यंदाच्या दिवाळीत सहकुटुंब फिरायला जात असला, तर हंपी सारखा बेस्ट ऑप्शन नाही कारण

दिवाळीच्या सुट्यांमध्ये दक्षिण भारतात टूर करायचा असेल तर शेकडो वर्षांपासून उभ्या असलेल्या दक्षिणेच्या भव्य मंदिरांवरचं कोरीवकाम पर्यटकांना भुरळ घालतं. मंदिरांसोबत दक्षिणेचे अनेक राजवाडे आणि किल्ले सुद्धा पर्यटकांच्या लिस्टमध्ये असतात.

पण या लिस्टमध्ये एक ठिकाण असं आहे जिथे किल्ला, राजवाडे आणि मंदिर हे सर्व एकाच ठिकाणी बघायला मिळतात.

ते ठिकाण म्हणजेच हंपी….

ज्याने कुणी हंपी शहराला भेट दिलीय तो हंपीच्या प्रेमात नक्कीच पडतो. कारण या ठिकाणचं वैभव आणि वास्तूंची सुंदरता ही भूतो न भवती अशीच आहे. या ठिकाणाला लाभलेल्या इतिहासामुळे हे शहर इतक्या भव्य आणि सुंदर वास्तूंनी नटलेलं आहे.  

कारण या हंपी शहराने एक दोन नाही तर एकूण ४ घराण्यांची सत्ता पाहिली आहे. 

दक्षिण भारतात चोल साम्राज्याची सत्ता संपली होती. तेव्हा इसवी सन १३३६ मध्ये हरिहर आणि बुक्का म्हणजेच (हक्का आणि बुक्का) या दोन भावांनी दिल्ली सल्तनतीच्या विरोधात युद्ध जिंकलं आणि  कर्नाटक राज्यात संगम साम्राज्याची स्थापना केली होती. त्यांनी राजधानी म्हणून विजयनगर शहराची स्थापना केली. तेच विजयनगर म्हणजे आजचं हंपी शहर होय.  

संगम वंशानंतर सालूवा आणि त्यानंतर तुलूवा घराण्याचं राज्य आलं. याच तुलूवा घराण्याच्या काळात विजयनगर साम्राज्याला सगळ्यात मोठं वैभव मिळालं होतं. 

तुलूवा घराण्याच्या एकूण ६ राजांनी विजयनगरवर राज्य केलं होतं मात्र त्यातील सगळ्यात जास्त प्रसिद्ध होते ते राजा कृष्ण देव राय. १५०९ ते १५२९ या २० वर्षांच्या राजवटीत विजयनगर साम्राज्य दक्षिण भारतात कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, केरळ तसेच उडीसा राज्याचा काही भाग आणि श्रीलंकेच्या काही भागावर विस्तारलं होतं. त्यांच्याच काळात विजयनगर साम्राज्यातले प्रसिद्ध सोन्याचे नाणे पाडण्याचं प्रमाण वाढलं होतं.

तेव्हा विजयनगरला भेट देणाऱ्या अनेक परदेशी प्रवाशांनी आणि राजदूतांनी या शहराचं वर्णन जगातील सगळ्यात जास्त आधुनिक आणि भव्य शहर म्हणून केलं होतं. त्याकाळी विजयनगर शहराला बीजिंगनंतर जगातील सगळ्यात मोठं शहर मानलं जात होतं. 

तुलूवा घराण्यानंतर अरिविडू घराण्याची सत्ता आली. चार घराण्यांच्या सत्ताकाळात १३३६ ते १५५६ या २२० वर्ष विजयनगर शहर भरभराटीला आलं पण नंतरच्या काळात शहराचा विनाश सुरु झाला.  

पण १५६५ मध्ये विजयनगर साम्राज्य आणि बहामनी राज्यात युद्ध झालं. या युद्धात बहामनी राज्याच्या सैनिकांनी शहराची मोठ्या प्रमाणावर नासधूस केली. यानंतर शहर हळूहळू ओस पडायला लागलं. पण इसवी सन १८०० मध्ये कॉलिन मॅकेंजी या ब्रिटिश अभियंत्याने या शहराच्या संवर्धनासाठी काम सुरु केलं आणि पुन्हा एकदा हे भव्य शहर जगाच्या समोर आलं. 

परंतु हल्ल्यांमध्ये या शहरातील मंदिरं आणि मंदिरांची पडझड झाली त्यातल्या मुर्त्या भंग पावल्या. पण नंतरच्या काळात झालेल्या संवर्धनात यातील बऱ्याचशा वस्तू पुन्हा एकदा लोकांसमोर आल्या. 

हंपी काही एकसंध शहर नाही तर ४,१८७ हेक्टरवर पसरलेल्या अनेक टेकड्या आणि त्या टेकड्यांमध्ये वसलेल्या अनेक महाल आणि मंदिरांचा समूह आहे. त्यामुळे या परिसराला वेगवगेळ्या टेकड्या आणि गावांमध्ये फिरून बघावं लागतं. 

