या गोष्टी आपण विसरलो होतो पण २०२० ने आपल्याला त्यांची किंमत नव्याने शिकवली.

२०२० हे वर्ष आपल्या पैकी अनेकांसाठी एखादं दुःखद स्वप्न असल्याप्रमाणे गेलं. कोरोनाच्या संकटामुळे महिनेंमहिने घरी काढावे लागले. अनेकांच्या नोकऱ्या सुटल्या. आजारपणं, हॉस्पिटल यात आयुष्यभराची कमाई खर्च झाली, उद्योगधंदा बसला. लाखोंचं नुकसान झालं. जवळचे मित्र, नातेवाईक यांचे मृत्यू पाहावे लागले.

अशा अभूतपूर्व संकटाच्या काळात सगळ्या वाईटच गोष्टी घडल्या असं नाही. काही गोष्टी आपल्याला नव्याने उलगडल्या. अशाच काही छोट्या छोट्या २० गोष्टींची यादी ज्यांच्या कडे आपण दुर्लक्ष करायचो पण २०२०ने आपल्याला त्यांची किंमत नव्याने शिकवली.

१)विना मास्क खुल्या हवेत श्वास घेणे –

वर्षभरात मास्क आपला जिवाभावाचा सोबती झाला. कुठेही बाहेर पडायचं तर मास्क घालायची सवय आपल्याला झाली. आता तर तोंडावर मास्क उमटू लागल्या आहेत. या सगळ्यात विना मास्कने आपण एकेकाळी मोकळा श्वास घेत होतो याची किंमत शिकवली. आयुष्यात कधी पुन्हा मास्क काढून बिनधास्त फिरता येईल ठाऊक नाही पण आज तरी हे बंधन आपल्यासाठी महत्त्वाचेच आहे हे ही तितकेच खरे

 

२) घरच्यांसोबत बसून टीव्हीवर क्रिकेट बघणे- 

ऑफिस कॉलेज आणि रोजच्या संसाराच्या धकाधकीच्या जीवनात क्रिकेट बघायलाच वेळ मिळत नाही. एकेकाळी आपण द्रविडचे कसोटीतली भिंत देखील तासनतास त्याच्या इतक्याच एकाग्रतेने बघायचो. आपल्या पप्पांसोबत रात्री जागून सचिन सेहवागच्या इनिंग बघितली, कानिटकरचा चौकार, गांगुलीच शर्ट काढणे हे सगळं काल घडल्यासारखं आठवत होतं. पण आजच्या टीमच्या निम्म्या खेळाडूंची नवे देखील आपल्याला माहित नाही. ते जून सगळं मिस करत होतो, या लॉकडाऊन मध्ये आयपीएल बघितलं. आई खाऊ आणून देतोय, वडील कॉमेंट्री सांगत आहेत. लहान भावासोबत मुंबई भारी कि चेन्नई भारी यावर आपली भांडणं चालली आहेत,  अगदी लहानपणीच चित्र पुन्हा उभं राहिलं.

३) मैदानात जाऊन खेळणे.

सुट्टीत सकाळी ग्राउंडवर गेलेली पोर रात्री उशिरा घरी परतायची. गुडघे फुटायचे. मारामाऱ्या व्हायच्या. कपडे फाटायचे. पण यात देखील मज्जा होती. गेल्या वर्षभरात ग्राउंडवर पाय ठेवायला देखील मिळालं नाही. २०२० ने आपल्याला व्हिडीओ गेमच्या ऐवजी बाहेर खेळणे किती भारी आहे हे शिकवलं.

Source: wikimedia

४) सणासुदीत घरी जाण्यासाठी ट्रेन पकडणे –

दिवाळी-गणपती चा सण आला कि ऑफिस मध्ये सुट्ट्यांसाठी मारामाऱ्या सुरु व्हायच्या. कामाची विभागणी, बॉसची कटकट, दिवसांचे हिशोब करून रेल्वे बुकिंगसाठी धावपळ सुरु व्हायची. एवढं करून घरी जायच्या आदल्या संध्यकाळी सगळं सामान बांधून आपण स्टेशनवर धावत पळत पोचायचो आणि आपली ट्रेन दिसायची तेव्हा जगात सगळ्यात जास्त आनंद व्हायचा.

Source: zeebiz

५. तब्येतीची काळजी घेणे –

यावर्षी सगळ्यांनी विशेष करून आपल्या तब्येतीची काळजी घेतली. सिगरेट दारू सारख्या वाईट सवयी आपोआप कमी झाल्या.  कडू काढा मन मारून का होईना सगळ्यांनी पिला. योगासने, वाफ घेणे, कोमट पाणी पिणे वगैरेची आता तर सवय लागली. हेल्दी फूड, डाएट वगैरेंनी आपल्या घरात देखील प्रवेश केला. हेल्थ कॉन्शियस असणे हि आता उच्च्भ्रू लोकांची मक्तेदारी उरली नाही. हे हि कोव्हीड महामारीचे यश.

