दुनियेला नेटफ्लिक्स सांगितलं, तरी लोकं रात्रीचा कम्फर्ट नेमका कशात शोधतात भिडू?

प्रत्येकजण दिवसभर हजार एक गोष्टी करतो, कुणाचं स्वप्न पूर्ण होतं, कुणाचं अपुरं राहतं… कुणाच्या पदरी बॉसच्या शिव्या येतात, कुणाच्या कानी कौतुकाचे दोन शब्द येतात. आपल्या शेजारचा माणूस डिप्रेशनमध्ये असलेला कळत नाही शेठ, लोकल आणि बसमध्ये तर कित्येक जण आनंदाचे मुखवटे घालून वावरत असतील, आपण कल्पनाही करु शकत नाही. पण हे सगळे मुखवटे उतरवून माणूस स्वतःसारखा कधी वागतो माहितीये…रात्री.

दिवसभराचा आनंद, दुःख, टेन्शन सगळं काही रात्री विसरलं जातं. रात्रीच्या छताखाली आणि एकटेपणाच्या भिंतींमध्ये आपण आपल्यासारखे जगतो. तिथं ना बाहेरच्या जगाचं दडपण असतं, ना मुखवट्याचा थर. डोळे मिटण्यापूर्वीची प्रत्येकाची रात्र वेगळी असते आणि ही त्याचीच गोष्ट…

प्रत्येकाची रात्र वेगळी असल्यानं, ती एकट्याच्या मेंदूतुन आणि अनुभवातून येणं शक्य नाही, त्यामुळे आम्ही लय जणांशी बोललो, त्यांनी कळत नकळत रात्र उलगडून दाखवली.

फॅंटसीचं जग…

लहानपणी जे काम करायचं ठरवलंय, तेच आता करायला मिळतंय अशी लय कमी लोकं या जगात आहेत. कुठंतरी कुठलंतरी वळण चुकतं आणि आयुष्य सरळमार्गी बनतं. ही लोकं मग स्वतःचं एक विश्व तयार करतात. त्यांचे डोळे दिवसभर कितीही कोरडे दिसत असले, तरी रात्री लय स्वप्नाळू असतात. आपण हे केलं असतं तर, ते केलं असतं तर हे इमॅजिन करण्यात त्यांची रात्र सरते आणि झोपण्याआधी रिग्रेटची हसरी छटा चेहऱ्यावर घेऊन ते झोपी जातात.

लय डीप झालं का भिडू? लोड नका घेऊ आता एकदम सोपे विषय…

हे फँटसीचं जग आपल्या कल्पनाविश्वात तयार करणं काही काही लोकांना लय कठीण जातं, त्यांच्या मदतीला धावून येतो मोबाईल आणि अर्थातच सोशल मीडिया.

शाळेत असताना प्रत्येकाला वाटायचं की शाळेवर दहशतवादी हल्ला झाला, तर आपण आपल्या लाईनला आणि मग सगळ्या शाळेला वाचवू. ते काय आता शक्य नसतंय, मग मदतीला येतं युट्युब. सापानं जिवंत माणूस गिळला, कुठल्यातरी बेटावर जलपरी सापडली, ही आहे देशातल्या बड्या नेत्याची अपरिचित मुलगी, या दडलेल्या खजिन्याचं रक्षण करतायत हे भयानक प्राणी, पृथ्वी सपाट आहे, जपानमधली लोकं हातावर चालतात… हे असले व्हिडीओ आवडीनं बघितले जातात. त्यातली एक गोष्टही खरी नाही, हे आपल्याला माहीत असतं… तरीही आपण क्लिक करतो. कारण ती ४-५ मिनिटं आपल्याला त्यात रमायचं असतं. ती व्हिडिओत दिसणारी खोटी जलपरी आपल्या शेजारी कधीच येणार नाही हे माहीत असूनही.. ती आपल्याला समाधान देते. आता सोशल मीडियावर माहिती, अभ्यास आणि मनोरंजनासाठीही अनेक व्हिडीओ पाहिले जातात, पण रात्रीची बात न्यारी असते… रात्र आपली असते.

रात्रीचं फेसबुकही वेगळं असतंय भिडू…

दिवसभर मित्रांची मापं काढणं, गूळ पाडणं, ट्रेंडिग टॉपिकवर रान हाणणं या सगळ्या गोष्टी होत राहतात. रात्री सर्चबॉक्समध्ये काही ठराविक नावं पडतात. पार जुन्या पोस्टपासून नव्या फोटोंपर्यंत सगळं पाहिलं जातं… परत, परत. एखाद्या अकाऊंटनं आपली रिक्वेस्ट पेंडिंग ठेवलीये हे पाहण्यातही चोरटं समाधान असतं. त्यावेळी लाईकचे आकडे आणि कमेंट्सचा पाऊस याचा फरक पडत नाही… एका विशिष्ट अकाऊंटच्या फोटोत २०१८ आणि २०२२ मध्ये गालावरची खळी बदलली नाहीये ना, हे पाहणं पुरेसं असतं. रात्रीचं फेसबुकही आपलं असतं.

