लोकं म्हणतात शेतीत पैसा नाही, हा गडी बँकॉकचा स्टार्टअप सोडून कोल्हापुरात तरंगती शेती करतोय

भारत हा कृषिप्रधान देश आहे. हे आपलं ठरलेलं वाक्य आहे, पण शेती करण्यासाठी तरुणपिढी किती उत्सुक आहे? हा देखील मोठा प्रश्न आहे. पण आयटीमधील घसघशीत पगारांची नोकरी सोडून दोन तरुण कोल्हापुर जवळच्या हातकणंगले येथे येऊन शेती करतात. ती देखील साधीसुधी शेती नव्हे तर पाण्यावर तरंगणारी शेती.

आधी पाण्यावर  तरंगणारी शेती ही काय भानगड काय आहे? हे समजून घेऊ.

ॲक्वापोनिक शेती म्हणजे पाण्यावर तरंगणारी शेती. या शेतीमध्ये दोन टॅंक बनविले जातात, एका टॅंकमध्ये मत्स्य पालन केले जाते. माशांपासून टाकली गेलेली विष्टा व इतर टाकावू पदार्थ जमा केले जातात. यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात.

नर्सरीमध्ये झाडांची वाढ केली जाते आणि नंतर ही झाडे ट्रेच्या माध्यमातून टॅकमध्ये सोडली जातात. सोडताना अशा प्रकारे सोडतात की, ती पाण्यांवर तरंगली पाहिजेत. माशांपासून बनविलेले खत वापरुन पाण्यांवर ह्या झाडांची वाढ केली जाते अशा प्रकारे ॲक्वाफोनिक शेती केली जाते.

ललित जवाहर आणि मयंक गुप्ता हे दोघे ही शेती करतात. 

मयंकने आयआयटी बॉम्बे मधून M Tech केले  न्यूयॉर्क मध्ये उत्तम पगारांची नोकरी देखील लागली होती. आयुष्य मस्त चाललं होतं, पण मयंकला या ९ ते ५ च्या नोकरीत काडीचा रस नव्हता. मयंकने कोलंबिया विद्यापीठातून एमबीए केले. तेव्हा जगभरात स्टार्टअपचं वारं वाहू लागलं होतं, मयंकने आणि त्यांच्या चार मित्रांनी एकत्र येऊन एक स्टार्टअप देखील सुरू केलं.

मयंकचे हे सर्व बँकॉकमध्ये सुरू होतं. स्टार्टअप भारी चालत होतं, पण मयंकला भारतात येऊन,आपल्या मातीत काहीतरी करायचं होतं. एकदा तो मुंबईत आला आणि त्यांची भेट त्यांचा जुना मित्र ललित जवहर सोबत झाली. दोघांनी कृषि क्षेत्रांतील काही तरी स्टार्टअप सुरू करू असा विचार केला. 

मयंकला अगोदरच एका यशस्वी स्टार्टअपचा अनुभव होता. दोघांनी आधी बारकाईने अभ्यास केला, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, भारतात जैविक शेती कोणीच करत नाही.मग या दोघांनी अनेक देशांचा दौरा केला, व त्या नंतर त्यांच्या लक्षात आले की आपण भारतात ॲक्वाफोनिक शेती करू शकतो. त्यानंतर त्यांनी लँड क्राफ्टो नावाचे स्वताचे स्टार्टअप सुरू केले. 

स्टार्टअप सुरू केले खरे पण त्यासाठी योग्य जागा देखील निवडणे गरजेचे होते. त्यांनी यासाठी कोल्हापुर येथील हातकणंगले येथील शेतीची निवड केली. मयंक आणि ललित यांनी ॲक्वाफोनिकचा प्रयोग तब्बल २ हेक्टर क्षेत्रांवर केला आहे. यामुळे स्थानिकांना तर रोजगार मिळाला आहेच पण महिलांसाठी हे स्टार्टअप अतिशय फायदेशीर ठरले आहे.

यांच्या स्टार्टअपमध्ये तब्बल ८० टक्के महिला काम करतात.

ॲक्वाफोनिक शेतीमध्ये तब्बल ९५ % पाण्याची बचत होते. ॲक्वाफोनिक शेतीच्या माध्यमातून ६५ हून अधिक प्रकारचे फळ आणि भाज्या यांचे उत्पादन घेतात. पिकांची लागवड अशा प्रकारे केली जाते की वर्षभर उत्पादन मिळत राहील. यामुळे उत्तम पैसे देखील मिळतात. 

मयंक आणि त्यांच्या मित्राने त्यांनी केलेले उत्पादन विकण्यासाठी सोशल मिडियाचा उत्तम वापर केला आहे. २०० हून अधिक सुपर मार्केटस यांना लँड क्राफ्टो मार्फत फळे आणि भाजीपाला तसेच मासे पुरविले जातात. ५ हजारांहून अधिक पार्सल पाठविले जातात.

लँड क्राफ्टोच्या सर्व भाज्यांवर  क्युआर कोड वापरला जातो. यामुळे ग्राहकांना भाज्यांची सर्व माहिती सविस्तर मिळते.  लँड क्राफ्टोचा पहिला मातीविना शेती हा देशातील पहिला प्रयोग आहे. मयंक आणि ललित आयटी क्षेत्रात असून देखील त्यांना शेतीविषयी असलेली आवड त्यांना यामध्ये यशस्वी करत आहे. 

ही शेती करण्यासाठी कोल्हापुरचीच निवड का केली हा प्रश्न जेव्हा मयंकला विचारला तेव्हा बोल भिडू सोबत बोलताना तो म्हणाला की, ”कोल्हापुरची निवड करण्यामागे दोन कारण आहेत. एक म्हणजे येथील वातावरण खूप भारी आहे, तसेच येथून मी रात्रीत चार-पाच मोठ्या शहरांना माल पोहचवू शकतो. त्यामुळे कोल्हापुर आम्हाला सोयीस्कर वाटले.”

पण आता तुम्हाला वाटेल आपण देखील ॲक्वाफोनिक शेती करावी पण ते इतकं सोप्पं काम नाही. त्यासाठी मोठी गुंतवणुक आहे. मयंक आणि ललित यांनी तब्बल १० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. पण योग्य अभ्यास, योग्य नियोजन आणि उत्तम मार्केटिंग करून मयंक आणि ललित यांनी माती विना शेती हा यशस्वी प्रयोग केला आहे. दोघांनी आधी उत्तम पैसे कमावले, अनुभव घेतले आणि मगच हा प्रयोग केला.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.