लोखंडाचा व्यवसाय करणाऱ्या कंपनीने संपूर्ण जगाला दाढी करायला शिकवलं….
दाढी वाढली तर आपण सगळ्यात आधी न्हाव्याचं दुकान शोधतो किंवा घरीच दाढी करतो. यापैकी दोन्हीतून कुठेही गेलं तरी ब्लेडची गरज हि लागतेच. ब्लेडचा विषय निघाला म्हणल्यावर जिलेट हा ब्रँड ओघाने आलाच. जिलेटने कित्येक वर्षांपासून आपली सेवा केली आहे, पण या जिलेट कंपनीचा उगम कसा झाला ते आपण आज बघूया.
जिलेटच्या आधीही लोक दाढी करायचे पण तेही धारदार दगडाने, आता आपण जिलेटकडे वळू. १९ व्या शतकाच्या सुरवातीला ब्लेडने दाढी करायला सुरवात झाली होती पण सततच्या वापरामुळे त्याला दरवेळी पातळ करून धार लावावी लागायची या दरवेळेसच्या भानगडीला लोक वैतागले होते.
लोकांच्या या त्रासाला सर्वप्रथम ओळखलं ते किंग कॅम्प जिलेट यांनी.
त्यांनी ब्लेड बनवायच्या आधीच विचार केला कि आपल्या कडून जे ब्लेड बनलं जाईल ते सुरक्षित आणि साधं असावं. त्यावेळी ते लोखंडाचा व्यवसाय करत होते.
त्यांच्या कंपनीतल्या एका कर्मचाऱ्याने त्यांना सांगितले कि आपण अशी वस्तू बनवली पाहिजे जी वापरून झाल्यावर लोकं फेकून देतील. त्यामुळे आपल्या कंपनीत बनणाऱ्या त्या वस्तूचा खप वाढेल आणि आपल्याला फायदा होईल.
ज्यावेळी तो कर्मचारी किंग कॅम्प जिलेट याना हि गोष्ट सांगत होता तेव्हा तो हाताने दाढी खाजवत होता. त्यावरून त्यांच्या डोक्यात आयडिया आली ती दाढी काढण्यासाठी बनवल्या जाणाऱ्या रेजरची, जे वापरायला सोपं असेल या संशोधनात त्यांनी डोकं लावायचं ठरवलं. पुढे अनेक वर्षानंतर त्यांनी जे रेजर बनवलं ते आधीच्या वापरात असलेल्या ब्लेडपेक्षा अधिक चांगलं होतं. १९०३ साली याच उत्पादन त्यांनी सुरु केलं होतं. पहिल्या वर्षी त्यांनी ५१ रेजर आणि १६८ ब्लेडची विक्री केली.
विक्री कमी होऊन कंपनी डबघाईला आली होती तेव्हा किंग कॅम्प जिलेट यांनी मॅगझिनमध्ये आपल्या प्रोडक्ट विषयी जाहिरात करणे चालू केले. यात त्यांनी दाढी कशी करावी याची जाहिरात केली. १९०४ साली या कंपनीने तब्बल ९० हजार रेजर आणि १ करोड २४ लाख ब्लेड बनवून विकले सुद्धा. हे तर स्पष्ट झालं होत कि हा ब्रँड लोकांच्या पसंतीस उतरला आहे.
जिलेटची बाजारात मागणी वाढली आणि त्याचबरोबर त्यांचे प्रतिस्पर्धीही वाढले. तेव्हा त्यांनी जिलेटचा एक स्पेशल पेटंट बनवून घेतला. जिलेटच्या ब्रॅण्डची कॉपी अनेक जण करू लागले होते. सीरीक, विल्किन्सन, टोपाज असे अनेक ब्रँड जिलेटला स्पर्धा देत होते. परंतु जिलेटने आपली शेविंग किट स्वस्त केली आणि डिझाईनवर काम करणं सुरु केलं याने त्यांना चांगलाच फायदा मिळाला.
१९२५ साली जिलेटने सेफ्टी रेजर बाजारात आणलं. या रेजरमुळे दाढी करताना होणाऱ्या जखमा न होण्याची शक्यता होती. १९५७ साली त्यांनी त्याची स्टाईल बदलली आणि त्याला हॅन्डल बसवलं. १९७१ साली त्यांनी डबल ब्लेड असलेलं रेजर सुरु केलं.
आजवर जिलेटने आपल्या ब्रँडमध्ये अनेक किरकोळ बदल केले. उद्देश हाच कि दाढी करताना इजा न होवो आणि आपली मार्केटवरची पकड घट्ट राहो.
आज जिलेट हि कंपनी जगात एक नंबरला आहे. अगदी अंतराळात सुद्धा जिलेट वापरलं गेलं होतं.
जिलेट्स बार्बर सुरक्षा प्रोग्रॅम अंतर्गत जिलेट ब्रॅण्डने एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. अगदी काही वेळातच तो प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये वेगळं काही न दाखवता सलून दुकानदार आणि कामगारांची जुनी परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती दाखवली आहे.
कोविड मुळे सलून असलेल्या लोकांसाठी जिलेटने एक स्पेशल किट आणि एक लाख रुपयांचा विमा असलेलं पॅकेज जाहीर केलं आहे. अशा परिस्थितीतसुद्धा जिलेट आपल्या कामगारांची काळजी घेत आहे.
हे हि वाच भिडू :
- जवळपास सव्वाशे वर्षांपूर्वी वायरलेसचा शोध जगदीशचंद्र बोस यांनी लावला मात्र एक चूक केली…
- पोलीसांनी दाढी ठेवणं योग्य आहे की अयोग्य, कायदा काय सांगतो..?
- अंबानींना चॅलेंज दिलं, स्वस्तात रस्ता नाही बांधून दाखवला तर मिशी कापून देईन