आयटीआय झालेला वायरमन आज मस्कतच्या सुलतानबरोबर बिझनेस करतोय

आपण सध्याच्या घडीला जे थर्मोकॉल वापरतो ते काय कुठल्या चीन किंवा जपानच्या कंपनीमधून येत नाही तर आपल्या अस्सल मराठमोळ्या उद्योगपतीच्या  कंपनीमधून येत. देशातील जवळपास ८० टक्के थर्मोकॉल हे उद्योगपती रामदास माने यांच्या कंपनीतून तयार होत. फक्त भारतच नाही तर जगभरातल्या वेगवेगळ्या देशात रामदास माने यांचे प्रकल्प निर्यात केले गेले आहे. आज आपण या मराठमोळ्या उद्योगपतीची सफर जाणून घेऊया.

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील लोधवडे हे रामदास मानेंचं गाव. आईसोबत शेतात ढेकळं फोडत असताना उन्हाची रख लागून त्वचा पोळली म्हणून आईकडे मला शाळेत घाल म्हणून हट्ट धरला. शाळेत वय बसत नसताना मास्तरांनी जुगाड करून शाळेत बसायची परवानगी दिली.

घरची शेती , त्यात दुष्काळी भाग , पाच पाच वर्ष तिथं पाऊस पडत नव्हता. त्यामुळे घरच्यांनी रोजगार हमीची कामे धरली. वडिलांनी रामदास मानेंना रोजगार हमीच्या कामाला नेण्याचा हेका धरला. पण त्यांनी आईला सांगून शाळा सुरु ठेवली. शाळा शिकत असताना घरच्यांनी वह्या पुस्तकाला एक रुपयाही दिला नाही.

एके दिवशी शाळेत जात असताना मध्ये त्यांना दुष्काळी योजने अंतर्गत इरिगेशन डॅमचं काम चालू असल्याचं दिसलं. तिथल्या इन्चार्ज मुल्ला साहेबाना ते भेटले आणि शिक्षणासाठी मला पैसे हवे आहे तर मला तुम्ही काम द्या. त्यावेळी रामदास मानेंचं वय कमी असल्या कारणाने मुल्ला साहेबांनी त्यांना काम देण्यास नकार दिला. पण रामदास मानेंनी त्यांना वाचन दिल कि,

मोठा माणूस जितकं काम करतो तितकं काम मी तुम्हाला करून देईल पण मला वह्या पुस्तकाच्या खर्चाला पैसे द्या.

मुल्ला साहेबानी परवानगी दिली.

दुसऱ्या दिवशी सगळी साधने घेऊन रामदास मानेंनी ठरवून दिलेला १५ बाय १०चा खड्डा अवघ्या दिड तासात खोदून मोकळा केला. मुल्ला साहेब खुश झाले, रामदास मानेंना शाबासकी दिली. तिथल्या एका अधिकाऱ्याला सांगितलं कि या मुलाला शनिवार रविवार सुट्टी, उन्हाळी सुट्टी, दिवाळी सुट्टी आणि ज्या ज्या वेळी त्याला शाळेला सुट्टी असेल तेव्हा त्याला कामावर घेत जा. पुढे मुल्ला साहेबानी रामदास मानेंची दहावी पूर्ण होईपर्यंत काम दिलं.

दहावी पूर्ण झाल्यानंतर पुढे काय करावं या साठी त्यांनी गावातल्या एका बी.कॉम झालेल्या माणसाचा सल्ला घेतला. त्यांनी मानेंना सांगितलं कि पुढच्या चार पाच वर्षात आपल्या गावात बटन दाबलं कि लाईट लागणार आहे तर तु त्याचा कोर्स कर.

आईला सांगून त्यांनी एका पात्राच्या पेटित जीवनोपयोगी सामान बांधलं आणि सातारा गाठलं. साताऱ्यात आल्यावर जवळपास सात आठ किलोमीटर ती पत्र्याची पेटी डोक्यावर घेत ते चालत चालत त्या इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये गेले. तिथं एका वायरमनला साध्या पांढऱ्या कागदावर अर्ज केला.

