बंदुकीच्या धाकात नजरकैदेत असणारे आमदार फोडून हा नेता मुख्यमंत्री बनला होता!

सालं होतं १९७९. जनता पक्षाचं सरकार पडू शकतं म्हणून हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या ४० आमदारांना एका बंगल्यात नजरकैदेत ठेवलं. बाहेर बंदुकधारी माणसं ठेवली. मात्र अश्या कडक पाहऱ्यात आमदारांना फोडून भजनलाल बिश्नोई हे मुख्यमंत्री झाले होते.

भजनलाल यांचा जन्म १९३० ला हरियाणामधील कोरानवाली गावात झाला. गावातील ग्रामपंचायत सदस्यापासून त्यांची राजकीय कारकिर्द सुरू झाली. त्याकाळात ते व्यापारही करत होते. नंतर ते आमदार झाले. १९६८ साली त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

आपल्या कुशल राजनीतीनं भजनलालनं काँग्रेस पक्षात आपलं वजन निर्माण केलं. त्यामुळे  १९७२ च्या विधानसभा निवडणुकीनंतर ते हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आले.

मात्र, त्याच्या अंतर्गंत कुरघोडीमुळं १९७५ साली भजनलालची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी केली गेली.

मात्र भजनलाल राजकारणात कसलेले होते. त्यामुळे राजकीय डावपेंचाचा त्यांना अंदाज होता. त्याच काळात देशात आणीबाणी लागू केलेली. जनतेचा काँग्रेस पक्षावर रोष होता. याचा फायदा उठवत भजनलाल यांनी जनता पक्षात प्रवेश केला.

१९७७ साली निवडणूक झाली. राज्यात जनता पक्षाचं सरकार आलं. देवीलाल चौधरी मुख्यमंत्री झाले. भजनलाल यांना मंत्रीमंडळात मंत्रीपद देण्यात आलं. सगळं आलबेल सुरू होतं. मात्र जनता पक्षाचं सरकार जास्त दिवस टिकणार नाही यांची कल्पना देवीलाल यांना आली.

फोडाफोडी होऊ नये म्हणून त्यांनी आपल्या ४०  आमदारांना एका मोठ्या बंगल्यात नजरकैदेत ठेवलं. बाहेर बंदुकधारी माणसं ठेवली होती

आमदारांना घराच्या बाहेर निघण्याची परवानगी नव्हती. आपल्या बायका, मुलांना भेटायचं असेल तर परवानगी घ्यावी लागायची. मुंगीलाही आत यायची परवानगी नव्हती अशी परिस्थिती होती.

आमदार फुटण्याचा कसलाच चान्स नव्हता. त्यामुळे देवीलाल चौधरी बिनधास्त होते. त्यांना आमदार फुटणार यांची पुसटीशीही कल्पना नव्हती.

भजनलाल मंत्रिमंडळात मंत्री होते. मुख्यमंत्री बनण्याची त्याची महत्वाकांक्षा वाढली होती. त्यामुळे आमदारांना फोडण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. मंत्री असल्यामुळे त्यांना बंगल्यात जाण्याची परवानगी होती. मात्र त्यांच्यासोबत नेहमी बाकीचे मंत्री असायचे. त्यामुळे त्यांची खेळी यशस्वी होत नव्हती. मात्र आमदारांना त्यांचे परिवाराताले लोक भेटायला यायचे. एकांतात त्याच्य़ासोबत गप्पा मारत बसायचे.

भजनलाल व्यापारी असल्यामुळे त्यांना लोकांची नस अलगद पकडता यायची. आपलं म्हणणं पटवून सांगता यायचं.

याचाच फायदा घेत भजनलाल यांनी आमदारांच्या घरच्यांना हाताला धरलं. घरच्यांना गाडी, फ्लॅट देऊ, आमदारांना मंत्रीपद देऊ असं आमिष दाखवलं.

आमदारांचे बायका पोरं जेव्हा बंगल्यावर भेटायला जात तेव्हा नजरकैदेत असणाऱ्या आमदारांना भजनलाल यांनी दिलेल्या आँफर सांगत. त्यांना साथ द्या म्हणून आग्रह करत. या आँफरच्या आमदार विचार करायला लागले. आमदारांमध्ये दोन गट पडले. मात्र दिवसेंदिवस भजनलालच्या आँफर वाढत गेल्या. रात्रभर आमदार विचार करायला लागले.

शेवटी आमदारांचं मन बदललं. अन् ४० आमदारांनी भजनलाल सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना आपला पाठिंबा दिला.

१९७९ साली देवीलाल चौधरी यांचं सरकार पडलं आणि भजनलाल बिश्नोई अशाप्रकारे हरीयाणाचे मुख्यमंत्री बनले.

त्यानंतरही भजनलाल यांची राजकीय कारकिर्द नेहमीच चर्चेत राहिली. कारण १९८० साली देशात पुन्हा उलथापालथ झाली. केंंद्रात काँग्रेस सत्तेत आली. त्यामुळे आपली नौका बुडणार आहे यांचा अंदाज त्यांना आला.

त्यामुळे त्यांनी पुन्हा आपल्या ४० आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि मुख्यमंत्री पदावर कायम राहिले. त्यांनी केलेलं हे पक्षांतर भारताच्या राजकारणातील आत्तापर्यंतचं सगऴ्यात मोठं पक्षातरं म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे नंतरच्या काळात भजनलाल यांना पक्षातंर करणाऱ्यांचे महामेरू म्हणून लोक ओळखू लागले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.