हंपीत बघण्यासारखं सगळ्यात पहिलं महत्वाचं ठिकाण म्हणजे विरुपाक्ष मंदिर 

८ व्या शतकापासून आजपर्यंत १२ शतकं हे मंदिर उभं आहे. हे मंदिर हंपीतीत सगळ्यात जुनं इतिहासदर्शक आहे.कारण याच मंदिराने विजयनगर साम्राज्याचा उदय आणि अस्त दोन्ही पहिले आहे. पण आजगायत हे मंदिर सुरक्षित आहे. मंदिराचे पूर्व दिशेचे गोपुर जवळपास १०५ फूट उंच आहे. त्याच्या आता भव्य आयताकृती अंगण आहे आणि त्यात अनेक लहान गोपुरं आहेत. 

यातील सर्वात लहान गोपुर आणि राज्याभिषेक मंडप कृष्णदेवराय यांच्या काळात बांधण्यात आलं होतं. इथल्या मंडपाला १०० खांब असून, मंदिरात मोठा नंदी आहे आणि त्यावर गिरिजा शंकराची मूर्ती आहे. या मंदिरात हिंदू धर्मातील अनेक देवतांच्या कथांचे शिल्प कोरण्यात आले आहेत. 

विरुपाक्ष मंदिरानंतर हंपीतलं प्रमुख आकर्षण म्हणजे विठ्ठल मंदिर.  

या विठ्ठल मंदिराची निर्मिती १५ व्य शतकात करण्यात आली होती. तर १५१३ ते १५६४ या अवघ्या ५१ वर्षांच्या काळात या मंदिराचा तब्बल २३ वेळ जीर्णोद्धार करण्यात आला होता. अख्या दगडाच्या चौथऱ्यावर या मंदिराची निर्मिती करण्यात आली असून या मंदिराला ३ दरवाजे आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारावर तुटलेला भव्य हत्ती आहे. 

गर्भगृहात विठ्ठलाची मूर्ती आहे तर मंदिरांच्या खांबांचं कोरीवकाम बघण्यासारखं आहे. या खांबांवर रामायणातले प्रसंग कोरलेले आहेत. मंदिराला लागूनच कल्याण मंडप आहे ज्यावर देवीदेवत्यांच्या मुर्त्या कोरलेल्या आहेत. याच मंडपात राजघराण्यातील लोकांचे विवाहसमारंभ होत होते. 

विठ्ठल मंदिराच्या आवारात ३५ फूट उंचीचा जगप्रसिद्ध दगडी रथ आहे.

या रथाला पाहिल्यावर रथ एकाच दगडात कोरलेला आहे असं वाटतं. पण हा रथ अनेक दगडांचा अतिशय चपखल पद्धतीने वापर करून बांधलेला आहे. रथाला दगडी चाकं आहेत आणि त्यावर कोरीव काम करण्यात आलंय. रथाच्या समोर दगडाचे दोन हत्ती ठेवलेले आहेत. रथाला पाहिल्यावर लाकडी रथ दगडाचा झाला असेल असा भास होती.  

या दोन्ही मंदिरांसोबत हजारा राम मंदिर पर्यटकांचं लक्ष वेधून घेतं.

या मंदिराची स्थापना विजयनगर साम्राज्यातल्या पूर्वीच्याच राजांनी केली होती. पण कृष्णदेवराय यांच्या काळात या मंदिराला भव्य रूप मिळालं. हे मंदिर २०० फूट रुंद आणि १०० फूट लांब चौथऱ्यावर बांधलेलं आहे. राम हे विष्णूचे अवतार असल्यामुळे मंदिराच्या खांबांवर रामायण आणि महाभारताचे प्रसंग कोरण्यात आलेले आहेत. दगडी खांबांवर बारीक नक्षीकाम करून या मुर्त्या कोरण्यात आल्या आहेत. या मंदिरात काळ्या घोड्यावर विष्णूचा कल्की अवताराची मूर्ती सुद्धा आहे. 

परिसरातील सगळी मंदिर ग्रॅनाइटच्या पांढऱ्या आणि बेसाल्टच्या काळ्या दगडांनी बांधण्यात आली पण इथे गुलाबी रंगाच्या दगडात बांधलेलं लोटस महाल हे अप्रतिम सुंदर आहे.  

राण्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी बनवलेल्या या महलाचं कमळाच्या फुलाप्रमाणे बांधकाम करण्यात आलेलं आहे त्यामुळे या महलाला लोटस महाल हे नाव देण्यात आलंय. खांब आणि कमानींनावर बांधण्यात आलेल्या या महालाच्या कमानी मुस्लिम वास्तूशैलीसारख्या आहेत. महालाच्या छतावर मंदिरातील गोपुरांसारखे कळस बांधण्यात आलेले आहेत.   