आठ दिवसानंतर बोलावणं आलं. इंटरव्हिव्ह झाला . पुढे ITI कॉलेजला कॉलेजला सिलेक्शन झालं. साताऱ्यात S T स्टॅण्डवर ते झोपत होते. आता पुढे राहणार कुठं ?  खाणार काय ? एका रात्री दोन वाजता पोलिसांनी काठीने खोचून त्यांना उठवलं जाब विचारला इथं का झोपलाय ? त्यावर रामदास मानेंनी सांगितलं कि माझं या  शहरात कोणी ओळखीचं नाही, कोणी नातेवाईक नाही म्हणून इथं झोपलो, पोलिसांनी इथ परत झोपायचं नाही दम देऊन त्यांना तिथून जायला सांगितलं. पोलीस गेल्यानंतर ते परत येऊन झोपले.

पुढचे दोन वर्ष ITI चे कसे काढणार यावर त्यांना तोडगा सुचला. सातारच्या ST स्टँडच्या कॅन्टीन मालकाला ते भेटले आणि परिस्थिती सांगितली माझी राहायची आणि खायची सोय नाही तर तुम्ही मला रात्रीचं वेटरचं काम दिलं तर बरं होईल. त्यावर कॅन्टीन मालकाने हरकत न घेता ३ रुपये महिना याप्रमाणे त्यांना कामावर ठेवून घेतलं.

रात्री ११ ते पहाटचे ५ अशा वेळात काम करून दिवसभर ते कॉलेज करू लागले . दोन वर्ष कॉलेज संपल्यावर त्यांना ITI ला पहिला क्रमांक प्राप्त झाला ८२% त्यांना मिळाले.

उत्तीर्ण झाल्यावर प्रिन्सिपलनी त्यांना तीन लेटर दिले इंटरव्हिव्हसाठी. पुण्याच्या महिंद्रा सिंटर्डची त्यांनी निवड केली. पुण्याला येण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. मग त्यांनी आजोळी जाऊन आजीकडून पैसे घेण्याचं ठरवलं. आजीला २० रु देण्यासाठी आजीला पटवलं, कामाला लागल्यावर परतफेड करण्याचं वचन दिल. आजीने आजूबाजूकडून उसने पैसे गोळा केले आणि मानेंना दिलॆ.

पुण्याला आल्यावर पंचवीस विद्यार्थी मुलाखतीला आले होते, मानेंची मुलाखत एक तास चालली, जवळपास सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली, मुलाखत झाल्यावर त्यांनी विचारलं की तुमचा काय निर्णय असेल तो मला आत्ताच कळवा, कारण मी आजीकडून उसने वीस रु घेऊन आलोय, त्यातले बारा रू खर्च झालेत आणि माझ्याकडे फक्त आठ रुपये शिल्लक आहेत, मी गावाला जायचो आणि तुम्ही निवड  झाली म्हणून परत बोलवायचे त्यापेक्षा आत्ताच सांगून टाका, त्यावर त्या अधिकाऱ्यांनी त्यांना संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत थांबायला सांगितलं.

निवड झाल्याचं पत्र आणि शंभर रुपये देऊन कामावर रुजू होण्यास सांगितलं. राहण्यासाठी जागा नसल्याने तब्ब्ल एक वर्ष ते पाण्याच्या टाकीखाली उघड्यावर राहिले. वायरमनचं काम करत असताना त्यांनी शिक्षणही सुरु ठेवलं, मॅनेजर झाले . पुढे तिथेही ते पहिले आले आणि कंपनीने पर्मनन्टचं लेटर दिल ५०० रु पगार चालू केला. काही कारणास्तव त्यांचं पुढचं प्रमोशन पोस्टपॉन्ड झालं.

