ऊसाला तुरा लागण्याला आणि त्याने शेतकऱ्यांचं नुकसान होण्याला रीतसर कारणं आहेत
कुठे तरी फिरायला म्हणून जाताना रस्त्याच्या बाजूने शेती लागते. त्यातही शेतामध्ये लांब लांब तुरे बघितले की मनाला खूप छान वाटतं. पण या निसर्गरम्य दृश्यामागे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान लपलेलं असतं. पिकाला असे तुरे लागलेले दिसले की शेतकऱ्यांच्या काळजात मात्र जोरात धस्स होतं.
असे तुरे लागतात ते ऊसाच्या शेताला.
सध्याची परिस्थिती काही अशीच झाली आहे. यंदा राज्यात ऊसाची विक्रमी लागवड झाली आहे. पण या ऊसाला तुरा लागल्याने राज्यातील ऊस उत्पादक पट्ट्यात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. कारण या तुऱ्यामुळे शेतकऱ्यांचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडतं. शेतकऱ्यांसाठी ऊस लागवड घाट्याचा सौदा बनत आहे. राज्यातील शेतकऱ्यांची ऊस तोडणी अजूनही पन्नास टक्के रखडली आहे. शिवाय राज्यातील ५४७ लाख टन ऊसाचं गाळप अजून होणार आहे. या गोष्टींचा विचार करता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची रेष उमटली आहे. आणि डोळ्यांसमोर दिसतंय ते फक्त नुकसान.
उसाला लागलेला हा तुरा शेतकऱ्यांसाठी अपायकारक कसा आहे? का लागतो हा तुरा? जाणून घेऊया…
राज्यात यंदा साडे बारा लाख हेक्टर क्षेत्रावर तब्बल १०९६ लाख टन ऊसाची लागवड झाली आहे. आजवरची ही विक्रमी लागवड असल्याचं साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितलं.
तुरा लागल्याने त्याचा परिणाम गाळपावर नक्की होणार असे दिसते आहे. ऊसावर तुरा आला आहे तो यंदा हवामानात झालेल्या बदलामुळे. अतिवृष्टी, सततचं ढगाळ वातावरण, त्यात होणारे अचानक अल्पकालीन बदल, अशा घटकांमुळे तुऱ्याचं प्रमाण वाढलं आहे.
उसाला तुरा का लागतो?
सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला की, त्याचा परिणाम ऊसावर होतो. कारण ऊसासाठी प्रकाशाचा कालावधी हा घटक खूप महत्त्वाचा आहे. रात्रीच्या आणि दिवसाच्या तापमानात झालेले अनियमित बदल तुरा येण्याला प्रोत्साहीत करतात.
हवेतील आद्रता, सातत्याने पडणारा पाऊस, पाऊसामुळे जमिनीत साचून राहणारं पाणी, पीक वाढीची अवस्था, जमिनीतील उपलब्ध नत्राची कमतरता तसंच लागणीचा हंगाम आणि पाचट जाळणे अशी तुरा येण्याची प्रमुख कारणं आहेत.
यातील लागणीचा हंगाम हा महत्त्वाचा घटक आहे. लागणीनंतर साधारणतः १० ते १२ महिन्यांनंतर तुरा येतो. पण हा तुरा पूर्णपणे उमलण्याचा कालावधी त्या तुलनेत खूप कमी असतो. अगदी ७ दिवस ते जास्तीत जास्त १ महिन्यात तुरा उमलतो. जातीनुसार या कालावधीमध्ये बदल होत असतो. ऊस ६ महिन्यांचा झाला किंवा ३ कांड्यांच्या वर गेला की तुरा येण्याला सुरुवात होते. लागवड पूर्वहंगामी किंवा आडसाली केली तरी तुरा येऊ शकतो.
हवामानबदलाप्रमाणे तुरा पण वेगवेगळ्या कालावधीमध्ये येत असतो. तसंच उत्पादनातील घाटीचं प्रमाणंही तुरा किती आहे यावर अवलंबून आहे.
ऊसाला तुरा लागण्याचं पाहिलं लक्षण म्हणजे फुल कळीची सुरुवात होते. त्यामुळे सुरुवातीलाच ऊसावर असं काही दिसलं तर त्यावर नियंत्रण करणं गरजेचं असतं. नाहीतर काही दिवसांतच फुलोरा लागायला सुरुवात होते. हळूहळू ही फुलं परिपक्व व्हायला लागतात आणि त्यातूनच तुरा बाहेर पडतो.
तुरा लागल्याने शेतकऱ्यांचं नुकसान कसं होतं?
ऊसाला तुरा लागला की सगळ्यात पहिले ऊसाची वाढ खुंटायला सुरुवात होते. तुरा लागल्यामुळे ऊसाला पक्वता लवकर येते. तुरा आल्यानंतर ऊसाची पाने अरुंद व्हायला लागतात, दोन महिन्यानंतर पाने गळायला सुरुवात होते.
ऊसाच्या एकूण उत्पादनात १५ ते २५ टक्के घट येते. याने आर्थिक नुकसान होतंच असतं पण जर कुणी त्यातूनही मार्ग काढायचा प्रयत्न केला, तुरा लागलेला ऊस जनावरांना चारा म्हणून वापरण्याचा निर्णय घेतला जेणेकरून चाऱ्याचा खर्च वाचेल तर तसंही करता येत नाही. कारण तुरा आल्याने उसाच्या शेंड्यातून होणारी वाढ निकृष्ट दर्जाची होते जी जनावरांना खाण्यासाठी उपयुक्त राहत नाही.
ऊसाच्याच नाही तर साखरेच्याही उत्पादनावर तुऱ्याचा परिणाम होत असतो. कारण तुरा लागल्याने ऊसाची प्रत खराब होते. ऊसातील साखरेचं प्रमाण कमी होत असतं. एकदा का ऊसाला तुरा लागला की त्याच्या काड्यांमध्ये पोकळी निर्माण होते ज्यामुळे वजनात घाट होते. असा ऊस कारखानदार कमी दराने घेतात.
याचं ताजं उदाहरण सध्या बघायला मिळतंच आहे. निसर्गाच्या लहरीपणाचं कारण देत कारखानदार कोट्यवधींची साखर घशात घालू पाहतायेत, असं शेतकरी सांगतात.
ऊसाच्या लागवडीनंतर त्याची तोडणी साधारण १० ते १२ महिन्यांनी अपेक्षित असते. पण साखर कारखानदार ही तोडणी दोन ते तीन महिने लांबणीवर टाकतात. त्यामुळे ऊसावर तुरे उगवतात आणि ते उभ्या ऊसाला पोकळ करतात.
परिणामी ऊसाच्या वजनात किमान पन्नास टक्क्यांनी घट होते. याने कारखानदारांची चांदी होते तर शेतकऱ्यांच्या कष्टाची माती होते. कारण या तुऱ्याच्या मागून कारखानदार राजकारण करत असतात, असं शेतकरी सांगतात.
या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करून शेतकऱ्यांनी वेळीच तुऱ्याचं नियोजन करणं गरजेचं आहे.
हे ही वाच भिडू :
- केंद्र आणि राज्याच्या गोंधळात ऊस शेतकऱ्यांचा बळी जाणारा निर्णय घेतला जातोय
- बार्बाडोसचं स्वातंत्र्य म्हणजे वेस्ट इंडिजच्या ऊसपट्टाच्या राजकारणाचा विजय आहे
- हे मंत्रीमहोदय ॲप वापरून पाऊस पुढं मागं करायचा प्लॅन बनवत आहेत..