हंपीत आणखी दोन मंदिर आहेत ज्यांच्यात अप्रतिम मूर्तिकळेच वापर करण्यात आला आहे.

यात पाहिलं आहे सासवकेलू गणेश मंदिर आणि दुसरं आहे लक्ष्मी नरसिंह मंदिर. चार बाजूंनी बसवलेल्या मखरात सासवकेलू गणपतीची मूर्ती २२ फूट उंचीची मूर्ती स्थापन करण्यात आलीय. मूर्तीच्या समोर असलेला उंदीर आणि गणपती या दोन्ही मुर्त्या वेगवगेळ्या दगडात कोरण्यात आलेल्या आहेत. 

या गणपतीसोबतच हंपीत आणखी एक १७ फूट उंच गणेशाची मूर्ती आहे जिला कडलेकलू म्हणून ओळखलं जातं. या टेकडीवरच्या गणपतीजवळ एकेकाळी सोन्या चांदीच्या आणि होर्या मोत्यांच्या वस्तूंचा बाजार होता. 

तर लक्ष्मी नरसिंह मंदिरात उग्र नरसिंहाची २२ फुटांची भव्य मूर्ती स्थापन केलेली आहे. श्रीविष्णूंचा अवतार असलेल्या नरसिंहाच्या एका मांडीवर लक्ष्मी बसलेली आहे. तर नरसिंहाच्या डोक्यावर शेषनागाचा फणा आहे. आश्चर्य म्हणजे नरसिंहाच्या मंदिरासमोर अखंड दगडातील शिवलिंग आहे. 

विजयनगरवर राज्य करणाऱ्या राजांच्या राज्याभिषेकासाठी चौथरा बांधण्यात आला होता. 

हंपीतील विजय चौकात ५३०० चौरस फुटाचा राज्याभिषेक चौथरा आहे ज्याला ४० फूट उंच लाकडी बांधकाम केलेला व्हरांडा आहे. या चौथऱ्यावर चढण्यासाठी हिरव्या रंगाच्या दगडांनी गोलाकार जिना बांधलेला आहे या चौथऱ्याच्या जवळ १०० खांबांचा दोन माजली भव्य सभागृह आहे. सभागृहाजवळ राणी आणि दास्यांना बसण्यासाठी खोल्या बांधलेल्या आहेत. याच्या जवळच आखीव पायऱ्या असलेला कुंड आहे. हा कुंड २५० फूट खोल आहे आणि याला १२५ पायऱ्या आहेत. 

विजय चौकातला परिसर हा सर्व राजमहालाच्या परिसर होता. या परिसरात आज फक्त भग्नावशेष उरलेले आहेत. परंतु यात एक तटबंदी अजूनही कायम आहे. ती म्हणजे झेनाना तटबंदी.राणीवंशातील राण्यांचा इतर भागाशी संबंध येऊ नये यासाठी या तटबंदीचं बांधकाम करण्यात आलं होतं. 

राणीमहालानंतर दिसतो तो हत्तीखाना..

विजयनगरमध्ये असलेल्या राजेशाही हत्तींना ठेवण्यासाठी मुस्लिम घुमटाच्या आकाराप्रमाणे भव्य हत्तीखाना बांधलेला आहे. ११ दालन असलेला हा हत्तीखाना १,२०० फूट लांब आहे. या हत्तीखान्याच्या आत हत्तींना बांधण्यासाठी लोखंडाच्या मजबूत साखळ्या अडकवलेल्या आहे.

सरतेशेवटी हंपीचा सर्व इतिहास एकाच ठिकाणी बघता येईल असं ठिकाण, हंपीतील म्यूजियम.

हंपीच्या कमलापूरमध्ये कर्नाटक सरकारने बांधलेलं  भव्य आणि प्रशस्त म्यूजियम आहे. पहिल्या दालनात हंपी शहराची प्रतिकृती ठेवण्यात आलीय. तर दुसऱ्या दालनात उत्खननातील दगड ठेवण्यात आले आहेत. म्युजिअममध्ये हिंदू देवी देवतांच्या मूर्ती आणि शिलालेख ठेवण्यात आलेले आहेत.

हंपी शहरात मिळालेल्या सर्व महत्वाच्या वस्तू आणि दगडी मुर्त्या या म्युजिअममध्ये संरक्षित करून ठेवण्यात आलेल्या आहेत. यात विजयनगर शहराच्या स्थापनेसंदर्भात कोरण्यात आलेले ७७ शिलालेख सुद्धा ठेवण्यात आलेले आहे. २२० वर्ष विजयनगर साम्राज्याच्या राजधानीचं वैभव मिरवणारं हे शहर डोळे भरून बघण्यासारखं आहे. म्हणून या दिवाळीत फिरायला जाण्याचा प्लॅन बनावत असाल तर हंपीचा पर्याय क्लिक करा.

हे ही वाच भिडू

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.