रोल्सरॉईस मधून फिरणारा हा कलाकार आयुष्याच्या शेवटी हाजी अली दर्ग्यासमोर भीक मागायचा…

ऋषिकेश मुखर्जी यांचा ‘गुड्डी’ हा चित्रपट तुम्ही पाहिला असेलच. ती सिनेमा प्रेमाची भयंकर वेडी असते. तिच्या डोक्यातून हे सिनेमाचं भूक उतरवण्यासाठी उत्पल दत्त आणि धर्मेंद्र प्रयत्न करत असतात. सिने कलाकारांच्या झगमगाटी चकाचौंध वातावरणाच्या मागे एक विदारक काळ सत्य लपलेलं आहे हे जयाला दाखवायचं असतं म्हणून ते तिला एका सेट वर नेतात. 

यात एक शॉट आहे ओम प्रकाश ला एक व्यक्ती मसाज करताना दाखवली आहे. त्यावेळी धर्मेंद्र म्हणतो,” ती व्यक्ती कोण आहे तुला माहित आहे का? ती व्यक्ती म्हणजे एकेकाळचा गाजलेला अभिनेता मास्टर निसार! आज दुर्दैवाने बिचाऱ्यावर ही वेळ आली आहे.” सिनेमातील वातावरण जरी ‘फिल्मी’ असलं तरी हा किस्सा मात्र शंभर टक्के खरा होता. 

मास्टर निसार हा बोलपटाच्या सुरुवातीच्या दशकातला एक आघाडीचा अभिनेता होता. 

त्याचे अनेक चित्रपट त्या काळात सुपरहिट ठरले होते. त्याच्याकडे रोल्स राईस ही गाडी होती. श्रीमंतीच्या पैशात तो अक्षरशः लोळत होता पण हा पैसा काही टिकला नाही. के एल सहकल, अशोक कुमार, दिलीप कुमार यांच्या आगमनानंतर साहजिकच निसार याची लोकप्रियता ओसरू लागली. 

आणि पन्नासच्या दशकात तर तो अक्षरशः बेकार झाला. त्याला काम मिळेनासे झाले. खायचे वांधे झाले. गाड्या ,बंगले, ऐषोराम सगळे एका झटक्यात निघून गेले. एकेकाळी पैशाच्या राशीत मिळणारा मास्टर निसार आता एकेका पैशासाठी तरसू लागला. त्या काळातला हा किस्सा आहे.

राजकपूर यांच्या श्री 420 या चित्रपटाचे चित्रीकरण आर के स्टुडिओ मध्ये चालू होते. ‘मुडमुड के ना देख मुड मुडके’ या गाण्याचे शूट चालू होते. त्यावेळी स्टुडिओच्या दारात एक मध्यम वयीन व्यक्ती आत जाण्याचा प्रयत्न करत होता. सिक्युरिटी त्याला आत जाऊ देत नव्हता, त्याच वेळी त्यावेळी आर के कॅम्पस मध्ये असलेले लेख टंडन तिथे आले त्यांनी त्या व्यक्तीला ओळखले. सिक्युरिटीला सांगून ते त्या व्यक्तीला घेऊन राजकपूर कडे घेऊन गेले.

राज कपूर देखील त्या व्यक्तीला पाहून एकदम भारावून गेला आणि त्याने चटकन खाली वाकून त्या व्यक्तीला नमस्कार केला. ती व्यक्ती होती मास्टर निसार! राजकपूर ने त्यांना खुर्चीत बसवले आणि विचारले,” कसे काय येणे केले?” त्यावेळी त्यांना रडू कोसळले. 

राज कपूर ने त्यांना जवळ घेतले. त्यांची विचारपूस केली. त्यावेळी मास्टर निसार यांनी  त्यांच्या खालावलेल्या परिस्थितीची माहिती दिली. “घरात अन्नाचा कण नाही खिशात एक पैसा नाही अशा विपन्नावस्थेत भटकत आहे” असं त्याने सांगितल्यावर राज कपूरला देखील खूप वाईट वाटले. 

