कॉंग्रेस भाजपच्या जाहीरनाम्यात तरुणांच्या या गोष्टी आल्या नाहीत. 

कॉंग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा आणला. नाही हो म्हणत मागोमाग भाजप सरकारने देखील आपला जाहीरनामा समोर आणला. कोणत्या पक्षाने काय वचन दिलं आहे यावर चर्चा झडू लागल्या. युवकांना काय पाहीजे तर रोजगार या एका मुद्यावर तरुणांचे प्रश्न मिटवण्याचे उद्योग या दोन प्रमुख पक्षांनी केले. मात्र युवकांचे नेमके प्रश्न काय? कोणत्या गोष्टी दोन्ही पक्षाच्या जाहिरनाम्यात असत्या तर युवकांची जास्तित जास्त मते या पक्षांना मिळाली असती या संबधित आम्ही समाजातील वेगवेगळ्या स्तरावरील युवकांशी संवाद साधून मिळवल्या.

हे तरुण जे म्हणाले ते आपणासमोर सविनय आम्ही सादर करत आहोत. 

१) MPSC च्या पोरांना चहामध्ये सबसिडी तसेच रेशन दुकानातून अल्पदरात ढेकूण मारणाऱ्या औषधांचा पुरवठा करावा. 

२) भारत २०२२ मध्ये भारतीयांना अंतरिक्षात पाठवणार असल्याचे समजते. या योजनेचा लाभ सर्वात प्रथम डी.एड ग्रस्त विद्यार्थांना देण्यात यावा. त्यानंतर MPSC एका मार्कांत गेल्याचे सांगून फसवणूक करणारे विद्यार्थांना या सुवर्णक्षणांचा लाभ पोहचवावा. 

३) NETFLIX हे यू ट्यूबच्या धर्तीवर मोफत करावे. रिलायन्स जिओने ज्याप्रमाणे क्रांन्तीच पाऊल उचलून तरुणांना अखंड ऑनलाईन केलं त्याप्रमाणे NETFLIX ने हे पाऊल उचलावे. त्याचप्रमाणे रात्री नऊ ते सकाळी सहा या वेळेत ALT बालाजीची सेवा देखील मोफत देण्यात यावी. 

४) पब जी चिकन डिनर सोबत शाकाहारी व्यक्तींना सोयाचंन्क डिनरची सोय करावी. 

५) लग्न कधी करणार? पुण्यात फ्लॅट आहे का? पॅकेज किती आहे? जोश्यांचा तन्मय युरोपला असतो, तूमचं काय? शेजारच्या पिकींच लग्न होवून चार वर्ष झाली तूझ काय? यांसारखे प्रश्न म्हणजे थेट देशविरोधी कारवाई म्हणून गृहित धरले जावेत. अभिव्यक्ति स्वातंत्र याठिकाणी रद्दबातल ठरवून या लोकांवर कठोर कारवाई करावी.  

६) फक्त कपल एन्ट्री असणारे हॉटेल, पब, रेस्टॉं सारख्या तत्सम ठिकाणी सिंगल लोकांसाठी एक गॅलेरी ठेवण्यात यावी. या गॅलेरीतून खाली असणाऱ्या सर्वांना निसंकोचपणे पहाता यावे अशी सोय करण्यात यावी. 

७) टिक टॉक सारख्या कृतीशील माध्यमातून पुढे येणाऱ्या तरुणाईसाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात यावेत तसेच प्रोत्साहन म्हणून “बॉबी देओल टिक टॉक व्हिडीओ प्रशिक्षण योजना” शासनाने लागू करावी. 

८) अखिल भारतीय विज्ञान संमेलन अथवा अखिल भारतीय साहित्य संमेलनाप्रमाणे अखिल भारतीय सिंगल लोक संमेलन केंद्रीय शासनाने पुढाकाराने सुरू करावे. या संमेलनासाठी जागतिक दर्जाचे तुंबलेले सिंगल लोक बोलावून त्यांचा योग्य पाहूणचार करावा. 

९) पोह्यामध्ये सांबार घालून खाणे, तौफा तौफा सारखी गाणे आपली हॅलोट्यून म्हणून ठेवणे, फेसबुकवर कमेंट बॉक्स मध्ये सात लिहून रेल्वेरुळावर झोपलेल्या मुलीला उठवण्याचा प्रयत्न करणे, जांभ्या दगडात घर बांधून त्यावर सिमेंटने गिलावा करणारे, रिकी पॉन्टिंगच्या बॅट मध्ये स्प्रिंग असल्याच्या गोष्टीवर विश्वास ठेवणारे यासारख्या लोकांना स्वतंत्र आरक्षणाची सोय करुन शासनाने त्यांची आजीवन जबाबदारी घ्यावी. 

१०) कोणताही अपघात झाल्यास, दुखद: प्रसंग घडल्यास, वाईट गोष्ट झाल्यास तात्काळ गर्दीत सहभागी होत, मी पहिलाच सांगितलेलं म्हणून आपण किती मोठ्ठे अंदाजकर्ते आहोत याची जाणिव आजूबाजूच्यांना सतत करुन देणाऱ्या खास व्यक्तिंना भारतीय गुप्तचर खात्यात १४ आरक्षणाची सोय करावी. 

बस्स सध्या दहाच सुचले आहेत. कारण मी बेरोजगार तरुण असून माझ्याकडे रिलायन्स जिओ आहे. तुम्ही देखील माझ्यासारखेच तरुण असाल तर या सुवर्णसंधीचा लाभ घ्या आणि तरुणांचा जाहिरनामा कमेंट करुन वाढवत रहा.  

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.