‘शिंदे-फडणवीस-राज’ महाविकास युतीचा हा फॉर्म्युला एकहाती सत्ता मिळवू शकतो..

आय लाईक यू बट ॲज ए फ्रेन्ड…

म्हणजे कस तर शिंदे-फडणवीस सरकारवर वेळ आली तर टिकाही करायची आणि बहुमत ठरावावेळी त्यांना पाठींबा देखील द्यायचा. वरचेवर भाजपच्या नेत्यांच्या भेटी देखील घ्यायच्या पण सभेतून एखादा फटकारा देखील मारायचा..

यामुळे सामान्य लोकांचा घोळ होतो, सोबत आहेत की नाहीत हेच कळत नाही. आपण बोलतोय राज ठाकरे व त्यांच्या मनसेबद्दल..

आजवर भाजप-मनसे संभाव्य युतीमध्ये सर्वात मोठ्ठा अडथळा होता तो शिवसेनेचा. शिवसेना सोबत असताना शिवसेनेला दुखावून मनसेसोबत दोस्ती करण्यास भाजप उत्सुक नव्हती. त्यातूनच 2014, 2019 सालच्या संभाव्य मनसे भाजप युतीच्या चर्चा फिस्कटल्या..

अगदी महाविकास आघाडीच्या काळात देखील जमतय जमतय अस वाटत असतानाही योग जुळून आला नाही. आत्ता योग जुळून येण्याचं कारण ठरलय ते शिंदेंच बंड. एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमानंतर मनसे आणि भाजप युतीच्या चर्चा सुरू झाल्या. राजकीय नेत्यांच्या भेटाभेटी, भाजपपूरक भूमिका, संभाव्य महानगरपालिका निवडणूका यामुळे यात भर पडत गेली.
आज तर शिवाजी पार्कवर आयोजित दीपोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने फडणवीस-शिंदे-राज ठाकरे एकत्र आल्याने या चर्चांनी वेग पकडला.

पण आत्ता तरी ही महाविकासयुती होईल का? झाली तर नेमका फायदा कोणाला होईल?

सर्वात पहिला मुद्दा पाहू तो म्हणजे जुळवून घेण्यासाठीचा कॉमन फॅक्टर..

नेत्यांच कितीही जुळत असलं तरी जमिनीवरच्या कार्यकर्त्यांच जुळावं लागतं. कॉंग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा तिन्ही पक्षांनी एकत्र येताना किमान समान कार्यक्रमाची आखणी केली तरी हिंदूत्वाच्या मुद्द्यावर मात्र प्रत्यक्ष मैदानावर लढाईच पहायला मिळत होती. शिवसेनेचे अनेक आमदार कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव करून निवडून आलेले तर कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे देखील अनेक आमदार शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करून निवडून आलेले. याचा परिणाम पक्ष फुटण्यात झाला..

शिंदे-फडणवीस-राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यात मात्र हा टोकाचा वैचारिक विरोध सध्या तरी दिसून येत नाही. हिंदूत्व या कॉमन फॅक्टरवर हे तिन्ही पक्ष एकत्र येवू शकतात. राज ठाकरेंनी देखील गेल्या दोन वर्षांपासून पक्षाची वैचारिक बैठक हिंदूत्ववादी करण्याकडे लक्ष केंद्रित केलं आहे. भाजप तर हिंदुत्वाचा पुरस्कर्ताच आहे आणि एकनाथ शिंदेंच्या गटाची भूमिका हिंदूत्व हीच राहिलेली आहे. या कॉमन फॅक्टवर मैदानावरील कार्यकर्त्यांसह नेते एकत्र येवू शकतात.

दूसरा मुद्दा आहे तो एकमेकांच्या सोयीच्या राजकारणाचा..

राजकारणात कोणीही कितीही दावे केले तरी प्रत्येक पक्षाला सत्तेत विराजमान होण्यासाठी बेरजेच्या राजकारणाची गरज लागते.

एकनाथ शिंदे यांच्या गटाबाबत बोलायचं झाल्यास आज एकनाथ शिंदेंना ठाकरे आडनाव व सोबत येणारी नैतिकता आवश्यक वाटते. आमचं बंड कसं नैतिक होतं हे सांगण्यासाठी एकनाथ शिंदेंनी स्मिता ठाकरे, जयदेव ठाकरे, निहार ठाकरे ते थापा अशा अनेकांचा पाठबळ मिळवलं आहे. राज ठाकरेंच्या घरी जावून त्यांची भेट घेवून एकनाथ शिंदेंनी पाठबळ मिळवण्याचे प्रयत्न केले देखील.

पण थेट राजकारणाच्या मैदानात राज ठाकरेंचा पाठींबा मिळाला तर मैदानात शिवसेनेच्या पर्यायाने उद्धव ठाकरेंच्या विरोधात तयार झालेली मनसेची फळीच शिंदेंच्या पाठींब्याला येईल. याचा फायदा त्यांना मुंबई शहरासह, मुंबई उपनगर, नाशिक, औरंगाबाद, पुणे यांसारख्या शहरात निश्चितच होईल.