Source: pixabay

६. दोस्तांसोबतचा टपरीवर चहा- 

घरचा चहा आपण भरपूर प्यायलो, काढा प्यायली. पण आपल्या खास मितरॉंच्या सोबत टपरीवरची चाय पे चर्चा सगळ्यात जास्त मिस केली. कितीजरी नाही म्हटलं तरी गप्पांसोबतच्या त्या चहा मध्ये एक वेगळीच तरतरी असते, कोरोना काळात आपण त्याला सगळ्यात जास्त मिस केलं.

Source: wikimedia

७. आपल्या घरादाराची स्वच्छता 

स्वच्छेतेचे महत्व कोरोना काळात सगळ्यांना कळले. घरात येणारी प्रत्येक गोष्ट सॅनिटाईज करणे, फळे भाज्या व्यवस्थित धुवून घेणे. रोजच्या रोज घर स्वतः झाडून पासून लख्ख करणे हे प्रत्येकाने केले कारण कोरोनाने त्याची किंमत आपल्याला शिकवली.

Source: pexels

८. घरच्या सगळ्यांनी एकत्र बसून जेवण करणे.

आजवर नोकरी, शाळा, कॉलेज यामुळे सगळ्यांनी एकत्र बसून जेवणे शक्यच नसायचे. पण २०२० मधील बहुतांश वेळा आपण लहानपणाप्रमाणे आईबाबा भाऊ बहीण बायको आज्जी आजोबा सगळे एकत्र बसून जेवलो. एकमेकांस जास्त समजून घेतलं. आपल्या आवडी निवडी नव्याने कळल्या. स्वैपाकात मदत केली. नवीन पदार्थ बनवायला शिकलो. घरच्या जेवणात पण मज्जा असते हे आपण विसरून गेलो होतो पण २०२० मध्ये आईच्या हातच्या चवीने त्याची आठवण करून दिली.

Source: unlockfood

९. महाभारत रामायण –

गेम ऑफ थ्रोन्स आणि मिर्झापूर बघणारी पिढी पुन्हा महाभारत रामायण बघण्याकडे वळली. एकेकाळी या सिरीयल लागल्या कि देशभरातले रस्ते मोकळे व्हायचे. आता तीस वर्षांनी तशीच वेळ आपण अनुभवली. आपल्या सिरीयल सुद्धा जागतिक दर्जाच्या सिरीयल पेक्षा भारी असू शकतात हे कोरोनाच्या काळात आपण शिकलो

१०. नातेवाईकांचे सणासुदीत घरी येणे- 

यावर्षीच्या दिवाळी गणपतीत नेहमी एवढी चमक नव्हती. आपण दिवाळी जोरात साजरी केलीच नाही पण याच बरोबर आपण कोणाच्या घरी देखील गेलो नाही. दिवाळीत नवीन कपडे घालून गल्लीत लोंकाच्या घरी जाणे, फराळावर आडवा हात मारणे, वगैरे वगैरे गोष्टी आपण मिस केल्या. आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना मिस केलं. मामाच्या घरी सुट्टीला जाणे मिस केलं.

Source: boldoutline

११. आवडीच्या कॅफे मध्ये पडीक राहणे-

एक आवडीचं पुस्तक आणि सुकून वाली कॉफी आपण प्रचंड मिस केली. आता तर आपलं आवडीचं कॅफे त्याच जागी आहे कि बंद झालं हे सुद्धा ठाऊक नाही. तिथली शांतता, खास कॉफीचा वास आपण तरी मिस करतोय.

Source: pxhere

१२. जिम मध्ये जाऊन व्यायाम-

दरवर्षी १ जानेवारीला वर्षभराची मेम्बरशिप घेणे आणि दोन दिवसात त्या पैशांवर पाणी फेरीने हे आपल्या सवयीचं झालं होत. पण गेल्या वर्षाने आपल्याला जिमच महत्व शिकवलं. तिथल्या त्या वजनाची आदळआपट, बायसेप्स असलेले पहिलवान, मस्त फिगर असलेल्या पोरी , ट्रेड मिलवर पळणारे आंटी  अंकल या सगळ्यांना आपण मिस करतोय.

Source: pixabay

१३. दोस्तांच्या सोबत लॉन्ग ट्रिप 

सगळ्यांना भेटणे, अगदी चौपाटीवर भेळ खाण्यापासून ते गोव्याला जाण्याचा प्लॅन करणे या गोष्टी किती आपल्याला आवडायच्या हे आता आठवतंय. गोव्याला जाण्याचा प्लॅन कधी यशस्वी झाला नसेल मात्र आजवरच्या असंख्य ट्रेकिंगच्या सफारी, पावसात बाईक घेऊन हुंदडणं, पैशांची जुळवाजूळव करून मारून आलेल्या ट्रिपच महत्व २०२० ने शिकवलंय.