पण पुढचे तीन महिने घरी बसून नक्की काय करायचं याचा विचार करत असताना त्यांनी MIDC भोसरी परिसरातल्या सगळ्या वर्कशॉप मध्ये काम केलं आणि त्यांच्या उद्योगाची सुरवात झाली.

एका थर्माकॉल बनवणाऱ्या जर्मन कंपनीच्या पदावर ते होते. त्यांची उत्सुकता चाळवली गेली आणि जस त्यांना त्याच ज्ञान येत गेलं त्यांनी त्या थर्माकॉल बनवणाऱ्या जर्मन कंपनीचं त्यांनी स्वतः इंडियन मशीन बनवलं. त्याचा इलेकट्रोनिक प्लॅन त्यांनी स्वतः डिझाईन केला ते त्यांचं इनोव्हेशन आहे. जर्मनीच्या ९०% हे मशीन प्रोडक्शन देऊ लागल पण कॉस्ट मात्र १०% होत.

त्यांच्या पहिल्या ऑर्डरचा प्रोजेक्ट त्यांनी २० लाखात करून दिला.

त्यांचा हा उद्योग बघून अजून काही लोकांनी हा प्रयत्न केला त्यामुळे रामदास मानेंच्या उद्योगावर त्याचा परिणाम झाला. मात्र त्यांनी इलेकट्रोनिक पॅनलच्या मध्ये त्यांनी एक सिक्वेन्स कंट्रोल टाकला आणि तो कुणी बघू नये म्हणून एमसील मध्ये तो पॅक केला म्हणजे कोणी त्याच डुप्लिकेशन करू नये. अशाने त्यांच्या उद्योगाने परत उभारी घेतली आणि त्यांना दूरदूरच्या ऑर्डर मिळणं सुरु झालं.

स्वच्छ भारत अभियानातला महत्वाचा थर्माकॉल टॉयलेट हा प्रकल्प सुद्धा रामदास मानेंच्या कंपनीचा आहे. करोना काळात रुग्णांना त्यांनी थर्माकॉलचे बेड सुद्धा उपलब्ध करून दिले.

भारतात मुंबई ते कलकत्ता आणि दिल्ली ते मद्रास इथपर्यंत सगळं थर्माकॉल हे रामदास मानेंच्या मशीनमधलं आहे. भारतात १२८ प्रोजेक्ट त्यांनी बनवले आणि १२००० लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला.

आज त्यांची माने ग्रुप ऑफ कंपनीज ही कंपनी पुण्यात उभी आहे.

जगभरातल्या ४५ देशांमध्ये त्यांनी ३५२ प्रकल्प निर्यात केले जातात. आजवर श्रीलंका, सौदी अरेबिया, नायजेरिया,केनिया,साऊथ आफ्रिका,टांझानिया,इथोपिया,युगांडा,इराण, इराक अशा बऱ्याच देशांमध्ये त्यांचे थर्मोकॉल बनवण्याचं मशीन निर्यात केले गेले आहे.

मस्कतच्या राजाला जगातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट दिला हा गिनीज बुकात नोंदवला गेलेला विक्रम आहे आणि  जगातलं सगळ्यात मोठं मशीन बनवण्याचा विक्रम लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदवला गेला.

भाषेचा ,रंगरूपाचा कॉम्प्लेक्स न बाळगता केवळ अथक परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर सगळं शक्य झालं असं रामदास माने सांगतात.

हे हि वाच भिडू

 

1 Comment
  1. सतीश says

    मुल्ला साहेबांचे नाव लिहिले, काही हरकत नाही पण त्यांना ITI करायचा सल्ला देणारे जनार्दन लोहार यांचे, सातारा कॅन्टीन चे मालक शेट्टी साहेब यांचे पण नाव लिहिले असते तर बरे वाटले असते.

Leave A Reply

Your email address will not be published.