चीन मध्ये मराठी “प्रपंच” सिनेमा बघायला रांगा लागल्या होत्या..!!!
राज कपूरची रशियामध्ये हवा होती. किंवा सोनु सुदचा मोठ्ठा फॅनबेस चीनमध्ये आहे. चंकी पांडेचे सर्वाधिक सिनेमे बांग्लादेशात चालतात. बऱ्याचदा आपल्याला माहिती नसतं पण एखाद्या देशात एखादा सिनेमा किंवा एखादा हिरो हा बाप असतो.
पण यात मराठी सिनेमा कुठे आहे..
तर थांबा मराठी देखील या यादीत वरचढ ठरलेली. यापूर्वी बर्लिनमध्ये सामना चा झालेला शो आणि त्याला मिळालेली प्रसिद्धी यावर आपण लेख लिहला होता.
आज तुम्हाला सांगतोय तो पहिला मराठी चित्रपट जो आंतराष्ट्रीय पातळीवर हिट झालेला.
या चित्रपटाचं नाव होतं प्रपंच. १९६१ साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा चीन मध्ये प्रचंड चाललेला. खुद्द चीनी सरकारनेच हा चित्रपट चीनी भाषेत डब करुन घेतला होता. सरकारचा या सिनेमाला जोरदार पाठींबा देखील होता आणि त्याला कारण देखील तसच होतं..
तर यासाठी थोडा चीनचा इतिहास सांगतो. झालेलं अस की चीनमध्ये भारतासारखचं लोकसंख्येचं गणित कोलमडलं होतं. वाढत्या लोकसंख्येला कस पोसायचा हा प्रश्न देशासमोर होता. कम्युनिस्ट राजवटीतलं चीन बारसं धरत होतं पण देशासमोरचा सर्वात मोठ्ठा प्रश्न हा वाढत्या लोकसंख्येचा होता…
कट टू इकडे भारतात तेव्हा काय चालू होतं…?
भारतात देखील वाढत्या लोकसंख्येची समस्या होती. १९६० साली महाराष्ट्राची स्थापना झालेली. याच काळात देवानंद यांचा एक के बाद एक हा सिनेमा आलेला. या सिनेमाची कथा लिहलेली गदिमा यांनी. १९६० साली दिग्दर्शक राजऋषी, ॲक्टर देवानंद आणि दाक्षिणात्य अभिनेत्री शारदा यांना घेवून हा सिनेमा करण्यात आला होता.
पण झालेलं अस की गदिमांनी लिहलेल्या कथेची या सिनेमात पुर्णपणे वाट लावून टाकण्यात आली होती. मुळ कथा फिरवून चित्रपट करण्यात आला आणि तो फ्लॉप देखील झाला.
त्यानंतर गदिमांनी याच कथेला धरून पुस्तक देखील लिहले. हे पुस्तक वाचलं ते गोविंद घाणेकर यांनी. त्यांना गदिमांची ही कादंबरी आवडली व याच कादंबरीवर सिनेमा काढण्याचं त्यांनी ठरवलं. पण याच कादंबरीवर एक के बाद एक आलेला.
घाणेकरांनी एक के बाद एक आणि गदिमांची कादंबरी दोन्ही गोष्टी पाहिल्या तेव्हा मुळ कथा पुर्णपणे बदलून टाकल्याचं त्यांना दिसलं.
घाणेकरांना कथा सुपरहिट वाटत होती. एक व्यक्ती त्याला सहा मुले. आईवडील व त्यांच्या मोठ्या कुटूंबाचा संघर्ष अस कथाबीज होतं. दिग्दर्शकांची जबाबदारी मधुकर पाठक यांना देण्यात आली. कुसूम देशपांडे, श्रीकांत मोघे, सुलोचना लाटकर, अमर शेख, सिमा देव यांना घेवून सिनेमा करण्याचं निश्चित करण्यात आलं. कथा-पटकथा-संवाद याची संपुर्ण भिस्त गदिमा यांच्याकडेच होती.
विठ्ठला तू वेडा कुंभार…! हे गाणं याच सिनेमातलं.
हा सिनेमा रिलीज झाला. कुटूंबनियोजन हा या सिनेमाच्या कथेचा गाभा होता. साहजिक सामाजिक विषय व त्यातही सिनेमा चांगला म्हणून हा सिनेमा तुफान चालू लागला. विषय पाहून हा सिनेमा चक्क १४ भारतीय भाषांमध्ये डब करण्यात आला. भारतासोबतच चीनमध्ये हा सिनेमा रिलीज झाला व तिथे देखील सिनेमाची तुफान हवा झाली.
महाराष्ट्र शासनाचा पहिला सर्वात्कृष्ठ सिनेमा म्हणून प्रपंचला पुरस्कार देण्यात आला.
हे ही वाच भिडू
- चंद्रकांत सूर्यकांत हे मांढरे बंधू मराठी सिनेमातले चंद्रसूर्य होते
- मराठी सिनेमाला ऑस्कर मिळावा म्हणून शाळकरी मुलांपासून बच्चनपर्यंत सर्वांनी मदत उभी केली
- लक्ष्या, तू फक्त मराठी सिनेमा जगवला नाहीस, तर आमचं बालपण अगदी मज्जेत घालवलस..