या ५ कारणांमुळे कळतं की, गल्ली टू दिल्ली कॉंग्रेसला घरघर का लागलीये…
अशोक चव्हाण कॉंग्रेस सोडणार, गुलाम नक्बी आझादांनी कॉंग्रेस सोडली, कपिल सिब्बल यांनी कॉंग्रेस सोडली, आनंद शर्मा कॉंग्रेस सोडण्याच्या मार्गावर, शशी थरूर कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार..कॉंग्रेसचा G23 गट नाराज..आत्ता या अशा बातम्या रोजच्याच झाल्या आहेत, भले भले दिग्गज नेते कॉंग्रेसला सोडून तरी चाललेत किंवा तशा चर्चा तरी चालू आहेत.
तर दूसरीकडे KCR, नितीश कुमार, शरद पवार, ममता बॅनर्जी अशा नेत्यांच्या नेतृत्वात मोदी सरकार विरोधात आघाडी उभी करण्यात येतेय. या नेत्यांकडून देखील आपल्या आघाडीचा उल्लेख दूसरी आघाडी असा केला जातोय. म्हणजेच मोदी विरोधक गटाकडून देखील कॉंग्रेसला दुर्लक्षित केलं जातय.. नेमकं काय चाललय कॉंग्रेसमध्ये ? आणि गल्ली टू दिल्ली कॉंग्रेसला घरघर का लागलेय हेच जाणून घेऊया.
कॉंग्रेसला घरघर लागण्याचं प्रमुख कारण सांगण्यात येतय ते म्हणजे,
जेष्ठ नेत्यांसोबत नसलेला ताळमेळ
अशोक चव्हाण. त्यांचे वडिल शंकरराव चव्हाण. कॉंग्रेसी विचारसणीची परंपरा लाभलेलं चव्हाण कुटूंब, तशीच गोष्ट गुलाम नक्बी आझाद यांची. तशीच गोष्ट महाराष्ट्रातल्या सुशिलकुमार शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाण यांची. इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर राजीव गांधींच्या हाती पक्षाची सुत्र आली.
तेव्हा यशवंतराव चव्हाण आत्ता दिल्लीला यायचे नाही या विचारात होते. अशा वेळी राजीव गांधींनी त्यांना बोलावलं व तुमचं मार्गदर्शन मला आवश्यक आहे अशी विनंती केली.
मात्र राहूल गांधींच्या बाबतीत मात्र वेगळं होतय.
काही महिन्यांपूर्वी सुशिलकुमार शिंदे यांनी गेल्या तीन ते चार वर्षात राहूल गांधी व प्रियंका गांधी यांच्यासोबत संवाद झाला नसल्याचं स्पष्ट केलं होतं. काहीसे असेच वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं. चव्हाण असोत वा शिंदे दोघेही जेष्ठ.
केंद्रासोबत राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा वाहणारे नेते. अशा वेळी राहूल गांधी यांनी जेष्ठत्वाचा सल्ला घेवून जुन्या व नव्या पिढीला एकत्र आणणं गरजेचं आहे,पण हे घडून येत नाही.. त्याचाच अंतिम निर्णय म्हणजे जुने नेते ज्यांना कॉंग्रेसी विचारधारेची परंपरा आहे असे नेतेही कॉंग्रेस सोडून जात आहेत..
दूसरा मुद्दा म्हणजे, राहूल गांधींच्या यंग ब्रिगेडचं काय झालं
2014 पुर्वी राहूल गांधी यांच्या नेतृत्वात अनेक नेते पुढे येत होते. सचिन पायलट, ज्योतिरादित्य सिंधीया, जितीन प्रसाद, दिपेंद्र हुड्डा, प्रियंका चतुर्वेदी अशी काही प्रमुख नावं आजही सांगता येतात. जेष्ठांना डावलताना नवी पिढी भक्कम असावी लागते मात्र गेल्या आठ वर्षात ही राहूल गांधींची यंग टिमच राजकीय पटलावरून गायब झालेली दिसतेय.
