तिसरी लाट खरं – खोटं !

आपल्याकडे कोरोनाच्या संसर्गाची पहिलीच लाट ओसरली नसताना दुसऱ्या लाटेने रौद्र रूप धारण केले. आजही दुसरी लाट ओसरली नसताना तिसरी लाट येणार किंवा नाही हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. कोरोनाच्या संसर्गाचा धोका टळलेला नाही. रोज नव्याने कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत आणि अजून काही काळ सापडत राहतील यावर वैद्यकीय तज्ञांनी यापूर्वीच भाष्य केले आहे.

कोरोनाचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काही गोष्टींमध्ये राज्य शासनाने निर्बंध लावले आहेत. ते निर्बंध कसे चुकीचे आहेत यावर विविध राजकीय पक्ष आपली मते व्यक्त करत असून ते निर्बंध उठावावेत म्हणून मागणी करत आहेत. या अशा परिस्थितीत शासनाच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे .

कोरोनाच्या या संसर्गाच्या प्रक्रियेत सगळं जसं ठरल्याप्रमाणे होत आहे. अनेक तज्ञांनी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविला होता. त्याप्रमाणे कमी असणारे रुग्ण, रुग्ण दुपटीचा कालावधी यामध्ये हळू हळू बदल दिसण्यास सुरुवात झाली आहे. एखादी आरोग्याला हानी पोहोचविणारी गोष्ट घडणार आहे याची तज्ञांनी व्यक्त केलेली शक्यता  माहीत असूनही त्याचा वैद्यकीय किंवा शास्त्रीय दृष्टिकोनाने विचार न करता त्याच्या अवती भोवती राजकारण करणे कितपत योग्य आहे ? हा सवाल सध्या काही जणांना पडला आहे, तर काहींना हा सवालच असू शकत नाही अशी स्थिती सध्या राज्यात दिसून येत आहे.

आजार होणे किंवा रोगराई पसरणे हे कुणालाच आवडत नाही. मात्र या वैश्विक महामारीच्या काळात या साथीच्या आजाराला थांबविण्याकरिता किंवा तो अनेक नागरिकांना होणार नाही यासाठी प्रशासन आणि सत्तेवर असणारे शासन शक्य होईल तेवढे प्रयत्न करत असतात. या सगळ्या प्रक्रियेत ते काही गोष्टीवर निर्बंध लावतात. जे निर्बंध नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने लावले जातात याकरिता शासन आरोग्य तज्ञांची मदत घेत असते. मात्र हे निर्बंध असतात ते सर्वांसाठी समान असावेत अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा असते. मात्र काही कारणाने त्या पद्धतीचे वातावरण न दिसल्याने सत्ताधारी आणि विरोधक यामध्ये संघर्ष निर्माण होतो. त्यामुळे मग सत्ताधारी पक्षाने नियम केले कि विरोधक ते नियम कसे आडमुठे आहेत आणि नागरिकांची पिळवूणूक करणारे आहे हे सिद्ध करण्यासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात उतरतात.

या सगळ्या कोलाहलात मात्र कोरोनाच्या साथीच्या आजारामुळे जे रुग्ण निर्माण होत आहे त्याकडे मात्र डोळे झाक करणे योग्य ठरणार नाही.

तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविताना काही तज्ञांनी तर टोकाची विधाने केलेली पाहायला मिळाली आहेत. कोरोनाचे अनुमान आज पर्यंत अनेकांनी व्यक्त केले ते काही अंशी खरे ठरले तर काही अंशी ते फोल ठरल्याचे चित्र बघावयास मिळाले आहे. शक्यता वर्तविणे आणि त्या अनुषंगाने आरोग्य व्यवस्थेने तयारी करणे हे क्रम प्राप्तच आहे. दुसऱ्या लाटेत नागरिकांचे या संसर्गाने जे हाल झाले आहेत ते तर सगळ्यांनीच पहिले आहे ती परिस्थिती तशी उद्भवू नये याकरिता काय सावधान राहणे हा एकमेव पर्याय आहे.

