वडापावमध्ये रमलेल्या पुण्यात पहिली कच्छी दाबेलीची गाडी या तीन भावांनी सुरू केली…

खाद्य पदार्थांचा व्यवसाय करणं तसं जिकीरीचं काम आहे. कारण चव आवडली तरच तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकता. चव आवडणे आणि ती चव टिकून ठेवणे भलतं अवघड काम आहे. त्यात जर तुम्ही पुण्यात एखादा पदार्थ विकताय म्हटल्यावर तुम्हाला चवीबाबत अतिशय सतर्क राहवं लागतं. कारण पुण्यात अनेक अशी हॉटेल्स आणि खाण्याचे स्टॉल आहेत, ज्यांना पिढ्यांपिढ्यांची परंपरा लाभलेली आहे.

पावाच्या आतमध्ये गरमागरम वडा खाणाऱ्या पुणेकरांनी सुरुवातीला कच्छी दाबेलीला नाकारलं होतं.

दोन-तीन वेळा कच्छी दाबेलीचे प्रयत्न फसले, रामोशी गेटजवळ एका विक्रेत्याने १९८५-१८८९ दरम्यान दाबेलीचा गाडा सुरू केला, पण कमी प्रतिसादामुळे काही दिवसांत तो बंद करावा लागला. पुणेकरांच्या पसंतीस उतरणाऱ्या दाबेलीला मार्केटमध्ये येण्यास १९९० सालं उजडावं लागलं.

पुण्यातल्या पहिल्या आणि सर्वात जुन्या दाबेलीच्या जन्माची कथा मोठी रंजक आहे. 

दिनेश, सुरेश, किशोर ठक्कर हे तीन बंधू पुण्यातील रास्ता पेठ येथे रहायचे. यातील सर्वात मोठे बंधु सुरेश हे एका बी-बियाणांच्या दुकानात कामाला होते. त्यांचे काम फिरतीचे होते. एकदा त्यांना एका ट्रकवाल्याने उडविले, सुरेश त्यानंतर अनेकदिवस एका जागेवर घरीच होते.

तेव्हा त्यांचा गुजरात मधील कच्छ येथील सचिन नावाचा एक मित्र त्यांना भेटायला आला. तेव्हा नेमका सर्वात लहान बंधु किशोर यांचा वाढदिवस होता. सचिनने किशोरच्या वाढदिवसानिमित्त गुजरात स्पेशल कच्छी दाबेली बनविली आणि दाबेलीचा गाडा टाकण्याची आयडिया देखील दिली.

किशोरने मग राहत असलेल्या बिल्डिंग समोरच गाडा टाकला. नाव दिले, जय जलाराम दाबेली, जय जलाराम खवैय्या.

1660903612052
जय जलाराम कच्छी दाबेली

आधी सुरेशच दाबेलीचा गाडा चालवायचा, पुढे जाऊन तिन्ही भाऊ या व्यवसायात आले. १९९० साली जलाराम बंधुकडे दाबेली होती, सव्वा दोन रुपयांना. आता ती दाबेली २० रुपयांना झाली आहे. आज पुण्यात अनेक ठिकाणी दाबेली मिळते, चीज दाबेली या सारखे अनेक प्रकार देखील सुरू झाले, पण पुण्यात पहिल्यांदा दाबेली इतका काळ विकत असलेले एकमेव विक्रेते आहेत, हे जलाराम बंधु.

गुजरातच्या कच्छ भागातून कच्छी दाबेली हा प्रकार उदयाला आला. महाराष्ट्रात ज्या प्रमाणे वडापाव बनविला जातो. अगदी त्या प्रमाणे गुजरातमध्ये दाबेली फेमस आहे. 

वडापावमध्ये गरम बटाट्याची भाजी असते, दाबेलीमध्ये देखील बटाटा वापरतात,पण दाबेलीसाठी वापरलेला मसाला हा थंड असतो. दाबेलीमध्ये चिंचेची चटणी, पुदिना चटणी, मीठ-लाल मिरची लावलेले शेंगदाणे असतात. डाळींबाचे दाणे देखील टाकतात. डाळींबाचे दाणे जेव्हा दाताखाली येतात.तेव्हा अप्रतिम चव लागते.

जलारामच्या दाबेलीची एक खासियत म्हणजे एक दाबेली खाऊन, तुमची भूक शमू शकते. कच्छ जवळच्या ऊनजा गावातून ठक्कर बंधु अजून देखील अस्सल गुजराती चवीचा दाबेली मसाला मागवतात. बन पावाच्या आतमध्ये मसाला, शेंगदाणे, डाळींबाचे दाणे लावून, भरपूर अमुल बटर लावून दाबेली भाजली जाते. 

पोळपाटासारखा एक हँडल असलेला पोळपट त्याने दाबेली दाबली जाते. त्यामुळे मसाले एकजीव होतात आणि अप्रतिम चव येते. अनेक वर्ष हे ठक्कर बंधु राहत असलेल्या इमारती बाहेर गाडा लावून दाबेली विकत. पुढे जाऊन त्यांनी त्या इमारतीत एक गाळा विकत घेतला. पण दाबेली मात्र ते अजून देखील गाड्यांवरच विकतात. तो गाळा त्यांच्यासाठी एक गोडाऊन आहे. 

1660903612046

आता इतकं वर्णन वाचल्यावर तुम्ही विचार कराल जलाराम दाबेली यांची वेळ काय ? दुपारी ३.३० ला दाबेली विक्रीला सुरुवात होते, पण बंद होण्याची फिक्स अशी काही वेळ नाही. २०० दाबेली विकून झाल्या की ठक्कर बंधु त्या दिवसाची विक्री थांबवितात.

कधी दोन तासात तर कधी तीन तासात त्यांच्या २०० दाबेली विकून जातात. लवकर गेलात तरच तुम्हाला त्यांच्या दाबेलीची चव चाखता येईल. ठक्कर बंधु बोल भिडूशी बोलताना सांगतात की,

“आम्ही रोज दोनशे दाबेली विकतो, कारण आम्ही पैशांपेक्षा क्वालिटी आणि आमच्या ग्राहकांचे समाधान यांना अधिक महत्व देतो. आमच्यावर ग्राहकांचे प्रेम आहे हेच आमच्यासाठी सर्व काही आहे, तीन पिढ्यांनी आमच्याकडे दाबेली खाल्ली आहे. आधी आजोबा जेव्हा तरुण होते तेव्हा ते येत आता त्यांच्या नातवाला घेऊन येतात आणि मुलांसाठी पार्सल घेऊन जातात. आम्हाला या व्यवसायाने आमची ओळख दिली आहे.”

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.