महाराष्ट्रात घुसून झेंडा फडकावलेल्या कन्नड रक्षण वेदिका संघटनेचा इतिहास असा आहे

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न हा दोन्ही राज्यातील राजकारणाचा महत्वाचा विषय राहिलाय. पुन्हा एकदा सीमाप्रश्न तापलेला असतानाच कर्नाटकातील कन्नड वेदिका या संघटनेनं आता महाराष्ट्रात घुसून कर्नाटकचा ध्वज फडकवलाय. त्यामुळं हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

सांगली जिल्ह्यातील सीमेवरअसलेल्या उमराणी गावात हा प्रकार घडला.

कन्नड वेदिका या संघटनेचे कार्यकर्ते या गावात आल्यानंतर गावातील ग्रामस्थांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. हे ग्रामस्थ महाराष्ट्रावर नाराज आहेत. जसा हा सीमावाद नवीन नाही तसंच, कन्नड रक्षण वेदिका संघटना चर्चेत येण्याचीसुद्धा ही पहिलीच वेळ नाही. 

मीडियामध्ये कन्नड वेदिका या नावाने चर्चेत आलेल्या या संघटनेचं नाव हे कन्नड रक्षण वेदिका असं आहे. कन्नड रक्षण वेदिका या नावाचा अर्थ ‘आपले कर्नाटक संरक्षण मंच’ असा आहे.

कन्नड भाषेतील लेखक आणि पत्रकार जनागेरे वेंकटरामय्या यांनी कन्नड वेदिका या संघटनेचे स्थापना केली. फक्त कर्नाटकच नाही तर, अमेरिका, लंडन, युएई, सिंगापूर, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सौदी अरेबिया आणि मलेशिया देशांतही संघटनेचे सभासद आहेत.

या संघटनेच्या व्याप्तीचा विचार करायचा झाला तर, 2012 साली या संघटनेच्या सभासदांची संख्या  60 लाख इतकी होती. कर्नाटकातील सर्व जिल्हयात मिळून 12 हजार पेक्षा अधिक शाखा आहेत.

सध्या या संघटनेचे अध्यक्ष हे नारायण गौडा आहेत.

पहिल्यांदा ही संघटना चर्चेत आली ती 2007 मध्ये कावेरी नदीच्या पाणी प्रश्नावेळी. कावेरी नदीतील पाणी हे तामिळनाडू आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये पोहोचवलं जातं. 1991 मध्ये तामिळनाडूला 205 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, 2007मध्ये तामिळनाडूला 419 टीएमसी पाणी देण्यात यावं असा निर्णय आला.

मात्र, हा निर्णय आल्यानंतर केवळ 20 मिनीटांतच कन्नड रक्षण वेदिका संघटनेनं कर्नाटक बंद पुकारला. हा बंद 8 फेब्रुवारी 2007 रोजी होणार होता. पण तसं झालं नाही. हा बंद ठरलेल्या तारखेच्या 4 दिवस नंतर म्हणजेच 12 फेब्रुवारीला झाला.

हा बंद कर्नाटकातील सर्वच जिल्ह्यांत पुर्णपणे यशस्वी झाला.

यावरून या संघटनेची व्याप्ती आणि ताकद किती मोठी आहे हे लक्षात येतं. 2007 मध्येच 4 मे रोजी संघटनेच्या जवळपास 2 लाख कार्यकर्त्यांनी या निर्णयाविरोधात दिल्ली गाठली. त्यावेळचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेऊन इतिहासातील इंग्रज सरकारच्या मैसोरच्या राजघराण्या विरोधातील धोरणामुळे तेलंगणा राज्याला फेवर केलं जातं असं म्हणणं असणारं निवेदन सादर केलं.

