जगाला या माणसानं सांगितलं रेमडिसिव्हर इंजेक्शन कोरोनावर पण चालू शकतं.

मागच्या वर्षभरापासून संपूर्ण जग कोरोनामुळे ठप्प पडलंय. या काळात जगभरातील करोडो लोकांना याची लागण झाली, लाखोंच्या संख्येनं जवळचे लोक मृत्युमुखी पडले आहेत. मध्यंतरीच्या काही दिवसांमध्ये कोरोना जातोय कि काय असं वाटायला लागलं होतं, पण तस होताना दिसलं नाही. शेवटी दुसरी लाट आलीच.

मात्र या काळात एक दिलासादायक गोष्ट घडली ती म्हणजे कोरोनावर भारतात २ लस आली, आणि तिचं लसीकरण चालू झालं. पण अजूनही यावर खात्रीशीर असं औषध शोधण्याला कोणालाही यश आलेलं नाही.

अशावेळी या रोगाशी लढा द्यायला मागच्या जवळपास वर्षभरापासून एक औषध उपयोगात आणलं आहे ते म्हणजे,

रेमडिसिव्हर

मात्र यातील गमतीची गोष्ट अशी कि कोरोनावर वापरण्यापूर्वी  ‘फेल गेलेलं औषध’ असा ठपका या औषधावर पडला होता.

थोडक्यात सांगायचं झालं तर हिपॅटायटीस सी या रोगावरील औषध म्हणून याचा २००९ ला जन्म झाला होता. हिपॅटायटीस सी हा देखील एक संसर्गजन्य रोग मात्र तो रक्तातून पसरतो. जिलीड सायन्सेस या अमेरिकन कंपनीने खास या रोगावर उपाय म्हणून अनेक महिन्यांच्या संशोधनानं रेमडिसिव्हर हे औषध बनवलं.

पण क्लिनिकल ट्रायल घेतल्यावर कंपनीच्या लक्षात आले की हे औषध हिपॅटायटीस सी साठी काहीही उपयोगाचे नाही. अनेक संशोधकांची मेहनत पाण्यात गेली होती.

पण जिलीड सायन्सेस ही कंपनी जिद्दी होती. त्यांनी याच औषधाला दुसऱ्या कोणत्या रोगासाठी वापरता येईल  का याचे प्रयत्न सुरू केले.

त्यानंतर ५ ते ६ वर्षांचा काळ लोटला. २०१५ साली जगावर इबोला नावाच्या संसर्गजन्य रोगाची महामारी आली. रेमडिसिव्हरचा वापर या रोगासाठी करण्याचे प्रयत्न झाले. सुरवातीला रेमडिसिव्हर इफेक्टिव्ह आहे असं वाटत होतं. जिलीड सायन्सने त्याचं उत्पादन देखील वाढवलं, मात्र दरम्यानच्या काळात दुसऱ्या कंपन्यांची इबोला वरची औषधे आली आणि रेमडिसिव्हर मागं पडलं.

तिसऱ्यांदा मारबर्ग या व्हायरल रोगावर प्रयोग झाले. त्यात देखील रेमडिसिव्हर औषध यशस्वी ठरले नाही.

जिलीड सायन्सेस या कंपनीचे फेल गेलेलं औषध म्हणून रेमडिसिव्हरची चेष्टा झाली होती. पण ही अमेरिकन कंपनी खमकी होती. त्यांनी वाट पाहायचं ठरवलं.

अशातच २०२० हे जगाच्या दृष्टीने दुर्दैवी वर्ष उजाडलं.

खरतरं चीनमध्ये साधारण २०१९ च्या शेवटापासूनच कोरोनाचे रुग्ण सापडायला सुरुवात झाली होती. या देखील एक संसर्गजन्य रोग होता. जिलीड सायन्सेसचे चेअरमन आणि सीईओ डॅनिअल ओ’डे यांनी अधिकाऱ्यांना कामाला लावतं रिसर्च केलं आणि समजलं याची लक्षण आणि मागील ज्या आजारात रेमडीसीवर फेल गेलं होतं त्या आजारांची लक्षण जवळपास सारखी आहेत.

