वायनाडला फेमस करणारा बेडूक !!

आईची आन सांगतो. आपल्या उभ्या आयुष्यात कधी वायनाड नावाच गाव ऐकलं नव्हत. ऐकलं असत तरी काय फरक पडणार होता? गावाच्या नावाच्या भेंड्या खेळताना ‘व’ अक्षर आलं असत तर फायदा झाला असता. बाकी काही नाही.

पण गेल्या काही दिवसापासून या नावाचे अच्छे दिन आले. उभा देश या जिल्ह्याला ओळखू लागला आहे. कारण तुम्हाला माहितच आहे राहुल गांधीनी केरळ मधल्या या आदिवासी बहुल मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

असो भरणार असेल भरू दे की तिकड. आपल्याला काय? आपण आज काय राजकीय चर्चा करायची नाही. चर्चा करायची आहे ती वायनाडची.

तर केरळ मधला या जिल्ह्याला काही वर्षापूर्वी अच्छे दिन आले होते. ते कोणा मुळे माहित आहे?? एका बेडका मुळे !!  हा बेडूक सुद्धा वायनाड प्रमाणे खूप वर्ष कोणाला माहित नव्हता.

साल होत २०१३. असाच एप्रिल,मे चा महिना होता. दिल्लीवरून काही तज्ञ संशोधक केरळ मध्ये आले होते, सोनाली गर्ग आणि सत्यांबा दास बिजू.  त्यांना वायनाडच्या रस्त्यावर काही बेडूक दोस्त आपल्या मित्रमंडळी बरोबर उड्या मारताना दिसले. निट लक्ष देऊन पाहिल्यावर त्यांना दिसलं की ही तर नवीनच बेडूक आहेत.

या बेडकाच्या जातीचा काही आतापता नव्हता. बेडूक जरा कन्फुय्ज वाटत होता. बिचाऱ्याच तोंड हिरमुसलेल होत. साधारण दोन वर्ष सोनाली आणि बिजू यांनी या बेडकावर लक्ष ठेवलं. त्याच्या बद्दलची माहिती लपवून ठेवायला बघितली.

पण वायनाड मध्ये चर्चा झालीच. हा कोण नवीन पाहुणा आपल्या इथे आलाय? काय त्याला आपल्या वायनाड मध्ये असं विशेष आवडलंय? लोकांना त्या बेडकाचे सगळे सिक्रेट जाणून घ्यायचे होते.

अखेर २०१५ मध्ये सोनाली आणि सत्यांबा बिजू यांनी डिक्लेअर केलं की या पाहुण्याच नाव आहे मिस्टीसेलस फ्रॅन्की !

हा मिस्टीसेलस फ्रॅन्की दिसायला एकदम देखणा असतो. त्याच्या गालावर खळी पडते का माहित नाही. एका फेमस माणसाच्या नावावरून त्याचं नाव फ्रॅन्की ठेवण्यात आलंय.

तो वर्षभर गायब असतो आणि फक्त चारचं दिवस प्रणयराधना करण्यासाठी वायनाडला येतो. इथल्या निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेतो आणि आपला हा चार दिवसाचा सिझन संपला की गायब होतो. त्याचं सगळा कारभार लपूनछपून असतो. म्हणून त्याला मिस्टीसेलस म्हणतात. याचा अर्थ गूढ, रहस्यमय.

सोनाली गर्ग यांनी सांगितलं की हा बेडूक पूर्णपणे नवीन नाही. त्याचे वायनाडशी नाते आहेच पण त्याच्यात परदेशी बेडकाचे देखील जीन्स आहेत. या बेडकाचे पाहुणे दूर बर्मा, व्हियतनाम, मलेशिया मध्ये आढळतात. या बेडकांना उड्या मारण्याची खूप आवड आहे. जर त्यांच्यावर कोणत संकट आलं तर आपल्या पाठीवर फेक डोळे बनवण्याची गूढ कला देखील यांना अवगत आहे.

२०१३ मध्ये सापडलेल्या या  मिस्टीसेलस फ्रॅन्की बेडकांपैकी २०१५ मध्ये जवळपास २००च्या वर बेडूक मॅच्युअर झाले होते. पण किती जरी झालं तरी हा बेडूक सध्या दुर्मिळ आहे . त्याच्या मागावर पट्टीचे शिकारी लागले असल्यामुळे त्याचे जगण्याचे चान्सेस देखील कमी आहेत. तरी देखील त्याच्या उड्या सुरूच आहेत.

बघू आता वायनाडची जनता त्याला कशी साथ देते ते? त्यांच मत आहे की या बेडकाच काय खर नाही. आज हाय तर उद्या नाही. एरव्ही कुठ राहतंय काय माहित नाही. आपल्या सिझन मध्ये हातोपा वर करून जोर जोरात डराव डराव करतंय. बाकीच्या वेळी जातय वाटत आपल्या आज्जीच्या गावाला.

त्यांनी वाचवल तर हा वायनाडला जगभरात फेमस करणारा मिस्टीसेलस फ्रॅन्की अजून काही वर्ष जगेल नाही तर त्याला म्युजियम मध्येच पाहावं लागेल हे नक्की!!

विशेष सूचना

ज्या कोणा पर्यावरण रक्षक समितीच्या लोकांना या बेडकाबद्दल अधिक माहिती हवी आहे त्यांनी खालील लिंक वर क्लिक करावे आणि या बेडकाच्या संरक्षणासाठी आपलाही हातभार लावावा.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.