नितीन गडकरींच्या एका वाक्यानं भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री टेन्शनमध्ये आलेत…

भाजप आणि धक्कातंत्र हे समीकरण मोदी-शहांच्या जोडीने सूत्र हातात घेतल्यापासून सगळ्या देशात फेमस झालयं. हे असंच धक्कातंत्र मागच्या काही काळात आपल्याला बघायला मिळालं ते ४ राज्यातील मुख्यमंत्री अचानक हटवल्यानंतर. आधी उत्तराखंड, मग कर्नाटक आणि नुकतंच गुजरात या राज्यांमधील मुख्यमंत्री भाजपने मागच्या ४ महिन्यांच्या काळात हटवले आहेत.

मात्र सोमवारी नितीन गडकरी यांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर आता उर्वरित भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री देखील खुर्चीमुळे टेन्शनमध्ये आले आहेत असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही.

नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी?

राजस्थानमधील जयपूरमध्ये आयोजित संसद प्रणाली आणि जन अपेक्षा या कार्यशाळेत गडकरी सोमवारी बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले,

आजकाल प्रत्येकाला समस्या आहेत, प्रत्येक जण दु:खी आहे. आमदार दु:खी आहेत कारण त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. मंत्री दु:खी आहेत कारण त्यांना चांगलं खातं नाही मिळालं, ज्यांना चांगलं खातं मिळालं ते दु:खी आहेत कारण त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही. तर मुख्यमंत्री यासाठी दु:खी आहेत कारण आपण पदावर कधीपर्यंत राहू आणि कधी जाऊ याचा त्यांना भरवसा नाही.

आपल्या रोकठोक वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेले गडकरी यांच्या याच आणखी एका अंतर्गत राजकारणाची माहिती सांगतानाच्या रोकठोक विधानानंतर उर्वरित भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री खुर्चीच्या विचाराने टेन्शनमध्ये आल्याचं बोललं जात आहे.

भाजपच्या या मुख्यमंत्र्यांचा पुढचा नंबर लागू शकतो.  

जयराम ठाकुर, हिमाचल प्रदेश : 

माध्यमांमधील बातम्यांनुसार मुख्यमंत्री बदलण्याची हि मालिका थांबणारी नाही. थोडा वेळ लागू शकतो मात्र उर्वरित राज्यांमधील देखील मुख्यमंत्री बदलले जाऊ शकतात. यात सगळ्यात पहिला नंबर लागू शकतो तो, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचा.

कारण मंगळवारी ठाकूर यांना दिल्लीहून बोलावणं आलं आहे.

या दिल्ली दौऱ्याची विशेष चर्चा होण्याचं कारण म्हणजे याआधी ५ दिवसांपूर्वीच ठाकूर दिल्लीमध्ये येऊन गेले होते. गत बुधवारीच त्यांनी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट देखील घेतली होती. त्यानंतर काल त्यांना अचानक पुन्हा दिल्लीला बोलावण्यात आलेलं आहे. सोबतच भाजपमधील मुख्यमंत्रीपदाच्या बदलांची मालिका बघता काँग्रेसने देखील यावर टीका केली आहे कि मुख्यमंत्र्यांनी आपली खुर्ची आता वाचवावी. 

हि भेट अजून एका कारणामुळे महत्वाची मानली जात आहे कारण राज्यात सध्या पोटनिवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि पुढच्या वर्षभरात इथं निवडणुका देखील होणार आहेत. त्यामुळे भाजप आपलं राज्यातील नेतृत्व मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे.

यानंतर नंबर लागू शकतो तो मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा. 

मध्यप्रदेशमध्ये २०१८ च्या विधानसभा निवडणुकांवेळी शिवराजसिंह चौहान यांचा चेहरा पुढे केला होता, पण त्यावेळी भाजपचा पराभव झाला होता. कारण देखील स्पष्ट होती, ती म्हणजे सामान्य लोकांमध्ये असलेली नाराजी, व्यापम घोटाळ्याचे डाग अशी अनेक कारण होती. मात्र त्यानंतर ऑपरेशन लोटसमुळे शिवराजसिंह पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर आले.

