खंडेनवमी आणि दसऱ्यात नेमका काय फरक असतो ?

नवरात्रीच्या काळात सगळीकडे असलेली गरबा आणि दांडियाची धूम नवव्या दिवशी संपते आणि दसऱ्याचा दिवस उजाडतो. भारतात सगळीकडे दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजा करून नवरात्रीची सांगता केली जाते. 

भारतात बहुसंख्य भागात अशी परंपरा असली तरी महाराष्ट्र आणि राजस्थानातील परंपरा मात्र यापेक्षा वेगळी आहे. महाराष्ट्रात शस्त्र पूजा ही दसऱ्याऐवजी खंडे नवमीच्या दिवशी केली जाते आणि दसऱ्याच्या दिवशी त्याची सांगता होते. या परंपरेमुळे काही लोकांचा गोंधळ उडतो की शस्त्रपूजा खंडेनवमीला करायची की दसऱ्याला. 

म्हणून अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो की, खंडेनवमी आणि दसऱ्यात नेमका काय फरक आहे?

तर या दोन दिवसांमध्ये फरक असण्यामागे पौराणिक आख्यायिका आणि महाराष्ट्रातील सामाजिक पार्श्वभूमी या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत असं सांगितलं जातं. 

यासाठी यामागे ज्या पौराणिक आख्यायिका सांगितल्या जातात त्या आधी समजून घ्या…

दसरा साजरा करण्यामागे रामायणातील राम आणि रावणात झालेल्या युद्धाची आख्यायिका सांगितली जाते. त्रेतायुगात रामाने रावणासोबत होणाऱ्या युद्धात विजय मिळवण्यासाठी ९ दिवस देवीची आराधना केली. प्रसन्न झालेल्या देवीच्या आशीर्वादाने दहाव्या दिवशी रामाने रावणाचा वध केला होता. रामायणातील युद्ध दहाव्या दिवशी संपल्यामुळे तेव्हापासून दसरा साजरा करण्याची परंपरा सुरु झाली.

तर विजयादशमी साजरी करण्यामागे देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला होता अशी पौराणिक आख्यायिका सांगितली जाते. 

देवतांकडून मिळालेल्या शक्तींचा दुरुपयोग करून महिषासुराने तिन्ही लोकांत दहशत माजवली होती. या उन्मत्त असुराचा वध करण्यासाठी देवी दुर्गेने अवतार घेतला. देवी आणि महिषासुरमध्ये प्रचंड युद्ध सुरु झालं. हे युद्ध नऊ दिवस चाललं आणि अखेर दहाव्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला. देवीने महिषासुरावर विजय मिळवला म्हणून विजयादशमी साजरी केली जाते.

पण हे दोन्ही सण एकाच दिवशी येत असल्यामुळे लोकं याला एकच सण समजून साजरा करतात. याच दिवशी रामाने रावणावर आणि देवीने महिषासुरावर विजय मिळवला आणि युद्धानंतर स्वतःचे शस्त्र हातातून त्यागले होते. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजा करण्याची परंपरा आहे.

मात्र दसरा साजरा करण्यामागे जशा या दोन आख्यायिका सांगितल्या जातात त्याचप्रमाणे आणखी एक महाभारतातील आख्यायिका सांगण्यात येते.

महाभारतात चौसरावर राज्य हरल्यानंतर त्यांना १२ वर्ष वनवास आणि १ वर्ष अज्ञातवास भोगावं लागलं होतं. जेव्हा पांडव वनवासात जात होते तेव्हा त्यांनी स्वतःचे शस्त्र एका शमीच्या झाडावर लपवून ठेवले होते. पांडवांनी आपला वनवास संपवला आणि शस्त्र परत घेण्यासाठी ते शमीच्या झाडाजवळ गेले. स्वतःचे दिव्य शस्त्र परत घेण्यासाठी त्यांनी काही धार्मिक विधी केल्या.

या आख्यायिकेबाबत मतमतांतरे आढळून येतात. 

काही जण असं मानतात की, पांडवांनी शस्त्र परत हातात घेण्याआधी यासाठी काही धार्मिक विधी केल्या होत्या. या धार्मिक विधी नवमीच्या दिवशी सुरु करण्यात आल्या होत्या आणि दहाव्या दिवशी शस्त्र हातात घेतले होते. म्हणूनच खंडेनवमीच्या दिवशी शस्त्रांची पूजा केली जाते आणि दसऱ्याच्या दिवशी शिलंगनानंतर आणलेली आपट्याची पाने अर्पण करून शस्त्रपूजा संपन्न होते. 

तर काही जण असं मानतात की, पांडवांनी शस्त्रांची पूजा आणि शस्त्र हातात घेण्याची विधी दसऱ्याच्या दिवशीच पूर्ण केली होती. त्यामुळे इतर ठिकाणी शस्त्रपूजा ही दसऱ्याच्या दिवशीच  केली जाते.

