ही ३ कारणं सांगतात, शिवाजीपार्कवर ज्याचा दसरा मेळावा त्याचीच शिवसेना…!

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा होणार याबाबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती त्यावर मुंबई हाय कोर्टने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाचा हा मोठा विजय असल्याचं मानलं जात आहे. 

२ ते ६ ऑक्टोबरपर्यंत शिवाजी पार्कच्या वापराची परवानगी ठाकरे गटाला दिली आहे. न्यायालयाने शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिल्याने शिवसेनेच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे.

खरी शिवसेना कुणाची या लढाईत शिवसेनेला स्वतःचं अस्तित्व राखायचं असेल तर ठाकरेंना शिवतिर्थ वर दसरा मेळावा घ्यावाच लागणारे अशी चर्चा सुरु होती. आणि त्या चर्चेला आधार म्हणजे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा इतिहास….

शिवसेनेसाठी दोन तारखांचं विशेष महत्व आहे. एक म्हणजे १९ जून १९६६. ज्या दिवशी शिवसेनेची स्थापना झाली होती आणि दुसरी तारीख म्हणजे ३० ऑक्टोबर १९६६. ज्या दिवशी शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा मुंबईतल्या शिवाजी पार्कात पार पडला होता. शवाजी पार्कात कुणाचा दसरा मेळावा होणार या रस्सीखेच नंतर देखील या वर्षीचा दसरा मेळावा शिवसेनेचाच होतोय यावर शिक्कामोर्तब झाला.

कितीही झालं तरी शिवाजीपार्कवर ज्याचा दसरा मेळावा त्याचीच शिवसेना…कारण या विधानामागे कारणीभूत असलेली ३ प्रश्न महत्वाची ठरतात.

१) पहिलं बघूया शिवसेनेसाठी दसरा मेळावा का महत्वाचा आहे ?

तर याच महत्व दसरा मेळाव्याच्या इतिहासात आहे. १९ जून १९६६ रोजी शिवसेना स्थापन झाल्यानंतर, शिवसैनिकांची अशी जाहीर मोठी सभा झालीच नव्हती.  मग बाळासाहेबांनी पक्षाची पहिली जाहीर सभा घेण्याचं ठरवलं.  दिवस कोणता निवडायचा तर दसरा कारण या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्याकारणाने सर्वात योग्य तारीख म्हणून दसऱ्याचा दिवस ठरवला आणि मार्मिकमधून याची घोषणा झाली…तेव्हापासून शिवसेनेची ही दसरा मेळाव्याची परंपरा कायम आहे. 

आता या मेळाव्याचं महत्व पाहायचं झालं तर मेळाव्याच्या इतिहासात शिवसेनेने महत्वाच्या घोषणा केल्यात. 

१९८९ च्या दसरा मेळाव्यात, शिवसेना प्रमुखांनी काँग्रेसला असणारा पाठींबा नसल्याचे जाहीर केलेले. १९९१ च्या दसऱ्या मेळाव्यात बाळासाहेबांनी आपल्या भाषणात जाहीर केले की, भारताचा पाकिस्तानशी नियोजित क्रिकेट सामना मुंबईत होऊ देणार नाही. त्यानंतर शिवसैनिकांनी वानखेडे स्टेडियमवर घुसून वानखडे स्टेडियम फोडलं, ग्राउंडचं नुकसान केले, त्यामुळे सामना रद्द करावा लागला होता. 

२०१० च्या दसरा मेळाव्यात, बाळासाहेबांनी आदित्य ठाकरेंना ऑफिशियली राजकारणात लॉन्च केलं. त्यानंतर २०१२ चा दसरा मेळावा बाळासाहेबांचा शेवटचा मेळावा ठरला होता. बाळासाहेबांची प्रकृती खालावल्यामुळे ते या मेळाव्यात येउ शकले नव्हते पण त्यांचं रेकॉर्डेड भाषण लावण्यात आलेलं ज्यात त्यांनी “मला सांभाळलंत तसंच माझ्या उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून घ्या” अशी भावनिक साद घातली होती. प्रत्येक दसरा मेळाव्यात शिवसेनेनं आपली भूमिका जाहीर केली त्यामुळे त्याच महत्व अधोरेखित होतं.  

२) त्यासाठी ‘शिवतिर्थ’ म्हणजेच शिवाजी पार्क इतके महत्त्वाचे का आहे? 

तर या जागेचं राजकीयदृष्ट्या असलेलं महत्व. शिवसेनेच्या आधीही हे स्थळ राजकीय अर्थाने आधीच चर्चेत असणारं होतं.  १९५० च्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीदरम्यान मराठी भाषिक राज्याची मागणी करणाऱ्या आंदोलनासाठी शिवाजी पार्क हे महत्त्वाचे ठिकाण होते.  शिवाजी पार्कवर अनेक मोर्चे काढले गेले ज्यात प्रबोधनकार ठाकरे देखील सामील होते. 