देवेंद्र फडणवीस व भाजप यांच्याबाबत बोलायचं झाल्यास, भाजपला भाजपला एकीकडे कॉंग्रेस-राष्ट्रवादी-ठाकरे गट यांच्यासोबत देखील स्पर्धा करायची आहे आणि दूसरीकडे शिंदे गटाला देखील वरचढ होवून द्यायचं नाही. अशा वेळी ठाकरे घराण्यातीलच एक दोस्त थेट सोबत असला तर सत्तेचं संतुलन साध्य करणं भाजपला शक्य होणार आहे.

दूसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमार्फत मराठी विरुद्ध उत्तरभारतीय असा प्रचार मुंबई महानगरपालिकांच्या निवडणूकीत करण्यात येईल. अशा वेळी मराठी माणसांची पारंपारिक मतं उद्धव ठाकरेंकडे न जाता राज ठाकरेंच्या मनसेच्या रुपात आपल्याकडे खेचून घेण्यासाठी देखील मनसेसोबत जाण्याची आवश्यकता भाजपला असेल..

पण राज ठाकरेंना शिंदे-फडणवीस गटाची आवश्यकता आहे का? कारण राज ठाकरेंनी यापूर्वी अभद्र युत्यांना टाळावं अस वक्तव्य केलं आहे. झालेल्या राजकीय घडामोडींकडे एक संधी म्हणून पहावं असा आदेश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे. तरिही राज ठाकरेंना प्रत्यक्ष निवडणूकांच गणित साध्य करायचं असेल तर शिंदे-फडणवीसांची गरज आवश्यक ठरू शकते. उदाहरण घ्यायचच झालं तर मुंबई महानगरापालिकेच्या निवडणूकांच घेवू. 2012 साली मनसेचे मुंबई महानगरपालिकेत 28 नगरसेवक होते. ज्यांची संख्या 2017 च्या निवडणूकीत 7 इतकी झाली. हे नगरसेवक देखील विजयी झाल्यानंतर शिवसेनेकडे गेले.

आमदारांची संख्या देखील 1 वर स्थिरावलेली आहे. अशा वेळी सत्तेत किमान भागिदार होण्याची वेळ आत्ता मनसेवर आली आहे. सत्तेबाहेर राहून 16 वर्ष पक्ष चालवणं ही साधी गोष्ट नसते. साहजिक सत्ता प्राप्त करणं त्यासाठी सहयोग करणं ही राज ठाकरेंच्या मनसेची सध्याची गरज आहे..

तिसरा मुद्दा येतो तो व्होट शेअरिंगचा..

फक्त 1 आमदार यापलीकडे मनसेची खरच ताकद आहे का? विस्तारपूर्वक पाहीलं तर याचं उत्तर हो असच येतं.  2014 च्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणूकीत मनसेचा एकच आमदार निवडून आला होता तरीही मनसेचा एकूण व्होट शेअर हा 3.15 टक्के इतका होता.

मनसे व्होट शेअरिंगच्या बाबतीत भाजप, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यानंतर पाचव्या क्रमांकाचा पक्ष होता. शेकाप, बहुजन वंचित विकास आघाडी किंवा MIM सारख्या पक्षांनी मनसे पेक्षा जास्त आमदार निवडून आणण्यात यश मिळवलं असलं तरी संपूर्ण महाराष्ट्रातून ठराविक पॉकेट्स आपल्या हाती घेण्यात मनसेनं सातत्य ठेवलं आहे.

2014 प्रमाणे 2019 सालची आकडेवारी पाहिली तर दिसून येत की यावर्षीच्या निवडणूकांमध्ये मनसेचा व्होट शेअर 2.25 टक्के इतका राहिलेला आहे. 2019 च्या निवडणूकांमध्ये देखील मनसेचा एकच आमदार निवडून आला मात्र व्होट शेअरिंगच्या बाबतीत मनसेने भाजप, कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, वंचीत बहुजन आघाडी नंतर सहावा क्रमांक मिळवला होता. 2014 साली 219 आणि 2019 साली 101 जागांवर मनसेने उमेदवार उभा केले होते. ही संख्या प्रत्येक मतदारसंघात मनसेचं किमान अस्तित्व असल्याचंच दाखवते.

अर्थात हा व्होट शेअर आणि ही संख्या भाजपला सत्तेचा टेकू देवू शकते हे निर्विवाद सत्य आहे. फडणवीस-शिंदे यांच्या युतीत जर राज ठाकरे आले तर मनसे जे योगदान देईल ते बहुमतापार घेवून जाणारं असेल याची जाणीव तिन्ही घटकांना आहे.

या तिन फॅक्टरच्या जोरावर महानगरपालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर तिन्ही पक्षांची युती होवू शकते. पण जशा जमेच्या बाजू आहेत तशाच विरोधाच्या देखील ठरू शकतात. राज ठाकरेंकडे शिंदे-फडणवीसांनी फक्त भाषणांची अपेक्षा ठेवणं, जागावाटपात योग्य स्थान न देणं, मनसेला समान वागणूक न देता इतर समविचारी पक्षांप्रमाणे वागवणं अशा गोष्टी मनसेचा व पर्यायाने राज ठाकरेंचा इगो डिचवण्यासाठी पुरेश्या आहेतच शिवाय नैतिकतेच्या अभावाची झालेली राजकीय स्पेस मिळवून एकला चलो रे चा नारा देत राजकीय अवकाश व्यापता येतो का हा पर्याय देखील राज ठाकरेंच्या समोर आहेच..

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.