राज्य सरकारच्या कोरोना विशेष कृती दलाचे सदस्य डॉ शशांक जोशी यांनी सांगितले की,

” तिसरी लाट आपल्याकडे अजूनही आलेली नाही. सध्या आपल्याकडे जी दुसरी लाट आहे ती ओसरत आहे. मात्र शासनाने आखून दिलेले नियम पाळले नाही तर मात्र कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होऊ शकते. विशेष म्हणजे आता सणासुदीचा काळ सुरु झाला आहे. गणेशोत्सवाच्या काळात आपल्याला या सर्व परिस्थितीवर विशेष लक्ष ठेवावे लागणार आहे. “

केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागातर्फ़े जी कोरोनाच्या अनुषंगाने दैनंदिन आकडेवारी जाहीर करण्यात येते त्यानुसार आजच्या घडीला ( ३१ ऑगस्ट ) देशात सध्या ३ लाख ७० हजार ६४० कोरोनाचे  ऍक्टिव्ह रुग्ण असून ते सध्या उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे या आकडेवारीतील रुग्णांचा मोठा वाटा हा दोन राज्याकडे त्यामध्ये क्रमांक एकवर केरळ आणि दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र राज्य आहे. यापैकी केरळ राज्यात सध्या २ लाख १० हजार ४० रुग्ण आहेत तर महाराष्ट्रात ५५ हजार ३५९ रुग्ण आहेत. त्यामुळे या दोन्ही राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर कोरोनाच्या रुग्णांचा ताण पाहायला मिळत आहे.

कोरोनाचे तांडव या विषयवार जेव्हा केव्हा लिहिलं जाईल तेव्हा केरळ राज्याचं  नाव पाहिलं घेण्यात येईल.

कारण संपूर्ण देशात पहिला रुग्ण  ३० जानेवारी २०२० रोजी याच राज्यामध्ये सापडला असून,  या महाभयंकर आजाराला अटकाव घालण्याचा मान पण याच राज्याला मिळाला होता. मजबूत सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, लोकांचा सकारात्मक सहभाग, प्रशासनावर असलेला विश्वास आणि  नियमांचं कडक पालन आणि  शिस्त. यामुळे त्यांनी काही महिन्यातच कोरोनाला अटकाव करण्यात यश मिळविले होते.  विशेष  म्हणजे त्यानंतरच्या चार महिन्यात  केरळ राज्यात कोरोनाबाधितांचा १ मे २०२० रोजी एकही रुग्ण आढळलेला नव्हता, याकरिता त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्याच राज्यात आज या आजाराला घेऊन गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या या साथीत आज जी परिस्थिती आहे ती उद्या तशीच राहील असे सांगता येणार नाही. त्यामुळे या राज्याचे चिंताग्रस्त  वातावरण पाहता आपल्या राज्याने बोध घेण्याची गरज आहे.

सार्वजनिक आरोग्याच्या मुद्द्याला कुणीच गृहीत धरू नये अशीच काहीशी सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे तिसरी लाट किंवा आणखी चौथी लाट येण्याची वाट न पाहता सतर्क राहणे हेच सोयीचे आहे. पाश्चिमात्य देशात कोरोना रुग्ण वाढीला प्रारंभ झाला आहे. त्या ठिकाणी विविध गोष्टींवर निर्बंध लावले जात आहे.

याप्रकरणी, मुंबई शहराच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे अध्यक्ष डॉ अविनाश सुपे सांगतात की,

तिसरी लाट येणार की नाही हे खरं तर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लक्षात येईल. कारण सांगली, सातारा, रत्नागिरी, रायगड, पुणे कोल्हापूर  या भागात काही प्रमाणात रुग्णांची संख्या तुलनेने अधिक आहे. विशेष म्हणजे या विषाणूच्या नवीन उपप्रकाराने राज्यातील सगळ्या भागात पसरू नये याची काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सणासुदीच्या काळात सोशल डिस्टंसिंगचे पालन केलेच पाहिजे. सर्व नियम पाळलेच पाहिजे. कारण आता ज्या वेगाने कोरोनाची संख्या आहे ती काही महिने राहणारच आहे. डेल्टा प्लस या विषाणूने डोकं काढू नये यासाठी विशेष सतर्क राहावे लागणार आहे.

तिसरी लाट न येऊ देण्याची जबाबदारी नागरिकांवर अवलंबून आहे. प्रशासन आणि आरोग्य व्यवस्था संभाव्य तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने सगळ्या उपाय योजनांसह सज्ज आहे त्यांच्या या प्रयत्नांना नागरिकांच्या साथीचे बळ अपेक्षित आहे.”

