२०२४ मध्ये पंतप्रधान पदासाठी मोदींना टक्कर देणाऱ्यांमध्ये ही नावं असणार

इथून पुढे मोदी नकोत रे बाबा, असं जर कुणी म्हणलंच तर त्यावर एक प्रतीप्रश्न ठरलेलाच असतो तो म्हणजे, मोदींना पर्याय कोण ? त्यावरच आज बोलूया…

२०१४ च्या निवडणूक असो किंव्हा २०१९ च्या निवडणूक असोत दोन्ही वेळेस बहुमताने भाजप सत्तेवर आणि नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदावर कायम आहेत…कोण म्हणतंय २०२४ मध्ये मोदींना टक्कर देणारा कुणी नाही.

आता ५ राज्यांच्या निवडणूक आणि त्यात पंजाब सोडता बाकी ४ राज्यांमध्ये भाजपने सत्ता कायम राखली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांनंतर झालेल्या १३ विधानसभा निवडणुकांमध्ये जवळपास राज्यांत भाजप सत्तेवर आहे तेही स्वबळावर.  थोडक्यात २०२२ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल येणाऱ्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकांच्या दिशा ठरवणारे आहेत. 

खरं तर जसे मोदी सत्तेवर आलेत तशी भाजपची ताकद आणखीनच वाढायला लागली. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान पदावर आरूढ राहिलेले मोदी येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत देखील आपलं पद कायम राखतील का हा प्रश्न आहे. जरी २०२४ मध्ये भाजप परत सत्तेत येणार हे जवळपास चित्र दिसत असलं तरी, मोदी लाटेला आणि आत्ता भाजपला मिळणारं यश हे बाजूला ठेवून, २०२४ मध्ये मोदींना प्रतिस्पर्धी म्हणून कोणता नेता मैदानात उतरणार ?

आता २०२४ मध्ये कोण सत्तेत येऊ शकतं याबाबत नुसते पतंग उडवण्यापेक्षा हे पाहणं महत्वाचं आहे कि, देशाच्या राजकारणात कोणत्या विरोधी पक्षांनी आणि नेत्यांनी थेट मोदींना आव्हान दिलं आहे. त्याच आधारे २०२४ मध्ये मोदींना तोड देणारे पर्यायी चेहरे कोणते असू शकतात ?

याबाबत काही नावं समोर येतात ती म्हणजे, ममता बॅनर्जी, केसीआर आणि केजरीवाल तसेच स्टॅलिन, जगनमोहन रेड्डी किंव्हा महाराष्ट्रातून तरी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांचंच नाव येतं. राहिला प्रश्न काँग्रेसचा तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पर्यायी चेहरा बनण्यात अयशस्वी ठरलेत असं स्पष्ट चित्र आहे. 

यातलं पहिलं नाव म्हणजे, अरविंद केजरीवाल !

ज्या प्रकारे काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पंजाबमध्ये बहुमताने आप निवडून आणली त्यामुळे केजरीवाल यांचं दिल्लीच्या पलीकडे देखील महत्व वाढलं आहे.  प्रादेशिक पक्ष म्हणून सुरुवात झालेल्या या पक्षाने अवघ्या ७ ते ८ वर्षात दिल्लीत तिसऱ्यांदा सत्ता आणली आणि आता पंजाब मध्ये देखील…आप कडे आता दोन मुख्यमंत्री आहेत.  त्यांची ताकद बघायची तर सध्या दिल्लीत पक्षाचे ७० पैकी ६२ आमदार आहेत.

आणि पंजाब राज्यात आम आदमी पक्ष आणि केजरीवाल यांनी ताकद दाखवून दिली आहे. पंजाबमध्ये अगोदर इथं २० आमदार होते. आता आप सत्तेत आली आणि आपचे आज पंजाबमध्ये ९२ आमदार आहेत. संसदेत देखील आम आदमीचं स्थान आहे. सध्या लोकसभेत १ आणि राज्यसभेत या पक्षाचे ३ खासदार आहेत. ज्या स्पीडने ‘आप’ आपला विस्तार करत आहे त्या आधारे केजरीवाल २०२४ मध्ये पंतप्रधानांच्या रेसमध्ये येणार. कारण स्वात केजरीवाल यांनी पंजाबच्या यशानंतर जाहीर केलं कि, येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आमचा पक्ष भाजपला तगडं आव्हान असणार आहे.

