या ‘७’ गोष्टी वाचल्यानंतर मुंबई पोलिसांचा अभिमानच वाटला पाहिजे….

काल नाशिकच्या पोलिस अकादमीमध्ये दीक्षांत समारोहा दरम्यान बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन सेवेत येणाऱ्या पोलिस उपनिरिक्षकांना मार्गदर्शन केलं. त्यावेळी त्यांनी ‘पोलिसांच्या प्रत्येक कृतीवर प्रश्न विचारला जातो, त्यामुळे त्यांनी प्रसंगावधान राखत काम करायला हवं असल्याचं सांगितलं.

आता मुख्यमंत्र्यांच्या या बोलण्याचा रोख मागील काही दिवसात मुंबई पोलिसांबाबत घडलेल्या वेगवेगळ्या घडामोडींकडे होता हे सांगायला कोणत्याही तज्ञाची गरज लागणार नाही.

मागच्या काही दिवसात मुंबई पोलिसांना माध्यम, राजकारणी आणि सामान्य नागरिक या सगळ्यांकडूनच त्यांना प्रश्न विचारण्यात आले. इतकंच काय तर सुशांतसिंग राजपूत आत्महत्या, सचिन वाझे अशा प्रकारणांवरून मुंबई पोलिसांच्या सेवेवर संशय घेत त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात देखील उभं करण्यात आलं.

मात्र भूतकाळात डोकावून पाहिल्यास मुंबई पोलिसांनी अभिमान वाटावे असे देखील काही पराक्रम गाजवले आहेत, अतुलनीय शौर्य गाजवलं आहे. अशा ७ गोष्टी खास बोल भिडूच्या वाचकांसाठी, ज्या वाचल्यावर मुंबई पोलिसांचा अभिमानच वाटला पाहिजे….

रमण राघव आणि ४२ जणांचं हत्याकांड 

१९६५ ते १९६८ या दरम्यान मुंबईमध्ये मोठं हत्याकांड सुरु होतं. यात बेघर लोकांच्या हत्या होत होत्या, त्यामुळे मुंबईत प्रचंड दहशतीचं वातावरण होतं. रात्री घराबाहेर पडायचंच झालं तर स्वसंरक्षणासाठी स्वतःजवळ काठी किंवा काही तरी हत्यारं बाळगायला लागतं होतं. त्यावेळी मुंबईचे पोलीस आयुक्त असलेले इमॅन्युएल मोडक हे या हत्यासत्राचा लवकरात लवकर छडा लावण्याच्या प्रयत्नात होते.

यासाठी त्यांनी पोलीस निरीक्षक विनायकराव वाकटकर यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमलं. प्राथमिक तपासानंतर रेकॉर्डवरील एक गुन्हेगार जो मूळचा तामिळनाडूचा रहिवासी आहे अशा रमन राघववर या पथकानं लक्ष केंद्रीत केलं. त्यावेळी अॅलेक्स फियालोह हे वाकटकर यांच्या टीममध्ये होते.

ते कायम आपल्या खिशामध्ये रमन राघवचा फोटो ठेवत होते. त्यांच्या चाणाक्ष नजरेनं २४ ऑगस्ट १९६८ रोजी त्यांना ही फोटोतली व्यक्ती डोंगरी भागात फिरताना दिसली. त्यावेळी शिताफीनं त्यांनी रमण राघवला अटक केली. चौकशीमध्ये राघवने आपला गुन्हा कबूल केला आणि आपणचं ४२ हत्या केल्याचं कबूल केलं. तो कोर्टात दोषी ठरला मात्र मानसिक रोगी असल्याचं सिद्ध झाल्यानं त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली

१९७१ सालचं हत्याकांड 

२ फेब्रुवारी १९७१ चा. मुंबईच्या अगदी महत्वाच्या भागात असणारा भाग म्हणजे धोबीतलाव परिसर. आणि इथल्या मेट्रो सिनेमाच्या शेजारची जहाँगिर मॅन्शन इमारत. जवळपास सगळेच पारशी कुटुंबीय असलेल्या या इमारतीमधील एका मास्टर आडनावाच्या घरात चौघांचे मृतदेह सापडले. 

१९७१ च्या कालखंडात हे हत्याकांड राज्यात खळबळ माजवणार ठरलं होतं.

घटनेचं गांभीर्य म्हणजे यात धारधार गुप्तीनं चारी जणांचा तब्बल १४३ वेळा भोसकून निर्घृण खून करण्यात आला होता. विशेष गोष्ट म्हणजे भर मुंबईमध्ये पोलीस आयुक्तालयाजवळ या हत्या झाल्यामुळे साहजिकच त्याला आलं होतं. सर्व वर्तमानपत्रांमध्ये त्याच्या बातम्या येऊ लागल्या.

यातील चौघांपैकी तिघे ज्येष्ठ नागरिक होते. दाराबशा सेठना (८२), गैमाई मास्टर (७२), नासरवानजी मास्टर (६५), आणि त्यांचा नोकर बावला (५५) अशी या चौघांची नावं होती.

