग्य ते संस्करण करून त्याची विक्री करणं तसंच त्यापासून विविध पदार्थ बनविणं आणि त्यांची विक्री करणंं अशा बाबींचा दुग्धव्यवसायामध्ये समावेश होतो. दूध आणि त्यापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांचा अन्न म्हणून वापर बऱ्याच वर्षांपासून होत असला, तरी दुग्धव्यवसायाचा विकास मात्र एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत फारसा झालेला नव्हता.

या विकासाचा मागोवा घेताना १८५० पूर्वीचा आणि त्यानंतरचा काळ असे दोन कालखंड नजरेसमोर येतात. खेड्यात राहणारे, सामान्य जीवन जगणारे लोक ज्यांचं जग फक्त त्यांचं कुटुंब आणि आजूबाजूची दोन चार घरं असं होतं. आणि जगण्याचं ध्येय म्हणजे आपल्या घरच्यांचं रोजचं दोन वेळचं पोट भरणं. याचं साधन होतं ते शेती. दुग्धव्यवसाय मात्र बऱ्याच प्रमाणात विस्कळित आणि कौटुंबिक पातळीवरच चालत असे. त्याला व्यवसायाचं स्वरूप फारसं नव्हतं.

पावसावर अवलंबून असलेली शेती करणारे बहुसंख्य लोक मुख्यत्वे शेतकामासाठी लागणाऱ्या बैलांच्या निपजीसाठी गायी आणि स्वतःची दुधाची गरज भागविण्यासाठी एक-दोन म्हशी पाळत असत. त्यातून  थोडे जास्त असलेले दूध आसपासच्या गरजूंना विकले जाई. तसं बघितलं तर खऱ्या अर्थाने हीच दुग्धव्यवसायाची सुरुवात होय. त्यावेळी दुग्धोत्पादन आणि दुग्धव्यवसाय हा त्यांचा दुय्यम हेतू असे. पण हेच लोक भारतातील प्रमुख दुग्धोत्पादक होते आणि आजही आहेत.

घरपोच दूध पोहोच करण्याची सुरुवात कशी झाली?

एकोणिसाव्या शतकाची सुरुवात झाली. याकाळात अनेक नवीन प्रयोग केले गेले. विज्ञानाला जास्त महत्त्व दिल गेलं, त्यामुळे व्यवसायाची सुरुवात झाली. या व्यवसायाचं शिक्षण घेण्यासाठी किंवा काम मिळवण्यासाठी लोक वस्त्यांच्या बाहेर पडू लागले. हळूहळू शहरांची निर्मिती झाली. आधी गावात राहणारे लोक जेव्हा शहरात गेले तेव्हा त्यांना दूध मिळणं  सहज शक्य होत नव्हतं. पण विकत दूध घेण्याइतकी ऐपत मात्र त्यांची झाली होती. राहणीमान बदललं होतं.

नवीन बदलत्या जगाला स्वीकारत खेड्यातील लोकांनीही व्यवसाय करण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांच्याकडे भांडवल होतं ते त्यांचं पशुधन. आता व्यवसायाचं मूळ सूत्रच हे आहे, ‘ज्याची मागणी, तो व्यवसाय सुसाट!’ या खेड्यातील लोकांनी शहरी लोकांची नेमकी गरज ओळखली. मग घरचं दूध काढून झालं की या लोकांनी शहरातील लोकांना अतिरिक्त दूध पोहोचवायला सुरुवात केली. आणि असे उदयास आले आपले ‘दूधवाले काका’.

पण आधी दूधवाले काका आता गाडीवर येतात तसे येत नव्हते बरका!

शहरवस्तीच्या आसपासच्या खेड्यांतील शेतकरी दूध डोक्यावरून वाहून नेऊन शहरातील लोकांची दुधाची गरज भागवीत असत. ही खेडी हळूहळू दुग्धोत्पादन केंद्रे बनली. पुढे वाहतुकीची साधनं उपलब्ध झाल्यावर सायकल, मोटार यांचा उपयोग होऊ लागला. आणि त्याचमुळे आता अनेकांची सकाळ ‘पीप – पीप’ अशा आवाजाने होते.

हळूहळू दुधाची खराबी न होता ते टिकविण्याची साधने उपलब्ध होत गेल्यावर दुग्धव्यवसायाची झपाट्याने वाढ झाली. म्हणूनच आता दूधवाले काका दुधाशिवाय पनीर, चीझ अशी दुग्धजन्य पदार्थही आपल्याला विकताना दिसतात. आता तर दूधवाले काकाचं नाही तर बऱ्याच ठिकाणी ‘दूधवाल्या काकू’ सुद्धा आल्या आहेत. आणि हे बदलत्या, विकसित होणाऱ्या भारताचं मूर्तिमंत उदाहरण आहे.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.