म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्येकाने मोकळ्या मनाने कौतुक करायला हवं

काही गोष्टी राजकारणाच्या पलीकडच्या असतात. राजकारणातले हेवेदावे, राजकारणातला मत्सर, राजकारणातला द्वेष, राजकारणातल्या कुरघोडी तिथे आणून चालत नाही. अशा ठिकाणी मनमोकळे पणाने कौतुक करायचे असते.

म्हणजे एक साधा किस्सा सांगतो,

विधानसभेचं नागपूर अधिवेशन चालू होतं. तेव्हा कॉम्रेड कृष्णा देसाई आपल्या सहा वर्षांच्या लहान मुलाला घेवून अधिवेशन दाखवण्यासाठी आले होते. कितीही लहान मुलगा असला तरी त्याला सभागृहात घेवून जाता येणं अशक्य होतं. दूसरीकडे कॉम्रेड कृष्णा देसाई यांना सभागृहात लक्षवेधी मांडायची होती.

अशा वेळी जवळच असणाऱ्या एका आमदाराला कृष्णा देसाईंनी हाक मारली. त्याला सांगितलं माझी लक्षवेधी आहे तोपर्यन्त या हिरवळीवर माझ्या मुलाला खेळवत बस. तो आमदार कृष्णा देसाईंच्या मुलाला घेवून हिरवळीवर खेळवत बसला.

त्या आमदाराचं नाव होतं, रामभाऊ म्हाळगी…

एकीकडे कॉम्रेड कृष्णा देसाई आणि दूसरीकडे रामभाऊ म्हाळगी. एकदम कट्टर विरोधक, विरोधी विचारसरणी. दोघेही एकमेकांच्या विरोधात सभागृहात तुटूत पडत असत. या दोन व्यक्ती एकमेकांसोबत बोलत असतील अशीही शंका यावी.

पण इथे विषय लहान मुलाचा होता. इथे मोठ्यांच शत्रूत्व कामी येत नाही.

असच एक काम काल फडणवीसांनी केलं आहे. तुम्ही विरोधकांच्या चष्मातून पहाणारे असा किंवा समर्थकांच्या चष्म्यातून. भले तूम्ही तटस्थ असा पण या कामाबद्दल फडणवीसांचे तोंडभरून कौतुक करायलाच हवं…

अस काय केलं आहे नक्की… 

काही दिवसांपूर्वी बोलभिडू वरून एक विषय मांडण्यात आला होता. कोरोनामुळे ज्या मुलांचे आई वडिल गेले, ज्यांचे छत्र हरपल त्यांच्यासाठी सरकार काय करणार आहे. आपण युपी, बिहार यांसारख्या राज्यांना मागासलेले ठरवतो पण अशा राज्यांनी सुद्धा कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी निर्णय घेतला. मात्र इथे महाराष्ट्र सरकार अजूनही झोपेतच आहे. असा तो विषय.

तर काल माजी मुख्यमंत्री व राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनामुळे छत्र हरवलेल्या १०० मुलांना दत्तक घेतले. त्यांच्या शिक्षण, आरोग्य ते पुढील आयुष्यातील कठीण प्रसंगात देवेंद्र फडणवीस यांनी पाठीमागे उभा राहण्याचे आश्वासन दिले. 

नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेखाली श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्ट काम करतो. त्यांच्यावतीने सोबत हा प्रकल्प  सुरू करण्यात आला. नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की,

कोरोनामुळे आई, वडिल किंवा दोघांचे छत्र गेलेल्या मुलांच्या पाठीमागे मी उभा राहणार असून या १०० मुलांचे पालकत्व मी घेत आहे. 

ज्या मुलांचे पालकत्व कोरोनामुळे गेले अशा मुलांना आधार देणं ही समाज म्हणून आपली गरज आहे. कित्येक कुटूंब या महामारीत बरबाद झाली, कित्येकांचे भविष्य गेले. अशा काळात एखादी व्यक्ती चांगलं काहीतरी करत असेल तर त्याचं कौतुक हे मोकळ्या मनाने केले पाहीजे.

तरिही इतकं सगळं होतं असताना अजूनही महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर महिन्याला अशा मुलांना ५ हजार देता येतील का याचा विचारच करत आहेत. विचार लवकर करावा आणि निर्णय घ्यावा. अगदी ठाम.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.