२. ममता बॅनर्जी

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधानपदासाठी आघाडीवर आहेत. बंगालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा परफॉर्मन्स बेस्ट राहिलाय. २२० जागेने  जिंकून आलेल्या ममता दिदींनी जेंव्हा निवडणुकीचे रणशिंग फुंकले तेंव्हा त्यांनी भाजपविरोधी पक्षांना आणि नेत्यांना एकत्र येण्याचे आव्हान केले होते आणि त्यांना त्या सर्व पक्षांनी पाठींबा देखील व्यक्त केला होता. 

ज्याप्रकारे ममता दीदी फ्रंटफूट वर आल्या आणि त्यांना देशातील विरोधी पक्षांनी दिलेलं बळ पाहता साहजिकच ममता बॅनर्जी यांच्याकडे सर्व पक्षांना एकत्र करण्याची ताकद आहे असं मानलं जातंय. आणि तिसरी आघाडी झालीच तर हि आघाडी मोदींना पर्याय म्हणून पंतप्रधान पदाची महिला दावेदार म्हणून  महिला ममता दीदींचं नाव पुढे करतील अशी शक्यता आहे.

३. केसीआर

ममता दिदींच्यानंतर मोदींचे कट्टर विरोधक म्हणून केसीआर यांचं नाव येतं. भाजपच्या विरोधात तिसरी आघाडी करण्याची गोष्ट येते तेंव्हा प्रादेशिक पक्षांची, सर्व विरोधकांची मोट बांधण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव कायमच पुढाकार घेतात. 

केसीआर हे निर्विवादपणे तेलंगणातील सर्वात महत्वाचे राजकीय नेते आहेत.  २०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आधी डाव्या पक्षांच्या भेटी घेतायेत. महाराष्ट्रात देखील त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तसेच राष्ट्रीय जनता दलाच्या तेजस्वी यादव यांच्याशीही बंद दरवाज्या आड चर्चा केल्याच्या बातम्या मध्यंतरी आलेल्या. मागे समजवादी पार्टी आणि तृणमूल काँग्रेस यांच्याशी ही ते संपर्क ठेवून होते. 

एकाच राज्यात सत्ता असणारे केसीआर देशाच्या पंतप्रधान पदाची अशा बाळगतात यात आश्चर्य नाही कारण २०१९ मध्ये देखील त्यांचे पंतप्रधानपदाचं स्वप्नं भंगलं असं म्हणतात. २०१९ मध्ये त्यांनी तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न केला होता.  त्यांचा मुख्य भर प्रामुख्याने दक्षिणेकडच्या राज्यांवर होता. कर्नाटकचे एच.डी. देवेगौडा यांच्याशीही त्यांनी जमवून घेतले होते. डावे आणि जगनमोहन यांचा पाठिंबा घेण्याचाही त्यांचा प्लॅन होता. केंद्रातील मोदी सरकारला पूर्वीएवढे बहुमत मिळणार नाही आणि मग आपले १५ ते १६ खासदार बहुमूल्य ठरतील असे गणित राव यांनी मांडले होते.  कमी खासदारात प्रधानमंत्री होण्याचा ‘देवेगौडा पॅटर्न’ त्यांनी अजमावायचं ठरवलं पण ते काही शक्य झालं नाही. 

त्यांची राज्यातली ताकद बघ्याची तर, त्यांच्या पक्षाचे राज्यात ११९ पैकी १०४ आमदार आहेत. विधानपरिषदेत ४० पैकी ३४ आमदार आहेत. लोकसभेत ९ आणि राज्यसभेत ७ खासदार आहेत. थोडक्यात राज्यात त्यांचा एकछत्री अंमल आहे. तसेच केसीआर हे  डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते त्यामुळे त्यांना राष्ट्रीय राजकारणाचा अनुभव आहे. 