यातील आरोपी फिरोज दारुवाला हा स्वतः पोलिसांच्या मदतीसाठी पुढे आला, तसचं या प्रकारणापासून लपण्यासाठी त्यानं महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्याच चिन्ह होतं तराजू. मंत्रालय किंवा मोठ्या नेत्यांच्या बैठकांमध्ये जाऊन तो यापासून लपण्याच्या प्रयत्न करतं होता. 

मात्र चाणाक्ष मुंबई पोलिसांनी अखेरीस एका पानपट्टी वाल्याच्या मदतीनं या बहुचर्चित आणि निर्घृण अशा हत्याकांडाचा तपास लावलाच.

गॅंगवॉर 

१९८० च्या दशकात मुंबईतील वाढत्या गॅंगवॉरला आळा घालण्यासाठी पोलिसांनी एन्काउंटरच हत्यार उपसलं होतं. यात पहिला एन्काउंटर झाला त्या काळचा कुख्यात गुंड मन्या सुर्वेचा. १९८२ साली इशाक बागवान यांनी मन्या सुर्वेला ठार केलं. त्यानंतर मुंबईत गॅंगवॉर संपवण्यासाठी पोलिसांनी रमा नाईक, मेहमूद कालिया अशा अनेक गॅंगस्टर्सना एकापाठोपाठ ठार केलं होतं.

१९९२ मध्ये भांडुपच्या खिंडीपाडा परिसरात तब्बल १८ तास एन्काउंटर चालला होता. मुंबई पोलिसांच्या इतिहासातील हा सगळ्यात मोठा एन्काउंटर ठरला होता. यात ७ दहशतवादी आणि ३ सामान्य नागरिक मारले गेले. एक पोलिस शिपाई देखील शाहिद झाले.

१९९३ च्या स्फोटानंतर मुंबईत एन्काउंटर हे नेहमीचे झाले. १९९५ साली पोलीस अधिकारी आर. डी. त्यागी यांनी गुन्हे शाखा आणि विभागीय उपायुक्तांना आदेश देऊन प्रत्येक विभागातील १० वॉन्टेड गुन्हेगारांची यादी तयार करायला सांगितली.

तर दुसरीकडे, तत्कालीन DCP सत्यपाल सिंग आणि DCP परमबीर सिंग यांनी एन्काउंटर स्क्वॉड तयार केले, ज्याच नेतृत्व १९८३ च्या बॅचच्या प्रफुल्ल भोसले, विजय साळसकर, प्रदीप शर्मा अशांकडे देण्यात आलं. या तिन्ही अधिकाऱ्यांना ताकद देण्यात आली आणि मुंबईतल्या माफियांविरोधात लढा सुरू केला. 

मुंबईमधील गॅंगवॉर संपवण्याच सर्वस्वी यश या टीमचं होतं, मात्र यातील अनेक एन्काउंटर पुढे फेक असल्याचं सांगितलं गेलं, काही न्यायालयात सिद्ध पण झाले.

१९८६ चार्ल्स शोभराजची अटक 

महिलांवर बलात्कार करून नंतर त्यांचे खून केल्याचा आरोपावरून चार्ल्स शोभराज या फ्रेंच नागरिकाला भारतात शिक्षा होऊन तिहार तुरूंगात ठेवण्यात आलं होतं. अशाच प्रकारचे अनेक गुन्हे त्यानं इतर देशांतही केल्यानं त्या देशांतही त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं.

पण तिहार येथील त्याची शिक्षा पूर्ण होण्यास काही दिवस शिल्लक असताना त्यानं तिथून पळ काढला. त्याकाळात म्हणजे १९८०च्या दशकातही तिहार एक अभेद्य तुरुंग समजला जायचा. इतर देशांनाही हवा असणारा हा कुख्यात गुन्हेगार तिहार तुरुंगातून पळाल्यानं त्यावेळी मोठी खळबळ उडाली. 

देशातील अनेक राज्यांतील पोलिसांनी चार्ल्सला पकडण्यासाठी जोरदार मोहीम राबविली होती. मात्र त्यांना यश येत नव्हतं.

पण एक दिवस अचानक गोव्यातील ‘ओ कोकेरो’ या एका बंगले वजा पण नामांकित हॉटेलात मधुकर झेंडे या पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील मुंबई पोलिसांच्या तुकडीनं चार्ल्सच्या अक्षरश: मुसक्या आवळल्या. 

अनेक दिवस शोधमोहीम राबवून मुंबई पोलिसांनी चार्ल्सचा माग काढला होता. साध्या वेशात आपल्या सहकाऱ्यांसह त्या हॉटेलात बसलेल्या पोलीस इन्स्पेक्टर झेंडे यांनी अत्यंत शिताफीनं चार्ल्सला पकडलं होतं. त्यावेळी दोरखंडाने आवळून त्याला मुंबईत आणण्यात आलं होतं.

