हे आहेत सगळ्यात जास्त कमाई केलेले, दहा मराठी सिनेमे…

बॉलीवुड आणि टॉलीवुड म्हणलं की अॅक्शन, डायरेक्शन, लोकेशन आणि कलेक्शन, सगळ्या गोष्टींवर मोठ्ठं डिस्कशन व्हायलाच लागतंय, शेंबड्या पोरांपासून सिनेमाच्या क्रिटीक्सपर्यंत सगळे आपापली सिनेमाविषयीची मतं मांडताना दिसतात. आणि बॉलीवुड टॉलीवुडच काय, यात आपली मराठी इंडस्ट्री सुद्धा मागे नसते.
पण या सगळ्यात मराठी सिनेमांनी किती कलेक्शन केलं, कमाई केली ह्याची चर्चा फार होताना दिसत नाही. मराठी सिनेमे बिग बजेट जरी नसले तरी मार्केटमध्ये हवा नक्की करतात.
त्यामुळे कोणता पिक्चर चालला किंवा पडला या प्रश्नाच्या पलीकडे जाऊन आज आपण पाहूया असे दहा मराठी सिनेमे, ज्यांनी मराठी फिल्म इंडस्ट्रीत आत्तापर्यंत सर्वाधिक कमाई केली आहे.
दहाव्या नंबरवर आहे मुळशी पॅटर्न
या पिक्चरची स्टोरी फिरते शहरीकरण आणि गुन्हेगारी भोवती. मुळशी तालुक्यातून जमीन विकून कित्येक कुटुंब पुण्यात येतात, मिळेल ते काम करतात. पुढं या घरातली मुलं गुन्हेगारी क्षेत्राकडे वळतात, तेव्हा या गुन्हेगारीचा अंत कसा होतो? याचा परिणाम कसा होतो? याचं दाहक वास्तव मुळशी पॅटर्न मधून दाखवण्यात आलंय.
सिनेमात प्रवीण तरडे, ओम भूतकर, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, क्षितिज दाते यांची कामं आहेत तर सिनेमा दिग्दर्शित केलाय स्वतः प्रवीण तरडे यांनी.
या सिनेमाने अकरा दिवसांत 11 कोटींची कमाई केलेली तर या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन 20 ते 22 कोटी झालय असं सांगण्यात येत
नवव्या नंबरवर आहे ‘नाळ’ हा सिनेमा.
नाळ हा सिनेमा सुरवातीला चर्चेत आला तो पिक्चरमध्ये असलेल्या एका छोट्या पोरामुळे. सिनेमाची स्टोरी सुद्धा या पोराभोवती फिरते. हा पोरगा आपल्या आई बाबांचा अतिशय लाडका असतो. पण आपण आपल्या आई बापाच्या पोटी जन्मलेलो नाही हे कळल्यानंतरचा या चिमूरड्याचा प्रवास ह्या सिनेमात दाखवला आहे.
या सिनेमात नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार आणि श्रीनिवास पोकळे यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर सिनेमा दिग्दर्शित केलाय सुधाकर रेड्डी यांनी.
या सिनेमाने पहिल्याच आठवड्यात तूफान कमाई करत १४ कोटींचा टप्पा गाठला होता, आणि ओवर ऑल पाहिलं तर २४.७२ कोटींचा गल्ला जमवला.
आठव्या नंबरवर आहे, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ हा सिनेमा
दिनकर भोसले नावाच्या एका सामान्य माणसासोबत घडणाऱ्या आणि नंतर याच माणसामुळे घडणाऱ्या असामान्य गोष्टी या सिनेमात दाखवल्या आहेत. काही पिक्चर आपल्याला स्टार्ट टू एंड तोंडपाठ असतात आणि कितीही वेळा पाहिले तरी परत पुढल्या वेळी पाहू वाटतात, त्या कॅटेगरीमध्ये हा सिनेमा मोडतो.
मराठमोळ्या महाराष्ट्रात जेव्हा मराठी लोकांनाच किंमत दिली जात नाही तेव्हा मराठी माणसाने पेटून उठून बंड करायचं असतं असं हा सिनेमा शिकवतो.
हा सिनेमा संतोष मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलाय, आणि या सिनेमात सचिन खेडकर, सूचित्रा बांधेकर, प्रिया बापट, सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपूरे आणि महेश मांजरेकर यांनी कामं केली आहेत.
२००९ साली आलेल्या आणि मराठी माणसाचा अभिमान जागरूक करणाऱ्या या चित्रपटाने तब्बल २५ करोड रुपयांचा टर्न ओव्हर केला. आणि या पिक्चरची पहिल्या आठवड्याची कमाई साधारण १.५ करोंड रुपये होती.
सातव्या नंबरवर आहे दुनियादारी हा सिनेमा
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात येणारी ‘कॉलेज’ वाली फेज किती गोड पण तेवढीच कडू असू शकते हे या पिक्चरमध्ये दाखवलय. ही गोष्ट कॉलेज मधली दुनिया आणि दुनियादारी दाखवते.