एक आणखी कारण साधं वाटेल पण महत्वाचं आहे ते म्हणजे, केसीआर हे विशेषत: केंद्र सरकारवर टीका करतांना अस्खलित हिंदी आणि इंग्रजीमध्ये बोलतात. जे कि दक्षिणेकडील नेत्यांना जमत नाही. 

४. जगनमोहन रेड्डी  

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे भारतातील प्रादेशिक नेत्यांमधील आघाडीचं नाव आहे. सध्याच्या घडीला आंध्रप्रदेश राज्यावर त्यांची एकहाती सत्ता असल्याचं चित्र आहे. त्यांच्या वायएसआर काँग्रेस या पक्षाचे आंध्र विधानसभेत १७५ पैकी सध्या तब्बल १५० आमदार आहेत. तर तिथल्या विधानपरिषदेत देखील त्यांच्या पक्षाचे ५८ पैकी १८ आमदार आहेत. आंध्र सरकारची जशी विधीमंडळात ताकद आहे तशीच त्यांची संसदेत देखील आहे, लोकसभेत २२ तर राज्यसभेत ६ खासदार आहेत. त्यांची ताकद पाहता ते सहज राष्ट्रीय राजकारणात येणार हे फिक्स आहे. 

५. उद्धव ठाकरे 

देशाच्या राजकारणात महत्वाचं स्थान असलेल्या महाराष्ट्रात देखील एक नाव जे २०२४ मध्ये मोदींना आव्हान ठरणार आहे ते म्हणजे, शिवसेनापक्ष प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

आता तुम्ही म्हणाल प्रादेशिक पक्ष असलेला मराठी पक्ष देशाच्या राजकारणात कसा उतरणार त्यावर उत्तर म्हणजे अलीकडेच ५ राज्यात सेनेने आपले उमेदवार उतरवले होते, तसं तर १९८९ पासूनच सेनेने राज्याबाहेर निवडणूक लढवल्यात. भले हाती अपयश आलं असेल पण एक आहे ते म्हणजे या निवडणुकांच्या निमित्ताने आपला ‘प्रादेशिक’ पक्ष ‘राष्ट्रीय’ करण्याचा मार्ग आहे. 

आता सेनेची महाराष्ट्रातील ताकद बघायची तर, आघाडीचे सरकार असले तरी मुख्यमंत्री पद हे सेनेकडे आहे. राज्यात आजच्या घडीला सेना ५७ आमदारांसह दोन नंबरचा पक्ष आहे. तर विधानपरिषदेत देखील शिवसेनेचे १५ आमदार आहेत. दिल्लीतील ताकद बघायची म्हंटलं तर शिवसेनेचे लोकसभेत १८ खासदार आहेत आणि राज्यसभेत ३ खासदार आहेत. मात्र या पक्षाला राष्ट्रीय राजकारणाचा जुना अनुभव आहे.

पण २०२४ मध्ये उद्धव ठाकरे देखील पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये असणार हे पक्कंय कारण…

अलीकडेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी वक्तव्य केलेलं कि, “२०२४ मध्ये आपण दिल्लीमध्ये बसणार म्हणजे बसणारच”, तसेच संजय राऊत यांनी देखील, “२०२४ पर्यंत शिवसेना दिल्लीच्या तख्तापर्यत पोहचली असेल” असं विधान केलं होतं. 

आणखी एक म्हणजे, उद्धव ठाकरे यांनी देखील मागेच एक खंत व्यक्त केली होती कि, “दुसऱ्या राज्यात शिवसेना मोठ्या प्रमाणात होती. पण त्यावेळी शिवसेनेने निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याने आपले लोक भाजपमध्ये गेले. पण आता भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्त्व नक्की करेल”. या विधानांवरून सेना देशापातळीवर नेतृत्व करणार याला दुजोरा मिळतो.  त्यात अलीकडेच तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती आणि त्या भेटीच्या केंद्रस्थानी हाच मुद्दा होता कि, २०२४ मध्ये   मोदींच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवं असं आवाहन त्यांनी केलं होतं.

तर अशाप्रकारे २०२४ च्या निवडणूक ध्यानात घेतल्या तर यात हि नावं मोदींसाठी आव्हान ठरतील हे नक्की. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.