प्रिन्सेस डायनाच्या लग्नाला कोण जाणार म्हणून पंतप्रधान व राष्ट्रपतींमध्ये वाद झाला होता

देशातली आणिबाणी संपली आणि जनता पार्टीचं सरकार अस्तित्वात आलं. इंदिरा गांधींच्या सुडाच्या भावनेपोटी केलेल्या राजकारणाला लोकं कंटाळले होते. त्यांना वाटतं होतं आत्ता द्वेषाचं, सुडाचं राजकारण संपेल.

पण तस काहीच झालं नाही, नव्याने आलेले पंतप्रधान मोरारजी देसाईंनी सुडाच्या भावनेतूनच राजकारण करण्यास सुरवात केली. त्यांनी पहिला काय केलं तर देशभरातील ज्या राज्यात कॉंग्रेसची सत्ता आहे तिथले सरकार बरखास्त करण्यास सुरवात केली. तत्कालीन हंगामी राष्ट्रपती बी.डी. जत्ती यांच्या सहीने देशातील ९ राज्यातील विधानसभा बरखास्त करण्यात आल्या.

त्यानंतरच्या जून महिन्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणूका झाल्या आणि आंध्र, कर्नाटक व महाराष्ट्रात कॉंग्रेसने जोरदार यश मिळवलं.

त्यानंतरचा कार्यक्रम राष्ट्रपतींच्या निवडीचा होता.

राष्ट्रपती हक्काचे असतील तर काहीही करता येवू शकतं हे इंदिरा गांधींनी आणिबाणी लादून सप्रमाण दाखवून दिल होतच. मात्र विधानसभेच्या निवडणूकांचा रिझल्ट पहाता राष्ट्रपतींची निवड एकमताने व्हावी यावर भर देण्यात आला.

यासाठी योग्य व्यक्ती म्हणून निलम संजीव रेड्डी यांच नाव समोर आलं. मोरारजी देसाई यांनीच निलम संजीव रेड्डी यांच नाव पुढे येण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. कॉंग्रेसला देखील रेड्डी यांच्या नावावर आक्षेप घेण्यासारखं काही वाटलं नव्हतं.

१९६९ मध्ये जेव्हा डॉ. झाकीर हुसेन यांचे निधन झाले होते तेव्हाच कॉंग्रेसने निलम संजीव रेड्डींच नाव पुढे केलं होतं. पण इंदिरा गांधींच्या असहकारामुळे रेड्डी विजयी झाले नव्हते. हा भूतकाळ सोडला तर रेड्डींच्या नावाला आक्षेप घेण्यासारखं काहीच नव्हतं.

राष्ट्रपतीपदावर विराजमान होताच रेड्डींनी लोकपाल विधेयकास मंजूरी दिली. मोरारजी देसाई यांच्या सरकारसोबत सहकार्यांची भूमिका घेतली. अगदी आपल्या निवडीनंतरच्या पहिल्या अभिभाषणात त्यांनी जनता पक्षाची तोंडभरून स्तुती केली.

आत्ता ऐवढा सगळा संदर्भ का दिला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. असही वाटलं असेल की लेखात पाणी ओतायचं काम केलं. पण कसय न भिडू पार्श्वभूमी माहित असल्याशिवाय एखाद्या किस्स्यांच बॅकग्राऊंड समजून घेता येत नाही.

असो तर मोरारजी देसाईं यांनी आणलेला माणूस, भूतकाळातल्या पराभवाला इंदिरा गांधींची असणारी जबाबदारी असा खूप गोष्टी होत्या…

पण हे संबंध सुमधूर होते अस नाही कारण नंतरच्या काळात मोरारजी देसाई आणि रेड्डी साहेबांच बिघडू लागलं.

त्याला कारण होतं परदेश दौऱ्यांच…

राष्ट्रपती पदावर विराजमान झाल्यानंतरच्या दोन वर्षाच्या काळापर्यन्त म्हणजे १९७९ पर्यन्त म्हणजे या दोन वर्षांच्या काळात राष्ट्रपतींचा एकही परदेशी दोरा मंजूर झाला नव्हता.