त्यामुळे आता अशी देखील चर्चा चालू आहे की, अनेक वर्ष राज्यात मुख्यमंत्री राहिल्यानंतर आता शिवराजसिंह यांना केंद्रात मोठ्या पदावर प्रमोशन मिळू शकते. त्यामुळे देखील शिवराजसिंह यांना हटवलं जाऊ शकत.

योगी आदित्यनाथ :

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांच्या मुख्यमंत्री पदावर देखील चर्चा सुरु झाली आहे. जुलैमध्ये हि चर्चा बरीच वेगाने चालू होती. त्यावेळी राज्यात केंद्रीय नेते आणि संघाचे नेते सातत्यानं बैठक घेत होते, आढावा घेत होते. त्या दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तर दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत बैठक केली होती.

त्याच दरम्यान युपीचे कामगारमंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी पत्रकारांना सांगितले होते कि, निवडणूक जिंकल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल असे. तर त्याच वेळी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी बरेली सांगितले की होते कि, राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका कोणाच्या नेतृत्वात लढवायच्या, याचा निर्णय पक्षाच्या संसदीय मंडळाकडून घेतला जाईल. 

दोन्ही मौर्य यांच्या विधानाचा अर्थ स्पष्ट होता कि, भाजप योगींच्याच नेतृत्वात आगामी निवडणूक लढेल यावर अजून एकमत नाही, आणि जे काही निर्णय असतील ते दिल्लीतूनच होतील.

मनोहरलाल खट्टर, हरियाणा :

या यादीत पुढचे नाव येते ते म्हणजे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचं. त्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर तज्ज्ञांच्या मते, खट्टर मागच्या अनेक वर्षांपासून राज्यात भाजपचे नेतृत्व करत आहेत, पण ते अद्याप एक प्रशासनावर पकड असणारा नेता म्हणून ओळख कमावू शकलेले नाहीत.

यासाठी मागच्या आठवड्यातील एका अधिकाऱ्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओच आणि त्यानंतर झालेल्या लाठीचार्जचं उदाहरण आपण घेऊ शकतो. त्यानंतर सरकारवर देशभरातून बरीच टीका झाली होती. सोबतच राज्यात जाट समाजाची नाराजी दूर करण्यात देखील खट्टर यांना अपयश आलं नसल्याचं तज्ञ सांगतात. त्यामुळेच इथून खट्टर यांना हटवलं जाऊ शकते.

गोवा आणि त्रिपुरा : 

गोवा आणि त्रिपुरा या छोट्या राज्यांतील मुख्यमंत्र्यांना देखील अभय नाही.

कारण गोव्यात सध्या कोरोनातील कामगिरीमुळे जनता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात आहे. सोबतचं अलिकडेच विधानसभा अधिवेशनादरम्यान भुमि अधिकारीनी विधेयकावरुन देखील सावंत यांना जनतेच्या रोषाला सामोर जावं लागलं होतं. आगामी विधानसभा निवडणूका बघता ही नाराजी दूर करण्यासाठी चेहरा बदलला जावू शकतो असं बोललं जात आहे.

तर तिकडे त्रिपुरामध्ये मुख्यमंत्री बिप्लब कुमार देव यांच्यावरील संकट मंत्रिमंडळच्या विस्तारानंतर काही काळासाठी टळलयं असं म्हणू शकतो. पण संपुर्ण टळलेलं नाही. कारण देव यांना मुख्यमंत्री पदावरुन हटवण्यासाठी मागच्या एका वर्षापासून आमदारांच्या एका गटाकडून प्रयत्न चालू होते. यातुन जे. पी. नड्डा यांच्यापर्यंत तक्रार देखील पोहचवण्यात आली होती. सध्या मागच्या आठवड्यात या आमदारांना शांत करण्यासाठी मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे.

या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता आगामी काळात नक्की कोणाची खुर्ची जाणार आणि कोणाची राहणार याबाबतच चित्र स्पष्ट होऊ शकेल. मात्र यामुळे भाजपमध्ये नेतृत्व बदलाची सुरु झालेली साखळी नक्की कोणापर्यंत येऊन थांबेल या विचाराने मुख्यमंत्री टेन्शनमध्ये आले असल्याचं बोललं जात आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.