ज्याचं हस्तिनापूर, त्याचंच युपीवर राज्य, हाच इतिहास आहे भिडू

हस्तिनापूर. हे नाव घेतलं की लगेच आपण महाभारताच्या काळात ओढले जातो. असं होणारसुद्धा का नाही. या राज्याच्या सिंहासनासाठीच तर महाभारत घडलं होतं. सत्तेच्या लालसेचं प्रतीक हस्तिनापूर होतं.  आता हस्तिनापूरचं सिंहासन भूतकाळातील खड्ड्यात गेलं असलं, तरीही हस्तिनापूरवर सत्ता मिळवण्याचा खेळ चालूचं आहे.  इथल्या विधानसभेच्या जागेकडे आजही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

यालाही कारण आहे हस्तिनापूरचा इतिहास.

मेरठ जिल्ह्यातील या विधानसभेच्या जागेवर जो झेंडा फडकवतो, त्याच पक्षाचे सरकार बनतं,असा इथला समज आहे. राजकीय पक्ष या समजाला इतकं महत्त्व देतात की, ते निवडणुकीचा फलक अतिशय काळजीपूर्वक लावतात आणि जिंकण्यासाठी पूर्ण ताकद लावतात. आतापर्यंतचा निवडणुकीचा इतिहास पाहिला तर बहुतेक वेळा असे घडले आहे की, हस्तिनापूर विधानसभेची जागा ज्या पक्षाने जिंकली आहे त्याच पक्षाचं सरकार स्थापन झालं आहे.

त्यामुळेच साध्याच्या निवडणुकीसाठीही हस्तिनापूरला खूप महत्त्व दिलं जात असून ही सीट मिळवण्यासाठी पक्षामध्ये चांगलीच जुंपली आहे. यावेळी पहिल्या टप्प्यात इथे १० फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

हस्तिनापूर सीटचा इतिहास कसा आहे?

देशात पहिली निवडणूक १९५२ मध्ये झाली होती पण त्यावेळी हस्तिनापूर विधानसभा मतदारसंघ नव्हता. पण १९५७ च्या निवडणुकीत हस्तिनापूरला विधानसभेचा दर्जा मिळाला. आणि देशाच्या निवडणूक नकाशावर हस्तिनापूरच नाव कोरलं गेलं. सध्या उत्तर प्रदेशवर शासन करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने दोन वेळा हस्तिनापुरवर स्वःतचा झेंडा फडकावला आहे. सर्वप्रथम १९९४ मध्ये भाजपचे गोपाल काझी यांनी हस्तिनापुरची सीट जिंकली होती.  यांच्यानंतर २०१७ मध्ये भाजपचे दिनेश खाटीक जिंकले होते. याचं कारण होत ते  मोदी लाट. हस्तिनापूरच्या जनतेने ३० हजार मतांनी खाटीक यांना जिंकून दिलं होतं.

हस्तिनापूरचे आमदार दिनेश खाटिक यांना सरकारची पाच वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच योगी सरकारनं मंत्री केले होतं. यंदाही भाजपला दिनेश खाटिक यांच्यावर पूर्ण विश्वास आहे की ते २०२२ मध्ये पुन्हा ही जागा जिंकतील. आणि त्यामुळेच त्यांचं हस्तिनापूरचं तिकीट निश्चित मानलं जात आहे. तर २०१२ च्या निवडणुकीत सपा सरकारमध्ये प्रभुदयाल वाल्मिकी हे हस्तिनापूर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. तेव्हा अखिलेश यादव यांनी त्यांना मंत्री केलं होतं.

मोदींच्या लाटेमुळे २०१७ मध्ये भारतीय जनता पक्षाने हस्तिनापूरची जागा जिंकली आणि यूपीमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाले. २०१२ मध्ये समाजवादी पक्षाने जागा जिंकली आणि त्यानंतर यूपीमध्ये सपा सरकार स्थापन झाले आणि अखिलेश यादव मुख्यमंत्री झाले. २००७ मध्ये योगेश वर्मा बसपाकडून विजयी झाले, त्यानंतर बसपा सुप्रीमो मायावती मुख्यमंत्री म्हणून उत्तर प्रदेशच्या सिंहासनावर विराजमान झाल्या. तर २००२ मध्ये सपाच्या प्रभुदयाल वाल्मिकी यांनी विजय मिळवून मुलायम सिंह यांना मुख्यमंत्री बनवले.

२०१७ च्या निवडणुकीत मात्र हस्तिनापूरच्या जनतेने  प्रभुदयाल वाल्मिकी यांच्या मंत्रीपदाचा विचारही केला नाही आणि त्यांचा पराभव केला. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार दिनेश खाटीक हेही मंत्रिपदाची इज्जत वाचवू शकतात की नाही, हे निवडणूक निकाल सांगेल. पण हस्तिनापूरबद्दल अजून एक बोललं जातं. इथले ज्येष्ठ सांगतात, एका पक्षाचा आमदार इथे पुन्हा निवडून आलेला नाहीये.

सध्या हस्तिनापूरमध्ये  ३ लाख ४२ हजार ३१४ मतदार आहेत. त्यामध्ये पुरुष मतदार १ लाख ८७ हजार ८८४ आहेत. तर महिला मतदार १ लाख ५४ हजार ४०७ आणि तृतीय लिंग २३ मतदार आहेत. विशेष म्हणजे या जागेवर सुमारे एक लाख मुस्लिम मतदार असून, ही संख्या सर्वाधिक आहे. दुसरीकडे, योगी आदित्यनाथ महिला सुरक्षा आणि हिंदू धर्माचा हवाला देऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतायेत.

तेव्हा आता मुस्लिमबहुल विधानसभेत पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुलणार की सत्तापालट होणार हे पाहावं लागेल. हस्तिनापूरचा इतिहास, तिथल्या मान्यता, समज  कितीपट खऱ्या निघतात हे देखील येणार काळंच  सांगेल.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.