मास्टर निसार राज कपूर यांना म्हणाले,” मला तुमच्या सिनेमात अगदी एक्सट्राची भूमिका द्या. डेली वेजेस वर पेमेंट द्या. पण काहीतरी काम द्या.” त्यावर राजकपूर त्यांना म्हणाला,” मी तुम्हाला एक्स्ट्रा मध्ये काम देऊ शकत नाही कारण तुमची गुणवत्ता खूप श्रेष्ठ आहे.” त्यावर मास्टर निसार म्हणाले,” कौतुक खूप होते आहे. पण खाण्यासाठी पैसे लागतात.” 

राजकपूर ने निसार याना आश्वस्त  केले ,

तुम्ही काळजी करू नका मी नक्की तुम्हाला काम देईन.

त्या दिवशी काम संपल्यानंतर राज कपूरच्या डोक्यात कायम निसार यांचाच विचार होता. रात्री त्यांना झोप लागत नव्हती. त्यांना वाटले आज निसार वर ही वेळ आली आहे उद्या कदाचित माझ्यावर देखील ही वेळ येऊ शकते. आपण निसार ला नक्की मदत करायला पाहिजे. दुसऱ्या दिवशी त्यांनी सकाळी श्री 420 या चित्रपटाचे शेड्युल थांबवले. आर के चा ‘बूट पॉलिश’ हा सिनेमा देखील निर्मिती अवस्थेत होता. 

राजने त्यांच्या एका माणसाला मास्टर निसारकडे  पाठवले आणि त्याची माहिती घ्यायला सांगितले.

 त्याने कोणाचे कर्ज वगैरे घेतले आहे का? आणि मग निसार ला  स्टुडिओत बोलावले. राज कपूरच्या माणसाने सगळी माहिती काढली . मास्टर निसार बेकार  असल्यामुळे तो खूप कर्जबाजारी झाला होता. खायचे वांधे होते. राज कपूर ने मास्टर निसार ला  बोलावले आणि मेकअप रूम मध्ये पाठवले. मेकअप झाल्यानंतर लगेच त्याच्यावर ‘बूट पॉलिश’ चित्रपटातील एक गाणे चित्रित केले. ’तुम्हारे है तुमसे दया मांगते है…’ मास्टर निसार हा अभिजात कलावंत होता. एका टेक मध्ये गाणे पूर्ण झाले. 

राजकपूर देखील खूष झाला. जाताना त्याने मास्टर निसार त्यांच्या हातात एक लिफाफा दिला. निसार ने  तो लिफाफा उघडून पाहिला. तर जात २५ हजार रुपये होते. मास्टर निसार च्या  डोळ्यातून अश्रू वाहू लागले.  तो राजकपूर यांना म्हणाला ,”एवढे पैसे?” त्यावर राज कपूर म्हणाले ,”मास्टरजी तुमची गुणवत्ता यापेक्षा अधिक आहे.

पण सध्या तरी मी एवढे पैसे देऊ शकतो!” त्या काळात मोतीलाल सारख्या आघाडीच्या अभिनेत्याला एका सिनेमासाठी पन्नास हजार रुपये मिळत होते असे असताना केवळ एका गाण्यासाठी निसार  यांना चक्क पंचवीस हजार रुपये दिले होत.

 यामुळे निसार  हे पुन्हा आत्मविश्वासाने चित्रपटात चरित्र अभिनेत्याची भूमिका करू शकले. पुढे साधना, बरसात की रात या चित्रपटात त्यांनी काम केले. ‘साधना’ चित्रपटातील ‘आज क्यू हमसे पर्दा है’ ही कव्वाली त्यांच्यावरच चित्रित झाली होती. पुढे मात्र पुन्हा त्यांना दारिद्र्याने घेरले. चित्रपट मिळणे कमी झाले. हाती आलेला पैसा संपून गेला. 

असं म्हणतात मास्टर निसार शेवटच्या काळामध्ये हाजीअली दर्ग्यासमोर भिकाऱ्यांच्या रांगेत चक्क भिक मागून पोट भरत होता. एकेकाळी रोल्स राईस मध्ये फिरणारा मास्टर निसार विपन्नावस्थेत १३ जुलै १९८०  रोजी निघून गेले.

– भिडू धनंजय कुलकर्णी 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.