या ५ डॉक्टरांनी चुकीचे सल्ले देण्याचं काम केल आहे, ज्यात केंद्रिय आरोग्यमंत्री देखील आहेत

कोण आहे आहे कोरोना, काय आहे हा कोरोना… मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो हा कोरोना भारतीयांच काही वाकडं करू शकणार नाही…

जरा डोक्याला लोड दिला तर हे वाक्य कोणाची होती ती आठवतील. आठवत नसतील तर आम्ही सांगतो. कोरोना नुकताच भारतात आला होता. सगळीकडे कोरोनाची हवा सुरू होत होती. अशा वेळी मुंबईच्या एका डॉक्टरांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात ते कोरोनामुळे भारतीयांच काही बिघडणार नाही अस सांगत होते.

दुर्दैव म्हणजे कोरोना हा आजारच नाही सांगणाऱ्या या अनिल पाटील डॉक्टरांच कोरोनामुळेच ऑगस्ट २०२० मध्ये निधन झालं. 

सुरवातीला कोरोनासारख्या गंभीर आजारांना विनोदात घेणारे काही ठराविक डॉक्टर मंडळी देखील सतर्क होवू लागली. संयमितपणे कोरोनावर भाष्य करु लागली. पण सगळेच शहाणे झाले असतील अस नाही. अजूनही काही डॉक्टर असे आहेत जे आजही कोरोनाच्या नावाने चुकीची माहिती देणं, गैरसमज निर्माण करणं अशी कामे करत असतात.

अशाच काही डॉक्टर मंडळींची यादी तुम्हाला देत आहोत.  

 

१) डॉ. हर्षवर्धन

डॉ. हर्षवर्धन हे नुसते डॉक्टर नसून केंद्रीय आरोग्य मंत्री आहेत. कोरोनाच्या महामारीत भारताचे नेतृत्व करत आहेत. जबाबदारीचे पद असताना कोरोना बाधितांना डार्क चॉकलेट खाण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्यांवर अनेक तज्ञ डॉक्टरांनी टिका केली.

काय केलं होतं : फेब्रुवारी महिन्यात रामदेव बाबा यांनी पतंजली कंपनी मार्फत कोरोनील गोळ्या बाजारात आणल्या. या गोळ्या कोरोना पासून बचाव करतात असा दावा केला होता आणि यासाठी WHO ने सर्टिफिकेट दिले असल्याचे सांगितले होते. या कोरोनीलचं डॉ. हर्षवर्धन यांच्या उपस्थित लॉन्चिंग झाले होते.

काय झालं : इंडियन मेडिकल असोसिएशने रामदेव बाबाच्या कोरोनील गोळ्यांना WHO ने सर्टिफिकेट दिले नसल्याचे सांगितले. हा दावा खोटा असल्याचे सांगितले होते.

 

२) डॉ. रणदीप गुलेरिया

भारतात पंतप्रधान असो की राष्ट्रपती आजारी पडल्यावर त्यांना प्रथम  एम्स दाखल करण्यात येते. दिल्ली एम्सचे संचालक आहेत डॉ. गुलेरिया. त्यामुळे ते किती मोठे डॉक्टर आहेत याचा अंदाज येतो.

काय म्हणाले होते : डॉ. गुलेरिया यांनी पत्रकार परिषद घेवून कोरोनाची लक्षणे कमी असेल तर सिटी स्कॅन करायची गरज नसल्याचे सांगितले होते. १ सिटी स्कॅन ३०० ते ४०० एक्सरे बरोबर आहे. तरुण जर वारंवार सिटी स्कॅन करतील तर त्यांना भविष्यात कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो असे सांगितले होते.

काय झाले : डॉ. गुलेरिया यांनी केलेला दावा इंडियन रेडीओलॉजिकल एंड इमेजिंग असोसिएशन फेटाळून लावला. असोसिएशन सांगितले की, सध्या वापरत असलेल्या सिटी स्कॅन मशीन या आधुनिक आहेत आणि त्यातून निघणारे रेडियेशन केवळ ५ ते १० एक्सरेच्या बरोबरीचे असते.

छातीचा सिटी स्कॅन घेतल्याने कोरोनाचा किती फैलाव झाला याची निश्चित माहिती मिळते. रुग्ण गंभीर होण्यापासून सिटी स्कॅनची मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

३) डॉ. बिस्वरूप रॉय चौधरी

युटूब वरून आरोग्याचे सल्ले देणारे भारतीय कमी नाहीत. त्यातील एक आहेत डॉ. बिस्वरूप रॉय चौधरी. ते आहार तज्ञ असून युटूब आणि फेसबुक वर त्यांचे लाखो चाहते आहेत.

काय केले : डॉ. चौधरी यांनी गेल्या वर्षी कोरोनावर ‘कोव्हिड १९८१’ असे पुस्तक लिहिले आहे. त्यात कोरोना खोकला, ताप सारखा साधा आजार असल्याचे सांगितले. नारळपाणी, मोसंबी आणि संत्रा यांचे पाणी पिवून तीन दिवसात कोरोना नाहीसा होतो असा दावा केला होता.

काय झाले : कोरोना बाबत सतत खोटी माहिती देत असल्यामुळे युटूब आणि फेसबुक खाते बंद करण्यात आले आहे. मात्र अजूनही काही लोकं ते खर समजून व्हॉट्सअप वरून त्यांचे व्हिडीओ एकमेकाला पाठवत असतात.

४) हिलर भास्कर

हिलर भास्कर हे तमिळनाडूत मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत. युटूबवर त्यांचे ६ लाख ४० हजार फॉलोअर्स आहेत. ग्रामीण भागात कॅम्प घेऊन ते इलाज करतात.

काय केले : कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्यांनी दावा केला होता की, कोरोना बाधितांना एका वेगळ कडून लोकसंख्या कमी करण्यासाठी मारून टाकण्यात येईल. त्यानंतर आता दुसऱ्या लाटेत त्यांनी नागरिकांनी मास्क घालू नये असे आवाहन केले होते. मास्क घातल्याने ऑक्सिजनची पातळी घटते असा दावा केला होता”.

काय झाले : कोरोनाचा चुकीच्या पद्धतीने इलाज करण्याचा सल्ला दिल्या बद्दल त्यांना कोयम्बतूर येथे अटक करण्यात आली होती. तर आता मास्क घातल्यावर शरीरातील ऑक्सिजन लेवल कमी होते असा दावा केल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

५) थानिकासम

कुठलेही शिक्षण न घेतला थानिकासम हे डॉक्टर झाले आहेत.  कोयम्बतूर मध्ये सिद्धा नावाचे  हॉस्पिटल चालवितात.

काय केले :  कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोनाचा इलाज करणारे आयुर्वेदिक औषध शोधून काढलाच दावा थानिकासम यांनी केला होता. एवढे करून ते थांबले नाही तर त्यांनी पेपर मध्ये जाहिरात सुद्धा दिली होती.

काय झाले : डायरेक्टर ऑफ इंडियन मेडिसिन एंड होमोयोपॅथीने थानिकासम विरोधात तक्रार दिली. त्यानंतर तामिळनाडू पोलिसांनी थानिकासमला अटक केली.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.