१९९३ बॉम्ब स्फोट खटला तपास 

१२ मार्चच्या दुपारी  १.३० ते ३.३० च्या दरम्यान मुंबईत विविध ठिकाणी १३ शक्तिशाली बॉम्बस्फोट करण्यात आले. ही स्फोट मालिका होती. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, एअर इंडियाची इमारत, प्लाझा थिएटर, शिवसेना भवन अशा महत्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. जवळपास २५७ नागरिक ठार झाले. १४०० च्या वर जखमी झाले. कित्येकांची ओळख ही पटू शकली नाही.

यात आरडीएक्स सारख्या घातपाती वस्तूंचा वापर करण्यात आला होता. तेव्हाचे संरक्षण खात्याचे सल्लागार ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलताना  ही स्फोटके एक तर देहूरोड येथील कारखान्यात अथवा कराची येथे तयार होतात असे सांगितले.

यानंतर पोलीस व गुप्तचर यंत्रणा या महाभयंकर घटनेचे सूत्रधार व गुन्हेगार शोधण्यासाठी अत्यंत वेगाने कार्यरत झाले. 

मुंबई पोलीसच्या टीमने वरळी भागातल्या एका व्हॅन मध्ये एक न फुटलेला बॉम्ब व शस्त्रास्त्रे शोधून काढले. आपल्या हुशारीसाठी आणि कार्यक्षमतेसाठी मुंबई पोलीस जगभरात फेमस होती. राकेश मारिया यांच्या धडाडीच्या नेतृत्वाखाली शेकडो अटक सुरु झाले. त्या मारुती व्हॅनवरून टायगर मेमन याच्या घरापर्यंत मुंबई पोलीस पोहचली.

अंडरवर्ल्डचा यामागे हात आहे हे एव्हाना सिद्ध झाले होते. टायगर मेमन पासून ते दाऊद इब्राहिमपर्यंत अनेकांची नावे समोर आली. पण दुर्दैवानं हे केव्हाच सीमापार जाऊन पोहचले होते.

२००६ चा बॉम्बस्फोट खटला

११ जुलै २००६. संध्याकाळी ६ वाजून २४ मिनिटांनी मुंबईतील उपनगरीय ट्रेनमध्ये पहिला बॉम्बस्फोट झाला. त्यानंतर पुढच्या ११ मिनिटांमध्ये सात शक्तिशाली बॉम्बस्फोट झाले आणि त्यामध्ये तब्बल २०९ जणांनी आपले प्राण गमावले. तर ८२४ जण जखमी झाले होते.

एकामागून एक झालेल्या या बॉम्बस्फोटांनी मुंबईकरांच्या पायाखालची जमीन सरकली होती.

मात्र बॉम्बस्फोटांनंतर अवघ्या १० दिवसांच्या आतच मुंबई पोलिस आणि दहशतवाद विरोधी पथक दहशतवाद्यांपर्यंत पोहोचले होते. या घटनेच्या तपासासाठी सात टीम तयार करण्यात आल्या होत्या. तसेच यामध्ये रॉ बरोबरच आयबीचीही मदत मागितली होती. २० जुलै ते ३ ऑक्टोबर २००६ या दरम्यान एटीएसने अनेक दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या.

पाकिस्तानच्या आयएसआयने लष्कर-ए-तोयबाच्या मदतीने हे बॉम्बस्फोट घडवल्याचे समोर आले होते. तसचं अटक करण्यात आलेल्या आरोपींचा संबंध सिमीशी असल्याची माहितीही मिळाली होती. २००८ मध्ये या प्रकरणात सादिक शेख, आरिफ शेख आणि मोहम्मद शेख यांना अटक करण्यात आली होती.

त्यानंतर पोलिसांच्या तपासात इंडियन मुजाहिद्दीनचा प्रमुख रियाज भटकळने हे बॉम्बस्फोट घडवले असल्याची कबुली तिघांनी दिली होती. पुढे भटकळलाही अटक करण्यात आली होती. विशेष न्यायालयात जून २००७ ते ऑगस्ट २०१४ अशी सुनावणी चालली, आणि एकूण १३ पैकी १२ जणांना दोषी ठरवण्यात आलं.

२६/११ च्या हल्ल्यातील शौर्य

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत १० दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यावेळी यात मुंबई पोलिसांनी इतर सुरक्षा यंत्रणा येई पर्यंत अपुऱ्या साधनांवर प्राणपणानं किल्ला लढवला होता. इतकच नाही तर त्यात पोलिस दलातील अशोक कामटे, विजय साळसकर, हेमंत करकरे असे धडाडीचे अधिकारी शहिद झाले.

पोलिसांनी नुसता किल्ला लढवला नाही तर अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडून दाखवलं होतं. यासाठी तुकाराम ओंबळे यांनी आपल्या पोटात गोळ्या खाल्ल्या होत्या. अवघ्या एका काठीच्या आधारे त्यांनी कसाबला पकडलं होतं. 

पुढे कसाबवर गुन्हा सिद्ध झाला, त्याला फाशी झाली.

पण मुंबई पोलिसांनी या सर्व गुन्ह्यांसाठी वापलेला चाणाक्ष पणा, शौर्य हे सगळचं अतुलनीय होतं, त्यामुळेच मुंबई पोलिसांचा अभिमानच जास्त वाटतो.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.