रेड्डी यांना या दोन वर्षाच्या कालावधीत एकदाही परदेश दौऱ्यावर जाण्याची संधी मिळाली नव्हती आणि संधी चालून आली असतांनाही मोरारजी सरकारने ती हिरावून घेतली असंही आपण म्हणू शकतो.

रेड्डी यांना या काळात फक्त एकच दौरा करायला मिळाला पण तो काय अधिकृत दौरा म्हणता येणार नाही कारण रेड्डी हे हार्ट ऑपरेशन साठी ते अमेरिकेला गेले होते.

याचा अर्थ रेड्डी अमेरिकेला एक राष्ट्रपती म्हणून औपचारिक, अधिकृत भेट देण्यासाठी गेले नव्हते तर मुख्यत्वे एक व्यक्ती म्हणुन त्यांच्या वैयक्तिक कारणासाठी गेले होते.

हे लक्षात घेता रेड्डी यांना मोरारजीभाई यांच्या पंतप्रधानाच्या कारकीर्दीत एकही दौरा करायला मिळाला नाही.

पण रेड्डी व मोरारजीभाई यांच्या त्या कारणाने फार मोठा असा काही वाद निर्माण झाला नव्हता, परंतु तणाव निर्माण व्हायला हे कारण पुरेसे होते हे नक्कीच !

त्यातून मोरारजी सरकारच्या अखेरच्या काळात हे संदर्भ बिघडले गेले. पण झालं अस की पुन्हा निवडणूका झाल्या आणि देशात इंदिरा गांधींच सरकार सत्तेवर आलं…

इंदिरा गांधींची सत्ता येताच रेड्डींना परदेशी दौऱ्यासाठी परवानग्या मिळू लागल्या. सप्टेंबर १९८० ते ८२ या दोन वर्षाच्या काळात आठ परदेश दौरे करण्याची संधी त्यांना मिळाली.

मात्र एक वेळी अशीही आलीच की राष्ट्रपतींचा परदेश दौऱ्याबाबतचा संयम सुटला आणि ते थेट पंतप्रधान इंदिरा गांधींना भिडले…

मॅटर असा झाला…

१९८१ मध्ये इंग्लंडच्या राणीने नीलम संजीव रेड्डी यांना राजपुत्र व डायना यांच्या विवाहाचे निमंत्रण पाठवले. रेड्डींनी जाण्याचा निर्णय घेतला मात्र पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यास आक्षेप घेतला. आणि स्वतः त्या विवाह समारंभास हजर राहण्याची इच्छा व्यक्त केली. जेणेकरून त्या विविध राष्ट्रांच्या प्रमुखांबरोबर आपल्याला चर्चा करता येईल असं त्यांचं म्हणणं होतं.

यावर रेड्डी म्हणाले की,

“हे निमंत्रण राणीने व्यक्तीश: मला पाठवले असून ते मी स्वीकारलं आहे त्यामुळे विवाहास मीच उपस्थित राहावं हेच योग्य राहील”. 

तरीही इंदिराजींनी त्याच जाणार अशी आग्रही भूमिका घेतली.

एकाच वेळी सरकारच्या प्रमुखाने म्हणजेच पंतप्रधान व राष्ट्राच्या घटनात्मक प्रमुख म्हणजेच राष्ट्रपतींने एकाच सोहळ्यास उपस्थित राहणे हे राजनैतिक दृष्टीने योग्य दिसले नसते. शेवटी रेड्डी यांनी इंदिराजींना ठामपणे सांगितले की,

“जर सरकारने त्यांच्या या दौर्‍यासाठी तयारी केली नाही तर ते स्वतः खर्च करून एक सामान्य माणूस म्हणून या शाही सोहळ्यास उपस्थित राहतील”

त्यांच्या या हट्टामुळे शेवटी इंदिराजींनी माघार घेतली आणि सरकारने राष्ट्रपतींच्या दौऱ्याची तयारी केली.

रेड्डी यांच्या नंतर राष्ट्रपतीपदावर ग्यानी झैलसिंग यांची निवड झाल्यानंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जरा हायसे वाटले कारण माजी राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी आपल्या कारकीर्दीच्या अखेरच्या काळात परदेश दौऱ्याव्यतिरिक्त इतर कारणांवरून देखील पुष्कळ तणाव निर्माण केला होता. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.