या दोन खेळाडूंनी देशातील प्रश्नाला जगाच्या व्यासपीठावर वाचा फोडली…

१९६८ सालची मेक्सिको ऑलंपिक स्पर्धा, अमेरिकेने त्यांची आतापर्यंतची सर्वोत्तम टीम मैदानी खेळासाठी उतरवली होती. या टीमने सुद्धा त्यांच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत एकूण २८ ऑलंपिक मेडल्स जिंकले, जवळपास ८ वर्ल्ड रेकॉर्ड्स बनवले.

या ऑलंपिक मधला १६ ऑक्टोबर १९६८ चा दिवस सुद्धा अमेरिकेने गाजवला, पुरुषांच्या २०० मीटर शर्यतीत अमेरिकेने वर्ल्ड रेकॉर्ड करत गोल्ड आणि ब्रॉंझ मेडल मिळवलं होत.

या स्पर्धेची बक्षिसे स्विकारायला खेळाडू पोडियम वर आले, स्टेडियम मध्ये असणारे अमेरिकेचे फॅन्स आपल्या खेळाडूंच्या नावाने जयघोष करत होते, घोषणा दिल्या जात होत्या.

खेळाडूंनी मेडल्स घेतले आणि ऑलंपिकच्या प्रथेप्रमाणे विजयी खेळाडूंच्या देशाचे म्हणजेच अमेरिकेचे राष्ट्रगीत सुरु झाले. नेमक्या याचवेळी अमेरिकेच्या विजेत्या खेळाडूंनी आपले हात उंचावून अभिमानाने उंच असलेली मान खाली घातली. त्यांच्या या कृतीमुळे सगळं स्टेडियम अचानक शांत झालं, त्या शांततेच राष्ट्रगीत पूर्ण झालं आणि खेळाडू पोडियमवरून खाली उतरले.

काही वेळापूर्वी ज्या खेळाडूंच्या नावाने सगळं स्टेडियम घोषणा देत होत आता त्यांनाच जोरजोरात शिव्या देऊ लागलं. वातावरण इतकं गंभीर बनलं कि पोलीस संरक्षणात त्या खेळाडूंना स्टेडियम च्या बाहेर काढावं लागलं.

फक्त स्टेडियमच्या बाहेर काढून कारवाई थांबली नाही तर लगेचच त्यांना अमेरिकेच्या ऑलंपिक टीम मधून काढण्यात आलं आणि ४८ तासांच्या आत मेक्सिको सोडण्यास सांगितले. 

हे खेळाडू होते टॉमी स्मिथ आणि जॉन कार्लोस आणि दोघेही Olympic Project for Human Rights ( OPHR ) या संघटनेचे सदस्य होते, त्यांनी केलेली हि कृती म्हणजे गेली कित्येक वर्षे अमेरिकेत कृष्णवर्णीय लोकांवर सुरु असलेल्या अन्यायाचा निषेध होती.

अमेरिकेला कृष्णवर्णीय लोकांवर होणाऱ्या अत्याचाराचा अत्यंत काळा इतिहास आहे, अमेरिकन समाजात अजूनदेखील काळे-गोरे हा वाद अस्तित्वात आहे. अलीकडेच जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलीस हिंसाचारात झालेल्या मृत्यूमुळे मोठं आंदोलन अमेरिकेत उभं राहिलं होत. तिथे आता हि परिस्थिती असेल तर ७०-८० वर्षांपूर्वी किती टोकाच्या वंशवादाचा (रेसिजम) सामना कृष्णवर्णीय लोकांना करावा लागला असेल याचा विचार करा.

पण हळूहळू या रेसिजम विरोधात आवाज उठायला सुरुवात झाली, मीडियाच्या माध्यमातून जगभरात अमेरिकेत सुरु असणाऱ्या हिंसाचाराच्या बातम्या पोहचू लागल्या.

जगासमोर बिघडत चाललेली आपली इमेज सुधारायचा निर्णय काही गोऱ्या लोकांनी घेतला आणि यासाठी मदत घेण्यात आली ती खेळाची.

अमेरिकेत लोकप्रिय असणाऱ्या रग्बी, बेसबॉल, बास्केटबॉल या खेळांच्या प्रोफेशनल टीममध्ये कृष्णवर्णीय खेळाडूंचा समावेश नसायचा, ‘White only teams’ ची संस्कृती अमेरिकेत होती. १९४६ मध्ये पहिल्यांदा केनी वॉशिंग्टन या कृष्णवर्णीय खेळाडूची प्रोफेशनल रग्बी टीममध्ये निवड करून हि प्रथा मोडून काढण्यात आली.