यानंतर 2008 मध्ये होगेन्नाकल प्रक्लपावरून संघटना पुन्हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. हा प्रकल्प नेमका काय तर, कावेरी नदीच्या पाण्यातील तामिळनाडू राज्याच्या असलेल्या वाट्यातून पाणी शुद्ध करून ते पाणी पिण्यायोग्य करून ते पाणी धर्मपुरी आणि कृष्णागिरी या जिल्ह्यात पोहोचवलं जाणार होतं.

हा प्रकल्प सुरू झाल्यास कावेरी नदीतील पाण्यामध्ये कर्नाटकच्या असलेल्या वाट्यावर परिणाम होईल असं म्हणत कन्नड रक्षण वेदिका संघटना आक्रमक झाली. कर्नाटकातील बेंगलोरमध्ये ज्या सिनेमागृहांमध्ये तामिळ चित्रपटांचे शो सुरू होते तिथे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली.

यावेळी त्यांनी तामिळ सिनेमांचे पोस्टर्स फाडताना त्यावेळचे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्याविरोधात घोषणाबाजी ही केली. या शिवाय कर्नाटकातील तामिळनाडूच्या बसेस जाळून टाकण्याची धमकीही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिली.

लोकल केबल ऑपरेटर्सवरही दबाव टाकून कर्नाटकात सुरू असलेले तामिळ चॅनेल्स बंद करायला भाग पाडलं. कर्नाटकात कन्नड भाषाच सर्वोच्च असावी यासाठी कन्नड रक्षण वेदिका सतत आग्रही राहिली आहे. कन्नड भाषेसाठी संघटनेच्या आग्रहाचा विचार करायचा तर, तीन वेगवेगळ्या आंदोलनांकडे पाहावं लागेल.

इंग्रजी विरोधातील मोहिम, हिंदीची सक्ती नको यासाठीची परिषद आणि कन्नड भाषा न बोलणाऱ्या डॉक्टरांवरील हल्ला केला होता.

सर्वात आधी पाहूया इंग्रजी विरोधातील मोहिम. महाराष्ट्रात मराठी पाट्यांचा मुद्दा आपण ऐकला आणि पाहिला असेलच. अगदी याच मुद्यासाठी कर्नाटकात कन्नड रक्षण वेदिका संघटना नेहमीच आग्रही असते. दुकानांवरील पाट्या या कन्नड भाषेतच असाव्यात आणि अन्य कोणत्या भाषेचा वापर केला असेल तरी, कन्नड भाषेच्या खाली असावा. या मूळ मागणीसाठी संघटना नेहमीच आक्रमक राहिली आहे.

त्यानंतर मुद्दा आहे तो, हिंदीची सक्ती नको या मागणीचा

2006 मध्ये संघटनेनं एक परिषद बोलावली होती, त्या परिषदेचं मुख्य उद्दिष्ट होतं ते म्हणजे ‘हिंदीची सक्ती नको’. ही परिषद 14 सप्टेंबर म्हणजेच हिंदी भाषा दिना दिवशीच आयोजित करण्यात आली होती.या परिषदेतून ‘हिंदी सक्ती विरोधी दिवस’ म्हणून 14 सप्टेंबर हा दिवस साजरा करण्याचा संदेश संघटनेनं दिला.

2019 मध्ये संघटनेच्या महिला उपाध्यक्षा अश्विनी गौडा यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह मिंटो या रुग्णालयातील डॉक्टर्सवर हल्ला केला. हल्ल्यामागचं कारण होतं की, हे डॉक्टर्स कन्नड भाषेत बोलत नाहीत. या घटनेनंतर कार्यकर्त्यांनी स्वतःला पोलिसांकडे सरेंडर केलं होत. या हल्ल्याचा संपुर्ण देशभरातून निषेध करण्यात आला.

एकंदरीतच या संघटनेचा इतिहास पाहता संघटनेचे कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणावर तर आहेतच पण ते प्रचंड आक्रमकही आहेत. या सगळ्या प्रकाराला महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सरकार काय निर्णय घेईल याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.