पंतप्रधानांसोबत पंजाबमध्ये जे झालं त्या घटनेमध्ये आता नवीन ट्विस्ट आला आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौरा प्रकरणाची केंद्रीय गृह मंत्रालयाची एक टीम तपासणी करत आहे आणि राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांची विचारपूसही चालू आहे. मात्र या घटनाचक्रात नवीन गोष्टींचा खुलासा झाला आहे ज्यामुळे हे षडयंत्र असल्याच्या चर्चा चालू आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यामध्ये अशा काही गोष्टी घडू शकतात याची पूर्वसूचना अधिकाऱ्यांना देण्यात अली होती, असं समोर आलं आहे.
घटना घडण्याआधीच सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.
पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत ग्राउंड रिअॅलिटी जमवण्याची जबाबदारी पंजाबच्या गुप्तचर विभागातील म्हणजेच सीआयडीमधील डीएसपी सुखदेव सिंग यांची होती. सुखदेव यांनी पंतप्रधानांच्या रॅलीपूर्वी प्रत्येक क्षणाची ग्राउंड रिअॅलिटी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळीच सांगितली होती. २ जानेवारीलाच त्यांनी इशारा दिला होता की, किसान युनियनचे नेते आणि कार्यकर्ते पंतप्रधानांचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरू शकतात.
शेतकऱ्यांचं रस्त्यावर येण्याचं नियोजन आधीच झालं होतं. याबद्दल पंतप्रधानांच्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपला आधीच कळवण्यात आलं होतं. घटना घडली त्यादिवशी सकाळपासून सीआयडीची टीम प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होती. शेतकरी संघटनेचे नेते आणि कार्यकर्त्यांनी घरं सोडली आणि फिरोजशाहचा नाका तोडून तो ओलांडून त्यांनी धरणे सुरू केल्यावरही जिल्ह्याच्या एसएसपींना सूचित करण्यात आलं होतं. घटना घडण्याआधीच सतर्कतेचा इशारा दिला होता, असं डीएसपी सुखदेव सिंग यांनी सांगितलं.
पंतप्रधानांच्या रस्त्यात शेतकऱ्यांना मुद्दाम बसू दिल्या गेलं होतं.
‘सिख फॉर जस्टिस’च्या पन्नूने पंतप्रधानांना चप्पल दाखवणाऱ्याला १ लाख डॉलरचे बक्षीस जाहीर केले होते. आणि तरीही शेतकऱ्यांना रस्त्यात बसू दिलं गेलं. पंतप्रधानांच्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपने पंजाब पोलिसांना आधीच सांगितलं होतं की, खराब हवामानामुळे पंतप्रधानांना प्रवासासाठी रस्त्याचा वापर करावा लागू शकतो. अशावेळी त्यांच्या रस्त्यात कोणताही अडथळा येता कामा नये. जर असं काही झालं तर तात्काळ त्यांचा रास्ता मोकळा करण्यात यावा. पण पंजाब पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही. शिवाय शेतकऱ्यांना दूर देखील केलं नाही.
यावर पंजाब पोलिसांना विचारणा केली असता त्यांनी आश्चर्यकारक उत्तर दिलं आहे. पंजाबमधील शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. त्यांचं गाव आहे आणि त्यांचा रास्ता आहे. शिवाय हे आंदोलक खूप जिद्दी आहेत. त्यांना मारहाणही करता येत नाही. तसे आम्हाला आदेश नाहीत. अशात त्यांना रस्त्यातून बाजूला करण्याचा प्रयत्नही रिकामा गेला असता, असं पोलीस म्हणाले.
पंतप्रधानांचा रस्ता अडवणारे शेतकरी आंदोलक नाही तर कट्टरपंथीयांचा ग्रुप होता.
पंजाब पोलिसांचं असं देखिल सांगितलं आहे की, त्यांना माहित होतं पंतप्रधानांचा रास्ता थांबवणारे शेतकरी आंदोलक नाही तर कट्टरपंथीयांचा ग्रुप होता. या कट्टरपंथीयांनी शेतकऱ्यांचं नाव पुढे केलं होतं. शिवाय हे शेतकरी आंदोलक नाही हे तिथे उपस्थित सर्वांना माहित होतं.
पंतप्रधान गाडीने जाताना त्यांचा रस्ता सील देखील करण्यात आला नव्हता.
एसपीजीच्या प्रोटोकॉल्सनुसार पंतप्रधान जेव्हा दौऱ्यावर असतात तेव्हा त्यांचा मार्ग ठरल्यानंतर रस्ता सील करणं आवश्यक असतं. जेव्हा पंतप्रधान रस्त्याने जाणार हे ठरलं तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांना ही माहिती देण्यात अली होती. पण तरीही असं करण्यात आलं नव्हतं. पंतप्रधान ज्या पुलावर १८ मिनिट थांबले होते त्या पुलाखाली बाजार सुरू होता. इतकंच नाही तर अवैधरित्या सुरू असलेले दारूचे ठेकेही उघडे होते.
शिवाय पंतप्रधानांचा ताफा जातो तेव्हा ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात असतो, मात्र त्या दिवशी तसे काही घडलं नाही.
यासर्व गोष्टी पुढे आल्यानंतर या प्रकरणात कुठेतरी पोलीस विभागाचे दुर्लक्ष झाल्याचं चित्र समोर आलं आहे. घडलेला प्रकार म्हणजे जाणून बुजून करण्यात आलेलं षडयंत्र असल्याच्या चर्चा चालू आहेत. पीएम मोदींच्या सुरक्षेतील त्रुटींवर चर्चा करण्याऐवजी कारवाईची चर्चा व्हायला हवी. तसंच या प्रकरणी पंजाबचे डीजीपी (सिद्धार्थ चट्टोपाध्याय) यांच्यावर एफआयआर नोंदवा, अशी मागणी देखील सध्या केली जात आहे.
हे ही वाच भिडू :
- मोदींचा ताफा अडवल्यानंतर, त्यांच्या सुरक्षेच्या जबाबदारीवरुन राडा सुरू झालाय
- मोदींच्या गाडीवर टीका करण्याआधी पंतप्रधानांच्या सुरक्षिततेचं महत्व जाणून घ्या
- आंदोलकांशी कसं बोलायचं हे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिलंय
- या पोरीनं पंजाबमधल्या मंत्र्यांची गाडी अडवली आणि आता तिचं करिअर घडू शकतंय