त्यानंतर अनेक प्रोफेशनल खेळात कृष्ण्वर्णीय खेळाडूंचा समावेश करायला सुरुवात केली. पेपर, रेडिओ टीव्हीवरील जाहिरातींचा उपयोग करून खेळाच्या माध्यमातून आम्ही कसा रेसिजम संपवत आहोत असा संदेश द्यायला गोऱ्या लोकांनी सुरुवात केली.

कितीजरी जाहिराती करत असले तरी खरी परिस्थिती वेगळी होती, खेळाच्या मैदानाच्या बाहेर कृष्णवर्णीय लोकांना रेसिजम सहन करावा लागतच होता.

१९६० च्या दशकात तर हे प्रमाण खूप वाढलं, अमेरिकेतला रेसिजम कमी व्हायला लागला आहे हा भ्रम तुटायला सुरुवात झाली. अमेरिकेतल्या प्रत्येक मोठ्या शहरात कृष्णवर्णीय लोकांसोबतचा अत्याचार वाढला होता आणि याचा परिणाम म्हणजेच त्यावेळी उदयास आलेली ‘ Black Power Movement ‘. सामान्य लोकांपासून ते कृष्णवर्णीय विद्यार्थी, खेळाडू या सर्वांनीच या आंदोलनात सहभाग घेतला.

खेळाडूंनी सुद्धा त्यांना मैदानाबाहेर सहन कराव्या लागणाऱ्या रेसिजम बद्दल बोलायला सुरुवात केली.  याच आंदोलनाच्या दबावामुळे अमेरिका सरकारने रेसिजम ला विरोध करणारा कायदा १९६४ साली पास केला, पण याचा काहीही फायदा झाला नाही. कृष्णवर्णीय लोकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना या कायद्यानंतरसुद्धा घडतच होत्या. पुन्हा एकदा अमेरिकेत सुरु असणाऱ्या रेसिजम बद्दल सगळ्या जगाला सांगायची गरज या आंदोलकर्त्यांना वाटायला लागली

आणि लवकरच तशी जागतिक पातळीवरची संधी सुद्धा चालून आली. 

जगातला सर्वात मोठा ‘स्पोर्टींग इव्हेंट’ कोणता असेल तर तो म्हणजे ऑलंपिक. १९६८ च्या ऑलंपिक स्पर्धा जवळ आल्या होत्या, याचा उपयोग करून आपण आपलं म्हणणं लोकांसमोर पोहचवू शकतो हे कृष्णवर्णीय आंदोलनकर्त्यांच्या लक्षात आलं होत. म्हणूनच १९६७ साली अमेरिकेतला प्रसिद्ध कृष्णवर्णीय खेळाडू डॉ.हॅरी एडवर्ड्स याने  Olympic Project for Human Rights ( OPHR ) या संघटनेची स्थापना केली.

या संघटनेचा मुख्य उद्देश्य होता कि ऑलंपिक स्पर्धेद्वारे आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना जगासमोर आणणे आणि कृष्णवर्णीय लोकांना न्याय मिळवून देणे.

यासाठी OPHR ने ‘Boycott Olympic’ म्हणजेच ‘ऑलंपिक वर बहिष्कार’ हि चळवळ सुरु केली. अमेरिकेच्या मैदानी टीममध्ये कृष्णवर्णीय खेळाडूंची संख्या मोठी होती, ऑलंपिक मध्ये जास्तीत जास्त मेडल्स जिंकण्याचं अमेरिकेचं स्वप्न त्यांच्याच मदतीने पूर्ण होणार होत. त्यामुळे ऑलंपिक मध्ये जर या खेळाडूंनी भागच घेतला नाही तर सरकार आपलं म्हणणं गंभीरतेने ऐकेल असा विचार या चळवळीमागे होता.

पण काही खेळाडूंचं मत वेगळं होत, बहिष्कार टाकून आपण आपलं म्हणणं लोकांसमोर पोहचवू शकत नाही असं त्यांना वाटतं होत. शेवटी OPHR ने कृष्णवर्णीय खेळाडूंचे मतदान घेतले आणि बहुमताने ठरवण्यात आलं कि आपण ऑलंपिक मध्ये भाग घ्यायचा. पण हा निर्णय घेताना सुद्धा खेळाडूंनी ठरवलं होत कि, संधी मिळताच एवढ्या मोठ्या स्टेजवरून आपल्या चळवळी मागची भूमिका जगासमोर मांडायची.

१६ ऑकटोबर १९६८, मेक्सिको ऑलंपिक मधल्या पुरुषांच्या २०० मीटर फायनल स्पर्धेचा दिवस.