तरुण आणि जेष्ठ नेते यांच्या सत्तास्पर्धेत अशोक गेहलोत सारख्या नेत्यांनी राहूल गांधींच्या तरूण नेतृत्वावर मात केल्याचं राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्या तथाकथित बंडखोरीत दिसून आलं तर दूसरीकडे ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासारख्या नेत्यांनी थेट भाजपमध्ये जात आपला मार्ग निवडला. कॉंग्रेसच्या या नव्या टिमचा नाराज होण्याचा सिलसिला साधारण 2019 च्या लोकसभा निवडणूकांनंतर घडलेला दिसतो.
याचं मुख्य कारण सांगता येत ते म्हणजे सत्तेचं भविष्य.
गुजरात विधानसभा निवडणूकांनंतर कुठेतरी मोदींची लाट ओसरेल व राहूल गांधींच्या नेतृत्वात सत्तेच्या जवळपास जाता येईल या आशा 2019 च्या लोकसभा निवडणूकांनंतर संपुष्टात आल्या. त्यानंतर मात्र बुडणाऱ्या जहाजातून उडी मारण्याचा खेळ यंग ब्रिगेडने केला. साहजिकच विरोधात असताना नव्याने नेतृत्व तयार करण्याचं नव आव्हान राहूल गांधींच्या समोर उभा असलेलं दिसतं..
तिसरं कारण म्हणजे, पक्षाची फसत चाललेली स्ट्रेटेजी
कुठेतरी कॉंग्रेसच चुकतय अशी टिका वारंवार होत असते. पक्षाचे अनेक कार्यक्रम या टिकेला पुरक ठरताना दिसतात. अगदी गेल्या चार पाच महिन्यांची आकडेवारी पहायची झाली तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुणे-मुंबई असा दोन वेळा दौरा केला. मात्र 2021 ची आकडेवारी अस सांगते की 2019 च्या लोकसभा निवडणूकांनंतर राहूल गांधी देशातल्या 17 राज्यामध्ये एकदाही फिरकले नाहीत.
अगदी महाराष्ट्रात देखील ते एकदाच आले होते. तेच दुसरीकडे 2024 च्या लोकसभा निवडणूकांचा अंदाज घेवून केंद्रिय मंत्री आजच्या क्षणी महाराष्ट्रात तळ ठोकून आहेत.
महाराष्ट्रातल्या 16 मतदारसंघात सहा केंद्रीय मंत्री पुढील अठरा महिन्यांमध्ये दौरा करत आहेत. यामध्ये प्रत्येक मंत्र्याने 3 दिवस या मतदारसंघात मुक्काम ठोकायचा आहे. या अंतर्गत केंद्रिय मंत्री सोमप्रकाश यांचा नुकताच सातारा लोकसभा मतदारसंघाचा दौरा झाला. यात ते गावखेड्यात पोहचले.
याउलट राहूल गांधींची यात्रा म्हणायला 12 राज्यातून जाणार आहे पण नकाशा पाहिल्यानंतर कळतं की प्रत्येक राज्याच्या कोपऱ्या कोपऱ्यातून ही यात्रा जातेय. युपी सारख्या राज्याच्या कोपऱ्यावरून जाणारी ही यात्रा जळगाव आणि नांदेड वरून जात आहे. यूपीचा मोठ्ठा भाग, बिहार, झारखंड, छत्तीसगड, आंध्रचा मोठ्ठा भाग, तामिळनाडू अशा अनेक राज्यांमध्ये या यात्रेचे पाय देखील लागणार नाहीत.
साहजिकच लोकांच्यात न जाण्याची जी टिका राहूल गांधी व कॉंग्रेसला सहन करावी लागतेय त्याला कुठेतरी पक्षाचा कृतीकार्यक्रम देखील सार्थ ठरवताना दिसतोय.
