फक्त कोर्टाचे ताशेरेच नाही कोश्यारींना वादग्रस्त राज्यपाल म्हटलं जातं, कारण ही वक्तव्य

राज्याच्या सत्तासंघर्षाचा ११ महिन्यांपासून प्रलंबित असलेला निकाल, सुप्रीम कोर्टानं आज जाहीर केला. या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलासा मिळाला, पण कोर्टानं राज्यपालांनी बोलावलेली फ्लोअर टेस्ट, एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावले यांना व्हीप म्हणून नेमणं बेकायदेशीर असल्याचं सांगितलं. सोबतच तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर ताशेरेही ओढले, त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही कोश्यारींवर टीका केली.

साहजिकच सत्तासंघर्षाचा निकाल लागल्यावर चर्चेत आलेत, भगतसिंह कोश्यारी.

कोश्यारी हे राज्यपाल झाल्यापासून कायम वादात राहिले आणि आता पद सोडल्यावरही हे वाद काय त्यांची पाठ सोडेनात. पण याला जसं राज्यातल्या सत्तासंघर्षावेळी घेतलेली भूमिका कारणीभूत ठरली, तशीच त्यांनी केलेली वक्तव्यही…

भगतसिंह कोश्यारी यांनी केलेली वादग्रस्त वक्तव्य पाहुयात… 

१४ फेब्रुवारीला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यावेळी कोश्यारी म्हणाले होते की,

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं लग्न १० व्या वर्षी झालं होतं. तेव्हा त्यांच्या पतीचं वय १३ वर्ष होतं. त्यामुळे कल्पना करा की, इतक्या लहान वयात एक मुलगा आणि मुलगी लग्नानंतर काय विचार करत असतील? एका प्रकारे तो कालखंड मुर्तीच्या पुढे फुलं वाहण्याच्या, नतमस्तक होण्याइतकाच नव्हे. तर थोडा इतिहासाचा अभ्यास करण्याचा होता.

या वक्त्यव्यानंतर त्यांच्यावर बरीच टीका झाली होती.

सावित्रीबाई फुलेंच्या वक्तव्यानंतर कोश्यारी यांनी औरंगाबादमध्ये २७ फेब्रुवारी २०२२ रोजी श्री समर्थ साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं.

ते म्हणाले होते,

चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? गुरुचं आपल्या समाजात मोठं स्थान असतं, तसंच छत्रपतींनी मला माझं राज्य तुमच्या कृपेने मिळालं आहे, असं समर्थांना म्हटलं होत.

तसेच कोश्यारी यावेळी म्हणाले होते,

सत्ता स्थापनेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी साऱ्या चाव्या समर्थाना देण्याचीही तयारी दर्शविली होती, गुरू मिळणे आवश्यक आहे. कवी कालिदास, कवी तुळशीदास हे सर्वव्यापी आहेत. समर्थ रामदासांचे साहित्यही त्याच तोडीचे आहे पण त्याची व्याप्ती वाढविण्यासाठी आता गुरू शोधावा लागेल असेही ते म्हणाले.

भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना राम मंदिराचा शिलान्यास झाला. तेव्हा समर्थ रामदासांचे नाव आठवत होते. असेही ते म्हणाले होते.

कोश्यारी यांच्या कार्यकाळातील अजून एक वादग्रस्त वक्त्यव्य म्हणजे मुंबईवर केलेली टीका.

कोश्यारी म्हणाले होते,

‘मी अनेक जणांना सांगत असतो, महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबई आणि ठाण्यातून गुजराती लोकांना काढून टाका किंवा राजस्थानी लोकांनाही काढू टाका, जर गुजराती आणि राजस्थानी लोक सोडून गेले तर तुमच्याकडे कोणतेच पैसे उरणार नाही.

मुंबईही आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, पण ती आर्थिक राजधानी म्हणून ओळखलीच जाणार नाही

महत्वाचं म्हणजे ज्या कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी हे मुंबई संदर्भात केलं तेव्हा व्यासपीठावर भाजपचे आमदार नितेश राणे हे सुद्धा उपस्थित होते. यानंतर कोश्यारी यांच्यावर टिका करण्यात आली होती. तेव्हा त्यांनी माफी मागितली होती.

कारगिल विजयी दिवसा निम्मित राजभवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर पातळी सोडून टिका केली होती.

ते म्हणाले होते,

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वत:ला शांतीदूत समजायचे. त्यांच्यामुळे देश कमकुवत झाला आणि बराच काळ तो कमकुवतच राहिला.

अशा प्रकारची टिका कोश्यारी यांनी केली होती. त्यावेळी या कार्यक्रमाला तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे इतर नेते सुद्धा उपस्थित होते.

कोश्यारी यांनी पद सोडलेलं असलं, तरी आजही त्यांची वक्तव्य आणि भूमिका चांगल्याच चर्चेत आहेत.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.