या स्पर्धेत  अमेरिकेकडून OPHR संघटनेचा सदस्य असणाऱ्या टॉमी स्मिथ ने वर्ल्ड रेकॉर्ड सहित पहिला क्रमांक आणि जॉन कार्लोस ने तिसरा क्रमांक पटकावला, दुसऱ्या क्रमांकावर होता ऑस्ट्रेलियाचा पीटर नॉर्मन. स्पर्धेनंतर मेडल स्विकारायची वेळ आली आणि आपल्या लोकांचा आवाज जगासमोर पोहचवण्याची हीच ती वेळ आहे हे स्मिथ आणि कार्लोस च्या लक्षात आलं.

हे दोघे शांतपणे आपलं मेडल घेण्यासाठी पोडियमकडे निघाले पण जाताना त्यांनी आपले बूट काढून हातात घेतले होते, फक्त काळ्या सॉक्स वर ते पोडियमवर चढले, मेडल्स घेतले आणि अमेरिकेचे राष्ट्रगीत सुरु होताच  काळे ग्लोव्ह्ज घातलेला उजवा हात स्मिथने तर कार्लोस ने डावा हात उंचावत आपली मान खाली घातली आणि जगासमोर आपला संदेश पोहचवला.

कृष्णवर्णीय लोकांवर सुरु असणारा अत्याचार ऑलंपिक च्या माध्यमातून जगाला दाखवणं हा OPHR चा उद्देश होता आणि स्मिथ-कार्लोस च्या या कृतीने हा उद्देश पूर्ण केला.

स्मिथ-कार्लोस ने त्या पोडियमवर उभा राहून केलेल्या प्रत्येक कृतीमागे एक अर्थ होता, टॉमी स्मिथने नंतर या सगळ्या कृतीचा अर्थ समजावून सांगितला. काळा ग्लोव्ह्ज घातलेला स्मिथ चा उजवा हात म्हणजे अमेरिकेतल्या कृष्णवर्णीय लोकांची ताकद होती तर कार्लोस चा डावा हात कृष्णवर्णीय लोकांची एकता दर्शवत होता. बूट काढलेले त्या दोघांचे अनवाणी पाय कृष्णवर्णीय लोकांची गरीबी दाखवत होते आणि सर्वात शेवटी या दोघांच्या छातीवर असणारा OPHR बिल्ला, जो या स्पर्धेत दुसरा आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या पीटर नॉर्मन ने सुद्धा आपल्या छातीवर अडकवलेला होता.

हा क्षण म्हणजे OPHR चळवळीला मिळालेलं यश होत.

स्मिथ-कार्लोस च्या या एका कृतीने सगळ्या जगाचं लक्ष कृष्णवर्णीय लोकांकडे आलं होत. पण याचे परिणाम सुद्धा स्मिथ-कार्लोस ला भोगावे लागले, या घटनेनंतर लगेचच त्यांना अमेरिकेच्या ऑलंपिक टीममधून काढून टाकण्यात आलं आणि ४८ तासाच्या आत मेक्सिको शहर सोडायला सांगितलं.

पण अमेरिकेत कृष्णवर्णीय लोकांच्यात ते दोघे हिरो झाले, त्यांच्या या कृतीमुळे संपूर्ण जगाने रेसिजम विरुद्ध बोलायला सुरुवात केली, अमेरिकेतील काही गोऱ्या लोकांनी आणि मीडियाने सुद्धा स्मिथ-कार्लोस च्या भूमिकेला पाठींबा दिला, आपल्या वैयक्तिक करिअर वर थोड्याकाळासाठी या दोघांना पाणी सोडावं लागलं, भरपूर अडचणी आल्या पण स्मिथ-कार्लोसची ती कृती अमेरिकन कृष्णवर्णीय  आंदोलनासाठी कायमची एक प्रेरणा बनून गेली. 

आजसुद्धा स्मिथ-कार्लोस ने आपल्या लोकांसाठी ऑलंपिकच्या पोडियमवरून उंचावलेल्या हाताचा फोटो हा आतापर्यंतच्या ‘स्पोर्टींग इव्हेंट’ मधला  सर्वात महत्वाचा फोटो मानला जातो,इतकंच नाही तर ज्या ‘San Jose University’ मध्ये स्मिथ-कार्लोस ने आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे त्या युनिव्हर्सिटीने ‘ 1968 Olympic Protest’ चा पुतळा सुद्धा उभा केला आहे.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Jayantraj says

    Good article. You should write one more on Peter Norman who is the third guy here (silver medal). His story is even more substantial.

Leave A Reply

Your email address will not be published.