दुनियादारी हा पिक्चर, सुहास शिरवाळकर यांच्या कादंबरीवरुन घेण्यात आलाय. संजय जाधव यांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात तर मराठमोळ्या आणि ऑल टाइम हिट असणाऱ्या कलाकारांची मोठी फळीच आहे. या सिनेमात अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, उर्मिला कानेटकर, जितेंद्र जोशी, सुशांत शेलार अशा एकसोएक काळकरांनी कामं केली आहेत.
२०१३ साली रिलीज झालेल्या आणि दिल दोस्ती आणि दुनियादारी शिकवणाऱ्या ‘दुनियादारी’ या पिक्चरने सुमारे ३२ करोडहून अधिक प्रॉफिट कमावला. शिवाय या पिक्चरची पहिल्या आठवड्यात १.८ करोंड रुपये कमाई झालेली
सहाव्या नंबरवर आहे टाइमपास सिनेमा
वयात आलेल्या पोराची पहिली वहिली लव्ह स्टोरी आणि त्याच्या आयुष्यात त्या दरम्यान घडणारे प्रसंग या पिक्चरमध्ये भारी दाखवलेत. रिक्शाचालकाचा मुलगा दगडू एका मध्यमवर्गीय मुलीच्या प्रेमात पडतो आणि मुलीच्या घरच्यांना हे अर्थातच मान्य नसतं त्यामुळे ते गांव सोडून निघून जातात अशी साधारण स्टोरी आहे.
हा पिक्चर दिग्दर्शित केलाय रवी जाधव यांनी, आणि मुख्य भूमिकेत म्हणजेच दगडूच्या भूमिकेत प्रथमेश परब आहे आणि प्राजूच्या (प्राजक्ता) भूमिकेत केतकी माटेगांवकर आहे.
२०१४ साली आलेल्या आणि अख्ख्या तरुणाईला वेड लावलेल्या ‘टाइमपास’ या सिनेमाने टोटल 33 करोंडचा बिझनेस केला होता. शिवाय या पिक्चरच दोनच दिवसांत 5 कोटी collection झालं होतं असं सांगण्यात येतं
पाचव्या नंबरवर आहे कट्यार काळजात घुसली
शास्त्रीय संगीताची मेजवानी म्हणजे हा सिनेमा. आता तुम्हाला वाटेल गाणं शिकणाऱ्या आणि शास्त्रीय संगीत आवडणाऱ्या लोकांनीच हा सिनेमा आवर्जून जाऊन बघितला असेल. मग या पिक्चरचं नाव सर्वाधिक कमाई केलेल्या सिनेमानच्या यादीत कसं? तर हा सिनेमा फक्त शास्त्रीय संगीत ऐकणाऱ्यांनी नाही तर बऱ्याच सामान्य जनतेने सुद्धा आवडीने पाहिला. या सिनेमाची स्टोरी लाइन एका संगीत नाटकावरून घेण्यात आली होती. आणि या सिनेमाला चार चाँद लावणारी गोष्ट होती ती म्हणजे या सिनेमामधली गाणी.
सचिन पिळगावकर, शंकर महादेवन, सुबोध भावे, पुष्कर श्रोत्री, मृण्मयी देशपांडे, अमृता खानविलकर अशी या सिनेमाची भली मोठी स्टार कास्ट होती, आणि दिग्दर्शन सुबोध भावे यांचं होतं.
दोन शास्त्रीय घराणी, या घराण्यांमधला वाद आणि गुरु शिष्याचं नातं कमाल पद्धतीने दाखवत आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवत, २०१५ साली आलेल्या या सिनेमाने ४० करोंडहून जास्त टर्न ओव्हर क्रॉस केला. आणि या सिनेमाचं पहिल्या आठवड्यात सुमारे ४ कोटी कलेक्शन झालं असं सांगण्यात येतं.
चौथ्या नंबरवर आहे लय भारी
लय भारी या सिनेमात रितेश देशमुखचा डबल रोल आहे. सिनेमात नायिकेला दोन जुळी मुलं होतात. त्यातला एक मुलगा जो कमजोर असतो त्याला ती नायिका स्वतःजवळ ठेवते तर दुसरा मुलगा जो बऱ्यापैकी हेल्थी असतो त्याला ती विठ्ठलाच्या पायाशी सोडते. नंतर या आईचं आणि मुलांचं काय होतं यावर पिक्चरची भावनिक अशी स्टोरी आहे.
लय भारी सिनेमाच्या नावावर एक रेकॉर्ड आहे, तो म्हणजे हा सिनेमा महाराष्ट्रात १०० दिवसांपेक्षा जास्त दिवस थिएटरमध्ये होता. या सिनेमाचं दिग्दर्शन केलं निशिकांत कामत यांनी. हा पिक्चर म्हणजे रितेश देशमुखचा पहिला मराठी पिक्चर होता, शिवाय या सिनेमात राधिका आपटे, अदिती पोहनकर, शरद केळकर, उदय टीकेकर हे सुद्धा कलाकार आहेत.