आता या झाल्या पौराणिक कथा. यासोबतच काही ऐतिहासिक आणि सामाजिक संदर्भ सुद्धा या सणांमागे सांगितले जातात.

खंडेनवमी या शब्दाची उत्पत्ती खड्ग आणि नवमी या दोन शब्दांपासून झाली असं सांगितलं जातं. खड्ग यायलाच मराठीत खंडा किंवा तलवार म्हणतात. याची पूजा नवव्या दिवशी केली जाते म्हणून याचं नाव खंडेनवमी असं प्रचलित झालं. राजस्थानच्या राजपूत समाजात लढाया करण्याची मोठी परंपरा राहिली आहे. त्यामुळे पांडवांनी केलेल्या शास्त्रपूजेची आख्यायिका तिथे जास्त प्रमाणात पसरली होती असं सांगितलं जातं.

तर अशाच प्रकारे युद्ध करण्याची लढाऊ परंपरा महाराष्ट्राला सुद्धा लाभलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा नवमीच्या दिवशी शस्रास्रांची पूजा करण्याची परंपरा रूढ झाली आणि हीच परंपरा आज खंडेनवमी म्हणून साजरी केली जाते असं जाणकार सांगतात.

खंडेनवमी आणि दसऱ्याच्या परंपरेबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी बोल भिडूने इतिहासकार मंदार लवाटे यांच्याशी संपर्क साधला.  

ते सांगतात की, “पूर्वीच्या काळी पावसाचे चार महिने संपल्यानंतर युद्धाला जाण्याची परंपरा होती. तेव्हा खंडेनवमीच्या मुहूर्तावर शस्त्रांची पूजा करून दसऱ्याच्या दिवशी युद्धावर निघण्याची परंपरा अस्तित्वात होती. त्यामुळे ही परंपरा आली असावी. सोबतच काही भागांमध्ये दसऱ्याच्या आख्यायिकांमुळे त्या दिवशी सुद्धा शस्त्रपूजा करण्याची परंपरा आहे.”

या ऐतिहासिक संदर्भांमध्ये आणखी काही गोष्टी सांगितल्या जातात.

भारतात पूर्वीपासून शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे. पूर्वी तलवारी, भाले यांसारखे पारंपारिक शस्त्र वापरले जायचे. मात्र कालानुरूप त्यात बंदूक, तोफा, रणगाडे यांचा सुद्धा समावेश झाला. तर लढाई करणारे योद्धे स्वतःच्या शस्त्रांची पूजा करायचे त्याचप्रमाणे व्यापारी, कारखानदार, शेतकरी यांनी सुद्धा खंडेनवमीच्या दिवशी स्वतःच्या कामाच्या वस्तूंची पूजा करण्यास सुरुवात केली.

त्यामुळे लोकं घरातील शस्त्रांची, कारखानदार स्वतःच्या कारखान्यातील वस्तू, शेतकरी शेतावर वापरायच्या कुऱ्हाड, खुरपणं इत्यादी वस्तू तसेच दुकांसदार स्वतःच्या दुकानातील काटेपारडे, वहीखाते या वस्तूंची पूजा करतात. 

या शस्त्रपूजेच्या परंपरेवर ‘निर्णयसिंधू’ या ग्रंथाचा प्रभाव असल्याचं सुद्धा सांगितलं जातं.

१६ व्या शतकातील प्रसिद्ध लेखक कमलाकर भट्ट यांनी अनेक ग्रंथांचं लेखन केलं होतं. हे ग्रंथ प्रामुख्याने धार्मिक विधींची माहिती देतात. त्यातच ‘निर्णयसिंधु’ नावाचा एक ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये वेगवेगळ्या धार्मिक विधींसोबतच शस्त्रपूजेचे वेगवेगळे मंत्र सांगितलेले आहेत. या ग्रंथाचा खंडेनवमीच्या परंपरेवर प्रभाव झाला आणि शस्त्रांची शास्त्रोक्त पूजा करण्यास सुरुवात झाली असं सांगितलं जातं.

पौराणिक आणि ऐतिहासिक संदर्भ असलेल्या खंडेनवमीला शस्त्रपूजन आणि कन्यापूजन केलं जातं. मात्र दसऱ्याला दिवशी शस्त्रपूजेसोबतच, कन्यापूजन, शिलंगण, रावणदहन या परंपरा सुद्धा साजऱ्या केल्या जातात. तसेच दसऱ्याला साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानलं जातं त्यामुळे अनेक कामाची सुरुवात आणि सोन्यानाण्याची खरेदी सुद्धा या दिवशी केली जाते. असा फरक या दोन सणांमध्ये आहे.

हे ही वाच भिडू 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.