लशींचे दोन डोस घेतले म्हणजे कोरोनापासून मुक्ती हा खूप जणांच्या मनात गैर समज आहे. 

अनेक ‘ लसवंतांना ‘ कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामध्ये विशेष फरक एवढाच होता की मोठ्या प्रमाणात रुग्ण घरच्या घरी उपचार होऊन बरे झाले तर फार कमी रुग्णांना हॉस्पिलमध्ये उपचाराकरिता रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. लसीकरण झाल्यानंतरही सर्व सुरक्षिततेचे उपाय पाळणे गरजेचेच आहे.  त्यामुळे लसीकरण करण्यावर भर देणे तर गरजेचेच आहे, त्याबरोबर नागरिकांना ती लस उपलब्ध करण्यासाठी शासनाने विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.

शहरी भागाबरोबर मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात आजही लसीकरणाची मोठया प्रमाणावर गरज आहे. लसीकरणाच्या बाबतीत राज्याची परिस्थिती चांगली असली तरी ती आणखी चांगली होण्यासाठी अजूनही मोठा वाव आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्र, डॉ अविनाश भोंडवे  यांच्या मते,

“कोरोनाच्या साथीचा विचार होताना त्याकडे सर्व प्रथम वैद्यकीय दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. अजूनही कोरोनाची दुसरी लाट संपलेली नाही, तिसरी लाट म्हणजे काय आपण हे समजून घेतलं पाहिजे. एखादा विषाणू जेव्हा आपलं रूप बदलतो नवीन (जनुकीय बदल त्यामध्ये होतात ) रूप धारण करतो. त्याची वैद्यकीय शास्त्रात नवीन नावाने नोंद होते जशी सध्या डेल्टा प्लस नावाने ओळख त्याची करून देण्यात आली आहे. हा विषाणूं सध्या काही प्रमाणात राज्याच्या काही भागातील रुग्णांमध्ये आढळून आला आहे.

खरं तर ज्या भागात हा रुग्ण आढळून आला आहे त्या भागातील त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या किती रुग्णांचे नमुने  शासनाच्या वैद्यकीय विभागाने  घेतले, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग किती झाले हे पहावे लागणार आहे. ज्या प्रद्धतीने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व्हायला पाहिजे ते होताना दिसत नाही. जर डेल्टा प्लस ची साथ पसरली तर मोठ्या प्रमाणात तिसरी लाट येऊ शकते आणि ती मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर डेल्टा प्लस विषाणूची साथ आली नाही तर सध्याच्या या दुसऱ्या लाटेत जे काही निर्बध नागरिक पाळत नाही त्यामुळे  कोरोना बाधितांची संख्या वाढून उसळी येऊन ती काही महिन्यात तिला अटकाव करणे शक्य आहे. त्यामुळे सध्या डेल्टा प्लसला रोखण्याकरिता आरोग्य विभाग किती प्रयत्न करतोय यावर तिसऱ्या लाटेची दाहकता ठरणार आहे. विशेष म्हणजे या यामध्ये नागरिकांनी शासनाला सहकार्य करणे अपेक्षित आहे.”

तिसरी लाट येईल का ? आलीच तर तिचे स्वरूप सौम्य असेल की विदारक यावर सर्वच तज्ञ आप आपली मते व्यक्त करत आहेत. कारण एखाद्या साथीच्या आजाराचे अनुमान व्यक्त करून त्या पद्धतीने उपाययोजना करणे हे त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचे काम असते. ते त्यांचे काम चोख पार पाडत असतील तर नागरिक म्हणून आपल्याला आपली जबाबदारीचे भान ठेवणे तितकेच गरजेचे आहे.

शासनाने आखून दिलेल्या नियमांना फक्त राजकीय हेतूने विरोध करताना शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून योग्य निर्णय घेणे गरजेचा आहे, शेवटी हा नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन योग्य वेळेत  न मिळाल्यामुळे अनेकांना प्राण गमविल्याच्या घटना सर्वश्रुत आहे. त्या सारखी परिस्थिती उद्भवू नये असे वाटत असेल तर सर्वानी मिळून एकदिलाने काम करण्याची गरज आहे.

  • संतोष आंधळे
1 Comment
  1. Amarkumar Ambade says

    सर तुमचे विचार पटलेत आम्हाला,
    Thank you sir🙏🏼✨🎵🎶🎼🤗

Leave A Reply

Your email address will not be published.