२०१४ साली आलेल्या आणि लय भारी गाजलेल्या ‘लय भारी’ या सिनेमाने सुद्धा बॉक्स ऑफिसवर ४० करोंड रुपयांची कमाई केली. या सिनेमाने पहिल्या तीन दिवसांत १०.१५ करोंड कमावले तर पहिल्याच दिवशी ३.१ करोंडची कमाई केली होती.
तिसऱ्या नंबरवर आहे पावनखिंड सिनेमा
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या आयुष्याशी निगडीत असणारा कुठलाही पिक्चर हा मराठी माणसाला अतिशय जवळचा वाटतो. आणि प्रत्येक मराठी माणूस तो आवर्जून बघायला जातो. पावनखिंड सिनेमा बाबतीतही असंच झालं. थोर पराक्रमी बाजी प्रभू देशपांडे यांच्यावर आधारित असणारा हा सिनेमा भरपूर गाजला आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.
या सिनेमात मुख्य भूमिका साकारली आहे अजय पुरकर यांनी. शिवाय सिनेमात, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, हरिष दुधाडे, प्राजक्ता माळी, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे दिगपाल लांजेकर यांनी.
नुकत्याच आलेल्या पावनखिंड या सिनेमाने पहिल्या आठवड्यात तब्बल १२.१७ करोडची कमाई केली होती तर, सिनेमाने टोटल ४३.६ कोटींचा गल्ला जमवला आहे.
दुसऱ्या नंबरवर येतो नटसम्राट
मुळात चित्रपटाचा विषय आणि त्यात नाना पाटेकरांसारख्या खुंखार अभिनेत्याची अॅक्टिंग म्हटल्यावर पिक्चर तर हीट व्हायचाच होता. कलेच्या क्षेत्रातून रिटायरमेंट घेतलेल्या कलाकाराला आलेलं रितेपण या पिक्चरमध्ये दाखवण्यात आलं आहे.
या सिनेमात नाना पाटेकर. विक्रम गोखले, मेधा मांजरेकर, सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे यांनी काम केलंय तर दिग्दर्शन आहे महेश मांजरेकर यांचं.
अत्यंत कमी बजेटमध्ये हा पिक्चर बनवला गेला होता पण त्यातही २०१६ साली आलेल्या या सिनेमाने जवळ जवळ ४८ करोंड रुपये प्रॉफिट कमवलं होतं. आणि पहिल्या आठवड्यात १० कोटिंचं कलेक्शन केलं होतं असं सांगितलं जातं.
आणि आता पहिल्या नंबरवर आहे सैराट
एक टिपिकल लव्ह स्टोरी पण डायरेक्शनचा गेम. गावाकडच्या साध्या साध्या गोष्टी हेरून, स्टोरीतला कनेक्ट वाढवून प्रत्येक तरुणाला किंवा तरुणीला ही आपलीच तर स्टोरी नाय? असा विचार करायला भाग पाडणारा हा सिनेमा. अॅक्टिंग म्हणू नका, डायरेक्शन म्हणू नका, सिनेमॅटोग्राफी म्हणू नका, की गाणी म्हणू नका. सिनेमा सगळ्याच बाबतीत तगडा आहे.
या सिनेमाचं दिग्दर्शन नागराज मंजुळे यांचं आहे, संगीत दिग्दर्शन अजय अतुल यांचं आहे आणि मुख्य भूमिकेत आकाश ठोसर आणि रींकू राजगुरू हे दोन नवोदित कलाकार आहेत.
२०१६ साली आलेल्या या सिनेमाने तब्बल ११० करोंड रुपयांची कमाई केली आणि १०० कोटींचा टप्पा पार करणारा ‘सैराट’ हा सिनेमा मराठीतला पहिला सिनेमा ठरला. एवढंच नाही तर रिलीजनंतर अवघ्या तीन आठवड्यात या पिक्चरने जवळ जवळ ६५ कोटींची कमाई केलेली.
आणि लवकरच आता या लिस्टमध्ये धर्मवीरचंही नाव अॅड होणारे कारण धर्मवीरने रिलीजच्या पहिल्या आठवड्यातच सुमारे दहा कोटी कमावले होते. आणि आत्ताची धर्मवीर सिनेमाची कमाई २३ कोटींच्या घरात जाऊन पोहोचली आहे.
तर ही होती मराठीत सर्वाधिक कमाई केलेल्या दहा पिक्चर्सची नावं.. वीकएंड आलाय.. यापैकी कुठले पिक्चर बघायचे राहून गेले असतील तर झटझट बघून टाका.
हे ही वाच भिडू:
- हिंदी असो वा मराठी सगळ्या सिनेमांच्या मेकअपचा बादशाह विक्रम गायकवाड आहे
- मराठीतला सगळ्यात सुपरहिट सिनेमा मुद्दामहून अमावस्येच्या दिवशी रिलीज केला होता.