देशभक्तांनो तुमच्या जेवणात चक्क पाकिस्तान आणि चीन आहे, योगीजींना बोलवा..!

भावांनो आपल्याला आपल्या इतिहासाबद्दल जाज्वल्य अभिमान पाहिजे. खरंच आहे. आजकाल अनेक योगी स्वदेशीसाठी भारतीयांना जागृत करत आहेत. रामदेव बाबा स्वदेशी जीन्स, टूथपेस्ट विकत आहेत तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शहरांची परकीयांनी दिलेली नावे बदलून त्यांना भारतीय बनवत आहेत.

आता अलाहाबादचं नाव बदलून प्रयागराज, फैसलाबाद स्टेशनचं नाव अयोध्या करून त्या गावांचा विकास झाला का असा प्रश्न विचारून काही फुरोगामी या कौतुकाच्या सोहळ्यात मिठाचा खडा टाकत आहेत. पण त्यांच्याकडे कोण लक्ष देतो.

पाकिस्तानी, इंग्रज, अरब, चायनीज या भारतावर आक्रमण करणाऱ्यांचा इतिहास नष्ट करण्याच्या योगीजींच्या प्रयत्नाला आम्ही सुद्धा हातभार लावायचं ठरवलं. या दिवाळीत आम्ही चायनीज लायटिंगच्या माळा लावल्या नाहीत. बोलताना चुकूनही उर्दू, इंग्लिश किंवा चायनीज शब्द जाऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील झालो.

अशातच आमच्या एका भिडूने आम्हाला एक नवीन यादी दिली. यादी कसली तर देशाच्या शत्रूंनी भारतात आणलेल्या खाद्यपदार्थांची.

त्यांची नावे सुद्धा परभाषिक आहेत. तसं बघायला गेलं तर जेवण आमचा विकपॉइंट. माफ करा आमची कमजोरी. जेवणात तडजोड करायला आम्ही तयार नसतो. पण राष्ट्रभक्ती साठी शुद्धतेच व्रत एकदा घेतलं तर मागे हटून चालणार नाही.

मोमो, पिझ्झा, तंदूर बिर्याणी वगैरे अँटीनॅशनल , माफ करा राष्ट्रद्रोही पदार्थ आम्ही आधीच बंद केले होते पण आमच्या भिडू ने नवीन यादी दिली आहे. बघा तुम्ही पण ती यादी नजरे खालून घाला आपल्या देशासाठी या गोष्टींचा जेवणातून त्याग करा.

१. गुलाबजाम

कायच्या गावात !!! गुलाबजाम भारतीय नाही ?? मस्त, गोल, गरगरीत खव्यापासून बनलेला तोंडात टाकल्यावर विरघळून जाणारा गुलाबजाम. अहाहा नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटते. आसिंधुसिंधूहिमाचल प्रत्येक सणा वाराला, लग्न, मुंज असल्या आनंदाच्या प्रसंगी हक्काने वाटीतून आपल्या समोर येणारा हा गुलाबजाम भारतीय नाही. मध्यआशियातले तुर्की आक्रमक जेव्हा भारत लुटायला आले तेव्हा ते हा इराणी, पर्शियन पदार्थ घेऊन आले.

गुलाबजामून हा शब्द सुद्धा फारसी आहे. गुल म्हणजे फूल आणि जामून म्हणजे पाणी. काही जन म्हणतात की मुघल बादशाह शाहजहानच्या स्वैपाक्याने गुलाबजामचा शोध लावला. शी बाबा. ऐकून तोंड कडू झालं. आता गुलाबजामचं नाव ही तोंडातून काढायचं नाही अशी भीष्मप्रतिज्ञा आम्ही घेतली.

२. जिलेबी

काहीही हा श्री !! जिलेबी तर आमच्या इथे खास १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला खाल्ला जातो. राष्ट्रभक्तीचा खास मेनू आहे जिलेबी. तो कसा काय बुवा शत्रूंचा?  चौदाव्या शतकात अरबांनी पर्शियामधून हा पदार्थ भारतात आणला. तिथे याला जलेबिया म्हणून ओळखतात. अफगाणिस्तान मध्ये तर म्हणे सकाळी न्याहारीला जिलेबी खातात. चला म्हणजे जिलेबीसुद्धा बंद. आता कोणाला मुलगी झाली तर जिलेबी खायला या असं म्हणता येणार नाही.

३. सामोसा

गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत सगळी कडे आढळणारा हा पदार्थ. हा सुद्धा म्लेंच्छ आक्रमकांनी मध्य आशियामधून भारतात आणला. मोहम्मद बिन तुघलक चा तो आवडता पदार्थ होता म्हणे. आता तुम्हाला सांगायला काही हरकत नाही आम्हाला सुद्धा समोसा खूप आवडायचा.

खिशाला मोठा फटका न बसणारया या समोस्याने एमपीएससीची तयारी करतानाच्या आमच्या वाईट दिवसात चांगली साथ दिली होती. पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी समोरचे अनारसे समोसेवाले यांच्या कडचे समोसे खायला दिल तरी आमची स्पर्धापरीक्षेची तयारी करणारी गर्लफ्रेंड खुश व्हायची. असो. आता ती एमपीएससी , ती गर्लफ्रेंड आणि ते अनारसे समोसे कशाचीच आठवण नको.

४. पनीर

शाकाहारीना पंजाबी हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर मिळणारा एकमेव सहारा, भारतीय चीज अशी ओळख असणारे पनीर भारतीय नाही? पनीर हा शब्द सुद्धा तुर्कस्तानच्या पेय्नीर वरून आला आहे. अफगाणिस्तान, इराण तुर्कस्तान या सर्वांनी पनीर वर हक्क सांगितला आहे. मटनचिकन खाणार्यांना कशाला पनीर लागत हो? पण तरी त्यांची पनीर वरून भांडण आहेत.

या वादात भारताने सुद्धा उडी घेण्याचा प्रयत्न केला पण गोकुळचा कृष्ण लोणी,तूप,दही खायचा पण तो पनीर खायचा असा महाभारतात उल्लेख नाही असं सांगून आपल्याला गप्प बसवलं गेल. पनीर पेशावरी आम्ही खायचं आधीच बंद केलं होत पण आता पनीरच्या सगळ्या भाज्या बंद.

५. चहा

चहाला वेळ नसते पण वेळेला चहा असतो असं म्हणतात. जगातला सगळ्यात जास्त चहा भारतात पिकतो आणि सगळ्यात जास्त इथेच पिला जातो. घरात येणाऱ्या पाहुण्याचं स्वागत आपण चहा ने करतो पण हा चहा भारतात चीनी पाहुण्यांनी आणला. आयला चहा हा चायना माल आहे ? देशासाठी चहा बंद चे whatsapp(याचा मराठी शब्द आम्हाला ठाऊक नाही) संदेश छापावे लागणार.

आयुष्याचा एकमेव आधार असलेल्या चहाला सोडताना मन होत नाही हो पण काय करणार करावे लागते.

अवघड वाटत ना ? पण उतारा आहे की, या सगळ्या पदार्थांच नाव बदलुन टाकायचं म्हणजे कसं गुलाबजामचं करायचं रामलालपाक,जिलेबीचं करायचं अभिमन्यू चक्रव्युव्ह, पनीरचं करायचं हिमालयमिठ्ठा, समोशाचं करायचं गोवर्धन खट्टा आणि चहाचं ते काय तंदूर करून टाकलयचं की..

हे ही वाच भिडू.

2 Comments
  1. Atrangi Crowd says

    चहा नाही तर काही नाही

Leave A Reply

Your email address will not be published.