हा इतिहास आहे, एका भारतीय राजाने पोलंडच्या ६०० मुलांना वाचवल्याचा… 

युक्रेन युद्धात युक्रेनचा शेजारी देश असणारा पोलंड चर्चेत आला. त्याचं कारण म्हणजे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतीय दुतावासाकडून पोलंडच्या सीमेपर्यन्त येण्यास सांगितलं. त्यानंतर मात्र भारतीय विद्यार्थांना पोलंडमध्ये प्रवेश नाकारला जातोय अशा बातम्या आल्या. 

मात्र पोलंडचे भारतातील राजदूत ॲडम बुराकोस्की यांनी ही बातमी स्पष्टपणे नाकारली.

त्यांनी सांगितलं की पोलंड आणि युक्रेनच्या सीमेवर असणारा चेकपोस्ट आहे इथून अचानकपणे लाखांच्या संख्येत लोक जावू शकत नाहीत. त्यामुळेच या चेकपोस्टवर गर्दी आहे मात्र भारतीय विद्यार्थांना प्रवेश नाकारला जातोय यात मात्र काहीच तथ्य नाही… 

साहजिक या बातमीमुळे पोलंड आणि भारताच्या संबंधावर देखील बोलण्यात आलं. याच संबंधाबाबत असणारा इतिहास तुम्हाला आम्ही सांगणार आहोत… 

हा इतिहास आहे एका भारतीय राजाने पोलंडच्या ६०० मुलांना वाचवल्याचा. त्यांना आपल्या मुलांप्रमाणे संभाळल्याचा. यामुळेच या राजांना आजही पोलंडमध्ये गुड महाराजा म्हणून ओळखलं जातं… 

महाराजा दिग्विजय सिंहजी हे गुजरात मधल्या नवानगर च्या संस्थानाचे राजे होते. दिग्विजयसिंह राजे हे मुळातच हूशार होते. त्यांच शिक्षण लंडन येथे झालेलं. ब्रिटीश इंडियन आर्मी मार्फत त्यांनी अनेक युद्धात देखील सहभाग घेतलेला. पण १९३३ साली त्यांचे काका रणजीतसिंह यांचे निधन झाल्यानंतर त्यांना नवानगर चे राजे म्हणून राज्याभिषेक करुन घेतला. त्यानंतरच्या काळात ते चेंबर्स ऑफ इंडियन प्रिन्सेंस चे प्रमुख झाले, तत्कालीन भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झाले. ब्रिटीशांकडून त्यांना सर पदवी देखील मिळाली. 

दूसरीकडे याच काळात युरोपमध्ये हिटलरचा उदय झाला होता.

१९४१ च्या दरम्यान हिटलरने तत्कालीन USSR अर्थात रशियावर हल्ला केला. या हल्ल्याच्या पूर्वी USSR ने पोलंडमधील नागरिकांना शरणार्थी म्हणून जागा दिली होती. मात्र हिटलरच्या हल्ल्यानंतर USSR ने पोलिश नागरिकांना बळजबरीने आपल्या सैन्यात सहभागी करून घेण्यास सुरवात केली. अशा वेळी काही पोलीश नागरिक USSR मध्ये गेले. मात्र उरलेल्या अनेकांनी शरणार्थी म्हणून वेगवेगळ्या देशात जाण्याचा निर्णय घेतला. 

यावेळी निर्वासित असणाऱ्या पोलीस सरकारच्या पंतप्रधानांनी ब्रिटीश पंतप्रधान विस्टन चर्चिल यांना पत्र लिहलं. पोलीश पंतप्रधानांनी अशीच पत्र जगभरातल्या विविध देशात असणाऱ्या आपल्या दूतावासांकडे देखील सोपवली. त्यातलच एक पत्र मुंबईच्या पोलीश दुतावासात आलं. 

या पत्रात किमान आपल्या येणाऱ्या पिढ्यांना तरी वाचवा म्हणून साद घालण्यात आली. 

पण भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लिनलिथगो यांनी मात्र या पत्राला केराची टोपली दाखवली. त्यांच म्हणणं होतं की महायुद्धामुळे आर्थिक संकट निर्माण झालं आहे. अशा वेळी शरणार्थी संभाळण्यास आर्थिकदृष्ट्या शक्य नाही. 

