नव्वदच्या कॅसेट युगावर राज्य करणारे ‘ड्यूप्लीकेट सिक्के’ !

टेपरेकॉर्डर आणि कॅसेट किती जणांना आठवते ?

काही वर्षापूर्वी या गोष्टी आपल्या जीवनाच्या अविभाज्य घटक होत्या. पण अचानकपणे त्या कधी गायब झाल्या ते समजलं सुद्धा नाही. गावात बसस्टँडच्या बाहेर वगैरे ही कॅसेटची दुकानं असायची. एवढंच काय तर काही सुपरहिट पिक्चरची कॅसेट पान टपरीवर देखील मिळायची.

एकाच पिक्चरमध्ये सगळी गाणी भारी असण्याचा तो काळ होता. पब्लिकसुद्धा कॅसेट विकत घेऊन ऐकायची. songs.pk आणि downloadming.com या साईटवरून हवं ते गाणं डाउनलोड करायचे दिवस अजून उगवायचे होते. पण असं नव्हतं की पायरसी अज्जिबातच  होत नव्हती.

खरं सांगायचं तर एकेकाळी ‘पायरसीचा बादशहा’ समजल्या जाणाऱ्या लोकांनीच कॅसेटयुगाचा सुवर्णकाळ अनुभवला.

‘टी-सिरीज’चा गुलशनकुमार एकेकाळी कॅसेट विकायचा. गाण्यातल्या दर्दी लोकांना खास चॉइसची गाणी भरून देण्यात त्याचा हातखंडा होता. त्याला स्वतःला गाण्याची चांगली समज होती. त्यामुळे त्याचा धंदा मोठा झाला. मोठ्या प्रमाणात ड्यूप्लीकेट कॅसेट तो बनवू लागला. यातून त्याची “टी सिरीज” कंपनी मोठी झाली आणि एके काळी ड्यूप्लीकेट कॅसेट भरून देणारा गुलशनकुमार पिक्चरमधली गाणी प्रोड्यूस करू लागला. ‘टी-सिरीज’  एचएमव्ही सारख्या जगातल्या  कॅसेटमधल्या दादा कंपनीला फाईट देऊ लागली.

….आणि महेश भट्टचा आशिकी आला.

संगीतकार नदीम श्रवण, गायक कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल, गीतकार समीर आणि टी सिरीजचा गुलशन कुमार ही गँग पहिल्यांदाच एकत्र आली होती. “नजर के सामने जिगर के पास”,”बस एक सनम चाहिये आशिकी के लिए” “तू मेरी जिंदगी है ” या गाण्यांनी अक्षरशः देशभर धुमाकूळ घातला. या पिक्चरची एकूण एक सगळी गाणी हिट होती. आतापर्यंत कुठल्याच पिक्चरच्या गाण्यांनी एवढं मोठ यश पाहिलं नव्हत.

गुलशन कुमार तर ‘पायरसी किंग’ म्हणून ओळखला जायचाच. संगीतकार नदीम श्रवण ही जोडी हॉलीवूड, पाकिस्तानी संगीत, इराणी संगीत कुठून कुठून शोधून धून आणायचे आणि त्याला आपला साज चढवून त्याची मेलेडी आपल्यापर्यंत पोहचवायचे. गीतकार समीर सुद्धा गाण्यामध्ये आपल्या वडिलांच्या कविता खपवतो असे आरोप व्हायचे. कुमार सानूला ड्यूप्लीकेट किशोर कुमार तर अनुराधा पौडवालला  ड्यूप्लीकेट लता मंगेशकर म्हणून ओळखलं जायचं.

या सगळ्यांना ड्यूप्लीकेट म्हणून हिणवल पण त्यांनी नव्वदच्या दशकातल्या संगीतावर राज्य केलं.

नदीम श्रवण यांनी १९९१ ते १९९३ सलग तीन फिल्मफेअर जिंकलं, याच तीन वर्षाचे उत्कृष्ट गायिकेचे फिल्मफेअर अनुराधा पौडवालला मिळाले.  कुमार सानूला तर उत्कृष्ट गायकाचा फिल्मफेअर सलग पाच वर्ष साठी मिळाला. हे सगळे आतापर्यंतचे विक्रम होते.

समीरला सुद्धा १९९१,९३ आणि ९४ असे तीन फिल्मफेअर मिळाले. त्या काळात या सगळ्यांचा झंझावातच असा होता की लता मंगेशकर,आशा भोसले, गुलजार,जावेद अख्तर,आर डी बर्मन , लक्ष्मीकांत प्यारेलाल अशी सगळी बाप मंडळी फक्त बघ्याच्या भूमिकेत उरली होती. पण सगळे दिवस सारखेच राहतात असं नाही.

गुलशनकुमारना भक्तीसंगीताचा नाद लागला. त्यांनी त्यात अनुराधा पौडवाललाही ओढलं. त्या दोघांबद्दलच्या चर्चा दबक्या आवाजात सुरु झाल्या. खरोखर लता मंगेशकरला स्पर्धा निर्माण करू शकणारी अनुराधा पौडवाल फिल्म संगीतातून बाजूला गेली. बेटा मधलं “धक धक करने लगा” सारखं गाण गाणारी अनुराधा पौडवाल हीच का असं वाटाव ही वेळ आली.

गुलशन कुमार आणि अनुराधा पौडवालने भारतातला एक सुद्धा देव सोडला नसेल, सगळ्या देवी देवतावर भक्ती गीत बनवली. एकवेळ तर अशी आली की टी सिरीजच्या भक्तीगीतांची कॅसेट पिक्चरच्या कॅसेटपेक्षा जास्त खपत होती.

आणि एक दिवस गुलशन कुमारचा खून झाला.

सगळी फिल्म इंडस्ट्री हादरून गेली. पोलिसांच्या तपासात संशय संगीतकार नदीम श्रवणवर आला. त्यातला नदीम देश सोडून पळून गेला. अंडरवर्ल्ड आणि बॉलीवूड कनेक्शनच भेसूर रूप सर्वांसमोर आलं. नदीम श्रवण हा अध्याय भारतीय फिल्म इंडस्ट्रीमधून संपल्यात जमा झाला.

अनुराधा पौडवाल आधीच स्पर्धेतून बाहेर फेकली गेली होती. गुलशनकुमारच्या  मृत्यूनंतर तर ती हळूहळू निवृत्त झाली. नव्या मिलेनियममध्ये नव्या दमाच्या संगीतकारांना कुमार सानूचा थरथरणारा थोडासा अनुनासिक आवाज जुन्या जमान्याचा वाटू लागला. गीतकार समीरच्या बाबतीतही थोडे फार असेच झाले. जेवढ्या वेगात हे सगळे यशाच्या शिखरावर गेले त्याच वेगात हे सगळे खाली आले. कंप्युटर, सिडी प्लेअर आले आणि कॅसेट टेपरेकॉर्डर इतिहास जमा झाले.पण काहीही झालं तरी आज आयट्युन्सच्या जमान्यात कसेटची आठवण येतेच.

आशिकी,दिल है के मानता नही ,साजन ,बेटा या पिक्चरची गाणी हेडफोन लाऊन  ऐकत त्या जमान्याची सैर होते आणि वाटतं की काहीही असो, हे सिक्के भले खोटे असोत पण हे होते खरे आपले सिक्के.

भूषण टारे. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.