कोरोना परिस्थितीमुळे जगभरातील या नेत्यांना आपली खुर्ची सोडावी लागली आहे….

सध्या भारतात #ResignModi हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंडिंगला आहे. अगदी ट्विटर आणि फेसबुकवर सुद्धा. भारतातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली असल्याचं म्हणत सोशल मीडियावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. फेसबुकने तर हा हॅशटॅग काही वेळासाठी बॅन केला होता, दंगा झाल्यावर पुन्हा सुरु केला.

नरेंद्र मोदींची आज पर्यंतची प्रतिमा बघता ते राजीनामा देतील कि नाही हा वेगळा विषय. मात्र सध्याला आपण जगभरात कोरोनामुळे कोणकोणत्या नेत्यांना आपली खुर्ची सोडावी लागली आहे हे बघू.

या यादीत पहिल्यांदा नाव येत रोमानिया मधून.  

या कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात देशातील परिस्थिती बिघडत चालली होती. रुग्णसंख्या सातत्यानं वाढत होती. हॉस्पिटलवर चांगलाच दबाव होता. देशात टेस्टिंग आणि पीपीए किटची कमतरता होती. उपचारासाठी लागणारी औषध आणि साधन देखील कमी पडत होती. अशावेळी या सगळ्या गोष्टी वाढवण्याची गरज असताना कॅबिनेटमध्ये या मुद्दावरून जोरदार वाद झाला. ६ एप्रिल २०२० ला आरोग्यमंत्री विक्टर कोस्तोचे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

आपलं पद सोडावं लागल्यानंतर त्यांना कारण विचारलं असता सांगितलं कोरोना संकटाच मिस मॅनेजमेंट.

दक्षिण आफ्रिका :

एप्रिल २०२०. देशात जवळपास २१ दिवसांचा लॉकडाऊन लागला होता. या लॉकडाउन दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या माहिती आणि डिजिटल तंत्रज्ञान मंत्र्यांचा एक फोटो व्हायरल झाला. स्टेला नडाबेनी अब्रहम्स आपल्या एका जुन्या मैत्रिणीसोबत बाहेर जेवण्यासाठी गेल्या होत्या. फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर चांगलीच टीका झाली.

राष्ट्रपती सिरिल रामफोसा यांनी अब्राहम्स यांना बोलावून घेतलं आणि त्यांना देशाची माफी मागण्याचे आदेश देण्यात आले. सोबतच त्यांना दोन महिन्यांसाठी मंत्रिपदाच्या जबाबदाऱ्यांपासून लांब ठेवत सक्तीच्या सुट्टीवर पाठवलं, आणि एका महिन्याचा पगार देखील कापला.

न्यूझीलंड :

जुलै २०२० पर्यंत न्यूझीलंडने कोरोनावर चांगलचं नियंत्रण मिळवलं होतं. पण अजूनही लॉकडाऊन हटवलं नव्हतं. डेव्हिड क्लार्क देशाचे आरोग्यमंत्री होते. सामान्य जनतेसाठी निर्बंध असताना ते जून २०२० मध्ये माउंटन बायकिंगसाठी बाहेर पडले. एकदा आपल्या कुटुंबासोबत बीच वर गेले.

झालं या सगळ्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर सरकारवर प्रचंड टीका झाली. सरकारवर दबाव वाढला आणि २ जुलै २०२० रोजी आरोग्य मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

इटली :

मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर एखाद्या देशाच्या पंतप्रधानांचा राजीनामा आला तो इटलीच्या. २६ जानेवारी २०२१ रोजी इटलीचे पंतप्रधान जेसेपी कोन्टे यांनी आपलं पद सोडत असल्याचं जाहीर केलं. कोरोनातून सावरण्यासाठी कोन्टे यांनी आपला प्लॅन सादर केला, पण निधीची तरतूद करण्यासाठी त्यांचे सहयोगी पक्ष तयार झाले नाहीत. एका पक्षाने तर पाठिंबा देखील काढून घेतला.

या सगळ्यानंतर देखील कोन्टे यांना कोरोनाचा प्रसार होण्यासाठी जबाबदार धरण्यात आलं. युरोपमध्ये सगळ्यात भयानक अवस्था इटलीची होती.

अखेरीस चहू बाजूनी होणार विरोध लक्षात घेऊन पंतप्रधान कोन्टे यांनी आपलं पद सोडलं. 

जॉर्डन : 

१३ मार्च २०२१ रोजी जॉर्डनमध्ये एक ह्रदयद्रावक घटना घडली. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे ६ जणांना आपला जीव गमवावा लागला. ते सगळे जण कोरोना बाधित रुग्ण होते. त्यानंतर पंतप्रधानांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले,

मात्र या घटनेची जबाबदारी स्वीकारून आरोग्य मंत्री नादिर ओबेदात यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. 

या घटनेच्या २ आठवड्यानंतर जॉर्डनचे न्याय मंत्री एका रेस्टोरंटमध्ये जेवण करताना दिसून आले. त्यावेळी त्यांच्या आजूबाजूला ९ लोक होते. कोरोना प्रोटोकॉल नुसार सहा पेक्षा लोकांना एकत्र जमण्यास बंदी होती. बातमी बाहेर पसरली तेव्हा टीका सुरु झाली, त्यावर मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिल, सरकारचे नियम फक्त सामान्य जनतेला लागू आहेत. चहू बाजूनी या वाक्यावर टीका झाल्यानंतर न्याय मंत्र्यांना देखील आपलं पद सोडावं लागलं.

पराग्वे : 

मार्च २०२१च्या सुरुवातीला पराग्वेमध्ये सरकारच्या विरोधात लोकांचं प्रदर्शन सुरु होतं. कोरोनाची परिस्थती आटोक्यात आणण्यात सरकार नापास झालं असल्याचा आरोप करत राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची मागणी केली. हिंसक प्रदर्शन देखील झाली. नागरिकांनी आरोप केले कि, सरकारनं परिस्थिती तर नीट हाताळली नाहीच पण, कोरोनामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे.

अखेरीस ६ मार्च रोजी राष्ट्रपतींनी आपल्या संपूर्ण कॅबिनेटला राजीनामा देण्याचे आदेश दिले आणि त्याजागी सर्व नवीन मंत्री आणून बसवले. 

स्लोवाकिया

स्लोवाकियामध्ये पंतप्रधानसमवेत सर्व मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागला होता. कारण होत एक तर कोरोना परिस्थिती हाताळण्यात आलेलं अपयश, आणि रशिया सोबत लसीसाठी केलेला गुप्त करार. पंतप्रधान इगोर मेटोविच यांनी आपल्या सहयोगी पक्षांना कोणतीही कल्पना न देता रशियाची स्फुटनिक – V लस खरेदी करण्यासाठी २० लाख कुप्यांचा करार केला.

स्लोवाकियामध्ये सहयोगी पक्षांचा रशियाची लस खरेदी करण्यास तीव्र विरोध होता. जेव्हा हा गुप्त करार समोर आला तेव्हा सरकारचा विरोध सुरु झाला. हा विरोध शांत झाला तो पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचा राजीनामा घेऊनच.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.