या मराठी माणसाने देशात पिनकोडची सुरुवात केली

जी-मेल, व्हाट्सऍप असं सगळं आल्यापासून पोस्टात पत्र टाकायला जायचे दिवस कधीच मागं पडलेत. पण आज देखील काही ऑनलाईन वस्तू मागवायची झाली तर आपण सगळा पत्ता सांगत असतो. शाळेत शिकवलेला असतो तसा, अगदी नावापासून पिनकोड पर्यंतचा. त्यामुळे पोऱ्याला जरी विचारला तरी त्याला आपल्या गावचा पिनकोड माहित असतोच.

पण तो पिनकोड कधी विस्कटून बघण्याचा प्रयत्न केलाय का? हा काय विषय असतो आणि तो कसा तयार झाला? किंवा याच्या मागं नक्की कुणाचं सुपीक डोकं असेल याचा? असा कधी डोक्याला जरा विचार करायचा त्रास दिला आहे का? नसेल दिला तर आता पण नका देवू. आम्ही सांगतो तो कसा आला आणि कोणी आणला.

ही आयडिया होती श्रीराम वेलणकर या मराठमोळ्या माणसाची.

त्यांनीच पूर्ण भारताला पिनकोडची देणगी दिली आहे.

भारतीय पोस्ट ऑफिसचा जर इतिहास बघितला तर तो जवळपास १५० वर्षापेक्षा जुना आहे. संपूर्ण जगात संवादाच सर्वात मोठं नेटवर्क म्हणून पोस्टला ओळखलं जात. त्यासाठी जवळपास १ लाख ५५ हजार ५३१ पोस्ट ऑफिस कार्यरत आहेत. यात मग अगदी श्रीनगरच्या डल सरोवरात असलेलं तरंगत पोस्ट ऑफिस पण कार्यरत आहे.

आज जरी पत्रांचा जास्त वापर होतं नसला तरी हाच इतिहास पोस्ट विभागाच्या सुवर्ण युगाचा साक्षीदार राहिला आहे.

६०-७० च्या दशकात पत्र आणि तार याशिवाय संवादाचं दुसरं कोणतंच माध्यम नव्हतं. त्यामुळे पोस्ट ऑफिसमध्ये पत्रांचा ढीग लागलेला असायचा. त्या पत्रांवरचे पत्ते वाचून त्यांचं विभागवार सॉर्टींग केलं जायचं. पण त्यात अनेक अडचणी असायच्या. म्हणजे एकसारख्या नावाची माणसं, एकसारख्या नावांची गावं, कधी कोणाचं अक्षर नीट वाचता यायचं नाही तर, कधी कोणाचा पत्ताच चुकीचा असायचा. त्यात देशात भाषांची संख्या जास्त.

हे सगळं टाळण्यासाठी १९७२ मध्ये श्रीराम वेलणकर यांनी PIN म्हणजे पोस्टल इंडेक्स नंबर ही संकल्पना मांडली.

वेलणकर मूळचे रत्नागिरीचे. संस्कृत पंडित, कवी आणि पाली भाषेचे गाढे अभ्यासक होते. काही पुस्तके देखील लिहीली. स्वातंत्र्यापूर्वी इंपिरियल सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा दिली होती. त्यामध्ये ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. पण ते रत्नागिरीची असल्याचा उल्लेख पाहून इंग्रज प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती मागवली. त्यात ते सावरकरांच्या संपर्कात असल्याच आढळून आलं.

त्यामुळेच संशयावरून त्यांना मुख्य पोस्टिंग न देता पोस्ट आणि टेलिग्राफ खात्यात पोस्टिंग देण्यात आली होती. १९७२ पर्यंत या खात्याचे ते अतिरिक्त सचिव झाले होते. त्यावेळी पत्रांच्या गोंधळावर उपाय म्हणून त्यांनी युक्रेन आणि इंग्लंडच्या पार्श्वभूमीवर पिन कोड ही संकल्पना खात्यासमोर आणली.

१५ ऑगस्ट १९७२ रोजी ही पद्धत अंमलात आली. त्यामुळेच वेलणकर यांना या प्रणालीचा जनक म्हणतात.

यानुसार संपूर्ण देश ९ झोन मध्ये विभागला गेला. यातले उत्तर, दक्षिण, पश्चिम, पूर्व असे ८ झोन हे भौगोलिक विभागात विभागले गेले आहेत. तर ९ नंबरचा एक विभाग मिलिट्रीसाठी वापरला जातो.

आता हा पिनकोड कसा वाचायचा याच उदाहरण बघायचं झालं तर,

४१५००१ हा सातारचा पिनकोड आहे. यात पहिला ४ हा अंक पश्चिम विभाग दाखवतो. त्यानंतर १५ हा पश्चिम विभागातल्या महाराष्ट्रातला एक उपविभाग दाखवतो. तर ४१५ हा अंक सॉर्टिंग जिल्हा दर्शवतो, शेवटचे तीन अंक – ००१ हा सातारा जिल्ह्यातल्या हेड पोस्ट ऑफिसचा नंबर आहे.

आज याच पिनकोडच्या सुविधेमुळे पोस्ट ऑफिसच खूप मोठं काम सोपं झालं आहे, शिवाय आपल्या गावाला पण एक सांकेतिक ओळख मिळाली. हे सगळं शक्य झालं ते केवळ एका मराठी माणसामुळे.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.