पण शिवसेनेच्या जन्मानंतर शिवसेनेची पहिलीच सभा याच शिवाजी पार्कच्या मैदानावर झाली होती. या पहिल्या सभेला पहिल्यांदाच बाळासाहेबांनी आपल्या शिवसैनिकांना संबोधित केलं होतं. 

शिवाजी पार्क अर्थात शिवतिर्थ ही शिवसेनिकांसाठी पवित्र जागा असल्याचं मानलं जातं, कारण याच ठिकाणी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे अंतिमसंस्कार करण्यात आले, याच ठिकाणी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, अन् त्याहून विशेष म्हणजे माहिम पार्कचं शिवाजी पार्क करण्याचं क्रेडिट देखील ठाकरे कुटूंबाकडेच जातं.. 

इतिहासतले दाखले सांगायचे झाले तर प्लेगच्या साथीत मुंबई शहराच्या विस्ताराची गरज इंग्रजांना वाटली. त्यातूनच बॉम्बे सिटी इम्प्रुव्हमेंट ट्रस्टची स्थापना करण्यात आली. या अंतर्गत परळ ते माहिम दरम्यान शहर वसवण्यात आलं तेच दादर. 

दादरच्या समुद्रकिनाऱ्याजवळ माहिम पार्क उभारण्यात आलं ते साल होतं 1925. पुढच्या दोनच वर्षात शिवजयंतीच्या तारखेचा वाद उफाळून आला. तेव्हा प्रबोधनकार ठाकरेंनी या माहिम पार्कवर शिवजयंतीचा कार्यक्रम साजरा करून माहिम पार्कचं शिवाजी पार्क करण्याची मागणी केली, तत्कालीन महापौर अवंतिकाबाई गोखले यांनी तात्काळ संमती दिली आणि १९२७ साली प्रबोधनकरांच्यामुळेच माहिम पार्कचं नाव शिवाजी पार्क करण्यात आलं.. 

दादर हे मुंबई शहर व उपनगर यांना जोडणारी मध्यवर्ती जागा होती. शिवाजी पार्क ही दादरमध्ये राहणाऱ्या मराठी कुटूंबासाठी मध्यवर्ती जागा होती. त्यामुळे इथेच अनेक राजकीय सभा, कार्यक्रम घेण्यासाठी प्रत्येक पक्ष पुढाकार घेवू लागला. संयुक्त महाराष्ट्राच्या अनेक सभा या मैदानावर झाल्या.. अर्थात मराठी माणसांच्या क्रांन्तीसाठी दादरचे शिवाजी पार्क ओळखले जावू लागले. यातूनच पुढे शिवसेनेच्या स्थापनेसाठी शिवाजी पार्कचं मैदान कामी आलं. पुढे दसरा मेळावा आयोजित करण्यात आला. मराठी माणसांचा राजकीय केंद्रबिंदूसाठी मध्यवर्ती ठरलेलं मैदान त्यामुळेच शिवसेनेकडे सहजपणे गेले आणि मुंबईतल्या मराठी माणसांनी देखील ते स्वीकारले. म्हणूनच ठाकरे कुटूंबासाठी शिवाजी पार्क मैदान महत्वाचं ठरतं. 

३) शिवसेना पक्षावरच दावा ठोकण्यासाठी हा दसरा मेळावा शिंदे गटाला आणि सेनेसाठी महत्वाचा आहे 

बाळासाहेबांच्या विचारांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यामधील दर्शनी गोष्ट म्हणजे दसरा मेळावा. शिवसेनेमार्फत पक्षाच्या पहिल्या वर्षापासून दसरा मेळावा आयोजित करण्यात येतो. दसरा मेळाव्याला मोठ्ठा इतिहास लाभलेला आहे. शिवसेना भवन, पक्षाचं चिन्ह, शाखा या पाठोपाठ दसरा मेळावा ही शिवसेनेची ओळख आहे. शिंदे गट पहिल्यापासून आपण स्वतंत्र नसून शिवसेना असल्याचा दावा करत आलेला आहे. हा दावा फक्त माणसांमध्ये पोहचण्यासाठी नसून निवडणूक आयोगापुढे देखील तो कायदेशीर पातळ्यांवर सिद्ध करण्याचं आवाहन एकनाथ शिंदे यांच्यासमोर आहे. 

आजपर्यन्त निवडणूक आयोगामार्फत मेजोरिटी टेस्टलाच प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून शिवसेनिकांचे एकनिष्ठता बॉण्ड पेपरवर लिहून घेण्यात आली. याच सत्तासंघर्षाचा पुढचा टप्पा म्हणजे दसरा मिळेवा प्रमुख भूमिका बजावणार आहे. 

 येत्या दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार हे फिक्स झालंय..त्यामुळे दसरा मेळाव्यात शिवसेनेचा आव्वाज घुमणार हे नक्की !

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.