Source: pexels

१४) निसर्गाशी पुन्हा कनेक्ट होणे.

पहिल्या जनता लोक डाऊन पासून आपल्याला पक्ष्यांचे आवाज पुन्हा ऐकू येऊ लागले. प्रदूषण विरहित शुद्ध हवा काय असते हे आपण पहिल्यांदा पाहिलं. मुंबईत दिसलेल्या मोरांपासून ते पुण्यात शिरलेला गव्या पर्यंत अनेक उदाहरणांनी आपण निसर्गावर केलेल्या अतिक्रमणाची पहिल्यांदाच जाणीव झाली. आपल्या लाइफस्टाइल मध्ये बदल घडायला हवा हे नव्याने जाणवलं. प्राणी पक्षी, निसर्ग यांच्यासोबतच आपणास जगायचे आहे हे २०२० ने शिकवलं.

१५. आपल्या छंदासाठी वेळ देणे –

या वर्षातला सर्वात मोठा धडा आपण काय शिकलो तर ते म्हणजे आपल्या छंदाला वेळ देणे. लॉकडाऊनमध्ये अडगळीत पडलेले जुने गिटार निघाले. कोणी आपल्या डान्सचे,गाण्याचे व्हिडीओ बनवू लागलं, कित्येक जण पुन्हा स्वयंपाक घराकडे वळले, निम्मा भारत आता घरात केक बनवायला शिकला.

Source: pexels

१६. सेव्हिंग करणे-

या वर्षाने सेव्हिंगच महत्व आपल्याला शिकवलं. णीवेळी आलेले हॉस्पिटलचे खर्च, गेलेल्या नोकऱ्या, बंद झालेले बिझनेस यांनी उधळपट्टीवर लगाम आणला. पुन्हा बँकेचे फिक्स डिपॉजिट, पोस्टातली खाती यांची उजळणी झाली. गुंतवणुकीचे नवीन पर्याय शोधणे आले, बजेटच्या बाबतीत जागरूकता २०२० ने आपल्या पिढीला शिकवली.

Source: pixabay

१७. इंश्युरन्सचे महत्व 

इतके वर्ष मेडिकल इंश्युरन्सचं महत्व आपल्या लक्षात आलं नव्हतं. इंश्युरंस वगैरे सांगायला येणारे एजंट आपल्याला फसवतातच हा गैरसमज आपण दूर केला. मेडिकल पॉलिसी,कोरोना कवच, टर्म इंश्युरंस हे आपल्या रोजच्या बोलण्यात येणारे विषय झाले. सर्वसामान्य माणूस सुकंच याचा अभ्यास करून आपल्या भविष्याचा विचार करू लागला.

Source: economic times

१८. ऑनलाइन शॉपिंगचे महत्व कळाले 

ऑनलाइन शॉपिंग आपण यापूर्वी करत होतो मात्र आता दुधापासून ते भाज्यांपर्यंत ऑनलाईन शॉपिंग होऊ लागली. अगदी गावाकडे सुद्धा whatsappच्या माध्यमातून किराणा माल भरला जाऊ लागला. गुगल पे, फोन पे, भीम हे अगदी अशिक्षित माणसे देखील वापरू लागली. साध्या टपरीवर देखील ऑनलाईन ट्रान्सफर करून चहाचे पैसे देण्यात येऊ लागले. डिजिटल क्रांतीच महत्व २०२०ने शिकवलं.

Source: pixabay

१९. स्पर्श-

खरं सांगायचं झालं तर यापूर्वी कधी आपण याकडे लक्ष दिल नव्हतं. एरव्ही लोकलची ढकलाढकली, गर्दीची दगदग यामुळे इतरांचा स्पर्श नको वाटायचा. पण कोरोना नंतर बच्चन साहेबानी सांगितल्याप्रमाणे २ गज दुरी आपण सगळे पाळतो, शेक हॅन्ड बंद होऊन नमस्काराची पद्धत परत आली. दोस्तांना कडकडून भेटणे, आपल्या खास व्यक्तीला जादूची झप्पी देणे वगैरे गोष्टी पुन्हा कधी सुरु होतील माहित नाही. मानवी स्पर्शाचं महत्व २०२० मुळे कळालं हे नक्की.

Source: pixabay

२०. स्वातंत्र्य-

स्वातंत्र्याची किंमत आपल्या पिढीला पहिल्यांदा समजली. कुठेही जाण्याचे स्वातंत्र्य, काहीही खाणे, कोणालाही भेटणे, कधीही अगदी रात्री अपरात्री भटकणे हे देखील स्वातंत्र्य आपण उपाभिवगत होतो हे आता अगदी विसरल्यासारखं झालंय. आपल्या जुन्या पिढ्या इंग्रजांच्या गुलामीत होत्या आणि आपण कोरोनाच्या गुलामीत अडकलो. २०२० ने स्वातंत्र्याची किंमत शिकवली.

Source: pixabay

तुम्ही या वर्षात काय शिकला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.