पगार, बोनस, दिवाळी सगळं बाजूला ठेवा, एक तारखेपासून लय गोष्टी बदलणार आहेत

एक जमाना होता जेव्हा रेडिओवर एक तारखेला गाणं लागायचं, खुश हे जमाना आज पेहली तारीख है… सध्याची परिस्थिती पाहता, गेले ते दिन गेले हे गाणं परफेक्ट बसेल. आता तुम्ही म्हणाल, भिडू काय गंभीर विषय झालाय का? सांगतो, सगळं सांगतो.

या एक नोव्हेंबरपासून तुमच्या आमच्या जीवनातल्या लय गोष्टी बदलणार आहेत, विशेष म्हणजे या सगळ्याची चाट आपल्या खिशाला फिक्समध्ये बसणाराय.

वि सामान्य नागरिक आर व्हेरी हतबल, युनो.

बदलणारी गोष्ट क्रमांक एक- एसबीआयमध्ये लायनी नाहीत.

अय्योव. म्हणजे आता ‘लंच टाईमनंतर या’ ऐकावं लागणार नाही? म्हणलं सुरुवातीला तुम्हाला जरा गुड न्यूज द्यावी. ही गुड न्यूज आहेच, पण तुम्ही पेन्शनर असाल तरच. तुमचं पेन्शन खातं जर एसबीआयमध्ये असेल, तर जिवंत असल्याचं प्रमाणपत्र द्यायला रांगेत उभे राहावं लागणार नाही. तुम्ही घरी बसूनच जिवंत असल्याचं प्रमाणपत्र देऊ शकता. त्यासाठी एसबीआयनं ‘व्हिडिओ लाइफ सर्टिफिकेट’ सेवा सुरू केली आहे. यात तुम्ही व्हिडीओ कॉलद्वारे बँकेला सांगू शकताय की, भावा मी जिवंत आहे आणि पेन्शनसाठीही पात्र पण.

बदलणारी गोष्ट दोन- बँक ऑफ बडोदावाले जरा जास्त पैसे घेणार.

तुमचं खातं जर बँक ऑफ बडोदात असंल, तर खात्यात महिन्यातून फक्त तीन वेळा पैसे जमा केले तर विषय ओके. त्याच्यापुढं प्रत्येकवेळी पैसे भरताना ४० रुपये एक्स्ट्रा भरावे लागणार. विषय फक्त पैसे भरण्याचा नाही, तर पैसे काढण्याचा पण आहे. कारण, निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढले तर तुम्हाला प्रत्येकवेळी १०० रुपये एक्स्ट्रा द्यावे लागणार. आणखी एक, या बँकेचे ग्राहक जर कर्ज घेत असतील, तर त्यांना १५० रुपये सर्व्हिस फी द्यावी लागणार.

बदलणारी गोष्ट क्रमांक तीन- गॅसचे भाव.

कपाळावरचा हात काढा, घरगुती गॅसचे भाव काय वाढलेले नाहीत. सरकार दिवाळीच्या तोंडावर रिस्क घेणार नाय. भाव वाढलेत ते व्यवसायासाठी वापरले जाणाऱ्या सिलेंडरचे. तेही २६६ रूपयांनी. आता तुमच्या व्यवसायाला सिलेंडर लागत असंल; तर सॉरी टू से भिडू, हात परत कपाळावर मारा. जवळपास १७००-१८०० ला मिळणारा हा सिलिंडर घ्यायला आता दोन हजाराची गुलाबी नोट द्यावी लागणार. त्यामुळं हॉटेलवाल्यांना भाव वाढवावे लागणार आणि सामान्य माणसाचाही खिसा रिकामा होणार.

घरगुती गॅसच्या विषयात पण एक छोटीशी खळबळ झालिये. सिलेंडरच्या डिलेव्हरीवेळी तुम्हाला ओटीपी सांगायला लागणार आहे. तुम्ही गॅस बुक कराल तेव्हाच हा ओटीपी तुमच्या मोबाईलवर येईल. तसा लोड घ्यायची गोष्ट नाही, पण तो ओटीपी डिलीट करू नका म्हणजे झालं.

बदलणारी गोष्ट क्रमांक चार- रेल्वेच्या वेळा.

आता पावसाळ्यानं कल्टी मारलीये आणि सणाचा माहोल पण सुरू झालाय. त्यामुळं काही नव्या ट्रेन धावणार आहेतच आणि प्री मान्सून टाईमटेबलही लागू केलं जाणारे. त्यामुळं बॅगा भरून घरुन निघायच्या आधी टाईमटेबल चेक करायला विसरू नका.

बदलणारी गोष्ट क्रमांक पाच- व्हॉट्सअप बंद पडणार.  

हा मेसेज तुमच्या फॅमिली ग्रुपवर लाख वेळा येऊन गेला असंल. पण यावेळी विषय खरा आहे. खरंच व्हॉट्सअप बंद पडणारे. पण फक्त Android 4.0.3, Ice Cream Sandwich, iOS 9 आणि KaiOS 2.5.0 ऑपरेटिंग सिस्टम असणाऱ्या फोनवर. आता तुमचा फोन यापैकी कोणत्याही सिस्टीमवर काम करत असंल तर तो अपडेट करा किंवा सरळ नवीन घ्या. होऊदे खर्च!

तर असा खोल विषय झालेला आहे. सगळं जरा नीट वाचा आणि खर्चाचा ताळमेळ बसवा.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.