दूसरीकडे नवानगरचे राजे दिग्विजयसिंह हे युद्ध मंत्रीमंडळाचे सदस्य होते. हे मंत्रीमंडळच दुसऱ्या महायुद्धात संस्थानांनी ब्रिटीश सरकारला मदत करण्यासाठी उभारण्यात आले होते. त्यांना आपल्या एका पोलीश मित्राकडून पोलीश मुलांच्या संदर्भात असणारा हा प्रश्न समजला. त्यास व्हाईसरॉय यांचा विरोध असल्याची बातमी देखील समजली. पण व्हाईसरॉय यांच्या विरोधात जावून पोलीश मुलांना भारतात आणण्यासाठी त्यांनी योजना आखण्यास सुरवात केली. 

विरोधाचं कारण फक्त आणि फक्त आर्थिक होतं.

दिग्विजय सिंह यांनी हा प्रश्न सोडवायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी बडोदा आणि पटियाला संस्थानासोबत संपर्क केला. आपल्या माहितीतल्या व्यापाऱ्यांसोबत संपर्क केला आणि मोठी आर्थिक मदत या योजनेला मिळवून घेतली. आर्थिक प्रश्न मिटल्याने व्हाईसरॉय यांचा असणारा विरोध देखील मावळला होता. 

फेब्रुवारी १९४२ साली एक हजार पोलीश मुलं भारतीय भूमीवर उतरली. या मुलांच भविष्य देखील नव्हतं. ईराण, क्वेटा करत ही मुले दिल्लीत आली व दिल्लीतून या मुलांना मुंबईत आणण्यात आलं. इथं या मुलांना तीन महिने ठेवण्यात आलं. 

या दरम्यान ब्रिटीश सरकारने देखील पुढाकार घेतला. यातीलच काही मुले कोल्हापूरच्या गांधीनगर भागात राहिली. काही कराची येथे गेली. तर उरलेली तब्बल ६०० मुले नवानगर संस्थानात दाखल झाली. 

पाच सहा वर्षांपासून ते १४-१५ वर्षांपर्यन्तची ही मुले होती. दिग्विजयसिंह या मुलांसमोर उभा राहिले आणि म्हणाले, 

तुम्ही इथे निर्वासित म्हणून आलेले नाही, आजपासून ही जमीन तुमची. हा देश तुमचा. तुमचं पालकत्व आजपासून मी घेतोय. 

दिग्विजय महाराजांनी या मुलांसाठी एकूण साठ बिल्डींग उभारल्या होत्या. पुस्तकांनी एक लायब्रेरी भरली होती. त्यासाठी महाराजांनी खास पोलीश भाषेतील पुस्तके मागवून घेतली होती. पोलीश मुलांना भारतीय अन्न चालणार नाही म्हणून त्यांच्यासाठी खास जेवणाची सोय केली होती. अगदी आपली मुलगी हर्षदकुमारी ही पोलीश मुलामुलींसोबतच खेळण्याची, राहण्याची परवानगी दिली होती. 

इथे पोलीश मुलं चांगलीच रमली. ती नाटक, खेळ बसवू लागली. भारतातल्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेवू लागली. पुढील तीन वर्षात जगाचा नकाशा बदलला. दूसरं महायुद्ध संपल आणि या पोलीश मुलांना परत पाठवण्याची तयारी सुरू करण्यात आली. पुढे ही पोलीश मुलं आपल्या देशात परतली. 

इकडे भारत स्वतंत्र झाला.

राज्य खालसा झालं आणि दिग्विजयसिंह यांना सौराष्ट्र राज्याचे राज्यपाल करण्यात आले. पोलंडमध्ये कम्युनिस्ट राजवट आल्याने या मुलांना मर्यादा आल्या. त्यांना दिग्विजयराजेंना पुढे भेटला आलं नाही. मात्र १९८० सालापर्यन्त या मुलांना एसोशिएश ऑफ पोल्स इन इंडिया नावाची संस्था उभारली.

या मुलांनी भारताचे विशेषत: दिग्विजय राजेंचे उपकार आयुष्यभर जपले. २०१२ साली पोलंडच्या सरकारने पोलंडच्या वारसॉ बेदनारस्का हायस्कुलचे मानद संरक्षक चा सन्मान देखील दिग्विजयसिंह यांच्या आठवणी जपल्या.

दिग्विजयसिंह यांना मरणोत्तर क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ द मेरिट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पुढे पोलंडच्या राजधानीत एका चौकाला स्वेअर दोबर्गा महाराजजी अर्थात गुड महाराज चौक म्हणून दिग्विजयसिंह यांच नाव देण्यात आलं. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.