तो पर्यंत अमेरिकेत किंवा जगात कोठेही रेमडिसिव्हर औषधाला लायन्सनं मिळालं नव्हतं किंवा त्याला अप्रूव्ह देखील केलं नव्हतं. 

त्यामुळे यावर क्लिनिकल ट्रायल घ्यायचं असं ठरलं. याची कल्पना नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ एलर्जी अँड इन्फेक्शियस डिसिजचे संचालक आणि वैज्ञनिक डॉ. अँथनी फाउची यांना देण्यात आली. ते देखील यासाठी तयार झाले. डॅनिअल सांगतात, आमची टीम जानेवारीपासूनच फौसी यांच्या मार्गदर्शनात दिवस-रात्र काम करत होती. त्यांना याचे सर्वाधिकार देण्यात आले होते.

क्लिनिकल ट्रायलनंतर साधारण एप्रिलमध्ये डॉ. अँथनी फाउची यांनी जाहिर केलं कि,

रेमडिसिव्हर या औषधाच्या वापरामुळे रिकव्हरी रेट वाढण्यासाठी मदत मिळत आहे. पण तरी देखील नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ एलर्जी अँड इन्फेक्शियस डिसीज औषधाच्या परीक्षणाचा आणि त्यांच्या परिणामांचा अजून सखोल अभ्यास करत आहे.

पण सध्या आम्ही केलेल्या परीक्षणात संकेत मिळत आहेत की, रेमडीसीवर रिकव्हरी होण्याच्या वेळेला जवळपास एक तृतीयांश पर्यंत खाली आणत आहे. म्हणजे १५ दिवसात बरा होणार रुग्ण असेल तर तो केवळ ५ दिवसात बरा होत आहे. हे औषध एका विशेष प्रकारच्या अंजायमला थांबवतो, ज्याचा वापर करून कोरोना व्हायरस शरीरात पसरण्यापासून थांबू शकतो.

अजून देखील या अभ्यासात ३१ टक्के सुधारणा अंदाजित आहे. पण हि गोष्ट देखील अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण हे सिद्ध झालं आहे की,

रेमडिसिव्हर हे औषध कोरोना वायरसला थांबवू शकते. 

त्यानंतर न्यू इंग्लंडच्या जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये १० एप्रिल रोजी प्रसारित झालेले अहवालात प्राथमिक पातळीवर सांगण्यात आलं की, रेमडिसिव्हरच्या वापरानंतर ६८ टक्के रुग्णांमध्ये वैद्यकीय सुधारणा दिसून आल्या. सोबतच त्यांची ऑक्सिजनची पातळी देखील सुधारली होती.

यानंतर हळू हळू संपूर्ण जगात यासंबंधीचे अभ्यास चालू झाले. वेगवेगळे अहवाल प्रकाशित होत गेले. इंडियन एक्सप्रेसच्या ४ मे २०२० च्या वृत्तानुसार एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनानं पण याच्या इमर्जन्सी वापरला मान्यता दिली होती.

त्यानंतर साधारण जून महिन्यात गंभीर कोरोना रुग्णांवर उपचारात हे औषध वापरलं जाऊ लागलं.

सुरवातीला भारतात या औषधांची निर्मिती होत नसल्यामुळे बांगलादेश मधून रेमडिसिव्हर मागवले जात होते.

मात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या देशाला सर्वप्रथम वापर असा नियम करून औषधांचा सर्वच्या सर्व स्टॉक उचलला. अमेरिकेकडे पेटंट असल्यामुळे जगभरात या औषधांची प्रचंड कमतरता निर्माण झाली. मात्र साधारण जुलै महिन्यात सिपला व हिटेरो या दोन कंपन्यांना रेमडिसिव्हरच्या जेनेरिक व्हर्जनला भारतात निर्मिती आणि विक्रीसाठी परवानगी मिळाली.

आता या गोष्टीला ८ महिले लोटले आहेत. तरी देखील भारतात रेमडिसिव्हरचा तुटवडा कायम आहे.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.