चौथं कारण म्हणजे घराणेशाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच कॉंग्रेसवर घराणेशाहीवरून टिका केली होती. 2014 साली लोकसभेचा मुख्य प्रचार देखील राजकुमार विरुद्ध सामान्य चहावाला या अजेंड्याखाली भाजपने आखला होता. मात्र भाजप मध्ये देखील घराणेशाही आहे असं आकडेवारी सांगते.
2019 सालच्या महाराष्ट्रात झालेल्या विधानसभेच्या निवडणूकांमधील मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवारांची आकडेवारी पहायची झाल्यास एकूण 116 उमेदवारांपैकी 94 उमेदवार हे घराणेशाहीतले होते. यामध्ये राष्ट्रवादी पक्षातर्फे 35, भाजपकडून 25, शिवसेनेकडून 11 तर कॉंग्रेसकडून 19 उमेदवार घराणेशाहीचं प्रतिनिधित्व करत होते.
तरिही कॉंग्रेसवरच का टिका होते, याच प्रमुख कारण मिळतं वरच्या पातळीवर होणाऱ्या नियुक्त्या व निवड.
युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत कुणाल राऊत, कुणाल राऊत हे माजी मंत्री नितीन राऊत यांचे चिरंजीव आहेत. भाजपसोबत तुलना करायची झाल्यास कॉंग्रेसची घराणेशाही नेतृत्वाकडून खालच्या पातळीकडे सरकताना दिसते, मग ते राहूल गांधी असोत, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण असोत की कुणाल राऊत, सत्यजित तांबे असोत..
सर्वात शेवटचं आणि पाचवं कारण म्हणजे सातत्याने मिळणारं अपयश
अगदी नुकत्याच झालेल्या निवडणूकांचे निकाल पाहीले तर विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेसचा दारूण पराभव झालेला दिसतो. पंजाबमध्ये कॉंग्रेसला फक्त 18 जागा जिंकता आल्या. मागील वेळेस त्या 77 इतक्या होत्या. गोवा विधानसभेत त्यांना फक्त 11 जागा जिंकता आल्या. मणिपूर राज्यात 60 पैकी फक्त तीन जागा कॉंग्रेसच्या वाट्याला आल्या तर युपी सारख्या राज्यात कॉंग्रेसच्या वाट्याला एकूण 403 जागांपैकी फक्त 2 जागा जिंकता आल्या
2019 नंतर झालेल्या विधानसभा निवडणूकांचे निकाल पहायचे झाल्यास महाराष्ट्रात पराभव, ओडिसामध्ये पराभव, अरुणाचलमध्ये पराभव, सिक्कीमध्ये पराभव, हरियाणात पराभव, प.बंगालमध्ये पराभव, केरळमध्ये पराभव, आसाममध्ये पराभव,पॉण्डेचेरीत पराभव बिहार आणि दिल्लीत देखील पराभवच.
राजस्थान आणि छत्तीसगड या दोन राज्यांमध्येच कॉंग्रेसचे मुख्यमंत्री आहेत. तर झारखंड आणि तामिळनाडूमध्ये कॉंग्रेस सत्तेत सहभागी आहे.
साहजिक सातत्याने मिळत असलेल्या या अपयशला कुठेतरी सातत्याने सत्तेत राहिलेले नेते कंटाळले आहेत. याच कारणांमुळे व अशा अनेक गोष्टींमुळे दिल्ली ते गल्ली कॉंग्रेसला ओहोटी लागलेली दिसून येतेय. मग अशोक चव्हाण यांच्यासंबंधित येणाऱ्या बातम्या असोत की गुलाम नक्बी आझाद यांचा पक्ष सोडण्याचा निर्णय असो.
हे ही वाच भिडू
- लवकरच काँग्रेसचा अध्यक्ष निवडला जाणार…पण त्याची निवडणूक प्रक्रिया कशी पार पडते ?
- तरुण नेते जात आहेतच पण ज्यांनी आपली उभी हयात पक्षात घातली तेही काँग्रेस सोडतायेत
- कितीही चर्चा झाल्या तरी गुलाम नबी आझाद काँग्रेस सोडत नाही त्यामागे ही कारणं आहेत