केरळच्या या गावाने ‘सॅनिटरी पॅड फ्री व्हिलेज’चा किताब मिळवत नव्या क्रांतीला सुरुवात केलीये

अगदी सहज जरी विचारलं की पुरुषांना जास्त जबाबदाऱ्या असतात की महिलांना तर तराजूचा काटा अर्थातच महिलांच्या दिशेने भारी होतो. घर सांभाळण्याच्या जबाबदारी सोबतच बाहेरच्या जबाबदाऱ्यासुद्धा आजकालच्या महिला सांभाळतात. या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना एक गोष्ट जगभरातील स्त्रियांच्या आयुष्यात नियमितपणे घडत असते ते म्हणजे ‘मासिक पाळी’.

दर महिन्याला पार पाडाव्या लागणाऱ्या या शरीरधर्माच्या वेळी महिलांना भयानक त्रासाला समोरं जावं लागतं. पण या त्रासात दिलासा देण्यासाठी सध्या जगभरातील देश सरसावत आहेत. स्त्रियांना मासिक पाळीदरम्यान होणारा त्रास लक्षात घेऊन काही देशांनी मासिक पाळी दरम्यान कमी काम करण्याची सवलत महिलांना दिली आहे. काहींनी मेन्स्ट्रुअल लिव्ह दिली आहे तर स्कॉटलंड हा पहिला देश बनलाय ज्याने सॅनिटरी प्रोडक्ट्स फ्री केले आहेत.

मासिक पाळीबद्दल जागृती घडत असताना आपला देश कसा मागे राहणार. भारतातही आता स्त्रियांच्या पिरियड हेल्थवर भर दिला जातोय. गाव-खेडी, वस्त्या, आदिवासी भाग अशा सगळ्या ठिकाणी जाऊन सॅनिटरी प्रोडक्ट्स वापरण्याचं महत्त्व सांगितलं जातंय. पण एक गाव असं आहे, जे या सगळ्यांत खूप पुढे गेलं आहे. आणि भारतातील पाहिलं ‘सॅनिटरी पॅड फ्री व्हिलेज’ म्हणून नावारूपाला आलं आहे.

ही काही चुकीची नाही तर सकारात्मक घटना आहे. कसं? बघूया…

सॅनिटरी प्रोडक्ट्समध्ये पॅड हा सगळ्यात सुरुवातीचा प्रोडक्ट असतो. बहुतांश महिला पॅड वापरण्यापासून सुरुवात करतात. भारतात अजूनही अनेक राज्यांत महिलांनी किमान पॅड तरी वापरायला सुरुवात करावी यासाठी आटापिटा केला जातोय. अशात केरळमधील कुंभलंगी गावातील महिला आता सॅनिटरी पॅड वापरणं पूर्णपणे बंद करणार आहे. इतकंच नाही तर या गावात सॅनिटरी पॅड्स विकलेसुद्धा जाणार नाहीये. या गावातील महिला आता ‘मेन्स्ट्रुअल कप’ वापरायला सुरुवात करणार आहे. म्हणजेच डायरेक्ट टू स्टेप्स अहेड!

नुकतंच  १३ जानेवारी रोजी केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी कुंभलंगी हे देशातील पहिलं पॅड फ्री गाव म्हणून घोषित केले आहे. मग याची सुरुवात झाली कशी?

केरळच्या एर्णाकुलमचे खासदार हिबी ईडन यांनी पंतप्रधान संसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत ‘अवलकायी’ मोहीम सुरू केली होती. अवलकायी म्हणजे फॉर हर (For  her) म्हणजे स्त्रियांसाठी, मुलींसाठी. या मोहिमेअंतर्गत १८ वर्षांवरील महिलांना ५००० हून जास्त मेन्स्ट्रुअल कप वाटप करण्यात आले आहे. शिवाय गेल्या तीन महिन्यांत महिलांना मासिक पाळीचा कप वापरण्याचं प्रशिक्षणही  देण्यात आलं.

बाकी सगळे सॅनिटरी प्रोडक्ट्स सोडून मेन्स्ट्रुअल कप वापरण्यात येण्याचं कारण म्हणजे, मेन्स्ट्रुअल कप जास्त हायजेनिक असतात. शिवाय सॅनिटरी पॅडमुळे खूप जास्त प्रदूषण होतं. त्याला डिस्पोस करण्यासाठी मशीन लावल्या तरी त्याचा जास्त उपयोग होत नाही. पण मेन्स्ट्रुअल कप हा वर्षानुवर्षे वापरला जाऊ शकतो. कारण प्रत्येकवेळी वापरून झाल्यानंतर त्याला चांगलं धुवून ठेवता येतं. अशाने प्रदूषणावरही आळा बसतो शिवाय स्त्रियांचं वैयक्तिक आरोग्यही राखलं जातं.

हे मेन्स्ट्रुअल कप असतात काय? 

मेन्स्ट्रुअल कप म्हणजे सिलिकॉनपासून बनवलेले छोटे कप. हे कप वेगवेगळ्या आकारात येतात. शिवाय कुठेही न्यायला सोपे असतात. पॅड आणि कप यातील फरक म्हणजे पॅड हे बाहेरून वापरले जातात. म्हणजे निकरवर  (अंडरवेअर) लावले जातात. पण कप प्राइवेट पार्टमध्ये इन्सर्ट केले जातात. यांना वापरणं खूप सोपं असतं.  बोटाने कप थोडासा मध्यभागी दाबायचा आणि कप बोटाभोवती दुमडून घ्यायचा.  C किंवा U आकार तयार झाला म्हणजे आता ते संकुचित झाले आहे आणि ते व्हजायनामध्ये सहजपणे घातले जाईल.

मेन्स्ट्रुअल कपचं वैशिष्ट्य म्हणजे बाकी प्रोडक्ट्स नेहमी नव्याने विकत घ्यावे लागतात. पण यात एकदाच इन्व्हेस्टमेंट करावी लागते. कारण तुम्ही त्याचा परत वापर करू शकता. वर्षानुवर्षे तुम्ही एक कप वापरू शकता. आणि याने तुमच्या आरोग्यावरही काही वाईट परिणाम होत नाही. शिवाय याने प्लास्टिकमुळे होणारा कचराही वाचतो. कारण हे पूर्णपणे इको फ्रेंडली असतात.

मेन्स्ट्रुअल कपचं महत्त्व जाणून केरळच्या कुंभलंगी गावाने त्याला प्राधान्य दिलंय. याने भारताला  विकसित देश बनवण्याच्या मार्गावर अजून एक पाऊल टाकलं गेलं आहे. केरळ सरकारने हे करून दाखवत परत एकदा सिद्ध केलंय की, केरळ हे राज्य भारतातील इतर राज्यांपेक्षा नेहमीच एक पाऊल पुढे असतं. आता भारतातील पहिलं राज्य आणि पहिलं गाव जिथे सॅनिटरी पॅडचा वापर बंद झाला असं कुणी विचारलं, तर ‘केरळचं कुंभलंगी गाव’ हे उत्तर आता देता येणार आहे. 

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.