आयपीलमध्ये ‘या’ प्लेअरचा १ रन राजस्थानच्या संघाला जवळपास ६.५ लाखांना पडलाय…!!!
टी-२० क्रिकेटमध्ये आणि त्यातही आयपीएलमध्ये कोण कधी हिट होईल आणि कोण कधी फ्लॉप जाईल हे सांगता येत नाही. याच गोष्टीचा दुखद अनुभव आयपीएलच्या या सिझनमध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघाने घेतलाय. कारण इंग्लंडचा ऑल-राउंडर बेन स्टोक याचा प्रत्येक रन या संघाला जवळपास ६.५ लाखांना पडलाय. या वर्षीच्या आयपीएल लिलावामधील सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या बेन स्टोकच्या संपूर्ण सिझनमधील खराब कामगिरीमुळे राजस्थानला हा भुर्दंड सहन करावा लागला.
आयपीलच्या पहिल्या सिझनचा विजेता राहिलेल्या राजस्थानच्या टीमने स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील २ वर्षांच्या बंदीनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन केलं होतं. त्यामुळे त्यांनी संघबांधणी करताना चांगले प्लेअर्स आपल्या टीममध्ये असावेत यासाठी भरपूर पैसा खर्च केला होता. गेल्या आयपीएलमधील ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर’ ठरलेल्या बेन स्टोकला जवळपास १२.५ कोटी रुपये खर्च करून आपल्या संघात समाविष्ट करून घेतलं होतं. मात्र आयपीएलच्या या सिझनमधला हा सर्वात महागडा खेळाडू काही राजस्थान रॉयल्सला पावला नाही. या सिझनमध्ये त्याने खेळलेल्या एकूण १३ सामन्यात स्टोकला फक्त १९६ रन्स काढता आले. म्हणजेच त्याच्या १ रनची किंमत राजस्थान रॉयल्सला साधारणतः ६ लाख ३८ इतकी पडली. बॅटिंग करताना फ्लॉप ठरलेला स्टोक बॉलिंग करतानाही फारसा प्रभावी ठरला नाही, कारण त्याने खेळलेल्या १३ मॅचेसमध्ये त्याला फक्त ८ विकेट मिळवता आल्या. विकेटच्या दृष्टीने विचार केला तर त्याने घेतलेली १ विकेट राजस्थानच्या टीमला जवळपास १ कोटी ५६ लाख रुपयांना पडलीये.
बेन स्टोकला गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये ‘पुणे वॉरीयर्स’ संघाने १४.५ कोटी रुपये मोजून आपल्या टीममध्ये घेतलं होतं. पुण्याकडून त्याने १२ मॅचेसमध्ये खेळताना ३१६ रन्स फटकावले होते तसेच १२ विकेट्स देखील मिळवल्या होत्या. त्यामुळे तो गेल्या आयपीएलमधील ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर’ ठरला होता. यावर्षीच्या आयपीएलमध्ये पुण्याचा संघ खेळत नसल्याने बेन स्टोक लिलावासाठी उपलब्ध होता. लिलावाच्या वेळी स्टोकवर कोण किती बोली लाऊन त्याला आपल्या संघात समाविष्ट करून घेणार याचीच उत्सुकता लागली होती. तेव्हा राजस्थान रॉयल्सच्या संघाने यात बाजी मारताना १२.५ कोटी रुपये मोजून स्टोकला आपल्याकडे घेतलं होतं. परंतु या रकमेच्या तुलनेत स्टोकची कामगिरी फारशी समाधानकारक झालेली नाही, त्यामुळे ‘प्ले-ऑफ’मध्ये स्थान मिळविण्यासाठी सध्यातरी राजस्थानचा संघ झगडताना दिसतोय.