सगळेच पुष्पा आणि सगळेच सलमान…

दिवसभर धक्के आणि अपमान पचवून आलेला माणूस, रात्री मोटिव्हेशनचे पिक्चर बघूच शकत नाय. गरीब घरातलं पोरगं पुढं जाऊन खोऱ्यानं पैसा कमवतं, एकावेळी ५० जणांना मारतं आणि अरेंज मॅरेजमध्येही हो म्हणाली नसती अशा पोरीला पटवतं… ही स्टोरी दिवसभरात कितीही भंगारात काढली तरी रात्री मात्र आवडते. कारण जी स्वप्नं पाहणं आपण सोडून दिलेलं असतं, ती कधीतरी पूर्ण होऊ शकतात ही एक टक्क्याची फिलिंग याच लॉजिक नसलेल्या पिक्चरमधून मिळू शकते… हा रात्रीचा प्रीमिअर फक्त चार भिंतीत एन्जॉय केला जाऊ शकतो.

शेवटचे दोन मुद्दे राहिले भिडू…

दिवसभर पुस्तकाच्या गठ्ठयात तोंड घातलेला माणूस रात्री काय वाचत असेल राव? लय सतावणारा प्रश्न. रात्रीच्या अवांतर वाचनाला अर्थ असतोही आणि नसतोही. ते वाचन बऱ्याचदा आपण ज्ञान मिळवण्यासाठी नाय तर आपल्या कम्फर्टसाठी करतो. पार जगाच्या लेखी भंगार ठरलेलं पुस्तक, इंटरनेटवर कुठल्यातरी पोरानं पोरगी असल्याचं प्रिटेंड करुन लिहिलेली सेक्स स्टोरी, फिनेलच्या बाटली मागे लिहिलेले बोलबच्चन, मेसवाल्यानी चपात्या बांधून दिलेला पेपर.. का वाचतो? माहीत नाही. पण वाचतो. काय वाचलं हे दुसऱ्या दिवशी लक्षातही रहायचं नाही, पण रात्री ते वाचणं आवडतं… कारण वरच सांगितलंय रात्र आपली असते.

झोप…

ज्याला पटकन लागली त्याचं नशीब. पण किती माणसं सुखानी आणि शांतपणे झोपत असतील? या प्रश्नामुळं एकदा झोप उडवली होती. म्हणून इनकॉग्निटो न वापरता गुगल करुन पाहिलं… फिलिप्स कंपनीनं २०१९ मध्ये ‘ग्लोबल स्लीप सर्व्हे’ केला होता. ज्यात निष्कर्ष निघाला की, जगात सगळ्यात जास्त चांगली झोप भारतातल्या नागरिकांना मिळते. एक प्रौढ व्यक्ती सरासरी दररोज ६.८ तास झोपते आणि आठवड्याभर निसटलेली झोप आठवड्याच्या शेवटी भरुन काढायचा प्रयत्न करते. ५४ टक्के लोकांना टेन्शनमुळं झोप लागत नाही, ४० टक्के लोकांच्या आजूबाजूचं वातावरण शांत झोप लागू देत नाही, ३७ टक्के लोकं काम किंवा शिक्षणामुळं झोपेचा बाजार उठवून घेतात, ३६ टक्के लोक मनोरंजनात वेळ घालवतात आणि उरलेल्या ३२ टक्क्यांना आरोग्यामुळं झोप लागत नाही.

आणि एक टक्का लोकं रात्री स्वतःला भेटतात… आपल्यासारखीच.

गाणी, नशा, सेक्स, चॅटिंग, गप्पा अशा कित्येक गोष्टींबद्दल बोलायचं राहिलंय, ते नंतर कधीतरी. लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होमनं आपल्या झोपेचा बल्ल्या केला असला, तरी आपणही तो होऊ दिला… आपली रात्र लांबवण्यासाठी!

त्यामुळे रात्री काय करतो/करते या प्रश्नाला नेटफ्लिक्स, वेब सिरीज, अभ्यास ही असली जड उत्तरं दिली नाहीत तरी चालतंय. टिकटॉकपासून क्लिकबेट पर्यंत काय हवं ते बघा आणि नेमाडेबाबांपासून जीर्ण झालेला दिवाळी अंक काहीही वाचा, पण रात्र स्वतःसाठी राखून ठेवा. कारण… रातसे झूट नही बोलते, रात को सब राज मालूम होते है!

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.